मातृत्वाचं मोल
फादर फ्रान्सिस दिब्रिटोतिच्या श्रद्धेच्या सत्त्वपरीक्षेचा क्षण होता तो. तो तडफडत होता, विव्हळत होता. पाण्याच्या थेंबासाठी आसुसला होता. तिच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं. अखेरच्या घटका मोजणाऱ्या आपल्या तृषार्त पुत्राला ती थेंबभर पाणीही देऊ शकत नव्हती. किती क्रूर असते नियती. उरात दूध आणि डोळ्यांत अश्रू...हेच मातृत्वाचं फलित असतं, हे तिला जाणवलं! या जगाचा निरोप घेताना, त्यानं तिला विश्वाची माता केलं. ज्यांना आईच्या मांडीचं कधी सुख मिळालं नाही, त्यांना त्यानं माउलीच्या पदरात टाकलं!
--------
""मी तर कुमारिका आहे. माझं लग्न ठरलं आहे; परंतु झालेलं नाही...हे कसं शक्य आहे?''
मरियेनं नम्रतेनं विचारलं, ""त्याची चिंता तू करू नकोस. तुला देवाचा अनुग्रह होऊन तुझ्या उदरी देवपुत्र जन्म घेईल...देवाला काहीच अशक्य नाही...
""जशी देवाची इच्छा..'' मरिया उद्गारली.
""तथास्तु'' असं बोलून देवदूत अंतर्धान पावला.
मरिया ध्यानातून बाहेर आली...कौमार्यावस्थेत बाळाची चाहूल लागणं समाजाला बिलकूल मान्य नव्हतं. अशा स्त्रीसाठी धर्म-कायद्यानं धोंडमाराची शिक्षा निश्चित केली होती.
कुशीतील कोंबाचं जतन करायचं तर अमानुष शिक्षेला सामोरं जावं लागेल, नात्या-गोत्यात आणि समाजात छी थू होईल. एका असहाय्य, दुर्बल जिवाचं संवर्धन करायचं की आपला जीव वाचवायचा? जे घडलं आहे, ते आपल्याच संमतीनं ना? मग त्याचे परिणाम का टाळायचे? माणूस असणं म्हणजे जबाबदार असणं. मातृत्वाची विटंबना हा सर्वात मोठा अधर्म आहे...कितीही सोसावं लागलं, भोगावं लागलं...अग्निदिव्याला सामोरं जावं लागलं, तरी जपणार आहे मी माझ्या कुशीतल्या अंकुराला. मी स्त्री आहे. मी सृजनाची जननी आहे. मी जीवनाची पूजक आहे...काय सांगावं, माझा बाळ उद्या जगाचा उद्धारकर्ताही होईल. देवाघरचं ज्ञात कुणा? मंदिराच्या मनोऱ्यावरील पिंपळाच्या रोपट्याला जो जपतो आणि रानातील फुलांना जो सजवतो, तो घेईल माझी आणि माझ्या बाळाची काळजी.
मरियेनं दृढनिश्चय केला. माणूस जेव्हा नैतिकतेची वाट चालण्याचं ठरवतो, तेव्हा त्याच्या अंगी दहा हत्तींचं बळ एकवटत असतं.
आपल्याच मनात शिरून, "आपुला संवाद आपणासि' करण्याची कला मरियेला अवगत झाली होती. जीवनातील रहस्याच्या निरगाठी सोडवण्याची किमया तिला साधली होती. त्यामुळं आपल्या अंतरात्म्यातील दिव्यत्वाचा शोध तिला लागला. आत्मिक शांती आणि गूढ मौन ह्या पंखांचा आधार असला तरच माणसाला दिव्यत्वाचा साक्षात्कार घडू शकतो.
मात्र, योसेफाला अकल्पिताची कुणकुण लागताच त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. त्यानं आकांडतांडव केलं. संशयाच्या पिशाच्चानं त्याला घेरलं. पौर्णिमेच्या चांदण्याप्रमाणं नितळ चारित्र्य असलेल्या आपल्या प्रेयसीबद्दल त्याच्या मनात अपार आदरभावना होती. तिच्या चारित्र्याबद्दल शंका घेणं हेदेखील त्याला पाप वाटत होतं. तो कोमल मनाचा सज्जन पुरुष होता. तिची नाचक्की होऊ नये म्हणून तिला गुप्तपणे निर्जन जागी सोडून देण्याचा निर्णय घेतला.
एका रात्री देवाच्या दूतानं योसेफाला दर्शन दिलं. त्याची समजूत घातल्यावर त्यानं मरियेच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तिला घेऊन तो जेरुसलेमनगरीला निघाला. खानावळीत जागा न मिळाल्यामुळं त्यांनी बेथलेहमजवळील माळरानावरील गुरांच्या गोठ्याचा आश्रय घेतला. मातृत्वाच्या अनुभवानं मरिया मोहरून गेली. मेंढपाळ धावले. शेतकरी गोळा झाले. राजे-रजवाडे आले. सारे बाळाच्या पायाशी नतमस्तक झाले. आपल्या बाळाच्या अंगभूत महत्तेमुळं मरिया भारावून गेली. सारं सारं तिनं बारकाईनं न्याहाळलं. एका दिव्य रहस्याच्या पुढ्यात ती होती. रहस्याचा आस्वाद मौनानंच घ्यायचा असतो, हे मरिया शिकली होती.
देवाचं बाळ जन्माला आलं. आठवडाभराच्या त्या बाळाच्या जन्माची वार्ता ऐकून संशयात्मा सम्राट हेरोद ह्याची भीतीनं गाळण उडाली. मरियेच्या घरातील लसलसता कोंभ उपटून टाकण्याचा आदेश सम्राटानं दिला. मरिया विचार करू लागली..का बरं राजे-रजवाड्यांनाही भीती वाटावी असहाय्य बाळाची? इतिहासाच्या प्रवासात किती कलिका कुस्करल्या गेल्या आहेत...किती कोंब चिरडले गेले आहेत; तेही प्रत्यक्ष जन्मदात्या जननीकडून!
चिमुकला जीव उराशी कवटाळून माता मरिया योसेफासह इजिप्तच्या दिशेनं निघाली. वाट आडवळणाची, चोरा-चिलटांची, साथीला फक्त जोडीदार, आपल्या पाठीशी भोग का लागावेत, हे मरियेला समजेना. तरी तिनं धीर सोडला नाही. ज्यानं पंख दिले आहेत, तो उडण्याचं बळ देईल, हा तिचा विश्वास होता. संपूर्ण प्रवासात ती मौनात मग्न झाली.
बाळाच्या जिवावर उठलेला सम्राट मरून गेला. तारणाऱ्याला घेऊन मरिया माहेरी परतली. मंदिरात तिनं बाळाचं समर्पण केलं. तिचं नवसाचं बाळ ऋषिवर्य सिमोन ह्यानं आपल्या थरथरत्या हातात घेतलं. त्याला जोजवलं, थोपटलं, त्याच्या भविष्याची झलक त्यानं मरियेला दिली. "तुझ्या काळजातून सात तलवारी आरपार जातील,' ते शब्द ऐकताच त्याच क्षणी सात तलवारी मरियेच्या काळजात एका वेळी खुपसल्या गेल्या. ते मातृत्वाचं मोल होतं. ती आपल्या मुलाची माता होती, त्याचबरोबर ती अपार वेदनेचीही आई होती. माता होणं म्हणजे तलवारीच्या पात्यांवरून अनवाणी चालणं होय.
बारा वर्षांच्या सुकुमार बाळाला घेऊन ती जेरुसलेमच्या तीर्थयात्रेला निघाली. यात्रा सरली. ती परतीच्या प्रवासाला निघाली. अर्ध्या वाटेवर कळलं, की बाळ संगती नाही. तिचं अवसान गळालं. तिचं शरीर बर्फासारखं थंड झालं. जड पावलांनी, भरल्या डोळ्यांनी ती माघारी फिरली. तिला बाळयेशू पंडितांना शहाणपण शिकवताना आढळला. त्याच्या प्रकांड विद्वत्तेनं धर्मपंडित थक्क झाले. त्याचं बोलणं तिला समजलं नाही. आपल्या झोपडीत उगवलेल्या ह्या सूर्याला आपल्याला कितपत जपता येईल, यावर ती चिंतन करू लागली.
त्याच्या आयुष्याच्या तिसाव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची ती गहिवरलेली संध्याकाळ. आईच्या पायांवर तो नत मस्तक झाला. तिचा आशीर्वाद त्यानं घेतला आणि घरदार कायमचं सोडून "मागं वळून न पाहता' तो देवराज्याच्या प्रचारासाठी घराबाहेर पडला. त्याची पाठमोरी आकृती क्षितिजावर अंतर्धान पावेपर्यंत ती पाहत राहिली. त्या कातरवेळेला अंगणात ती एकटी. एकपुती असो की सातपुती असो, आईच्या जीवनात असे एकटेपणाचे कितीतरी क्षण येत असतात. "कन्या सासुऱ्यासी' जाताना किंवा पुत्र निराळा संसार थाटण्याच्या विचारानं घराच्या पायऱ्या उतरत असताना उंबरठ्याच्या आत आई एकटी, एकटी अश्रू ढाळत असते.
दिवस सरत होते. महिने उलटत होते. पुत्रवियोगानं ती विव्हळू लागली. उडत्या पाखरांकडं त्याच्या खबरा विचारून ती शिणली. वाटेच्या वाटसराकडं तिनं त्याची चौकशी केली आणि एके दिवशी आपल्या राहत्या घराचा कायमचा निरोप घेऊन त्याची शिष्या होण्यासाठी त्याचा मागोवा घेत ती निघाली. शोधत शोधत ती गालिलीच्या गावात पोचली. तो प्रवचन देत होता. त्याची अमृतवाणी श्रवण करणारा जमाव मंत्रमुग्ध झाला होता.
""तुझी आई तुला भेटायला आली आहे,'' कुणीतरी त्याचा कानात कुजबुजलं. अफाट जमावाकडं नजर टाकून तो शांतपणे म्हणाला, ""कोण माझी आई? कोण माझी बहीण? हे जे देवाचं वचन ऐकणारे व पाळणारे, तेच माझी आई व माझे भाऊबंद आहेत.''
तिच्या कानावर हे शब्द पडले. तिला जाणवलं, की तो आता तिचा राहिलेला नाही. तो विश्वाचा झालेला आहे. ती क्षणभर हिरमुसली. तिनं आवंढा गिळला. डोळे पुसले. लगेच तिनं स्वतःला सावरलं. संत-महात्म्यांची आई होणं हा सन्मान नसतो मुळी, हे तिला ठाऊक होतं. तो विरक्त झाला होता; परंतु ती? नाळेचं नातं ती विसरू शकत नव्हती. देवाचा शब्द तिच्या जीवीचं जीवन होता. ती पुन्हा चिंतनात गेली..."आई होणं म्हणजे धगधगत्या निखाऱ्यांवरून चालणं...महामानवाची माता होणं म्हणजे वणव्यात शिरणं...सर्वांग पोळत असताना ओठावरच्या स्मिताला आणि काळजातल्या मायेला जपणं...का रे देवबाप्पा, तू सगळे भोग मातेच्या पदरात टाकले आहेस?''
काना गावी लग्न निघालं होतं. आईच्या संगती तोही लग्नाला गेला होता. वाजंत्री वाजत होती. पाहुण्यांची वर्दळ वाढत होती. पंगती उठत होत्या आणि अचानक कुजबूज सुरू झाली ः "द्राक्षरस संपला.'
"त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही,' ती पुत्राच्या कानात कुजबुजली तीनच शब्द. त्यानंतर ती ध्यानस्थ झाली. तिच्या पुत्राच्या केवळ कटाक्षानं पाण्याचा द्राक्षरस झाला. मंडपात आनंदाला उधाण आलं आणि मरियेच्या हृदयालाही. ती सर्वांचीच माता झाली होती.
अखेर तो शुक्रवारचा दिवस उजाडला. त्याच्या बलिदानाचा परममंगल दिवस. रात्रभर झालेल्या मारहाणीमुळं त्याचं शरीर काळंनिळं पडलं होतं. त्याच्या हाता-पायांना खिळे ठोकून त्यांनी त्याला क्रुसावर चढवलं होतं. त्याला धाप लागली होती. लोहाराच्या भात्याप्रमाणं त्याची छाती खाली-वर होत होती. श्वास गोंधळत होता. जडशीळ जिभेवरून एकेक शब्द बाहेर पडत होता....
"मला...तहान...लागली...आहे...'
तिच्या श्रद्धेच्या सत्त्वपरीक्षेचा क्षण होता तो. तो तडफडत होता, विव्हळत होता. पाण्याच्या थेंबासाठी आसुसला होता. तिच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं. अखेरच्या घटका मोजणाऱ्या आपल्या तृषार्त पुत्राला ती थेंबभर पाणीही देऊ शकत नव्हती. किती क्रूर असते नियती. उरात दूध आणि डोळ्यांत अश्रू...हेच मातृत्वाचं फलित असतं, हे तिला जाणवलं! या जगाचा निरोप घेताना, त्यानं तिला विश्वाची माता केलं. ज्यांना आईच्या मांडीचं कधी सुख मिळालं नाही, त्यांना त्यानं माउलीच्या पदरात टाकलं.
आयुष्याच्या प्रवासात मरिया मोजकीच बोलली. अगदी आवश्यक होतं, अपरिहार्य होतं, तेव्हाच तिनं शब्दांचा आधार घेतला. एरवी, तिनं मौन पाळणं पसंत केलं. मात्र, शाश्वताबरोबर तिचा अखंड संवाद सुरू होता. जो शांततेच्या जवळ असतो, तो शाश्वताच्या जवळ असतो, हे रहस्य तिला उमगलं होतं. ती शांत होती, कारण ती कृपेनं भरलेली होती. भरलेलं भांडं आवाज करीत नाही. उथळ पाण्यालाच खळखळाट असतो.
मरिया शांत होती. प्रसन्नचित्त होती. मात्र, ती मुकी नव्हती. अन्यायाची तिला चीड होती. जुलूम करणाऱ्यांबद्दल तिला सात्त्विक संताप होता. जीवनात कधी शांत राहावं नि कधी बोलावं, हे तिला माहीत होतं. धर्माच्या नावानं मंदिरात चाललेला व्यापार तिनं पाहिला होता. गोरगरिबांचं होणारं शोषण तिनं अनुभवलं होतं. आपल्या नित्याच्या चिंतनशील वृत्तीनं तिनं सगळ्या गोष्टी आपल्या मनात ठेवल्या होत्या. अन्यायानं परिसीमा गाठली तेव्हा ती जणू रणरागिणी बनली. देवाचे आभार मानताना तिनं मदांध आणि सत्तांध ह्यांना इशारा दिला ः
"देवानं आपल्या बाहूनं पराक्रम केला आहे.
जे गर्विष्ठ आहेत, त्यांची त्यानं दाणादाण केली आहे.
त्यानं सम्राटांना राजासनावरून खाली खेचलं आहे.
आणि धनवानांना रिकाम्या हातानं परत पाठवलं आहे.'
शांतीच्या उपासकाच्या ओठावरून जेव्हा एखादा शब्द बाहेर पडतो, तेव्हा प्रचंड उत्पात करण्याची ताकद त्यात सामावलेली असते. ही शक्ती त्यांनी मौनाच्या तपस्येमधून मिळवलेली असते.
साभार : http://www.esakal.com/esakal/20120513/4779269888593690923.htm
No comments:
Post a Comment