अगतिक स्त्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न जयमती दळवी , सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आपल्या स्वरूपसुंदर शरीराचा शेवट करून घेणाऱ्या नजमाची बातमी वाचली. विविध वर्तमानपत्रांतून या घटनेवर आलेले लेख वाचले आणि मन विषण्ण झाले. ही घटना खरी तर १९७७ सालची; पण आजही ती विषण्णता कमी न होता त्यात भरच पडते आहे. अशा अनेक नजमांचा शेवट थोडय़ाफार फरकाने असाच होत आलेला आहे.. होतो आहे.. आणि असाच पुढेही होत राहणार का? देहविक्रयाच्या नरकातून त्यांची कधीच सुटका होणार नाही का? त्यांना नरकात ढकलणारे दोषी की नरकात पडणाऱ्या त्या स्वत:च दोषी, हे आपण सोफ्यावर बसून आरामात बातम्या वाचणाऱ्या वाचकांनी का ठरवावे? हक्क तरी आहे का आपला? ‘वेश्या’ हा शब्दही तोंडातून काढणे म्हणजे तोंड विटाळून घेणे असे आपल्यातले काही महाभाग समजतात. ‘त्या तसल्या बायका’ असा त्यांचा (कधी केलाच तर) तिरस्कारयुक्त उल्लेख ते करतात. इतकी त्यांना या व्यवसायाबद्दल घृणा वाटते. त्याला व्यवसाय म्हणावे का, हीसुद्धा एक शंका! पण मालाच्या विक्रीबद्दल पैसे घेऊन उदरभरणासाठी केलेला तोही एक व्यवसायच! अनादि काळापासून बाई ठेवणे, देवदासी, कलावंतिणी इत्यादी प्रकार सुरू होते. केवळ खेडय़ापाडय़ांतच नव्हे, तर आज तथाकथित उच्चभ्रू समाजातही हे सर्व प्रकार चालू आहेत. अंगवस्त्र असणे हे आजही मोठेपणाचे लक्षण मानले जाते. शतकानुशतके दोन सत्ताधाऱ्यांमधील युद्धांत अडकल्यामुळे महिनोन् महिने घरापासून दूर राहणाऱ्या सैनिकांना विरंगुळा अथवा शारीरिक गरज म्हणून, तसेच युद्धात ज्या स्त्रियांचे आधार कामी आले त्यांना जगण्यासाठी आवश्यक त्या पैशांची गरज भागवायला म्हणून बेचिराख शहरांमध्ये हा धंदा जोम धरू लागला. शत्रू-सैनिकांनी जिंकलेल्या मुलखातील बायकांवर मालकी हक्काने अत्याचार केल्यामुळे पुढे अनेक पतितांना मग दुसरा पर्यायच उरला नव्हता. शतकानुशतके हा कटू इतिहास मागील पानावरून पुढे चालू आहे. अनाथ, प्रेमभंगाने पोळलेल्या, कधी फसून मातृत्व लादले गेलेल्या, सासरच्या जाचाने पळून आलेल्या अशा अनेक दुर्भागी अबला या मळलेल्या चोरवाटेवरून जाऊ लागल्या. फिल्मी दुनियेच्या झगमगाटाला दिपून घर सोडून गेलेल्या आणि मग त्या फसव्या, मायावी दुनियेतील वास्तवात पोळून निराश झालेल्या अबलांना या नरकात ढकलले जाते. त्यांना अबलाच म्हटले पाहिजे, कारण मातृत्वाचे ईश्वरी दान अशावेळी त्यांच्यात दौर्बल्य आणते. आपण मातृत्वाचे गुणगान गातो, ते वरदान समजतो, स्त्रीजीवनाची इतिकर्तव्यता समजतो; परंतु या बिचाऱ्या अगतिक, चुकल्या गाईंना तो एक शापच ठरतो. निसर्गाने पुरुषजातीला वरचष्मा बहाल केला आहे. मनात आले की चार पैसे फेकून मजा केली की नंतर त्या कृतीची कसलीच जबाबदारी त्याच्यावर नसते, किंवा त्याबद्दलची बांधिलकीही नसते. पुरुष करूनसवरून नामानिराळा होऊ शकतो. पण परिणामाचं फळ पदरी पडणाऱ्या स्त्रीच्या बाबतीत मात्र बोटं मोडली जातात. कावळ्यांप्रमाणे टोचून टोचून त्या स्त्रीला घायाळ करणारा समाज तिला चार घासही सुखाने खाऊ देत नाही. शिक्षण नाही, पुरुषी आधार नाही, अशावेळी त्या स्त्रीला पोट भरण्याचा एकच मार्ग उरतो तो म्हणजे शरीरविक्रय. या तिच्या खासगी मालमत्तेवर जग टपलेलं असतंच. शरीराचा बाजार मांडल्यावर तिचा अन्न-वस्त्राचा प्रश्न थोडाफार सुटतो. त्यासाठी तिला आपल्या शरीर, मन आणि अब्रूचं फार मोठं मोल द्यावं लागतं. पण पोटाची भूकच विलक्षण असते. यातही स्वत:हून देहाचा बाजार मांडणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आढळते. त्यांचा बोलविता धनी वेगळा असतो. एखादी एकटी, एकाकी स्त्री दिसली, किंवा एखादी स्त्री अगतिक झालेली आढळली की एखादा सज्जन (?) मानभावीपणे तिला सहानुभूती दर्शवून, नोकरीधंद्याचे आमिष दाखवतो आणि तिला कुंटणखान्यात विकतो आणि दलाली खिशात टाकून हात झटकून मोकळा होतो. तिच्या देहविक्रयाचा फायदा उठवणाऱ्या बहुतांश व्यक्ती पुरुषच असतात. हॉटेल्स, रेल्वेस्टेशन्स, बस स्टेशन्स यावर पाळत ठेवून पळून आलेल्या, चुकलेल्या, अनाथ, कामाच्या शोधार्थ मोठय़ा बकाल शहरात फिरणाऱ्या एकटय़ा मुलींना हे दलाल गाठतात. या मुलींना गोड भूलथापा मारून, वेळप्रसंगी धाकदपटशा दाखवून, मिळतील त्या पैशांना एखाद्या कुंटणखान्याच्या मालकीणीला (‘ऑन्टी’) विकतात. सुरुवातीला त्या मुलीला बऱ्यापैकी खायला-प्यायला घालून कपडेलत्ते पुरविले जातात. बाजारात भाव यावा यासाठी तिची दलालांकरवी जाहिरात केली जाते. तीही तोंडीच होते. मुली विरोध करू लागल्या तर पाळलेल्या गुंडांकरवी मारहाण करून त्यांना वठणीवर आणले जाते. चार-आठ दिवसांनी मारहानीमुळे त्या दुर्दैवी मुलीचा विरोध मावळतो किंवा ते नित्याचेच झाले की तिचे मन मुर्दाड बनते. कधीतरी एखादा मायेचा लाल आपल्याला भेटेल आणि या नरकातून सुटका करेल, हा आशेचा किरण मनात बाळगून अनेकजणी बधिर मनाने मग शरीर शृंगारून गिऱ्हाईकाची वाट बघायला लागतात. आपल्या देशात असंख्य पुरुष बेकार आहेत. मग बायका बेकार असल्यास नवल नाही. दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठी अगतिक होऊन त्या या बिनभांडवली धंद्याकडे वळल्यास आश्चर्य वाटायला नको. इतर सर्व मार्ग बंद झाल्यावर पैसा मिळविण्याचे एकमेव साधन त्यांच्या हातात असते ते म्हणजे त्यांचे शरीर. याही बाबतीत त्या पुरुषांवर अवलंबून असतात. सामान्य स्त्रीला लग्नानंतर पती- एक पुरुषच सुरक्षितता व स्थैर्य देतो. वेश्यांनाही पैसा मिळविण्यासाठी पुरुषाचीच गरज भासते. भुकेल्याला भूक भागवताना पक्वान्न की पालेभाजी असली निवड करायची संधी नसते, तेच शरीराची भूक भागवण्यासाठी कुंटणखान्याची माडी चढणाऱ्यांचेही असते. किंमत देण्याच्या बदल्यात थोडय़ा वेळापुरता का होईना, तो पुरुष त्या स्त्रीदेहाचा मालक असतो. पुरुषी अहंकाराला याशिवाय दुसरे काय लागते? माडीवरची दोन घडीची मौज झटपट व कमी खर्चात होते. वर भावनांचा गुंतावळा वगैरे भानगड नाही. मालाची पत तसा भाव बाजारात ठरतो. दात्याच्या अर्थशक्तीनुसार मालाचा पुरवठा होतो. सभ्य वेश्यांना ‘कॉलगर्ल’ म्हटले जाते. मात्र रेडलाइट एरियात शरीरविक्रयाचा धंदा थेटच होतो. अर्थात इंग्रजी शब्दाचे पांघरूण घातले म्हणून या व्यवसायाचे स्वरूप काही बदलत नाही. ‘कॉलगर्ल’ होण्यासाठी थोडेसे वेगळे तंत्र अवलंबिले जाते. बडय़ा लोकांशी घसट वाढवू इच्छिणाऱ्या, श्रीमंत, उच्चभ्रू (पेज थ्री) वर्गात स्थान मिळविण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणी हेरून त्यांच्याशी ओळख करून घेण्यासाठी दलाल नेमले जातात. एकदा का अशा मुलींचा विश्वास संपादन केला, की त्यांना ऐषारामी जीवनाची चटक लावली जाते. इम्पोर्टेड सेंट्स, कॉस्मेटिक्स, उंची कपडे, महागडय़ा पर्सेस यांसारख्या किमती वस्तूंच्या अभिलाषेला बळी पडून पुढे या जीवनाची चटक सोडू न शकणाऱ्या मुली ही चंगळवादी जीवनशैली बिनदिक्कत सुरू राहण्यासाठी देहविक्रय करून सहजी मिळणारा पैसा (इझी मनी) कमावू लागतात. त्यांचा उल्लेख ‘बिझनेस वुमेन’ असा करण्यात येतो. त्यांच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून किंवा इंटरनेटवर केल्या जातात. ‘उपलब्ध आहे- ‘मुक्त मनाची साथीदार’, ‘एकटेपणा घालवणारी ड्रीमगर्ल’, ‘एस्कॉर्ट’, ‘टेंपररी लिव्ह-इन् पार्टनर..’ अशा प्रकारे जाहिराती देऊन गिऱ्हाईकांना आमंत्रण दिले जाते. घरच्या अडचणींपायी नाइलाजाने हा मार्ग पत्करणाऱ्याही काही मुली असतात. डान्स क्लासेस किंवा डान्स बारच्या नावाखाली कित्येकदा राजरोसपणे वेश्यागृहे चालविली जातात. नोकरी करता करता लंच टाइममध्ये किंवा ऑफिस संपल्यावर हा ओव्हरटाइमचा जॉब करणाऱ्या अनेक सुशिक्षित, सुसंस्कृत घरांतील मुली आढळतात. ओव्हरटाइमचे पैसे बघून घरची माणसेही त्यांच्या कृत्यांकडे कानाडोळा करतात. असे डान्स क्लासेस आणि डान्स बारबद्दल बरीच आरडाओरड झाल्यावर पोलीस छापे घालून तिथल्या अल्पवयीन मुली व मॅनेजरला अधूनमधून पकडतात. या मुलींना सरकारी रिसेप्शन सेंटर्समध्ये पाठविले जाते. परंतु ही सेंटर्स एकूण गरजेच्या मानाने फारच अपुरी आहेत. शिवाय तेथे स्वावलंबी जीवन जगण्याच्या दृष्टीने नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी व्यवसाय शिक्षण दिले जात नाही. आई-वडील अशा मुलींना घरी घेऊन जाण्यास राजी झाले तरी त्यांना गाव आणि समाजाकडून हीन वागणूक मिळते. त्यांचे जीवन असह्य़ केले जाते. साध्या घरकामालाही त्यांमा कोणी ठेवून घेत नाही. मग तिला एकच मार्ग उरतो. परत त्याच नरकात शिरण्याचा! या व्यवसायामुळे रोगग्रस्त होऊन या मुलींना आयुष्याचे शेवटचे दिवस अक्षरश: यमयातनांमध्ये काढावे लागतात. लाजेपायी आणि गिऱ्हाईके बंद होतील, या भीतीने डॉक्टरकडे जाण्यासही त्या कचरतात. तात्पुरते देशी उपाय करतात. आणि मग रोग हाताबाहेर गेल्यावर निरुपयोगी म्हणून त्यांना रस्त्यावर फेकले जाते. अलीकडे केलेल्या पाहणीतून आढळून आले आहे की, वेश्यांचे बरेच मोठे गिऱ्हाईक महाविद्यालयीन तरुण असतात. एल. एस. डी. वगैरे उत्तेजके घेऊन स्वैर जीवनाचा आस्वाद (!) घेणे, हा त्यांचा उद्देश असतो. फास्ट लाइफ आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या व्याख्येत लैंगिक स्वैरता हा घटक हल्ली महत्त्वाचा मानला जातो. किंबहुना, व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजेच स्वैर लैंगिक जीवन अशीही गफलत अनेकजण साळसूदपणे करतात. ‘देवाचं देणं आहे हे. पोटाची भूक तशीच ही शारीरिक भूक. तिचा अवमान करून कसं चालेल? पोटासाठी जगाचं रहाटगाडगं चालू आहे त्यात जर कसली लाज नाही, तर मग शारीरिक भूक भागवताना कसली आलीय लाज?’ असे त्याचे समर्थन केले जाते. गुप्तरोग आणि एड्सची लागण तरुण पिढीत आज फार मोठय़ा प्रमाणावर आढळून येत आहे. या रोगांच्या परिणामी भोगाव्या लागणाऱ्या यमयातनांमध्ये खितपत पडायचे नसेल तर संयमासारखे दुसरे कोठलेही रामबाण औषध नाही. या व्यवसायात नाइलाजानं ढकलल्या गेलेल्या अनाथ, अगतिक स्त्रियांनाही उपजीविकेसाठी दुसरा मार्ग मिळाला तर त्या नक्कीच या नरकातून बाहेर पडतील. परंतु त्यांच्या या यातना कमी करण्यासाठी त्यांच्या वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करणे, त्यांना योग्य त्या औषधांचा पुरवठा करणे याबद्दल समाजकल्याण खात्याने जागरूक राहायला पाहिजे. मात्र, आज अपुरी सुधारगृहे, स्वावलंबी