Pages

Thursday, September 6, 2012


मी आदिवासी बोलतेय!


आदिवासींवर होणा-या अन्यायाच्या घटना नव्या नाहीत. त्यांना नक्षलवादी ठरवून त्यांच्या हत्या केल्याच्या घटनाही घडत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून 65 वर्ष झाली असली तरी आदिवासींवर अन्याय होतातच का, याची व्यथा मांडणारं एका आदिवासी कन्येचं हे स्वगत..
आज मी बोलणार आहे. इतकी र्वष मनाला बोचणा-या यातना सहन करून जगणारी मी. ढोरांसारखी मेहनत करून उपाशी मरणारी मी. जंगलाची राणी असूनही बेघर अशी मी. आज मी बोलणार आहे. माझ्या सहनशक्तीचे बंध आता फुटलेत. मूग गिळून बसणं आता केवळ अशक्यच ! गेल्या आठवडय़ात सर्व भारतवासीयांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. झेंडावंदन, मिरवणूक, पताका.. सारं काही अगदी उत्साहात! पण मी तुम्हाला विचारते, आपण खरंच स्वतंत्र झालोत की, स्वातंत्र्याचा फक्त टेंभा मिरवतोय? ते इंग्रज होते ज्यांनी आपल्या देशावर राज्य केले आणि ते क्रांतिकारी ज्यांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केलं. पण आजचं काय? खरंच गुलामगिरी संपली? खरंच स्वातंत्र्य आलं? अन् आलं तरी कसलं स्वातंत्र्य?

देशात बांगलादेशीयांना आश्रय देऊन मूळ निवासी असलेल्या आमच्या जातबांधवांना त्यांच्या जागेवरून हुसकावून लावण्याचं स्वातंत्र्य? नक्षलवादी सांगून छाताडावर गोळ्या घालण्याचं स्वातंत्र्य. आमच्या जमिनी हिसकावताना आया-बहिणींची अब्रू लुटण्याचं स्वातंत्र्य.. की, आम्हाला मिळणा-या सवलतींच्या जोरावर गाडय़ा फिरवण्याचं स्वातंत्र्य? नेमकं कसलं स्वातंत्र्य? एकेकाळी जंगलाची राणी मानली जाणारी मी, आज लाचार कुणामुळे झालेय? कोण जबाबदार याला? भ्रष्टाचारी नोकरशाही, जी फक्त आकडे मोजून गरिबी कमी झाल्याच्या फुशारक्या मारते की, आमच्या सवलतीवर स्वत:चे खिसे गरम करणारे की, आमच्या जमिनीवर रक्ताचे पाट वाहून राजमहाल बांधणारे दलाल. आमच्या समस्यांचं भांडवल करून स्वत:ची पोळी भाजणारे राजकारणी की, आम्हाला लाचार, बिच्चारे म्हणवणारे पांढरपेशी..? कोण कोण जबाबदार आहे?

कधी कुणावर विसंबून न राहिलेली मी आज लाचार का झाले? आमच्या जमिनींवर, सवलतींवर डोळा ठेवणारे का फोफावलेत? आम्हाला जमीनदोस्त करून आमचं अस्तित्व मिटवू पाहणा-यांची वृत्ती का अधिकाधिक सोकावत चाललीय? देशाची सर्वात पहिली वासी मी. आज माझंच अस्तित्व धोक्यात आलंय नि असे करणारे कोण? माझेच देशबंधू ! मग मी स्वतंत्र कशी? एकीकडे लखलखत्या दुनियेत प्रगतीचे आकडे भराभर वाढत असताना महासत्ता बनण्याची स्वप्नं घडणा-या देशात आम्हाला पिण्याचं पाणी नशिबात नाही, मग कसली प्रगती.? राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा म्हणवणा-या या देशात जंगलच्या राणीची अशी केविलवाणी अवस्था असेल तर अशा स्वातंत्र्यापेक्षा इंग्रज बरे, असं म्हटल्यास नवल ते काय !!

तर दुसरीकडे आमच्या जमिनी घशात घालण्यासाठी आमच्या जात बांधवांची खुलेआम कत्तल केली जातेय. त्यांना नक्षलवादी ठरवलं जातंय. रोजच्या रोज नक्षलवाद्यांना मारल्याच्या बातम्या मोठय़ा अभिमानाने सांगितल्या जातायत. मग नक्षलवाद संपत का नाही? कारण मारले जाणारे माझे जात बांधव आहेत, नक्षलवादी नाही .. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणा-या समाजाचे रक्षक म्हणवणा-याचं हे अघोरी कृत्य! रक्षक हेच आमचे भक्षक बनल्यास स्वरक्षणासाठी आम्ही बंदुका का उचलू नयेत? जिथे आम्हाला पिण्याचं पाणी नाही तिथले सरकार मोफत मोबाइल वाटप जाहीर करते. वा खरंच किती मोठी प्रगती आहे ही! जर असंच आमचं शोषण होत राहिले तर आमचं अस्तित्वच नष्ट होईल. आमच्यावर अन्याय करणाऱ्या लांडग्याची आग शमेल.. थांबवा हा अन्याय! अन्यथा आम्ही पेटून ऊठू आणि आमच्यावर अन्याय करणाऱ्यांना भस्म करू! आमच्या सहनशक्तीचा अंत आता संपलाय.. तेव्हा क्रांती झाली होती इंग्रजांविरुद्ध! आता ही एक क्रांती घडेल आमच्यावर अन्याय करणा-याविरुद्ध!

No comments: