Pages

Monday, September 12, 2011

कोर्ट मार्शल' झालेल्या अंजलीची आत्महत्या
वृत्तसंस्था
Monday, September 12, 2011 AT 05:37 PM (IST)
भोपाळ - लष्करी न्यायालयाने "कोर्ट मार्शल'ची शिक्षा सुनावलेल्या फ्लाईंग ऑफिसर अंजली गुप्ता (वय 35) हिने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. तिने ज्या खोलीत आत्महत्या केली ती खोली हवाई दलाच्या अधिकाऱ्याची असल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे.
अंजली ही भारतीय हवाई दलातील पहिली महिला फ्लाइंग ऑफिसर. जेव्हा तिची नियुक्ती झाली तेव्हा तिचे देशानेच स्वागत केले होते. हवाई दलात दाखल झाल्यानंतर मात्र ती नेहमीच वादग्रस्त राहिली. तिने तीन अधिकाऱ्यांविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तिच्या या आरोपानंतर हवाई दलात खळबळ माजली होती. हवाई दलाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. लष्करी न्यायालयात हे प्रकरण गेले. अंजलीने केलेले आरोप शेवटी तिच्या अंगलट आले. तिला "कोर्ट मार्शल'ची शिक्षा सुनावण्यात आली.
अंजली अविवाहित होत्या. लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर प्रचंड दबावाखाली होत्या. आत्महत्या करावी वाटते असे तिने आपल्या मित्रांना अनेक वेळा बोलूनही दाखविले होते.
भोपाळ शहरातील शाहपुरी भागातील आकृती ग्लोरी येथील कॅप्टन अमित गुप्ता यांच्या घरात शेवटी तिने आत्महत्या केली. त्यावेळी गुप्ता आणि त्यांचे कुटुंब घरात नव्हते. काही वेळाने शेजारच्या लोकांनी गुप्ता यांच्या घराचे दरवाजे आतून बंद असून कोणी तरी आत असल्याचे सांगितले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता एका खोलीत अंजलीने आत्महत्या केल्याचे दिसले. तिने गुप्ता यांच्या घरात आत्महत्या केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
अंजलीने यापूर्वी वायुदलातील आर.एस.चौधरी, वी.सी. सारिक आणि अनिल चोपडा यांच्याविरोध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या तिघांविरोधात तिने स्थानिक पोलिसांकडे तक्रारही केली होती.
अंजलीच्या विरोधात लष्करी न्यायालयाने तपास सुरु केल्यानंतर तिने आत्महत्या करण्याचीही धमकी दिली होती. तेव्हा तिला तुरुंगांतही ठेवण्यात आले होते. "कोर्ट मार्शल'ची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर तिने शेवटी आत्महत्या केली आणि जीवनयात्रा संपविली. आता तिच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास होणार आहे.