Pages

Monday, February 20, 2012



शिवरायांचे स्त्री विषयक अलौकिक धोरण!
(19-02-2012 : 00:09:25)   Share
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=EditorialEdition-16-1-19-02-2012-cce4b&ndate=2012-02-19&editionname=editorial 

यशवंत, किर्तीवंत।
सार्मथ्यवंत, वरदवंत।।
पुण्यवंत, नितीवंत, जाणता राजा।।
या भुमंळाचे ठायी। धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्रधर्म राहिला काही तुम्हा कारणे।।

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनच एवढे भव्य आहे की त्याचे जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडेच होईल. ते एकाच वेळी दृष्टे, स्वातंत्र्य योद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तीदाते, युगपुरूषोत्तम होते. त्यांच्या कुठल्याही गुणाला त्यांच्या काळातच नव्हे तर आताच्याही कित्येक शतकात तोड नाही. असा हा राजा केवळ पुण्यवंत राजाचं नव्हता तर तो आदर्श नितीवंत राजा होता.. 
 त्याच्या अनेक गुणांपैकी एक आदर्श असा गुण म्हणजे त्यांचे स्त्रीविषयक अलौकिक धोरण!
ज्या काळात शिवराय जन्मले तो काळ सरंजाम शाहीचा काळ होता. त्या काळात स्त्रीला माणूस म्हणून जगणे म्हणजे केवळ दिव्य होते. चारही बाजूला अंधाधुंदी होती. केवळ काही मराठी सरदार आणि सरंजामदार यांच्या स्त्रिया पडद्यामागे सुरक्षित होत्या! पण सर्व सामान्य स्त्रियांबाबत स्थिती म्हणजे कुणीही लांडग्याने यावे अन् अब्रू घेऊन जावे अशी अपमानास्पद परिस्थिती, अशा या सरंजाम शाहीच्या काळात सर्वसामान्य जनतेपैकी कुणाचीच संपत्ती आणि स्त्री सुरक्षित नव्हती!.. या काळात १९ फेब्रुवारी १६३0 रोजी एक दिव्याने जन्म घेतला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! लहानपणापासूनच जीजाऊंनी शिवरायांना चारित्र्याचे, शुरतेचे धडे दिले. जीजाऊंनी तत्कालीन परिस्थिती अनुभवली होती, पाहिली होती त्यामुळे शिवरायांना लहानपणापासून त्यांनी असे घडवले की ते युगपुरूषोत्तम ठरले! कारण जगात पराक्रमी राजांची कमतरता नव्हती पण जे पराक्रमी होते ते चारित्र्यसंपन्न होतेच असे नाही आणि जे चारित्र्यसंपन्न होते ते पराक्रमी होतेच असे नाही आणि जे चारित्र्यसंपन्न होते ते पराक्रमी होते असेही नाही पण शिवराय मात्र केवळ अपवाद ठरले! पुरोगामी जगाच्या इतिहासातील हे केवळ एकमेव उदाहरण! परस्त्री मातेसमान मानणारे राजे चारित्र्यवान आणि नितीवंत ठरतात ते याच मुळे! त्यांनी आपल्या संपूर्ण हयातीत परस्त्रीस माते समान, मुलीसमान दर्जा दिला. स्त्रियांना पूज्य मानले इतकेच नव्हे तर स्वत: आदर्श न्याय व्यवस्था स्थापन करून स्त्रियांना भोगवस्तू, त्यांचा उपर्मद किंवा त्यांच्या अब्रू लुटणार्‍यांना अत्यंक कडक शिक्षा फरमावल्या इतकेच नव्हे, तर त्याची काटेकोर अंमलबजावणीही केली.
रांझ्याच्या पाटलाची गोष्ट ही सर्वश्रुत आहे. रांझे गावचा पाटील बाबाजी गुजर याने गावकीतल्याच एका गरीब शेतकर्‍याच्या तरूण मुलीला दिवसाढवळय़ा सर्वासमक्ष पळवून तिच्यावर बलात्कार केला, अब्रुच्या भीतीने तीने जीव दिला! सारा गांव हळहळता पण मुकाच राहिला!.. पण शिवरायांच्या काही ही गोष्ट आली. ते सालं होतं १६४५ आणि शिवरायाचं वय होत केवळ पंधरा वर्षे परंतु या वयातही शिवरायांनी मुजोर बाबाजी गुजरला पकडून आणले. खटला चालवून बाबाजी गुजर या पाटलांचा चौरंग केला. चौरंग करणे एक हात पाय कलम करणे, विचार करा ही शिक्षा जर आजच्या काळात अमंलात आणली तर काय होईल! परंतु याच शिक्षेमुळे सार्‍या मावळ खोर्‍यावर एक प्रकारची दहशत बसली. रयत लहानग्या शिवरायांवर अक्षरश: खुश झाली. स्त्रियांच्या अब्रु रक्षणाबाबत जर शिवराय असे धोरण अवलंबत असेल तर त्यांच शिवबांसाठी रयत काहीही करायला तयार झाली. शिवरायांचे वय १५ वर्षांचे पण त्यांच्या याच न्याय स्वभावामुळे अनेक मराठे त्यांच्या फौजेत नुसते सामीलच झाले नाही तर मरायला सिद्ध झाले. कारण ज्यांच्या पाठबळावर राजांनी राज्य करायचं त्या वतनदार, पाटील, देशमुख आदी मंडळीची सुद्धा गय न करता त्यांना शिक्षा करायची धमक शिवरायांच्या ठायी होती. गुरूवार २६ जाने १६४५ राच दिवशी रांझ्याच्या पाटलाला शिक्षा दिली गेली आणि इथूनच एका क्रांतीची सुरूवात झाली..
शिवरायांनी आपल्या मावळय़ांना, सरदारांना, अधिकार्‍यांना तात्काळ हुकुम जारी केले. लढाईत, लुटीत किंवा इतर कोणत्याही समयी कुठल्याही धर्माची स्त्री हाती आली तर त्या स्त्रीस तोशीस लागता कामा नये. आपल्या मातेप्रमाणे, बहीणीप्रमाणे तिचे रक्षण करावे. त्या काळात हिंदु-मुसलमान, राजे रजवाडे, लढाईस जाताना, कुटुंबकबीला, कलावंतीणींना नेण्याची प्रथा होती पण शिवरायांनी ही प्रथा पूर्ण बदलून काढली आणि हुकुम जारी केले की लढाईस जाताना सोबत, बायको, बटकीण अथवा कलावंतीण नेऊ नये तसे केल्याचे कोणी आढळल्यास त्यांची गर्दन मारण्यात यावी. त्यामुळे झाले काय की, सैनिकांनीही राजाचेच अनुकरण केले आणि हुकुमाचे पालन थेट राजामहाराजांच्या काळापर्यंत पूणे पेशव्यांनी मात्र या हुकुमांना हरताळ फासला आणि सार्‍या भारतवर्षांने त्याचे परिणाम भोगले.

आबाजी सोनदेवाची हकालपट्टी :
कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट ही शिवरायांचा स्त्री विषयक दृष्टीकोण सांगण्यासाठी प्रमाण मानली जाते! कल्याण खजिना लुटीमध्ये आबाजी सोनदेवाने केलेल्या घरपकडीत सुभेदाराची सून, मुलगा व ते सुभेदार सापडले, मुसलमान असल्याने आणि स्वत:च्याच कार्यपद्धतीमुळे पुढे काय होणार याचे स्पष्ट चित्र त्यांना दिसू लागतो. जीवाची श्‍वाश्‍वती नव्हतीच पण आता आपली सून, आपली बायको जनानखान्यात कोंबली जाणार याच भीतीने हे सरदार पिता पुत्र थरथर कापत उभे होते. ते साल होतं १६५७! २४ ऑक्टोबर १६५७ रोजी या तिघांना शिवरायांसमोर उभे करण्यात आले. शिवरायांनी मिळालेली लूट स्वराज्यासाठी जमा करण्यास सांगितली आणि या दोन्ही पिता पुत्रांना बाईज्जत सोडून दिले.. पण आबाजीने जेव्हा अजून एका कैद्याचा फैसला व्हायचा आहे असे सांतिले तेव्हा त्या लावण्यवती सूनेस शिवरायांपुढे हजर करण्यात आले.. कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या बरोबर कोणताही गैरव्यवहार न करता तिला मातेचा दर्जा देऊन चोळी बांगडी व खणाने ओटी भरून सन्मानाने त्या सरदार पिता पुत्राबरोबर जाऊ देण्यात आले. मुसलमान शत्रुची तरणीताठी अन लावण्यवती सून पाहून शिवरायांना आईची आठवण यावी यासाठी स्वत:ची चारित्र्यसंपन्नता, सुसंस्कृतपणा, आणि सौदर्यांबाबतचा निकोप आणि निरोगी दृष्टीकोन असावा लागतो! शिवाजी महराज हे प्रजेचे कल्याणकर्ते राजे होते. त्यांची नैतिक बैठक इतकी निर्दोष होती की त्याविषयी अनेक मुस्लीम राज्यकर्त्यांनाही शिवरायांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
-उदय आत्माराम संखे