Pages

Monday, August 27, 2012

   स्त्री-इतिहासाच्या’ दृष्टीने.........!


आज भारतामध्ये वैचारिक कृती विभिन्नता कमालीची दिसते. एकीकडे स्त्रीने उच्चाधिकार प्राप्त केलेला दिसतो, तर दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या सधन प्रदेशामध्ये स्त्री-भ्रूण हत्येचे प्रमाण अधिक दिसून यते. स्त्री-पुरुष असमानतेची बीजे इथून पेरली जातात. असेच घडत राहिले तर निसर्गाचा समतोल ढळेल आणि समाज अशांत बनेल. यासाठी विचारपूर्वक स्त्री भ्रूणाला वाढविणे जरुरी आहे. स्त्रीची आजची स्थिती अशी दिसते तेव्हा हजारो वर्षांपूर्वीची स्त्री कशी असेल याची उत्सुकता नक्कीच वाटते. त्यासाठी शिल्पातून स्त्रीचे अवलोकन केले आहे.
पुरातत्त्वशास्त्र म्हणजे प्राचीन मानवाने निर्मित केलेल्या वस्तू आणि वास्तूंचा अभ्यास होय. यामध्ये आदिमानवाने तयार केलेल्या दगडी हत्यारापासून मध्ययुगात बांधलेल्या ताजमहालापर्यंतचा अभ्यास करण्यात येतो. ताम्रपट्ट, प्रागैतिहासिक कालखंड, इतिहासपूर्व कालखंडातील ‘सिंधू’सारख्या संस्कृती, उत्खननशास्त्र, प्राचीन लेण्या, मंदिरे, शिलालेख, ताम्रपट्ट, नाणी, चैत्य, गुफाचित्रे, स्तुप, मूर्ती या सर्वांचा अभ्यास पुरातत्त्वशास्त्र करते.

प्रागैतिहासिक कालखंडाच्या उत्तर पुराश्मयुगातील (Upper Palaeolithic Age) मातृदेवतेची हाडाची प्रतिमा बेलन व्हॅली (उत्तर प्रदेश) येथे सापडली. काळ अंदाजे इ.स.पूर्व ३२००० वर्षे त्यांनतर मध्यश्मयुगातील (Mesolithic) मातृदेवतेची प्रतिमा जावरा, मध्यप्रदेश येथे सापडली. प्राचीन शैलाश्रयामध्ये अनेक मातृदेवतांचे चित्रण आहे. या सर्वांवरून मातृदेवतेस म्हणजे स्त्रीस चांगले स्थान असावे असे वाटते. सिंधू संस्कृतीत मातीच्या अनेक मातृदेवतेच्या प्रतिमा मिळाल्या आहेत. तसेच ब्रांझच्या काही प्रतिमा आहेत. या प्रतिमा पूर्णपणे सालंकृत आहेत. वैदिक कालखंडात ‘स्त्री’ची स्थिती फार चांगली होती. वेदातील अनेक सुक्तांच्या रचना एकट्या ‘स्त्री’ने केलेल्या आहेत. अपला, रोमशा, उर्वशी, लोपामुद्रा सीक्ता अशा विदुषी यज्ञयागसुद्धा करीत. तत्त्वज्ञानाची चर्चा, वादविवाद यात त्या ऋषींना हरवत गार्गी, मैत्रेयी, सुलभा आदींनी ज्ञानाच्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान घेतले होते. बौद्ध कालखंडातील काही विदुषींनी आपली विद्वत्ता सिद्ध केली आहे. प्राचीन आणि मध्ययुगातील स्त्रियांचे पुरातत्वाच्या दृष्टीने अवलोकन करायचे असल्यास मूर्तिशास्त्राच्या अथवा शिल्पशास्त्राच्यादृष्टीने एक वेगळा विचार मांडता येईल. स्त्रीषु पांडित्यम निसर्गदेवः! स्त्रियांची बुद्धिमत्ता ही निसर्गताच असते असे महाकवी कालिदासांनी म्हटले आहे.
पुरातत्वशास्त्राचे सौंदर्य मूर्तिशास्त्राने वाढविलेआहे. मूर्तीचे धार्मिक आणि अधार्मिक असे प्रकार आहेत. वास्तूशोभनासाठी अधार्मिक शिल्पांचा उपयोग केला गेला. मंदिरे, लेण्या किंवा स्तुपाच्या तोरणावर अशी शिल्पे दिसतात. तर देवदेवतांच्या मूर्तीची स्थापना गर्भगृहात (गाभार्‍यात) केलेली असते. तसेच पुष्प, पत्र, वेलबुट्टी, भौमितिक स्वरूपाची नक्षी, निरनिराळे प्राणी, पक्षी यांचा वापर केलेला असतो. अवकाशातून विहार करणारे गंधर्व, किन्नर, विद्याधर, दोन प्राण्यांचे एकत्रीकरण असणारे व्याल यांचा वापर केलेला असतो. अनेक स्त्री-पुरुषांची शिल्पं गायन, वादन करताना दिसतात. या सर्वात लक्ष वेधून घेणारी शिल्पे म्हणजे सुरसुंदरीची शिल्पे! सर्व मूर्ती अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविल्या जात. मूर्तीची उंची, हात-पाय यांची लांबी, चेहर्‍याचे प्रमाण कसे असावे या सर्वांची माहिती लक्षणग्रंथात दिलेली असे, त्यामुळेच या मूर्ती अत्यंत प्रमाणबद्ध शरीराच्या, मोहक चेहर्‍याच्या बनल्या जात. कारण कलाकार लक्षणग्रंथांचा अभ्यास करूनच प्रतिमा बनवत. मंदिराच्या शोभनासाठी अनेक रूपके वापरली गेली आहेत. त्यातील एक महत्त्वपूर्ण म्हणजे सुरसुंदरी होय. सुरसुंदरींना देवांगना, देवकन्या किंवा अप्सरासुद्धा म्हटले जाते. विविध अलंकाराने नटलेल्या या सुंदरी आपल्याच विभ्रमात मग्न असतात.
सुरसुंदरींचे वर्गीकरण खालील प्रकारांमध्ये करता येते.
१) नृत्य आणि वादनात मग्न असतात. आपल्या हातातील निरनिराळ्या वाद्यांचे वादन करीत असतात. आपल्या सौंदर्याचे जतन करण्यासाठी सौंदर्य प्रसाधनात मग्न असणार्‍या सुरसुंदरी २) घरगृहस्थीची कृती करत असणार्‍या सुरसुंदरी ३) प्राण्यांबरोबर सुरसुंदरी ४) काही सुरसुंदरी स्त्रियांमधील बुद्धिमत्ता आणि पराक्रम दर्शवितात. वादन करणार्‍या सुरसुंदरी द्विभंग (शरीरात दोन ठिकाणी बाक) किंवा त्रिभंग (शरीरात तीन ठिकाणी बाक काढून उभ्या)असतात त्यांच्या गळ्यात किंवा हातात एखादे वाद्य असते आणि मन लावून त्या वाद्य वाजवित असतात. वस्त्र आणि आभूषणाने त्या सजलेल्या असतात. मृदंग, बासरी, खंजरी, शहनाई, एकतारी, ढोल, वीणा, झांज अथवा टाळ अशी वाद्ये वाजवण्यात त्या मग्न असतात. नृत्यशास्त्रात प्रविण असणार्‍या काही सुरसुंदरी नृत्याचे वेगवेगळे प्रकार दाखविण्यात निमग्न असतात. यामध्ये शास्त्रीय नृत्य आणि कदाचित लोकनृत्यही असावे. आपल्या नुपूराच्या झंकाराने संपूर्ण सभा स्तंभित करणार्‍या नर्तकीची कित्येक उदाहरणे आपणास मिळतात. सुरसुंदरी नृत्यासाठीची तयारी करण्यात निमग्न असतात, म्हणजे पायात नुपूर घालताना दिसतात. सौंदर्य प्रसाधन करणार्‍या सुरसुंदरीत पहावयास मिळणारे सुरेख शिल्प म्हणजे ‘दर्पणा’ होय. हातामध्ये आरसा घेऊन आपल्याच रूपाला निरखणारी सुंदरी म्हणजे ‘दर्पणा’ होय. कर्णभूषणे घालणारी सुंदरी काही ठिकाणी आपणास दिसते. एवढेच नव्हे तर हातात सौंदर्यप्रसाधने घेऊन चेहर्‍याला लावणार्‍या सुंदरी दिसतात. त्यामध्ये ओष्टशलाका (लिपस्टीक) हातात असणारी शिल्पे आहेत. डोळ्यामध्ये काजळ घालणारी सुरसुंदरी असते. तिच्या हातात एक ‘कज्जलशलाका’ असत. तसेच पायाला आळिता लावताना काही जणी असतात. काही स्त्रिया केशरचना करत असतात. प्राचीन आणि मध्ययुगीन स्त्री शिल्पांच्या केशरचनेत वैविध्य पुष्कळ आहे. आधुनिक ब्युटिशियन्सनी याचा अभ्यास जरूर करावा. काही मंदिराच्या भिंतीवर देवाला दोन्ही हात जोडून नमस्कार करणारी सुंदरी दिसते. तर काही ठिकाणी हातात चामर घेऊन देवाला वारा घालणारी सुंदरी असते. हातात जलकलश किंवा फूल घेऊन देवदर्शनाला जाणार्‍या सुंदरी दिसतात. त्यांना जया, पद्मगंधा म्हणतात. तसेच झाडाची एक फांदी वाकवून प्रियकराची अथवा पतीची वाट पाहणारी ‘शालभंजिका’ असते किंवा झाडावरची फुलं तोडण्यासाठी तिच्या हातात परडी असते. पती किंवा प्रियकरावर रुसलेली ‘मानिनी’ काही ठिकाणी असते. तिच्या चेहर्‍यावर रुष्ट भाव दाखविण्यात कलाकार यशस्वी झाला आहे. याशिवाय दोन्ही हात वर करून आळस देणारी ‘आलसा’ बर्‍याच मंदिरावर दिसते.
स्त्री बर्‍याच मंदिराच्या मंडोवरावर (बाह्यभिंतीवर) आपल्या पुत्रास किंवा पुत्रीस कडेवर घेऊन अतिशय प्रेमाने वात्सल्यपूर्ण नजरेने त्याच्याकडे पाहणारी माता दिसते. स्त्रीचे सर्वात जास्त प्रेम तिच्या मुलीवर अथवा मुलावर असते. माता आपले सर्वस्व पणाला लावते ते फक्त आपल्या पाल्याला मोठे करण्यास आणि तिच भावना शिल्पाच्या मुखावर आणण्याचा शिल्पींचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. साधारणपणे गोजिरवाणे मूल आईच्या कडेवर बसलेले असते आणि आपल्या चिमुकल्या हाताने आपल्या आईचा दंड पकडलेला असतो. मातृप्रेमाचे हे शिल्प अत्यंत लोकप्रिय होते. ‘क्षीरार्णव’ या ग्रंथात या शिल्पास ‘पुत्रवल्लभा’ असे म्हटले आहे. काही शिल्पांमध्ये सुरसुंदरी या पक्षी आणि प्राण्यासोबत मिळतात. ‘शुकसारिका’ या सुरसुंदरीच्या एका हातात फळाचा घोस असतो तर दुसर्‍या हातावर पोपट बसलेला असतो. काही सुरसुंदरी खेळामध्ये मग्न असतात त्यातील एक ‘कुंदक क्रीडामग्ना’ नावाची सुंदरी चेंडू खेळताना दिसते. चेंडूफळी (क्रिकेट) हा खेळ कित्येक शतकाआधी भारतात खेळला जात होता हे इथे सिद्ध होते.
विंचू, नाग, सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांचा धाडसाने प्रतिकार करताना सुरसुंदरी दिसतात. आधुनिक काळात स्त्रिया झुरळाला घाबरतात असे वर्णन करण्यात येते. परंतु स्त्रिया हिंस्र श्वापदालासुद्धा धैर्याने तोंड देत असत असे दिसते. सापाला हातामध्ये पकडून त्याला काबूत ठेवून उग्रपणे त्याच्याकडे पाहणारी सुरसुंदरी आपणास मार्कंडेय मंदिर (गडचिरोली) येथे मिळते. पानगाव ता. लातूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या मंडोवरावर असणार्‍या सुरसुंदरीने एका हातात नाग धरला आहे तर दुसर्‍या हातात मुंगूस! एकमेकाचे वैरी असणारे प्राणी केवळ या ‘स्त्री’मुळे मित्र झाले आहेत. यावरून सर्वांना सामावून घेण्याची म्हणजेच ‘स्त्रीची सर्वसमावेशक क्षमता’ स्पष्ट होते. काही मंदिरावर ‘विन्यासा’ नावाचे स्त्रीरूप दिसते. सर्वसंग परित्याग करून अध्यात्म मार्गाकडे वळलेल्या स्त्रीच्या चेहर्‍यावर भाव अतिशय गंभीर दिसतात. ती आभूषणविरहित असते. केस ‘जटाशी’ साधर्म्य साधणारे असतात. विरक्त अशा संन्याशिणी वाटतात.
आज जगाच्या पाठीवर सर्वत्र स्त्रीच्या सौंदर्याची मोहकतेची, कमनीयतेची म्हणजेच स्त्रीदेहाची चर्चा असते. परंतु तिची बुद्धिमत्ता तिचा पराक्रम, धैर्य झाकून टाकले जाते. तिच्या बुद्धिमत्तेचे आणि पराक्रमाचे पुरावे या लेखाद्वारे समोर आणणे हा या लेखाचा प्रमुख उद्देश आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पराक्रमी स्त्रियांची अनेक शिल्पे दिसतात. त्यांच्या हातात वेगवेगळी आयुधे असतात. या शिल्पांना विविध नावे दिली गेली आहेत.
स्त्री शिक्षणाचे पुरावे आपणास वैदिक कालखंडात मिळतात. परंतु नंतरच्या कालखंडात मात्र हळूहळू स्त्रियांना शिक्षणापासून दूर केले गेले. नंतर विसाव्या शतकात स्त्रियांना शिक्षणाची दारे अनेक समाजसेवकांनी उघडी करून दिली हे सत्य असले तरी सुद्धा साधारण ९ व्या ते १३ व्या शतकामध्ये निर्माण झालेल्या मंदिरांच्या बाह्यांगावर ‘लेखिका’ नावाची सुरसुंदरी असते. स्त्रियांना लिहिता वाचता येत होते याचा धडधडीत पुरावा आपल्यासमोर आहे. या सुरसुंदरीस ‘क्षीरार्णव’, ‘शिल्पप्रकाश’ या ग्रंथात पत्रलेखिका म्हटले आहे. परंतु याही पुढे जाऊन असे म्हणायला काहीच हरकत नाही की त्या ज्ञानी होत्या आणि ग्रंथ निर्मितीही त्यांच्याकडून झाली असावी. स्त्री शिक्षणाचा उत्कृष्ट पुरावा आपल्याला पहावयास मिळतो. या सुरसुंदरी लातूर, कोरवली (सोलापूर) धर्मपुरी, खिद्रापूर आणि महाराष्ट्राच्या इतर अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात. बुद्धिमत्तेबरोबर स्त्रिया पराक्रमी होत्या याचा पुरावा वाङ्मयात मिळतो. इंद्रसेना मुद्गलानी युद्धात भाग घेऊन गाईचे अपहरण करणार्‍यांचा पतीच्या मदतीने पराभव केला. विश्पला नावाच्या स्त्रीचा पाय युद्धात तुटला होता, तेव्हा अश्विनीने तिला पाय बसविला असे ऋग्वेदातील ऋचेवरून कळते. म्हणजे स्त्रिया युद्धात पारंगत होत्या हे सिद्ध होते आणि त्यापेक्षाही महत्त्वपूर्ण पुरावा शिल्पामधून दिसून येतो. ‘शिल्पे इतिहास स्वतःच्या तोंडून सांगतात’ याची अनुभूती या सुरसुंदरींना पाहिल्यावर येते. योद्धा स्त्रियांची अनेक उदाहरणे आपणास माहीत आहेत.
