Pages

Monday, September 24, 2012

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर!

जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना.
भीमाबाईंचा जन्म १७९७ मद्धे पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे इंग्रजांचे कर्दनकाळ, आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला कि नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव केल्यानंतर झाली. तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले.

सुटकेनंतर मात्र यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षनाची व लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली. ब्रिटिश विदुषि मेरी सदरल्यंड म्हणतात, ज्या काळात भारतात महिलांना गोषात रहावे लागे, शिक्षणाचा विचारही नव्हता, अत्यंत बंदिस्त व मानहानीचे जीवन जगावे लागे त्या काळात, यशवंतरावांसारख्या द्रष्ट्या पुरुषाने भीमाबाईला शिक्षण देने व लढवैय्याही बनवणे ही एक क्रांतीकारक घटना होती. अर्थात अशी सामाजिक क्रांती होळकर घराण्याला नवीन नव्हती. अहिल्याबाई होळकर स्वत: शिक्षित तर होत्याच पण त्या काळात भालाफेकीत त्यांचा हात धरणारा कोणी पुरुषही नव्हता. एवढेच नव्हे तर जगातील पहिले महिलांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालयही स्थापन करुन महिलांची बटालियन उभारली होती. या बटालियनला घाबरुन रघुनाथराव पेशव्यालाही पळुन जावे लागले होते.
यशवंतरावांचा ब्रिटिशांशी संघर्ष सुरु असला व एका मागोमाग एक अशा अठरा युद्धांत त्यांना पराजित करत राहिले असले तरी परिवाराकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. भीमाबाईचा विवाह धारचे संस्थानिक गोविंदराव बुळे यांच्याशी झाला. यशवंतरावांनी आपल्या लाडक्या कन्येला पेटलवाड येथील जहागीरही व्यक्तिगत उत्पन्नासाठी दिली. परंतु विवाहानंतर दोनेक वर्षातच भीमाबाईवर वैधव्य कोसळले. त्या परत माहेरी आल्या व यशवंतरावांनी भानपुरा येथे सुरु केलेल्या तोफांच्या कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहु लागल्या. त्यांना उत्तम अश्वपरिक्षा अवगत होती. त्यामुळे भारतभरातुन यशवंतरावांनी एक लक्ष घोडे आपल्या सैन्यासाठी विकत घ्यायचा सपाटा लावला होता त्यात निवडीची मुख्य भुमिका भीमाबाई बजावत होत्या. यशवंतरावांचा भारतीय स्वातंत्र्यासाठी कलकत्त्यावर इस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयावरच हल्ला करण्याचा बेत होता. पण दुर्दैवाने मेंदुतील गाठीच्या आजाराने यशवंतरावांचा २८ आक्टोबर १८११ रोजी भानपुरा येथे अकाली म्रुत्यु झाला. त्यावेळीस भीमाबाईंच्या धाकट्य भावाचे, मल्हारराव तिसरा याचे वय होते फक्त सहा वर्ष. महाराणी तुळसाबाई या मल्हारराव (तिसरे) यांच्या रीजंट म्हणुन कारभार पहात असतांना भीमाबाई लष्करी फेररचनेत व्यस्त होत्या. यशवंतरावांच्या म्रुत्युमुळे होळकरी सम्स्थान ताब्यात घेता येईल या कल्पनेत इंग्रज रमाण होते व तसा प्रयत्नही करत होते, पण त्यांना यश येत नव्हते. कारण तत्कालीन भारतात होळकरांचे लष्कर बलाढ्य मानले गेलेले होते. शेवटी इंग्रजांनी कपटनीतिचा आश्रय घेतला. गफुरखान या होळकरांच्या सेनानीला त्यांनी जाव-याची जहागिरी देण्याचे आमिष दाखवत फोडले. या घरभेद्याने १९ डिसेंबर १८१७ रोजी महाराणी तुळसाबाईंचा निर्दय खुन केला व त्यांचे प्रेत क्षिप्रा नदीत फेकुन दिले.
त्याच वेळीस भीमाबाई आणि मल्हारराव (तिसरे) सर थोमस हिस्लोप या माल्कमने पाठवलेल्या ईंग्रज सैन्याचा सेनापतीशी मुकाबला करण्याच्या तयारीत महिदपुर येथे होते. मल्हाररावाचे वय त्यासमयी फक्त बारा वर्षाचे होते तर भीमाबाईचे वय होते वीस. त्या घोडदळाचे नेत्रुत्व करत होत्या. २० डिसेंबरला सकाळी युद्ध सुरु झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत होळकरी सेना इंग्रजांना कापुन काढत विजयाच्या क्षणापर्यंत पोहोचली होती. पण ऐन मोक्याच्या वेळी गफुरखान आपल्या सैन्यासह रणांगणातुन निघुन गेला. हाती आलेला विजय त्याच्या गद्दारीमुळे निसटला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.
या युद्धानंतर मल्हाररावाला इंग्रजांशी मंदसोर येथे तह करावा लागला. पण भीमाबाई मात्र आपल्या तीन हजार पेंढारी घोडदळानिशी निसटली होती. इंग्रजांशी तिचा लढा थांबणार नव्हता. तिने अक्षरश: अरण्यवास पत्करला व पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत गनीमी काव्याचा मंत्र जपला. तिने माल्कमच्या सैन्यावर गनीमी हल्ले सुरु केले. इंग्रज खजीने लुटले. अनेक तळ उध्वस्त केले. मार्च १८१८ मद्धे तर खुद्द माल्कमच्या सेनेला अचानक हल्ला करुन असे झोडपले कि माल्कमलाच पळुन जावे लागले. इंग्रजांनी भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे लक्षात घेवुन पेंढा-यांविरुद्धच मोहीम हाती घेतली. पेंढा-यांना पुनर्वसनाच्या, जमीनी-जागीरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी भीमाबाईला सोडुन जावु लागले. आपल्या पित्याप्रमानेच भीमाबाईने भारतातील सम्स्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळुन भीमाबाईच्या सर्वनाशासाठे भीमाबाईचा माग काढत होता, पण भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे. तिने इंग्रजी तळांना अचानक हल्ले करुन लुटण्याचा धडाका लावलेला होता. भीमाबाईवरील मोहीम यशस्वी व्हायचे नांव घेत नव्हती. माल्कमने पुन्हा कपटाचा आश्रय घेतला. त्याने भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करुन घेतले. भीमाबाईचा तळ धारनजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली. माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला भीमाबाईवर हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पदला. यावेळीस दुर्दैव असे कि एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडुन निघुन गेले. भीमाबाईला कैद करण्यात आले. रामपुरा येथील गढीत त्यांना बंदिस्त करण्यात आले. पुढे नोव्हेंबर १८५८ मद्धे भीमाबाईंचा म्रुत्यु झाला. कैदेतच जन्म आणि कैदेतच म्रुत्यु असे दुर्दैव या थोर महिलेच्या वाट्याला आले. पुढचे दुर्दैव हे कि ज्या अखिल भारताच्या स्वातंत्र्यासाठी जिने संगर मांडला तिला भारतवासी चक्क विसरुन गेले. ती काही आपल्या संस्थानासाठी लढत नव्हती...ते शाबुतच होते...पण आम्हाला झाशीची राणी, जी फक्त आपल्या दत्तकविधानासाठी लढली, फक्त स्वत:च्या संस्थानासाठी लढली तिच्याबाबत माहिती असते, पण तिच्याही पुर्वी होवुन गेलेली व अखिल भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी वीरांगना मात्र माहित नसते.
जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने जगाने दखल घेतलेल्या या आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीला विनम्र अभिवादन करुयात, तिच्या स्म्रुती जतन करण्याचा प्रयत्न करुयात व भारतात अशा अगणित भीमाबाई जन्माला याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करुयात!
------संजय सोनवणी
साभार : http://www.ns6.hostit.co.in/index.php?q=node/8279
 

No comments: