Pages

Monday, September 24, 2012

महिलांच्या सशक्तीकरणाशिवाय 
सर्वोत्कृष्ट देशाची कल्पना अशक्य !
 
दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो. म्हणजेच समाजाने महिलांसाठी सर्मपित केलेला एक दिवस. या दिवशी महिलांचा विकास, त्यांचे सशक्तीकरण या विषयांवर अनेक चर्चा होतात, त्यांच्या विकासासाठी मोठया-मोठया घोषणा होत असतात. परंतु या सगळया प्रयत्नांनंतरही महिलांच्या परिस्थिती मध्ये सुधारणा होत नाही. यासाठी महिलांनीच त्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्तरावर सशक्तीकरण कसे होईल ते पाहिले पाहिजे.       
आपल्या कुंभार समाजातील महिला वर्षानुवर्ष घरच्या कुंभार उद्योगात सहकारी म्हणुन काम करीत आहेत. ही अभिमानाची बाब आहे की, त्यांच्या सहकार्यामुळेच अनेक वर्ष कुंभार कारागीर आपला व्यवसाय करीत आहेत.सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबात घरातील स्त्रीच कुटुंबाचा गाडा हाकत असते. मुला-बाळांचे संगोपन, वृध्द मंडळींची देखभाल, घरातील कर्त्या पुरूषांच्यामागे (पती) खंबीरपणे उभे राहणे व महत्वाच्या बाबीत निर्णय घेणे. ही कामे प्रामुख्याने स्त्रीयांनाच करावी लागतात. तरी देखील तिच्या कार्याला नगण्य समजले जाते. म्हणुन आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या महिलांना स्वतः सजग राहण्याची गरज आहे. जितक्या मोठया संख्येने महिला आत्मनिर्भर होतील, रोजगार किंवा नोकरी करतील तितक्याच त्या शक्तीशाली होतील. या दिशेने आपण जे पाऊल टाकले आहे, त्यात प्रामुख्याने "महिला बचत गट' हा मुख्य मार्ग समोर आहे. ज्यामुळे महिलांना रोजगार व सन्मान मिळण्यास पर्यायाने त्यांचे सशक्तीकरण होण्यास निश्चितच मदत मिळेल.
महिला दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी रेल्वेने प्रवास करणान्या मुलींना मोफत रेल्वे पास देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे आजच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने आगामी काळात महाराष्ट्रात होणान्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. महाराष्ट्र राज्यसरकारने यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे अनेक महिला निवडुन येत आहेत. परंतु याचा म्हणावा तसा फायदा झालेला दिसत नाही. निवडणुक जिंकुन कोणाच्या तरी हातातली बाहुली बनुन राहणे, मग अशा निवडणुका जिंकुन तरी काय उपयोग? या महिलांना आपल्या ताकदीचा अंदाज नाही, तो आला तर त्या केवळ स्वतःसाठीच नाही तर संपुर्ण समाजासाठी उत्तम कार्य करू शकतील. परंतु त्यासाठी महिलांनी आव्हाने स्विकारायला हवीत. त्यांनी हा आत्मविश्वास बाळगला पाहिजे की, आपण स्वतः विचार करू शकतो, समाजाचे नेतृत्व करू शकतो. आता राज्यात ५० टक्के आरक्षण जाहीर झाल्यामुळे विविध राजकीय पक्षांना महिला उमेदवार मिळविणे अवघड जाईल. पर्यायाने राजकारणात प्रथमपासुन असणा-या कुटुंबातील ताई-माई आणि आक्का यांनाच महत्व येईल. त्यासाठी आमच्या विविध समाज संघटना व पदाधिका-यांना देखील आपल्या महिलांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्या राजकीय क्षेत्रातील सहभागासाठी प्रयत्न करावे लागतील.
आपण सर्वजण महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारी योजनांवर अवलंबुन राहतो. परंतु मला वाटते, महिलांच्या बाबतीत समाजाच्या दृष्टिकोनात बदल होण्याची खरी गरज आहे. आणि हे काम आपल्या घरापासुनच सुरू झाले पाहिजे तरच घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी परिवर्तन होईल. महिलांसाठी कायदे ही खुप बनविले जातात, परंतु ते तोडण्याचे अधिकाधिक पर्याय शोधले जातात. म्हणुन परिवर्तन हे कायदे करून होणार नाही तर त्यासाठी समाजाची भुमिका महत्वाची आहे. त्यासाठी समाजाने जागरूक असायला हवे. खासकरून यशस्वी महिलांनी सामाजिक स्तरावर आपले प्रयत्न अधिक गतीने सुरू ठेवले पाहिजेत.
भारताच्या इतिहासात महिलांची कामगीरी मोलाची राहिली आहे. राजमाता जिजाऊ, राणी झाशी, सावित्रीबाई फुले, इत्यादिंनी प्रतिकुल परिस्थितीत समाजासाठी भरपुर योगदान दिले. सावित्रीबाई स्वतः शिकल्या, शिक्षिका झाल्या आणि समाजाचा विरोध झुगारून महिलांची पहिली शाळा त्यांनी चालविली. त्यांना ज्योतिबांची साथ असली तरी सावित्रीबाईंकडे ती क्षमता होती म्हणुनच खंबीरपणे त्यांनी पाउले टाकली. अलिकडे काही दशकांपूर्वी अनेक कर्तृत्वान महिलांनी भारताच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवुन आज त्या सर्वोच्य स्थानी विराजमान आहेत. त्या सर्वजणींना त्यांच्या अतुलनिय कार्याबद्दल अनेक बहुमान मिळाले आहेत. स्वर्गीय इंदिराजी गांधी, मेधा पाटकर, किरण बेदी, सुषमा स्वराज, सानिया मिर्झा, साईना नेहवाल, मायावती, लता मंगेशकर अशा अनेकजणींचा त्यात समावेश आहे. संपुर्ण देशात अशा अनेक महिला आणि संस्था विभिन्न स्वरूपाचं काम करीत आहेत. तरीही समाजात आज देखील महिलांवर अत्याचार होत आहेत. कन्या भ्रूणहत्येपासुन तिच्या जन्मानंतरही त्यांच्या बाबतीत प्रत्येक स्तरावर भेदभाव केला जातो. लिंगभेदामुळे पुरूषांच्या खांदयाला खांदा लावून काम करताना महिलांच्या वागण्याला, बोलण्याला खुप मर्यादा येतात. व्यासपीठावरून स्त्री-पुरूष समानतेच्या कितीतरी घोषणा केल्या जातात आणि तत्वज्ञान सांगीतले जाते. मात्र स्त्री-पुरूष समानता पाळण्याचा कितीही निश्चय केला तरी महिलांना समान अधिकार देण्यास पुरूष तयार नसतात. अनेकांच्या मनामध्ये महिलांविषयी हिणकस भावना ठाण मांडुन बसलेली असते. जोपर्यंत ही पुरूषी मनोवृत्ती कमी होत नाही तो पर्यंत समाजात महिलांचा सन्मान कधी वाढणार नाही.
महिलांच्या संदर्भात विचार करताना एक दुर्देवी वस्तुस्थिती ठळकपणे जाणवत असते. ती म्हणजे महिलांविषयी दुजाभाव आणि तिचे गौण स्थान यासाठी पुरूषांन इतक्याच स्त्रिया जबाबदार असतात. अलिकडच्या काळात स्त्री व पुरूष दोघांच्याही मनातील "स्त्री' गौण आहे या भावनेमुळे लोकसंख्येतील मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे. याची आकडेवारी आपल्याला विविध माध्यमातुन समजते. आपल्यापोटी मुलगी जन्माला येऊ नये असे केवळ पतीलाच वाटते असे नाही तर पत्नीलाही तसेच वाटत असते. अर्थात दोघांच्या ही मानसिकतेत थोडा फरक असतो. नव-याला मुलगी नको असते ती लिंगभेदाच्या भावनेने किंवा कुटुंबातील थोरा मोठयांचे मुलगाच हवा हे दडपण असते म्हणुन. पण त्या होणान्या मुलीची आई तिला निरोपयोगी समजते, म्हणुन नको असते. मुलगी किंवा बाई म्हणुन आपण काय भोगत आहोत हे तिला अनुभवाने माहित असते. म्हणुन असे भोग भोगण्यासाठी एक जीव जन्माला न घातलेलाच बरा, अशी तिची आगतिकतेची भावना असते. परंतु असे असले तरी एक स्त्री म्हणुन आपण मुलीला जन्म देऊ आणि येणा-या संकटांशी टक्कर देऊन या समाजात सन्मानाने तिला जगायला शिकवू, असा तिचा निर्धार नसतो. त्यामुळे गेल्या २० वर्षात भारतामध्ये जवळपास ३ कोटी कळया पोटातच खुडल्या गेल्या आहेत. कारण त्या कोवळया कळीचा गर्भ पोटात बाळगणारी तिची आई तिच्या जन्माबाबत आग्रही नसते.
प्रत्येक महिला कोणाची तरी आई, कोणाची बहीण, तर कोणाची पत्नी अशा विविध रूपात एकाच वेळी कार्य करत असते.आयुष्यभर तिला हे करावेच लागते. जास्त दुर जाऊन विचार करण्याची आवश्यकता नाही. आपल्या स्वतःच्या घरातील महिला घरासाठी किती कष्ट उपसतात ते पाहिले तरी त्यांचे महत्व लक्षात येते. माझ्या आईने आम्हां दोन भावंडांचे संगोपन व शिक्षणासाठी किती कष्ट घेतले, ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यामुळेच तर आम्ही स्थिरावलो, आयुष्यात यशस्वी होऊ शकलो.एक महिलाच हे कार्य करू शकते. म्हणुन महिलांना सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि सन्मान जर आम्ही देऊ शकलो नाही, तर तो आमचा मोठा पराभव असेल. जे आयुष्यात यशस्वी झाले, ज्यांना स्वतःची प्रगती करण्यासाठी महिलांचे सहकार्य लाभले. त्यांनी तरी महिलांबाबत सकारात्मक विचार करायला हवा. विकासापासुन फार मागे राहिलेल्या महिलांसाठी हात पुढे करण्याची आवश्यकता आहे. एकुण लोकसंख्येच्या निम्मी संख्या असणान्या महिलांच्या परिस्थितीत सुधारणा झाल्याशिवाय उत्कृष्ट समाज आणि सर्वोत्कृष्ट देशाची कल्पना असंभव आहे.
सुधीर चांदेकर पुणे. 

साभार: http://infotoolsindia.com/kumbharsamajonnti/GetCriteria.php?Link=Print%20version&Menu=VichardharaMahilaDin

No comments: