‘थांबा! या जगात जन्म घेण्याआधीच मला का मारुन टाकताय? मी एक मुलगी आहे
म्हणून?’ असा मर्मभेदी सवाल ‘स्त्री भ्रूणहत्या’ या विषयावरील एका कवितेत
प्रारंभीच केला आहे. देशात पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलींना केवळ
जन्मापासूनच नव्हे तर त्यांचा जन्म होण्याआधीपासूनच कायम दुय्यम स्थान
देण्यात आलेले आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे धनाची पेटी
असे कुविचार या संस्कृतीतूनच रुजले व फोफावले. त्यातूनच स्त्री
भ्रूणहत्येसारख्या अतिशय निंदनीय गोष्टीही जन्माला आल्या. विविध शास्त्रीय
शोधांमुळे वैद्यकीयसह सर्वच क्षेत्रांतील ज्ञान-तंत्रज्ञान अद्ययावत झाले.
समाजाची झपाट्याने प्रगती होत आहे असे चित्र रंगवण्यात आले. मात्र समाजाची
पुरुषप्रधान संस्कृतीची चौकट तशीच कायम राहिली असल्याने बहुतांश व्यक्तींची
मने मात्र मागासच राहिली. आधुनिक वैद्यकज्ञानाचा फायदा उपटत गर्भलिंगनिदान
चाचणी करण्याचे पेव फुटले. मातेच्या उदरात मुलीचा गर्भ असल्यास स्त्री
भ्रूणहत्या करण्याचे प्रमाणही वाढू लागले होते. सामाजिक भान जपणारा
संवेदनशील अभिनेता आमिर खान याने आपल्या ‘सत्यमेव जयते’ या मालिकेत स्त्री
भ्रूणहत्या या विषयावर सादर केलेले दोन भाग बहुचर्चित ठरले होते. स्त्री
भ्रूणहत्येस काही डॉक्टरही कसे जबाबदार आहेत याचा उघड पंचनामाच आमिर खानने
या कार्यक्रमात केला होता. स्त्री भ्रूणहत्येचा विषय आता पुन्हा
प्राधान्याने चर्चिला जाण्याचे कारण एका सकारात्मक घटनेत दडलेले आहे.
महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे 813 इतका
वेगाने घसरला होता. मात्र यंदाच्या वर्षी मुलींचा जन्मदर राज्यात 931 तर
शहरांमध्ये 915 इतका झालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक
रुग्णालयांतून यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात 2011-12 या वर्षातील एप्रिल
ते जुलै या महिन्यांचा तुलनात्मक अभ्यास 2013-14च्या सोबत करण्यात आला.
जळगाव, नंदुरबार, नाशिक, धुळे, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये
गेल्या वर्षी घसरलेला मुलींचा जन्मदर यंदाच्या वर्षी वाढल्याचे राज्य
कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीतूनही स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात
स्त्री भ्रूणहत्येला चाप लागल्यानेच मुलींचा जन्मदर वाढला आहे. स्त्री
भ्रूणहत्येच्या विरोधातील कायदा अस्तित्वात असला तरी त्याची प्रभावी
अंमलबजावणी राज्यात होत नव्हती. बीड जिल्ह्यातल्या परळी येथील डॉ. सुदाम
मुंडे याच्या रुग्णालयामध्ये गेल्या वर्षी एका महिलेचा गर्भपात
शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता. स्त्री भ्रूणहत्येचे हे प्रकरण
असल्याने त्यावरून संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. स्त्री
भ्रूणहत्यांसाठी गेल्या 10-12 वर्षांपासून डॉ. सुदाम मुंडे याचे रुग्णालय
सतत चर्चेत असायचे. 2010 मध्ये या रुग्णालयातील स्टिंग ऑपरेशननंतर
सोनोग्राफी मशीन सील झाले होते. त्यानंतरही पुढील दोन वर्षे या रुग्णालयात
गर्भलिंगनिदान व गर्भपातही चोरीछुप्या पद्धतीने सुरू होते, असेही पोलिस
तपासात उघड झाले होते. डॉ. सुदाम मुंडे व त्याची पत्नी डॉ. सरस्वती
यांच्यावर यथोचित कायदेशीर कारवाईही झाली. या प्रकरणानंतर मुळापासून
हादरलेल्या राज्य सरकारने स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी हालचाली सुरू
केल्या. त्यातूनच ‘मुलगी वाचवा’ अभियानाचा प्रारंभ झाला. स्त्री
भ्रूणहत्येला जबाबदार असणाºयांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला.
गर्भलिंगनिदान करण्यास भाग पाडणारे नातेवाईक आणि गर्भपात शस्त्रक्रिया
करणाºया डॉक्टरांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये गुन्हा
दाखल करण्याची तरतूद करावी, अशी मागणीही काही लोकप्रतिनिधींनी त्या वेळी
केली होती. डॉ. सुदाम मुंडेचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकारी यंत्रणेने
राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर धाडी टाकण्याचा सपाटा सुरू केला व त्यातून
अजून काही प्रकरणेही उजेडात आली. या सर्वांचा एकत्रित परिणाम स्त्री
भ्रूणहत्येचे प्रमाण कमी होण्यात झाला. समाजात मुलांच्या तुलनेत मुलींना जी
दुय्यम वागणूक देण्यात येते त्याविरोधात 19 व्या शतकापासून समाजधुरिणांनी
आवाज उठवण्यास सुरुवात केली होती. पुरुषप्रधान समाजव्यवस्था स्त्रीला तिचे
मूलभूत हक्क नाकारते त्याविरोधात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी
बंड पुकारले. त्या काळात स्त्रियांची स्थिती किती विदारक होती याचे अत्यंत
भेदक वर्णन महात्मा फुले यांच्या शिष्या ताराबाई शिंदे यांनी केलेल्या
लेखनातूनही आले आहे. विधवा स्त्रियांची होणारी पिळवणूक हा त्या काळचा मोठा
सामाजिक प्रश्न होता. त्याला गोपाळ गणेश आगरकर, न्या. रानडे आदी
समाजसुधारकांनीही आपल्या लेखन-भाषणांतून वाचा फोडली होती. स्त्रियांच्या
उद्धारासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अविस्मरणीय कार्य केले. त्यांचे
चिरंजीव र. धों. कर्वे हे तर संततिनियमनाच्या कार्याचे देशातील आद्य
प्रवर्तक ठरले. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र.
धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे प्रबोधन फार मोलाचे आहे. स्त्री
भ्रूणहत्या रोखायला हव्यात, मुली व मुलांच्या प्रमाणातील नैसर्गिक समतोल
ढळू देता कामा नये, असे विचार र. धों. कर्वे यांनी आपल्या
‘समाजस्वास्थ्य’ मासिकात प्रसंगोपात केलेल्या लेखनामध्ये व्यक्त केलेले
होते. 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर
केले. 1975 ते 1985 हे महिला दशक म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानिमित्त
जगभर स्त्रियांच्या प्रश्नांसंबधी विचारमंथन सुरू झाले. देशातील अनेक
राज्यांत त्याचे परिणाम जाणवू लागले. घटनेने स्त्री-पुरुष समानता हे मूल्य
मान्य केले असले तरी वास्तवात वेगळीच परिस्थिती होती. 1979 मध्ये मंजुश्री
सारडा हिचा गूढ मृत्यू आणि 1980 मध्ये मथुरा बलात्कार घटना यातून हुंडा आणि
बलात्कारविरोधी मोहिमेने वेग घेतला. महाराष्ट्रात महिलांच्या प्रश्नांबाबत
जागृती करण्यासाठी स्त्री मुक्ती चळवळीमार्फत सुसंघटित प्रयत्न होऊ लागले.
‘मुलगी झाली हो’ हे नाटक लिहिण्याची ज्योती म्हापसेकरांना प्रेरणा मिळाली
ती याच काळात. या नाटकातील ‘मुलगी झाली, आता काय मी करू?’ या गाण्याने
असंख्य लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले होते. ‘मुलगी झाली हो’
नाटकाचे तीन हजारच्या वर प्रयोग झाले. इतर सामाजिक संस्थांनीही स्त्री
भ्रूणहत्याविरोध, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीमुक्ती यासंदर्भात महत्त्वाचे
कार्य करूनही समाजातील मागासलेले विचार पूर्णपणे दूर झालेले नाहीत.
सरकारने कारवाईचा दंडुका उगारल्यानंतर अनेक वाईट गोष्टींना काही काळापुरता
चाप बसतो, असे मागील काही उदाहरणांवरून स्पष्टपणे दिसते. डॉ. सुदाम मुंडे
प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारने तत्परतेने पावले उचलल्यामुळेच राज्यातील
स्त्री भ्रूणहत्यांचे प्रमाण कमी झाले व मुलींचा जन्मदर वाढला. मात्र हा
चांगला बदल तात्पुरता न ठरता कायमस्वरूपी व्हावा. त्यासाठी समाजातील सर्वच
घटकांनी जागरूक राहायला हवे.