

बिगर आदिवासींच्या साहित्यात खूप विसंगती
कॉ.नजूबाई गावित यांचे प्रतिपादन
दि. 31 सप्टेंबर 2010
पुणे/प्रतिनिधी
देशात आणि राज्यातही खऱ्या अर्थाने आदिवासी समाजावर साहित्य लिहिलं गेलेलं नाही, परंतु ज्या बिगर आदिवासी साहित्यिकांनी आदिवासींबद्दल जे साहित्य लिहिलं त्यात मोठया प्रमाणावर विसंगती आहेत. आदिवासींचं अस्सल साहित्य त्यांच्या कला, नृत्य, वाद्य, कलेत विविध स्तरावर विखुरलेले असल्याचं प्रतिपादन आद्य आदिवासी व स्त्रिसत्तेच्या कादंबरीकार कॉ.नजूबाई गावित यांनी केलं
भारतातील नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील एकमेव असलेले प्राच्यविद्यापंडित तथा दार्शनिक कॉ. शरद पाटील यांच्या "प्रिमिटिव्ह कम्युनिझम मॅट्रिआर्की-गायनॉक्रसी ऍण्ड मॉडर्न सोशॅलिझम' खंड 4 च्या प्रकाशन सोहळया प्रसंगी त्या बोलत होत्या.
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी युनिव्हर्सलचे कार्पोरेश(अमेरिका) प्रमुख किशोर देशपांडे, पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे प्रा. प्रदीप गोखले, संस्कृततज्ज्ञ तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे , प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद् पाटील आणि मावळाई प्रकाशनाचे प्रमुख डॉ. सुभाष गवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, आदिवासींच्या सर्व देव-देवता या दगड-गोटयाच्या बनलेल्या आहेत,
आम्ही आत्ताच गुजरातमधील डांगमध्ये जाऊन आलो, त्या ठिकाणी शबरीचे मंदीर काही लोकांनी बनविले आहे, ते देवूळ आदिवासींचे बिल्कुल नसून पांढरपेशी लोकांचे आहे, त्याचा आणि शबरीचा काहीही संबंध नाही. कारण आमच्या शबरीचा अवतार असा असूच शकत नाही. रामाने शबरीचे बोरे खाल्ले असे वैदिकांनी म्हटले असून ते पूर्णपणे खोटे आहे. ती त्यावेळी तिथल्या स्त्रीसत्ताक राज्याची राणी होती, हे अजूनही लोकांच्या स्मृतीत असल्याच्या कथा ते एकमेकांना सांगतात. जिथं जातीव्यवस्थेमध्ये आम्हाला उच्चवर्णिय चपलाच्या जवळही ठेवत नाहीत, तिथं बोरे खाण्याचा प्रश्न येतो कुठे? रामायण काळ असो की, आजचा काळ इथं अजूनही जातिव्यवस्था "जशीन् तशीच हाय' हे आपण मान्य केले पाहिजे. कॉ. शरद् पाटील यांनी मानव समाजाचा इतिहास सुरुवातील स्त्री सत्तेपासून पितृसत्तेपर्यंत व पुढे वर्ण आणि जातीव्यवस्थेपर्यंत कसा विकसित होत गेला हे आपल्या आयुष्यभराच्या संशोधनातून सांगितलं.
युनिव्हर्सल कार्पोरेशनचे प्रमुख किशोर देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाची सुरुवात सिंह आणि मानवाच्या एका कथेपासून केली. ते म्हणाले की, कॉ. शरद् पाटील यांनी निर्माण केलेले संशोधन हे पाच दशकातील तत्वज्ञानाच्या विकासातील एक महत्वाचा जागतिक टप्पा म्हणून ओळखले जाईल. त्यांनी 30 वर्षांपूर्वी वर्णवाद्यांना दिलेले आव्हान आजतागायत कायम असून त्यांच्याकडून अजूनही या आव्हानाला त्यांना उत्तर देता आले नाही. आपल्या देशात मार्क्सवादी विचारधारा जी एकप्रवाही आहे, ती कॉ. शरद् पाटील यांनी मार्क्सवादी-फुले-आंबेडकरवादी या विचाराच्या संयोगाने बहुप्रवाही केली. त्यानंतर याची मर्यादा लक्षात घेऊन पुढे सौतांत्रिक मार्क्सवादाची निर्मिती केली. यामुळेच त्यांचा हा चवथा खंड त्यांनी चीन, क्युबा, रशिया येथील क्रांतिकारी आणि समाजवादाच्या शोधात असणाऱ्या लोकांना अर्पण केला ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे असे सांगत शरद् पाटील यांचे संशोधन हे जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख कशी निर्माण करते हे स्पष्ट केले.
डॉ. प्रदीप गोखले यांनी "प्रिमिटिव्ह कम्युनिझम मॅट्रिआर्की-गायनॉक्रसी ऍण्ड मॉडर्न सोशॅलिझम' खंड 4 च्या पुस्तकाचे विमोचन केले. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत जात्यान्तासाठी नवे तत्वज्ञान कसे विकसित करण्यात आले आहे हे त्यांनी सविस्तर मांडले.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ संशोधक तथा संस्कृतपंडित डॉ. आ.ह. साळुंखे यांनी यावेळी सांगितले की, कॉ. शरद् पाटील यांनी भारतीय समाज रचनेच्या तत्वज्ञानाच्या चिंतनात अतिशय श्रेष्ठ दर्जाचे योगदान दिले असल्याने आपण त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो. ते या ग्रंथात सिंधू संस्कृतीतल्या निर्ॠती या आद्यमाता हिचे विवेचन करीत तो स्त्रीसत्ताक आणि मातृसत्ताक परंपरेचा प्रवाह आधुनिक काळाकडे घेऊ येतात. त्यांनी या ग्रंथात ब्राह्मणी आणि अब्राह्मणी या विचारप्रवाहाचे वर्णन कॉन्शस आणि अनकॉन्शस हे शब्द नव्याने वापरुन नव्या तत्वज्ञानाचा विकास केला असल्याचं डॉ. साळुंखे यांनी सांगितलं.
मंचकावर मणिपूरमधील आदिवासींच्या मानवी हक्काबाबत गेल्या दहा वर्षांपासून उपोषणला बसलेल्या इरोम शर्मिला चानू व चीनमध्ये लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लिऊ झिबाओ यांच्या प्रतिमा लावल्या होत्या.या दोन्ही व्यक्तींनी लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी उभारलेल्या लढयाची माहिती कॉ. शरद् पाटील यांनी आपल्या मनोगताच्या सुुरुवातीला सांगितली. मंचावर आणि त्यांच्या 4ध्या खंडाच्या पृष्टावर लावलेल्या देवी हरितीबाबत ते म्हणाले की, देवी हरितीचे हे शिल्प इंडो-ग्रिक काळात तयार झाले असून जगातील मातृदेवतेचे हे सर्वात सुंदर असलेले एकमेव शिल्प आहे. हरिती ही निसर्ग देवता आणि भूमाता असल्याचे मी सिध्द केले. आपटयांच्या डिक्शनरीत तीचा उल्लेख नाही. आपल्या देशात मातृसत्ता होती. आद्यधर्मसूत्रकार हारीत याने तिला आपली माता म्हटले होते. हारीतने या भूमातेचे कायदे काय होते याचे वर्णन केले आहे. त्याचे धर्मसूत्र वैदिकांनी लपवून ठेवले असले तरी त्याची विचारधाना त्यांना लपविला आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज दलित साहित्य हे ब्राह्मणी चळवळीला शरण गेलेले असल्याचे सांगत त्यांनी जिथे प्रतिक्रांतीला रोखण्यासाठी जिथे बाबासाहेब थांबले तिथून आम्हाला पुढे जायचे की, नाही हा प्रश्न आता प्रत्येकांनी विचारला पाहिजे कारण प्रतिक्रांती आता आक्रमक पावले टाकत आहे. अशावेळी सगळयांनी एकत्र येवून जात्यांतक लोेकशाहीची पूर्वतयारी करण्याची गरज असल्याचे आवाहन केले. जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांनी साडेचार लक्ष एकर जमिनीपैकी सव्वा दोन एकर जमिनी भूमिहिनांना वाटल्या. असेच राज्यात आदिक सरकारने पुणे जिल्ह्यात भूमिहिनांना जमिनी वाटल्या होत्या. आज देशात समाजवादाची नवउभारणी करायची असेल तर देशात दोन कोटी 10 लाख हेक्टर जमीन शिल्लक असून तिच्या फेरवाटपाची मोठी गरज आहे. यासाठी येत्या काळा आपण सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या चार जिल्ह्यात भूमिहिनांची परिषद आयोजित करणार आहोत. जात्यांतक लोकशाहीसाठी जमिनीच्या फेरवाटपाचे हे आंदोलन देशभर करावे लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांनी पावरी या आदिवासी वादनाचा निनाद परिसरात घुमविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. किशोर मांदळे यांनी केले तर प्रस्ताविक कॉ. रविंद्र घोगरे यांनी केले.