Pages

Saturday, February 23, 2013

आदिवासींच्या जीवनसंघर्षाचा जिवंत आलेख


नजूबाई गावित यांच्या साहित्यातून आदिवासी जीवनाचे दाहक वास्तव नेहमीच उभे राहते. इंग्रजांशी संघर्ष करत आपल्या लोकांना जगवणा-या ध्येयवादी नायकाची कहाणी सांगणारी ‘भिवा फरारी’ ही त्यांची कादंबरी प्रकाशित झाली आहे. भिवाची कहाणी काल्पनिक असली तरी वास्तवाचा आधार घेऊन लिहिलेली आहे. आदिवासींच्या जीवनपद्धतीचा आणि जीवनसंघर्षाचा जिवंत आलेखच त्यात मांडलेला आहे.
--------
देशातील पहिल्या स्वतंत्र आदिवासी लेखिका म्हणून नजूबाई गावित यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. आदिवासींवर आजवर बरेच लेखन प्रसिद्ध झाले असले तरी आदिवासी साहित्यातील जिवंतपणा आणि वास्तव केवळ नजूबाईंच्या साहित्यातून अनुभवायला मिळतो. धुळे जिल्ह्यातील भूमिहीन आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या नजूबाईंनी जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले असले तरी त्यांची प्रतिभाशक्ती आणि साहित्यातील जीवनवादी दृष्टिकोन प्रज्ञावंतांनाही भुरळ घालतो.
त्यांची प्रत्येक साहित्यकृती मानवी जीवनाचे नवे पैलू नव्याने उलगडून दाखवते.दलित आणि ग्रामीण साहित्य चळवळ मरगळीला येत असल्याच्या काळातच नजूबाईंची पहिली आत्मनिवेदनपर ‘तृष्णा’ नावाची कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने आदिवासींच्या जीवनातील दाहक असे वास्तव समाजासमोर आणले. नामवंत समीक्षकांपासून ते विचारवंतांपर्यंत सगळ्यांना या कादंबरीने आदिवासी जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. त्यानंतर त्यांची ‘भिवा फरारी’ ही कादंबरी ‘मावळाई प्रकाशन’ने प्रसिद्ध केली.
   धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे २ ० जानेवारी २ ० १ ३ ला  सत्यशोधक कष्टकरी महिला  सभेचे अधिवेशन झाले त्यावेळी निघालेल्या मोर्च्याचे नेतृत्व कॉ. नजुबाई गावित यांनी केले होते. त्यावेळीचे हे छायाचित्र  
ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’नंतर इंग्रजांशी संघर्ष करत आपल्या लोकांना जगवणा-या ध्येयवादी नायकाची कहाणी सांगणारी ‘भिवा फरारी’ ही दुसरी कादंबरी म्हणता येईल. ‘फकिरा’तील फकिरा आणि ‘भिवा फरारी’तील भिवा हे या दोन्ही कादंबरीचे दोन नायक, खरे तर दोन स्वतंत्र ‘देशनायक’ म्हणून समोर येताना दिसतात. फकिरापेक्षा भिवाच्या जगण्यातील संघर्ष हा मानवी जीवनाला नवे परिमाण देणारा ठरतो. डोंगरद-यात आणि कडेकपारीत आयुष्य घालवत आपल्यासारखी जगण्याचा संघर्ष करणारी आदिवासी माणसे जगवणारा तसेच भिल्ल जमातीमधील आपल्या गोतावळ्याला जगवणारा भिवा हा आपल्या कर्तृत्वाने माणुसकी कायम राखण्यासाठी सातत्याने समता-संघर्षाची एक अनोखी चळवळ उभारताना दिसतो.
सतत अन्यायाच्या गर्तेत सापडलेल्यांना समतेची वागणूक देत त्यांना माणसांसारखे जगवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि त्यासाठी वाट्टेल ते संकट अंगावर घेण्याची तयारी असणा-या भिवामध्ये एक प्रकारचा क्रांतिकारी बंडखोर आहे. भिवाचा शेवट इंग्रजी सत्तेच्या विरोधात आपल्या प्राणाची आहुती देऊन झाला असला, तरी तो या देशाच्या स्वातंत्र्यासाठीचा होता, हे नक्की. त्याच्या अखेरच्या क्षणी आणि या कादंबरीच्या शेवटी त्याची पत्नी सीता हिने गायिलेले गीत देशात समतेबरोबर स्वातंत्र्यासाठीही आवाहन करणारे आहे.
कधी महू फुले, कधी झाडपाला, कधी शिकारीतून मिळालेले मटण-मांसाचे तुकडे खाऊन जगताना या कादंबरीतील माणसं विषमतेच्या विरोधात संघर्षाची मशाल पेटवताना दिसतात. त्यांचे एक स्वत:चे जग आहे. ते जग समतेचे, समानतेचे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे आहे. भिवा हा या कादंबरीतीत मुख्य नायक असला तरी त्यासोबत काळ्या, उंबऱ्या, मंगळ्या, झुंबडया, जंगल्या, रंग्या ही पुरुष पात्रही तितकीच महत्त्वाची आहेत.
या कादंबरीत भिवाच्या सोबतीचे प्रत्येक स्त्री आणि पुरुष पात्रही विषमतेच्या विरोधात भिवाची साथ देताना, त्याला सतत प्रेरणा देताना दिसतात. भिवाच्या लग्नाच्या मांडवासाठी शिवरा, कान्ह्या व रंग्या भिवासोबत जवळच्या जंगलात जातात. तिथे भिवा पिंपरीची फांदी तोडतो. हिरव्यागार पानांच्या झुबक्याने भरलेली ती फांदी धाडदिशी कोसळते आणि सगळे आरोळी ठोकतात, ‘अरे शाब्बास नवरदेवा, चार-पाच घावांत फांदी तोडलीस. तसे हे गुलामीचे, विषमतेचे, बांडय़ांचे (इंग्रजांचं) राज्य भिवाबरोबर आम्ही तोडू अन् समतेचे राज्य आणू!’
त्यावर आपले बलदंड बाहू उंचावत भिवा म्हणतो, ‘अरे, या फुगलेल्या दंडात जे रक्त आहे, ते विषमतेविरोधी लढून समता आणण्यासाठीच वापरणार आहे,’ या वाक्यातून भिवाचा संघर्ष हा पूर्णपणे विषमतेविरोधात होता, हे दिसून येत असले तरी तो स्वकियांशी आणि तितकाच परकीय इंग्रजांशीही होता. देश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला पाहिजे, ही त्याची तळमळ बरेच काही सांगून जाते.
प्रत्येक प्रसंगी भिवाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे उंब-या, मंगळ्या, झुंबडया, जंगल्या, रंग्या हे त्याचे सोबती या कादंबरीत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, पण तुळसा, काळघी, शिवरी, झुनकी, बाजरी, झाकरा आणि भिवाची सखी सीता ही स्त्री पात्रेही तितकीच महत्त्वाची आहेत. ती भिवाच्या संघर्षातही सहभागी होताना दिसतात.
‘भाऊ, तू मानसं पोसणारा आहे. तुझ्या आजाची टोळीबी आपली मानसं पोसत होती. पन शिवबाची बातमी ऐकून ते गेले, तर एकही परत आला नाही. त्या बायकोमा-या रामानंबी आपले पूर्वज गिळून घेतले. बळी काय अन् शंबू काय, ताटका रानी काय अन् रावण काय, ही सगळी आपली मानसं होती. चांगली होती, जातपातविरोधी होती, म्हनून त्यांना जातपातवाल्यांनी मारलं. आपल्यात अजूनबी पोराचं नाव रावण ठेवतात. गोरा इंग्रज त्याच चालीने वागतो आहे,’ अशी म्हणणारी तुळसा एकीकडे भिवाची समजूत काढते, तर दुसरीकडे ‘भिवा, लहू झाला नसता तर मी तुझ्यासोबच राहिले असते. स्त्री राज्यात सैन्य स्त्री-पुरुष दोघांचं असलं तरी, ते स्त्री राज्याचं म्हणूनच ओळखलं जायचं,’ अशी आपल्या हजारो वर्षापासूनच्या स्त्री राज्याची जाणीव करून देणारी सीता तितकीच महत्त्वाची ठरते.
बांडया बाणाच्या कांडयाला विषारी दवा लावताना आपला जीव धोक्यात घालणारी भिवाची आजी तुळसा, ही या कादंबरीची वेगळी नायिका म्हणून समोर येत असली तरी सीता, झाकरा, झुनकी, बाजरी आणि काळघीही स्वतंत्र नायिका ठरतात. खरे तर ही सर्व स्त्री पात्रे नजूबाईंनी काळजीपूर्वक व आस्थेने निर्मिलेली आहेत. कारण त्यांची प्रत्येकीची भूमिका, प्रत्येक प्रसंगी वेगळे भान राखणारी आहे. या प्रत्येक पात्रांच्या स्वतंत्र कथांची सरमिसळ लेखिकेने मोठया कौशल्याने केली आहे.
झाकराचा करुण अंत आणि त्यानंतर तिच्या आठवणीने वेडापिसा झालेला काळ्या यांची कथा वाचकांचे हृदय हेलावून टाकते. पुढे ती झाकरादेवी म्हणून समोर येते. काळ्या अनेक वर्षे झाकराच्या आठवणीत डोंगरद-यातून आयुष्य घालवतो. नंतर आपल्या वस्तीत येऊन राहिल्यानंतर झाकराच्या आठवणीत मुक्या गायीवर आपला जीव लावतो. त्यासाठी लेखिकेने काळ्याच्या तोंडी टाकलेली कविता पशुप्रेमाविषयी नव्या जाणिवा निर्माण करते. या कादंबरीत पाच कविता प्रसंग साधून आल्या असल्या तरी त्या मानवी जीवनाचे अनेक पदर उलगडून दाखवतात. इमला देवी आणि शेंडय़ा देव, जिबला देवी यांच्या कहाण्याही वाचकांना चकित करून सोडतात.
वर्षानुवर्षे आदिवासी समाजात रूढ असलेल्या अंधश्रद्धांचा स्त्रियांच्या जीवनावर कसा परिणाम होतो, त्याचे दर्शन ‘भिवा फरारी’त होते. रोगराई आली की, त्यासाठी बायामाणसांचा जीव घेत असल्याचे दाखले देत असतानाच त्यांना डाकीण कसे ठरवले जाते आणि त्यामागे काय वास्तव असते, ते नजूबाईंनी तुळसाच्या तोंडून वदवले आहे. भिवाला ती अनेक जुन्या गोष्टीतून स्त्रियांचे हे वास्तव आणि त्यांची परंपरा तुळसा सांगत असते. गंगठा राज्यातली कुळदेवी मोगीआया यांच्यासोबतच शूर्पणखा, ताटिकांचा संघर्ष वेळोवेळी सांगते.
भिवाची कहाणी काल्पनिक असली तरी वास्तवाचा आधार घेऊन लिहिलेली आहे. पण कल्पनाविलास व वास्तव यांचे भान बाजूला ठेवले तरी या कादंबरीत मांडलेला दस्तावेज हा एका काळाचा नव्हे तर अवघ्या एका जीवनपद्धतीचा आणि जीवनसंघर्षाचा जिवंत आलेख आहे, असे म्हणावे लागेल. नजूबाई गावित यांच्या सामाजिक कार्याप्रमाणेच त्यांचे लेखनही खूप मोठय़ा सामाजिक परिवर्तनासाठी दिशादर्शक ठरावे. नव्या पिढीला, विशेषत: तरुणाईला समाजाचे हे दुर्लक्षित टोकही निश्चितपणे दिसले पाहिजे, त्यावर विचारमंथन झाले पाहिजे.
भिवा फरारी : नजूबाई गावित
प्रकाशक : मावळाई प्रकाशन
पानं : २४६
किंमत : २७० रुपये