शत्रूमर्दिनीची दोन उत्कृष्ट शिल्पे वरकुटे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे पहावयास मिळतात. त्यापैकी एक सुरसुंदरी उजवा पाय जमिनीवर रोवून उभी आहे, तिने डावा पाय वर उचलला आहे. तिच्या उजव्या हातात बर्ची आहे आणि अतिशय आक्रमकपणे ती शत्रूवर चाल करून जात आहे असे दृश्य आपणास दिसते. कानात कर्णकुंडले, गळ्यात हार, दंडात केयूर (बाजूबंद), हातात कंकण, कमरेला मेखला, पायात नुपूर आदी अलंकाराने आणि वस्त्राने सुरसुंदरी नटली आहे. तिची केशरचना चक्राकार (अंबाडा) आहे. तिच्या चेहर्‍यावर रौद्रभाव दाखवण्यास शिल्पी यशस्वी झाला आहे. दुसरी ‘शत्रूमर्दिनी’ची वस्त्राभूषणे वरीलप्रमाणेच आहेत, परंतु दोन्ही पायात किंचित बाक आणून ती उभी आहे. तिच्या उजव्या हातात बर्ची आहे आणि ती शत्रूवर वार करण्यासाठी दबा धरून बसली आहे असा भास होतो.
आक्रमण करणार्‍या सिंहाला धनुष्यबाणाचा नेम धरून मारत असणारी एक सुरसुंदरी आहे, तिच्या चेहर्‍यावर अनुपम आत्मविश्वास दिसत आहे. तिने डावा पाय वर केला आहे. पाठमोरी वळून तिने सिंहावर नेम धरला आहे. विविध वस्त्र, आभूषणाने ती नटली आहे. या शिल्पातील स्त्री फक्त सुंदरच नव्हे तर ती अत्यंत पराक्रमी आहे. संकटाचा सामना करण्यास ती समर्थ असल्याचे दिसते. दुसर्‍या एका सुरसुंदरीने डावा पाय गुडघ्यातून वाकून जमिनीवर रोवला आहे तर उजवा पाय वर उचलला आहे. तिच्या दोन्ही हातात खड्ग (तलवार) आहेत. खड्ग फिरवत फिरवत शत्रूला नामोहरण करण्याचा प्रयत्न ती करत आहे असे दिसते. तिच्या चेहर्‍यावर गंभीर भाव दिसत आहेत. माथ्यावर तिने केसाचा अंबाडा बांधला आहे. कानात चक्राकार कुंडले आहेत. गळ्यामध्ये नाना स्वरूपाच्या माळा शोभत आहेत. डोळ्यापासून पायाच्या बोटापर्यंत आभूषणानेयुक्त अशी सुरसुंदरी आहे. बुद्धिमत्ता आणि पराक्रम यांचे अतुलनीय मिश्रण स्त्रियांमध्ये दिसते. ते सुरसुंदरीच्या शिल्पाद्वारे सिद्ध होते. अशा सुरसुंदरी महाराष्ट्रात निलंगा, पानगाव, कुडलसंगम, कोरवली, वरकुटे, माणकेश्वर, होट्टल, खिद्रापूर, मार्कंडेय इत्यादी गावातील मंदिरावर आढळतात. प्राचीन आणि मध्ययुगीन स्त्रियांचे एक आगळेवेगळे रूप ‘स्त्री-इतिहासाच्या’ दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
----

डॉ. माया ज. पाटील-शहापूरकर
प्रा. भा. इ. सं. आणि पुरातत्वशास्त्र विभाग,
सामाजिकशास्त्रे संकुल,
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
चलभाष ः ९८६०५६१९६४
mayajagdish@hotmail.com

No comments: