कलावतीची मुलगी वडिलाच्या मार्गाने -
गरिबीला कंटाळून आत्महत्या (15-10-2011 : 23:23:07)
देवेंद्र पोल्हे।
दि. १४ (मारेगाव)काँग्रेसचे युवराज खासदार राहुल गांधी यांच्या भेटीने देशात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या जळका येथील कलावती बांदूरकर यांच्या विवाहित मुलीने वडीलांचाच मार्ग स्विकारून गरिबीला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून जाळून घेत स्वत:ला संपविल्याची घटना नुकतीच प्रकाशात आली आहे. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. यवतमाळ जिल्हय़ातीलच मारेगाव तालुक्यातील जळका येथील परशुराम बांदूरकर यांनी २00५ मध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर बांदूरकर कुटुंब उघड्यावर पडले होते. अचानक एके दिवशी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी जळका येथे भेट देऊन कलावती बांदूरकर यांची व्यथा समजून घेतली. त्यांच्या गरिबीची कहाणी ऐकून त्यांचे हृदय द्रवले. त्यांच्या कुटुंबासमोर ‘आ वासून’ उभ्या असलेल्या समस्यांची राहुलजींनी दखल घेतली. त्यानंतर परत दिल्लीत जाऊन त्यांनी कलावतीची व्यथा संसदेत मांडली. यामुळे कलावतीचे दुख जगासमोर उघड झाले. त्यानंतर सुलभ आंतरराष्ट्रीय संघटनेच्या बिंदेश्वर पाठक यांनी पुढील २0 वर्षे कलावतीला दरमहा २५ हजार रुपये घोषणा केली आणि कलावती बांदूरकर रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. आता त्यांना दरमहा २५ हजार रुपये मिळत असल्याने त्यांचे जीवनमान उंचावले आहे. मात्र कलावतीबाईंच्या मुलींच्या दुखाची धग कायमच आहे. कलावती यांना सहा मुली आहेत. मुली विवाहित आहेत. त्यापैकी एक सध्या विधवा आहे. दोन मुलींना परित्येचे जिणे जगावे लागत आहे. त्यापाठोपाठ आता चंद्रपूर जिल्हय़ातील भद्रावती तालुक्यातील राळेगाव येथील सविता दिवाकर खामनकर (२७) या मुलीने जाळून घेऊन आत्महत्या केली आहे. सविता ही कलावती यांची दुसर्या क्रमांकाची मुलगी ती. घरातील अठरा विश्व दारिद्रय़ व सततच्या आजाराने तिने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत १५ सप्टेंबरला अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले. यात ती ७0 टेच्यावर भाजली. सविताला तत्काळ चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर २६ सप्टेंबरला तिने रुग्णालयातच या जगाचा निरोप घेतला. सविताला पाच वर्षांंची शारू नावाची मुलगी असून ११ महिन्यांचा नमन नावाचा मुलगा आहे. यापूर्वी सविताचा मोठा मुलगा आजारपणात दगावला होता. सविताचा विवाह आठ वर्षांंपूर्वी राळेगाव येथील दिवाकर खामनकर यांच्याशी झाला होता. पतीकडे तीन एकर शेती असून कुटुंबात सासू, सासरे यांच्यासोबत सविता राहात होती. मात्र तीन एकर शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. तिचे सासरे शेतीची वहिती करीत होते, तर पती दिवाकर सालगडी म्हणून नोकरी करीत होता.घरातील दारिद्रय़ामुळे आजारावरील उपचारासाठी पैसे मिळणे कठीण झाले होते. सविता गेल्या एक वर्षापासून सतत आजारी होती. बरा न होणारा आजार व अठराविश्व दारिद्रय़ याला कंटाळून अखेर तिने वडील परशुराम बांदूरकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वतला संपविण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्धी माध्यम व पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून सविताने, ‘स्टोव्हवर स्वयंपाक करीत असताना पदराने पेट घेतल्याने जळाल्याचे’ पोलिसांना बयाण दिले, असे कलावती यांनी सांगितले. वास्तविक सविताकडे स्टोव्हसुद्धा नाही. आता सविताचा ११ महिन्यांचा नमन व पाच वर्षांंची शारू पोरकी झाली आहे. नमनला कलावतीबाइंनी जळका येथे आणले आहे.
|