आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर!
जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला
स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने
मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज
जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने अठराव्या शतकात शिक्षित असलेली,
परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर
पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना. भीमाबाईंचा जन्म १७९७ मद्धे पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे इंग्रजांचे कर्दनकाळ, आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला कि नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव केल्यानंतर झाली. तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले.