ती विश्वमाता
भ्रूणहत्या ही वंशाचा दिवा म्हणजे मुलगा, या गैरसमजुतीतून केली जात आहे. त्यामुळे मुलींची संख्या कमी होत असल्याचं चित्र आहे. मुलीला परक्याचं धन म्हणून डिवचणारे लोक अजूनही समाजात आहेत. त्या अजाण लोकांना कोणीतरी जाऊन समजवावं की, अशा कितीतरी मुली आहेत, ज्या काबाडकष्ट करून आपल्या आई-वडिलांना सांभळत आहेत. मुली पुढे जाऊन आई होतात. मोठय़ा कष्टांनी मुलांना वाढवतात. स्त्रीच्या रूपांवर प्रकाशझोत टाकण्याचा केलेला हा प्रयत्न.
ते शब्द मल्याळम् भाषेतील. पण मराठीतील असावेत इतके परिचयाचे होते. एका तरुण विधवा मातेच्या रडण्यातून ऐकू येणारे केरळमधील उद्गार आमच्या कोकणातील रत्नागिरीच्या सिंधुताईच्या तोंडून पन्नास वर्षापूर्वी मराठीतून ऐकले होते.‘‘माझ्या दोन मुलांसाठी मला कामाची गरज आहे. मला काहीतरी स्वयंपाकपाण्याचे काम आणि दिवसभर पडेल ते काम मिळवून द्या हो.’’
सिंधुताई महिला मंडळाच्या अध्यक्षबाईंना अर्धशतकापूर्वी रडत रडत विनवत होती. नऊवारी, लुगडे, घट्टा अंबाडा आणि हातात साध्या काचेच्या बांगड्या, अशा वेषातील तिची मूर्ती अजून नजरेसमोर येते. आज दक्षिणेकडील संपूर्ण साक्षर अशा केरळ राज्यात चर्चच्या पुढील प्रांगणात फिलोमिना ही तरुण, रोमन कॅथलिक आई प्रिस्टकडे रडत, हुंदके देत मल्याळम् भाषेतून विनवत होती.
‘‘फादर मला टायपिंग येतं. मी ते तर करीनच. पण ऑफिसचे इतर पडेल ते कामही करीन. मला माझ्या दोन मुलांसाठी नोकरीची फार गरज आहे. मी संध्याकाळच्या कॉम्प्युटर क्लासला जाऊन ते कौशल्यही शिकून घेईन.’’
फिलोमिना पांढ-या रंगाची, बारीक काळी नक्षी असलेली साडी नेसून उभी होती. वैधव्य आल्यानंतर पहिल्या श्राद्धापर्यंत या राज्यातील रोमन कॅथलिक स्त्रियांचा तो पोषाख असतो. सिंधुताई हिंदू तर फिलोमिना ख्रिश्चन. एक मराठी तर दुसरी तिच्यापासून हजारो मैल दूरची केरळी. दोघींच्या वयात अर्धशतकाचं अंतर. पण दोघीत एक मोठं साम्य.
आपल्या अजाण बाळांना सुरक्षित, सुखाचं भविष्य देण्याची दोघींची धडपड. एका मातेची माया आपल्याला अवगत असणा-या कौशल्यांचा वापर करून दिनरात मेहनत करण्याची आणि नवीन कौशल्य शिकून आपल्या बाळांसाठी अधिक कमाई करण्याची दोघींची तयारी. पन्नास वर्षापूर्वी सिंधुताई शिवणकाम शिकली आणि रात्रीच्या वेळी कपडे शिवून आपल्या मुलांच्या बारीक-सारीक गरजा भागवण्यासाठी चार पैसे मिळवत राहिली. आज फिलोमिना टायपिस्टची नोकरी करता करता कॉम्प्युटर शिकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सिंधुताईची मुलं गुणी निघाली. मुलगा सरकारी नोकरीत स्थिरावला आणि मुलगी शिक्षिका बनली. गेली तीस र्वष मी सिंधुताईला एक सुखवस्तू, मध्यमवर्गीय, सुसंस्कृत स्त्रीच्या भूमिकेत पाहत आले आहे. पण तिची मुलं लहान असताना त्यांचा एखादा बालहट्ट पुरवता न आल्यामुळे तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील! शाळेतील इतर मुलांचे कपडे, त्यांची खेळणी, त्यांच्या डब्यातील चविष्ट खाऊ पाहून त्या मुलांनी सिंधुताईकडे नक्की हट्ट धरला असेल. त्यांचा हट्ट पुरवता न आल्याने त्या आईच्या डोळ्यांतून कितीदा अश्रू वाहिले असतील! कधीतरी त्या बाळांना चापटी मारावी लागली असेल आणि मग त्या शिक्षेनं तिचं स्वत:चंच मन तिला छळू लागले असेल! आई आणि मुलं यांचं नातं असं वेगळं असतं.
करूनि माता अनुराग-राग।
विकासवी बाळ मनोविभाग।।
फळे तरू सेवुनि उष्ण शीत।
जगी असे हिची विकासरीत।।
साने गुरुजींच्या या अर्थपूर्ण काव्यपंक्तीतून हे माता-बाळाचं नातं स्पष्ट होतं. पन्नास वर्षापूर्वीच्या सिंधुताईच्या भूमिकेत आज ही फिलोमिना उभी आहे. पण काळ खूप बदलला आहे. देशात आर्थिक उदारीकरण वैश्विकीकरण यांचे वारे वाहत आहेत. ठिकठिकाणी मॉल्स, मल्टिप्लेक्स उभे आहेत. मुलांचे कपडे, खेळणी, खाऊ यांमध्ये जागतिक स्वरूपाची विविधता आली आहे. साहजिकच मुलांचे हट्ट पुरविताना सुखवस्तू पालकांनाही जड जाऊ लागले आहे. अशा परिस्थितीत फिलोमिना तिच्या तुटपुंज्या मिळकतीत आपल्या दोन बाळांना कशी वाढवू शकेल, कोण जाणे!
मुलांच्या जीवनात पन्नास वर्षात फार मोठे बदल झाले आहेत. वयाच्या तिस-या वर्षापासून स्पर्धेच्या चक्रात ती सापडली आहेत. या जीवघेण्या स्पर्धामुळे त्यांचे बाल्य जणू अवेळी संपुष्टात येत आहे. त्यातूनच बाल आणि कुमार वयातील मुलं-मुली ‘टेन्शन’ अनुभवत आहेत. शाळकरी मुलांच्या आत्महत्यांच्या बातम्या कानावर पडत आहेत.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रसारामुळे घरोघरी विविध प्रकारच्या बातम्या आणि माहिती यांचा जणू पूरच आला आहे. त्यातूनच गुन्हेगारीकडे शाळकरी मुले आकृष्ट होताना दिसत आहेत. एक अल्प आर्थिक कुवत असणारी ही तरुण आई या सर्व संकटांचा एकटीने मुकाबला करू शकेल का? सिंधुताईपेक्षा फिलोमिनाची वाटचाल नक्कीच अधिक खडतर आहे.
सहा वाजले आणि चर्चची घंटा वाजू लागली. प्रार्थनेसाठी भाविक येत होते. चर्चवरील भिंतीवर मदर मेरी आपल्या कुशीत येशूबाळाला घेऊन येणा-या भाविकांना आशीर्वाद देत होती. ती विश्वमाता फिलोमिनाच्या मागेही असू दे. तिच्या आयुष्याची वाटचाल निर्विघ्न होवो.