जीवनासाठी हातभार न लावणारी सरकारी यंत्रणा, समाजाचा असहकार यामुळे या स्त्रियांना त्याच भयाण वाटेवरून जावे लागते. हा प्रश्न तरी संघटितरीत्या काम केल्यास काही अंशी तरी सुटू शकेल. अशा स्त्रियांना विविध व्यवसाय शिकवून त्यांचा उद्योगगृहांमध्ये उपयोग करून घ्यायला हवा. त्यांना समाजाची कीड न मानता, ‘अपंग’ समजून या नरकातून त्यांना बाहेर काढण्याची, तसेच त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी समाजाचीच आहे. मानवी हक्क संघटनेच्या अहवालानुसार, भारतात दीड कोटीच्या आसपास मुली व स्त्रिया वेश्याव्यवसाय करतात. केवळ मुंबईतच एक लाख वेश्या आहेत. मुंबई हे आशियातील सर्वात मोठे ‘सेक्स इंडस्ट्री’चे केंद्र आहे. दिवसेंदिवस मुंबई हे अल्पवयीन वेश्यापुरवठा केंद्र बनते आहे. त्यापाठोपाठ आहेत कोलकाता आणि हैदराबाद ही शहरे. अलीकडेच एका विमा कंपनीने कोलकात्यात २५० वेश्यांना विमा दिला आहे. समाजमानसात होत असलेला हा सकारात्मक बदल आहे. अशावेळी मनात प्रश्न येतो की, वेश्यांना माणूस म्हणून वागवले जाण्यासाठी या व्यवसायाला कायद्याची मान्यता द्यावी काय? कायद्यामुळे वेश्याव्यवसाय निर्मूलन होणार नाही; परंतु अनैतिकता आणि बेकायदेशीरपणा या शब्दात अडकलेले हे व्यवहार कायदेशीर झाल्याने त्यात सहभागी होणाऱ्या स्त्रियांच्या वैद्यकीय तपासण्या अनिवार्य ठरतील. याचं कारण आज अध्र्याअधिक वेश्या एड्सग्रस्त आहेत. परिणामी समाजात एड्स पसरतो आहे. या व्यवसायातील बेकायदेशीरपणा गेल्यास वैद्यकीय विमा, वैद्यकीय सवलती उपलब्ध होतील. त्यांच्या कुटुंबाच्या व मुलांच्या भावी आयुष्याबद्दलही विचार केला जाईल. ज्यांना हा व्यवसाय सोडायचा असेल त्यांच्यासाठी पुनर्वसनाचे कार्यक्रम आखून ते राबविणे शक्य होईल. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, त्याप्रमाणे कायद्याने वेश्याव्यवसायाला मान्यता देण्यावर काही आक्षेपही घेता येतील. हा एक प्रकारे स्त्रीदेहाचा बाजार मांडणे होईल; त्यामुळे सामान्यांचे कौटुंबिक आयुष्य गढूळ होईल, समाज अस्ताव्यस्त होईल, असे काही समाजशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कॅनडा, फ्रान्स, वेल्स, डेन्मार्क, हॉलंड, बराचसा दक्षिण अमेरिका (मेक्सिकोतील विशिष्ट भागासह), इस्रायल, ऑस्ट्रेलिया आदी देशांनी वेश्याव्यवसायास कायद्याने मान्यता दिली आहे. ऑस्ट्रेलियात ‘सेक्स सव्र्हिस कंपनी’ आहे. त्या कंपनीच्या शेअर्सची तेथील शेअर बाजारात उलाढाल होते. कायद्याची मान्यता योग्य की अयोग्य, हा वादविवादाचा मुद्दा आहे. पाश्चात्य आणि भारतीय नैतिकता वेगवेगळी आहे, हे लक्षात घेतल्यास पाश्चात्यांचे केवळ अंधानुकरण टाळणे इष्ट ठरेल. वेश्याव्यवसाय अर्थात ‘प्रॉस्टिटय़ूशन’ या इंग्रजी शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आहे : ‘स्वत:च्या देहाची किंवा बुद्धीची पैशासाठी विक्री करणे.’ आज भारतात चाललेला खेळाडूंचा घोडेबाजार या व्याख्येत बसत नाही का? त्यातील अनैतिकता समाजाने पचवली आहे. मग वेश्याव्यवसाय हा तर अगतिक स्त्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. त्याला वेगळा मापदंड का? साभार : http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=177536:2011-08-19-07-11-43&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194 |
Thursday, September 20, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment