Pages

Monday, August 27, 2012

अंधारातल्या तारका

            पाश्चिमात्य देशातील स्त्रियांनी १८ व्या शतकापासून विज्ञान
            क्षेत्रात तसेच शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्यावर प्रकाश 

 ---------------------------------------------------------------------------------------------------------


स्त्री चळवळीचा एक रोख हिस्ट्नी म्हणजे हिज स्टोरी या शब्दावर होता. हा शब्द इतिहास जणू पुरुषांनीच घडवला ही बाब मनावर ठसवतो. त्यामुळेच स्त्रियांचे हक्क, स्त्रीपुरुष समानता यासारख्या गोष्टींसाठी झगडणाऱ्या स्त्री चळवळीने भूतकाळात स्त्रियांनी केलेली कर्तबगारी व त्यांनी निरनिराळया क्षेत्रात केलेले कार्य जगापुढे आणण्याच्या दृष्टीने संशोधन करून विविध प्रकारची माहिती मिळवली. पॅि्निशटाया फारा या लेखिकेने `सायंटिस्ट्स अॅनानिमस' या आपल्या पुस्तकातून पाश्चिमात्य देशातील स्त्रियांनी १८ व्या शतकापासून विज्ञान क्षेत्रात तसेच शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला आहे.

       -----------------------

भारतात तर मुलींना लिहायला, वाचायलादेखील त्या काळात शिकवले जात नसे. मुलींना शिकवण्याची गरज गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षि धोंडो केशव कर्वे व त्याही आधी जोतिबा फुले यांना वाटली. प्रारंभी शिकलेल्या सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, बाया कर्वे, रमाबाई रानडे या आपल्या नवऱ्यांच्या आग्रहाखातर व त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे शिकल्या. युरोप-अमेरिकेतील मुलींना विज्ञान व गणित शिकायला बंदी होती. त्याविरुद्ध अनेक स्त्रियांनी आवाज उठवला. मुलींना विज्ञान व गणिताचे शिक्षण द्यायला हवे यावर भर दिला. त्यासाठी स्वत: शाळा चालवल्या. विज्ञानप्रयोगांसाठी मुलींना उत्तम उपकरणे प्राप्त व्हावीत म्हणून पैसा जमवला.
मुली मुलांप्रमाणेच विचार करू शकतात हे सांगून स्त्री शिक्षणासाठी चळवळ करणारी पहिली इंग्रज स्त्री बाथुसा माकिन ही होय. बुद्धिमत्ता चाचण्यांचा पहिला प्रयोग जेव्हा मुलांबरोबर मुलींवर करण्यात आला तेव्हा त्याचे निकाल पुरुषांना मान्य होण्यासारखे नव्हते. अनेक मुलींनी त्यात मुलांपेक्षा अधिक गुण मिळवले होते. पण नंतर मुलगे व मुली दोघांचा बुद्ध्यांक समान असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे ताबडतोब पुरुषांच्या मनोवृत्तीत फरक पडला असे नाही; पण मुलींना अक्कल कमी असते हा शेरा सहज मारता येत असे त्याला थोडाफार का होईना आळा बसला. व्हर्जिनिया वूल्फच्या मते अनामिक (अॅनानिमस) नावाने झालेले पूर्वीच्या काळातील सगळे लिखाण स्त्रियांनीच केले असले पाहिजे. स्त्रियांनी आपली हुशारी लपवून ठेवावी असा सल्ला १७ व्या, १८ व्या शतकात मुलींना दिला जात असे. काय शिकावे या बाबतीत मुलींना पर्याय नव्हता. जे शिकवले जाते ते शिकायचे. इतकेच नव्हे तर १९ व्या शतकातही इंग्लंडमधील एका मुलींच्या शाळेत शिवणटिपण करता येणे ही आवश्यक बाब मानली जात असे. शिकण्याची दुर्दम्य इच्छा असणाऱ्या मुलींना लपूनछपून भावांची पुस्तके वाचून शिकावे लागे. काहींनी शिक्षण घेता यावे म्हणून आपल्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या पुरुषांशी विवाह केले. काहींनी अन्य देशी जाऊन शिकण्याचा प्रयत्न केला तर काहींनी पुरुषांची नावे धारण करून उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. काहींनी अतिशय मौलिक संशोधन करूनही केवळ स्त्री म्हणून त्याचे श्रेय त्यांना मिळाले नाही. काहींचे संशोधनातील निष्कर्ष इतर पुरुषांनी चोरून ते आपल्या नावावर प्रसिद्ध करून नोबेल पारितोषिकही निर्लज्जपणे पटकावले. अनेकींना मानहानी सहन करावी लागली, टक्केटोणपे खावे लागले. काहींच्या शारीरिक व्यंगाची टर उडवली गेली व कुरुपपणावर ताशेरे झाडले गेले. (जणू सगळे पुरुष देखणेच असतात. स्टीफन हॉकिंग सतत चाकाच्या खुर्चीवर असतो पण त्याची कोणी स्त्रियांनी टर उडवलेली ऐकिवात नाही.) विज्ञानाला वेगळे वळण देणारा व एक वेगळा ऊर्जा स्रोत प्राप्त करून देणारा शोध अणूचे विभाजन करता आल्यामुळे लागला. हे श्रेय खरे लिझ माइटनरचे; पण ते तिला मिळाले नाही. अथेना ही देवता आपल्याकडील गणेशाप्रमाणे विद्येची देवता मानली जाते. ग्रीक पुराणानुसार अथेना ही ज्युपिटरची मुलगी; परंतु ती विद्या फक्त
पुरुषांनीच मिळवायची. नोबेल पारितोषिकावरील चिन्हातूनही हाच संदेश कळत-नकळत दिला जातो असे पॅि्निशटाया फारा म्हणते.
काही स्त्रिया अशाही होत्या ज्यांनी आपल्या पैशाचा आणि आपल्या पदाचा उपयोग करून अनेकांना संशोधनासाठी मदत केली. अशा स्त्रियांमध्ये इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथ ही होती. जॉन डी हा तिच्या पाठबळावर प्रयोग करीत असे. तो तिचा सल्लागारही होता. तो गणितज्ञ असून नौकानयनात तरबेज होता. जे. के. रोलिंगच्या गाजलेल्या हॅरी पॉटर मालिकेत येणारे डंबल डोअर (हॉगवॉट्सच्या शाळेचा मुख्याध्यापक) हे पात्र जॉन डी वरून निर्माण केले आहे असे काहींचे मत आहे. मेरी हर्बर्टने डी व इतरांना प्रयोगासाठी लागणारे पाठबळ पुरवले. त्या बदल्यात प्रयोग कसे करावेत हे तिने शिकून घेतले.
जर्मन गणितज्ञ व तत्त्वज्ञ आणि लंडनच्या रॉयल सोसायटीचा सदस्य असलेल्या लायबनिट्झला राजघराण्यातील लोकांनी मदत केली. त्याने हॅनोव्हर घराण्याच्या राजपुत्राचा ग्रंथपाल म्हणून काम केले. क्रॅरोलीन या राजकन्येने न्यूटनच्या विरोधात लायबनिट्झला पाठिंबा दिला. स्वीडनची राणी िख्र्तासीना (१६२२-१६८९) ही उत्तरेकडची अथेना म्हणून ओळखली जात असे. लंडन आणि पॅरिस या शहरांच्या तोडीस तोड अशी स्टॉकहोमची ख्याती व्हावी अशी तिची इच्छा होती. तिचा राजवाडा हा विद्येचे केंद्र बनला होता. देकार्त हा तत्त्वज्ञ तिला आठवड्यातून ५ तास शिकवत असे. त्याची शिकवणी पहाटे ५ ला सुरू होत असे. त्याच्या मृत्यूनंतर िख्र्तासीनाने ग्रीक व लॅटिन वाङ्मयाच्या अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित केले.
लारा बासी : (१७११ ते १७७८) ही इटलीची असून वयाच्या २१ व्या वर्षी ती बोलोग्रा विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवू लागली. तिचे वडील वकील असून ते सधन होते. त्यामुळे खासगीरीत्या तिला विज्ञान, गणित, भाषा आणि वाङ्मय हे विषय शिकता आले. ती अनेक तज्ज्ञ मंडळींबरोबर उत्साहाने वादविवाद करीत असे. भौतिकशास्त्रावर तिचे ४ शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते. तिने इटलीला विज्ञानक्षेत्रात प्रतिष्ठा मिळवून दिली. पण तिला पुरुषांपेक्षा कमी पगार दिला जात असे. तिने बराच काळ घरात राहून मुलाकडे लक्ष द्यावे असे सांगून तिला शिकवण्याचे काम दिले जात असे. इ.स.१७७२ मध्ये तिने प्राध्यापकपदासाठी अर्ज केला. त्यासाठीही तिला संघर्ष करावा लागला. परंतु विद्यापीठातील पुरुषांनी स्त्रियांना त्या पदावर प्रवेश द्यायचा नाही असे ठरवले व पात्रता असूनही तिला त्या पदापासून वंचित राहावे लागले.
मारी पाल्झ : (१७५८-१८३६) मारीने अँटोन लॅव्हॉइझे या महत्त्वाकांक्षी धनाढ्य व्यापाऱ्याशी लग्न केले. तो वकीलही होता. त्याच्या काटेकोर व कडक शिस्तीत तिचे शिक्षण सुरू झाले. रात्रीच्या जेवणानंतर ती नवऱ्याबरोबर ३ तास प्रयोगशाळेत काम करीत असे. तिने रसायनशास्त्राचा आणि लॅटिन व इंग्रजी या भाषांचा अभ्यास केला. जवळजवळ २० वर्षे दोघांनी प्रवास केला व जोडीने काम केले. आपल्या नवऱ्यासाठी तिने पुस्तके व निबंध यांचे फ्रेंच भाषेत अनुवाद केले. गहू, दूध, मांस यांचे उत्पादन वाढावे व शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी म्हणून लॅव्हॉइझे शेतात निरनिराळे प्रयोग करीत असे. मारी पाल्झला चित्रकलेचीही आवड होती. पॅरिसमधील एका चित्रकाराकडून तिने चित्रकलेचे शिक्षणही घेतले होते.
लॅव्हॉइझेने लिहिलेल्या पाठ्यपुस्तकासाठी ती आकृत्या काढीत असे. प्रयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या शास्त्रीय उपकरणांच्या अचूक आकृत्या काढण्याची पद्धत तिने शोधून काढली. त्यामुळे इतरांनाही त्या आकृत्या प्रमाणबद्ध काढता येणे शक्य झाले. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर तिचा नवरा व सासरा दोघांनाही फाशी देण्यात आली. तिने नवऱ्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. तिलाही दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली. नंतर बरीच वर्षे ती आपल्या घरी साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ यांना मेजवानीसाठी बोलावीत असे. मेजवानीसाठी येणारे पाहुणे दहशतीच्या भीतीमुळे चार भिंतींच्या बाहेर बोलता न येणाऱ्या वादग्रस्त बाबींवर बोलत असत. `मोकळया वातावरणात श्वास घेण्याची चैन निर्वात जागेतील वास्तव्य चाखल्याशिवाय अनुभवता येत नाही' असे त्यापैकी काहीजण म्हणत.
मेरी वूलस्टोनक्राफ्ट : `अ व्हिंडिकेशन ऑफ द राइट्स ऑफ वुमन' ह्या तिच्या १७९२ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाद्वारा तिने स्त्रियांना अधिक चांगले शिक्षण मिळावे अशी मागणी केली. ती पहिली स्त्री चळवळकर्ती मानली जाते. तिच्या मते स्त्रिया नवऱ्यांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात. तिच्या अशा विचारांमुळे तिला खूप अपमान सहन करावा लागला. `परकरातील तरस' (हायेना इन पेटिकोट) अशीही तिची संभावना केली गेली. एका छिद्रान्वेषी माणसाने काही बायका भाषणाच्या ठिकाणी वही पेन्सिल घेऊन मुद्दे लिहून घेतात आणि त्या वरवरच्या तकलादू ज्ञानाचा उपयोग त्यांना पार्टीच्या ठिकाणी दुसऱ्यावर प्रभाव पाडण्यासाठी होतो असे उद्गार काढले होते.
क्रॅरोलीन हर्शेल : (१७५०-१८४८) क्रॅरोलीन हर्शेल आणि तिचा भाऊ विल्यम हर्शेल ही भावंडे जर्मनीत हॅनोव्हर येथे जन्मलेली  होती. त्यांना संगीतात रुची होती. मात्र त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खगोलशास्त्राला वाहून घेतले होते. तिला गायिका व्हायचे होते पण आईने तसे करण्यास विरोध केल्यामुळे ती भावाबरोबर इंग्लंडमध्ये आली. भावाच्या कामात मदत करणे हे तिने तिच्या आयुष्याचे ध्येय ठरवले होते असे तिने आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे. भावाला ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण निर्वेधपणे करता यावे म्हणून ती इमानेइतबारे अनेक गोष्टी करीत असे. त्याच्या प्रकृतीची हेळसांड होऊ नये म्हणून ती त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष पुरवीत असे. दुर्बिणीतून रात्रीच्या वेळी आकाशाचे निरीक्षण करीत असे. ताऱ्यांच्या निरीक्षणासाठी आरसे ठेवण्यासाठी जमीन गुळगुळीत व मऊ करावी लागे. त्यासाठी घोड्याची लीद चाळून ती जमिनीवर पसरावी लागत असे. हे काम क्रॅरोलीन करीत असे. याखेरीज निरीक्षणांच्या नोंदी करणे, ताऱ्यांचे व ग्रहांचे स्थान ठरवणे, त्यांची गती निश्चित करण्यासाठी जी विविध प्रकारची आकडेमोड करावी लागे त्यात अचूकपणा आणण्यासाठी तिने अनेक वर्षे खर्ची घातली. त्याबद्दल युरोपमधील शास्त्रज्ञांनी तिची प्रशंसाही केली ; पण आज मात्र फारच थोड्या लोकांच्या स्मरणात तिचे नाव राहिले आहे. अतिशय गरिबीत राहून बहीणभावांचा हा संशोधनाचा उद्योग चालला होता.
विल्यम हर्शेलने १७८१ मध्ये युरेनसचा शोध लावल्यावर इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज याने विल्यमला दरमहा काही वेतन देऊ केले आणि त्याला राजाचा खासगी खगोलशास्त्रज्ञ असा हुद्दा दिला. त्यानंतर त्यांची परिस्थिती थोडी सुधारली व त्यांना अधिक वेळ आकाश निरीक्षणासाठी देता येऊ लागला. इ.स.१८१६ मध्ये विल्यमला `नाईटहूड' ही पदवीही देण्यात आली. क्रॅरोलीनने १७८६ ते १७९७ या काळात ८ धूमकेतू शोधून काढले. १७८७ मध्ये इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज याने विल्यमची सहायक म्हणून क्रॅरोलीनलाही सालीना ५० पौंडांचे वेतन सुरू केले. १५ वर्षांच्या खडतर तपश्चर्येचे फळ मिळाल्यामुळे तिचाही या कामातील उत्साह वाढला. भावाच्या लग्नानंतर ती पूर्णतया खगोलनिरीक्षणात बुडून गेली. तिच्या दुर्बिणीचे नाव `स्वीपर' होते. तिने जे ८ धूमकेतू शोधून काढले त्याबद्दलचा अहवाल लंडनच्या रॉयल सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. तिच्या मौलिक संशोधनाची अशा प्रकारे दखल घेतली तरी तिला सोसायटीच्या बैठकीच्या (मीटिंग रुम) खोलीत प्रवेश दिला जात नव्हता. तिला फेलोशिपही दिली गेली नाही. १८२२ मध्ये भावाचा मृत्यू झाल्यानंतर ती परत हॅनोव्हरला गेली. तिथे तिने आत्तापर्यंत जमवलेल्या ताऱ्यांच्या माहितीची सूची प्रसिद्ध केली. १८२८ मध्ये रॉयल अॅस्ट्न्ॅानॉमिकल सोसायटीने तिला सुवर्णपदक देऊन तिच्या कामाची दखल घेतली. १८३५ मध्ये रॉयल अॅस्ट्नॅनॉमिकल सोसायटीवर सन्माननीय सदस्य म्हणून निवडून आली, १९३८ मध्ये आयरिश अकारणीने तिला सदस्यत्व बहाल केले. तिच्या ९६ व्या वाढदिवसाच्या दिवशी प्रशियाच्या राजाकडून तिला सुवर्णपदक देण्यात आले. ती जवळजवळ १०० वर्षे जगली.
सोफी जर्मेन : (१७७६ ते १८३१) सोफी जन्मजात गणितज्ञ होती. पॅरिसमध्ये १७९४ च्या सुमारास `न्यू सायंटिफिक कॉलेज' सुरू झाले. पण १८ वर्षांच्या सोफीला ती स्त्री असल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. अँटनी ऑगस्टला ब्लँक हे नाव तिने धारण केले. या नावाच्या एका विद्यार्थ्याला तिथे प्रवेश मिळाला होता. पण तेथील अभ्यास त्याला कठीण वाटू लागला. त्याच्याच नावावर ती परीक्षा देऊ लागली. ब्लँक हा `ढ' विद्यार्थी अचानक इतका कसा हुशार झाला याचे तेथील प्राध्यापकांना कोडे पडले. काही काळाने तिचे गुपित उघडे झाले. मात्र तिला शिक्षा झाली नाही. तिला तिचे गणितातील कौशल्य विकसित करण्यास उत्तेजन दिले गेले. मात्र तिने आपले अंकांच्या सिद्धांतातील संशोधन व पत्रव्यवहार `ला ब्लँक' या नावानेच कितीतरी वर्षे चालू ठेवला होता. २० व्या शतकातही ज्यांचा शोध पूर्णपणे लागला नाही अशा काही संशोधनांबाबत तिने बरेच मूलभूत कार्य केले होते. नंतर भौतिकशास्त्राकडे आकर्षित होऊन तिने `कंप पावणाऱ्या पटि्टकां' (व्हायब्रेटिंग प्लेट्स) च्या संदर्भात प्रयोग केले व त्यांच्या स्पष्टीकरणासाठी आपले गणिती कौशल्य विकसित केले. परंतु हे सारे करताना आपल्याला विज्ञानाचे औपचारिक शिक्षण न मिळाल्यामुळे अनेक अडथळे येत असल्याची खंत ती नेहमी व्यक्त करीत असे. १९१६ मध्ये पॅरिस अॅक्रॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे एक स्पर्धा घेण्यात आली. `अनामिक' या नावाने तिने स्पर्धेत भाग घेतला व त्यात बक्षीसही मिळवले. त्यानंतर तिला अॅक्रॅदमीमध्ये प्रवेश मिळाला आणि तेथील बैठकींसाठी तिला तिच्या खऱ्या नावाने हजर राहता येऊ लागले.
मारी लियेल : (१८०८-१८७३) मारीचा नवरा चार्लस् महत्त्वाकांक्षी वकील होता; पण भूवैज्ञानिक बनण्याची त्याची इच्छा होती. मारीचे वडील विख्यात शास्त्रज्ञ होते. त्यांच्यामुळे चार्लस्चा अनेक मोठ्या व्यक्तींशी परिचय झाला. मारीने भूविज्ञान जर्मन भाषा शिकावी म्हणून त्याने तिचे मन वळवले. तिने त्या भाषा शिकून त्यात प्रावीण्य मिळवले. नवऱ्यामध्ये असलेली पुढील बाबींची कमतरता तिने स्वखुशीने भरून काढली. १) त्याचे भाषा ज्ञान अपुरे होते. त्यामुळे अन्य भाषांतील पुस्तके मारीने त्याच्या संशोधनाला उपयुक्त ठरावीत म्हणून अनुवादित केली. २) त्याची दृष्टीही अधू होती. त्यामुळे ती त्याला पुस्तके वाचून दाखवीत असे. ३) त्याला
चत्रकला अवगत नव्हती. त्यामुळे संशोधनासाठी जमविलेले खडकांचे नमुने व अन्य सामग्रीची रेखाटनेही तीच करीत असे. ४) चिकाटीने काम करण्याची त्याची प्रवृत्ती नव्हती. त्यामुळे जमवलेल्या सामग्रीचे वर्गीकरण करणे, त्यांना नावे देणे इत्यादी कामेही तीच करीत असे. भूवैज्ञानिकांना शिंपले व अन्य अवशेषांवरून दगडांचा काळ ठरवावा लागतो. मारीने त्याबाबतही संशोधन केले. गोगलगाय मारून तिचा शिंपला कसा स्वच्छ करायचा ते तिने आपल्या मोलकरणीला शिकवले होते.
चार्लस् डार्विन : (१८०९ ते १८८२) हा चार्लस् लियेलचा चाहता होता. परंतु तो आपल्या पत्नीला संशोधनात सहभागी करून घेतो हे त्याला पटत नसे. आपली पत्नी एम्मा डार्विन हिला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो `आय वॉन्ट प्रॅक्टिस इन इलट्नीटिंग फिमेल सेक्स. आय डिड नॉट ऑब्झर्व लियेल हॅड एनी कंपन्शन्स', डार्विनची विचारसरणी ही ह्या वाक्यातून स्पष्ट होते.
चार्लस्चे घर असंख्य कोळी, माश्या, इ. प्राण्यांनी नेहमी भरलेले असे. प्राण्यांची निरीक्षणे करणे, नोंदी ठेवणे, त्यांची देखभाल करणे यासाठी त्याने अनेक मोलकरणी ठेवल्या होत्या. त्यांच्याकडून तो ही कामे करून घेत असला तरीही स्त्रिया बौद्धिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा खालच्या दर्जाच्या असतात ह्या आपल्या मताला तो कायम चिकटून राहिला. व्हिक्टोरियन काळातील शास्त्रज्ञांनी आपल्या पत्नीची निवड करताना त्या गृहकृत्यदक्ष असतील आणि संशोधनातही मदत करू शकतील हे पाहिले. जॉर्ज बूल व त्याची पत्नी मेरी बूल हे दांपत्यही असेच होते. मारी बूल चांगली शिकलेली असूून तिने जॉर्जला संशोधनात बहुमूल्य मदत केली; पण प्रसिद्धी फक्त जॉर्जलाच मिळाली. मारीची मेहनत व कार्य अंधारात गुडूप झाले.
मेरी सॉमरव्हिल : (१७८०-१८७२) मेरी सॉमरव्हिल ही अतिशय तल्लख बुद्धिमत्ता असलेली स्त्री होती. जर तिला पुरेशी संधी उपलब्ध झाली असती तर आपण कितीतरी प्रगती करू शकलो असतो याची तिला जाणीव होती. स्त्री असल्यामुळे उत्तम शिक्षणाच्या अनेक संधी मिळू शकल्या नाहीत याचे शल्य तिच्या हृदयात कायम होते. गणित विषयाविषयी प्रचंड आकर्षण असल्यामुळे लपूनछपून तिने तो विषय शिकण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या नात्यातल्याच एका मुलाशी लग्न केले. तो डॉक्टर होता. त्याने तिच्या शिक्षणाला व संशोधनाला उत्तेजन दिले. त्याचे मूळचे घर स्कॉटलंडमध्ये होते. ते सोडून ती दोघे दक्षिण लंडनमध्ये राहू लागली. लंडनमध्ये अनेक देशी परदेशी शास्त्रज्ञांबरोबर तिला चर्चा करता येऊ लागल्या. तिच्या स्वत:च्या कल्पना तिला त्या चर्चेतून तपासता येऊ लागल्या. सूर्यप्रकाशावरील संशोधनावरचा तिचा पहिला शोधनिबंध लंडनच्या रॉयल सोसायटीने प्रसिद्ध केला; परंतु तो निबंध शास्त्रज्ञांच्या बैठकीत तिच्या नवऱ्याने सादर केला. त्यानंतर भौतिकशास्त्रावरील फ्रेंच भाषेतील एका क्लिष्ट पुस्तकाचा स्पष्टीकरणासह अनुवाद करण्यास तिला सांगण्यात आले. जर अनुवाद चांगला झाला नाही तर ते काम जाळून टाकण्याची तिने अट घातली. परंतु तिचे `मेक्रॅनिझम्स ऑफ हेवन्स' हे पुस्तक इतके उत्तम झाले की पुढील शंभर वर्षांच्या काळात एक पाठ्यपुस्तक म्हणून ते गाजले. नंतर तिने अनेक पुस्तके व बरेच निबंध लिहिले. तिला अनेक पदकेही मिळाली ; पण अखेरपर्यंत तिला रॉयल सोसायटीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. तिचा एक अर्धपुतळा रॉयल सोसायटीच्या दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापाशी स्थापन केला आहे ; पण जित्याजागत्या कर्तबगार सॉमरव्हिलच्या कार्यानेही शास्त्रज्ञांचा दृष्टिकोन बदलला नाही तो अर्धपुतळयाने कसा बदलणार?
अॅडा लव्हलेस : (१८१५-१८५२) अॅडा लव्हलेस ही विख्यात इंग्रज कवी बायरन याची कन्या. तिची व वडिलांची कधीच भेट झाली नाही. अॅडाच्या आईने तिच्या गणिताच्या आवडीला प्रोत्साहन दिले तसेच अभ्यासासाठी कठोर परिेश्रम करण्याची तिच्यावर सक्ती केली. आयुष्यभर ती अधूनमधून सारखी आजारी पडत असे. तीन वर्षे तर ती अंथरुणावरच होती. तेव्हा तिला कुबड्या घेऊन चालावे लागे. त्या काळात ती फक्त वाचू शकत होती. तिच्या लग्नानंतरही तिला अभ्यास करता यावा म्हणून तिची आईच तिची ३ मुले व तिच्या घराचा व्याप सांभाळत असे. केंब्रिज येथील गणिताचा प्राध्यापक चार्लस् बॅबेज अॅडाचा जवळचा मित्र होता. तर्कशास्त्र व गणित यासंबंधीचे आपले विचार ती दोघे एकमेकांना लांबलचक पत्र पाठवून व्यक्त करत असत. चार्लस् बॅबेजच्या डोक्यात एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प घोळत होता. तो होता `अॅनॅलिटिकल इंजिन' चा. त्या काळात लांबलचक गुंंुतागुंतीची आकडेमोड करणारे स्त्री-पुरुष असत. त्यांना `कंप्युटर' म्हटले जात असे. ही सर्व आकडेमोड करणारे यंत्र बनवण्याचे बॅबेजचे स्वप्न होते.
बॅबेजच्या फ्रेंचमध्ये लिहिलेल्या `अॅन अॅनॅलेटिकल इंजिन' या निबंधाचा अॅडाने इंग्रजीत अनुवाद केला. बॅबेजने अॅडाला त्या निबंधावर भाष्य करण्यास सांगितले. तिने ते केले; पण तिचे भाष्य मूळ निबंधाच्या तिप्पट झाले. ते लहान करून देण्यासाठी तिच्या नवऱ्याने तिला ह्या कामात मदत केली. (हे जरा वेगळे घडले. नेहमी स्त्रिया नवऱ्यांना मदत करतात) अॅडा लव्हलेसची कल्पनाशक्ती बॅबेजपेक्षा अधिक दूरदर्शी होती. बॅबेजच्या कल्पनेतले यंत्र कधीच तयार झाले नाही. सध्याच्या आधुनिक संगणकाचा बॅबेजच्या कल्पनेशी फारच थोडा संबंध आहे. मात्र लव्हलेसची आज्ञावलीची(प्रोग्रॅमिंग) सूचना इतकी महत्त्वाची ठरली की
संगणकाच्या अऊअ या भाषेचे नाव अॅडावरून देण्यात आले.
क्लेमन्स रॉयर : (१८३९-१९०२) चार्लस् डार्विनच्या मते तल्लख बुद्धिमत्ता असलेली पण अतिशय विचित्र अशी ही स्त्री होती. १८८१ मध्ये `टूडेज मेन' नावाच्या कार्टून मालिकेत तिचा सामावेश केलेला होता. १९ व्या शतकातील ती फ्रान्समधील पहिली स्त्रीवादी मानली जाते. तिने डार्विनच्या `द ओरिजिन ऑफ स्पेशीज' या पुस्तकाचा फ्रेंच भाषेत अनुवाद केला. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत तिने आपली स्वत:ची मते नोंदवली. स्त्रिया या पुरुषांपेक्षा बुद्धिमत्तेने कमी असतात हे डार्विनचे मत चुकीचे असल्याचे तिने ठासून सांगितले. तिच्या या मतामुळे डार्विन संतापला. ज्याबद्दल पुरुषांना अगदी कमी माहिती आहे अशी स्त्री ही निसर्गाची निर्मिती आहे असे तो म्हणत असे. तिच्या या लिखाणामुळे फ्रेंच लोक डार्विनच्या उपपत्तीचा धिक्कार करतील असे त्याला वाटले. क्लेमन्सचे वडील राजकारणात असल्यामुळे काही वर्षे त्यांना फ्रान्स सोडून पळून जावे लागले. क्लेमन्सने राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयावर अनेक लेख लिहिले. आयकरविषयक तिने लिहिलेल्या पुस्तकाला पुरस्कारही प्राप्त झाला. ती ज्याच्या प्रेमात पडली त्याच्याशी लग्न न करता ती दोघे आयुष्यभर एकत्र राहिली. फ्रान्सला परतल्यावर फ्रेंच सायंटिफिक सोसायटीत निवडून आलेली ती पहिली महिला होती. पण तेव्हा सायंटिफिक सोसायटीतल्या पुरुषांनी तिचा धसका घेतला होता. ती मात्र सराईतपणे वादविवादांना उपस्थित राहत असे. तिच्या `अप टिल नाऊ' या पुस्तकात ती म्हणते, ``कायद्याप्रमाणेच विज्ञानही पूर्णपणे पुरुषांनीच बनवले आहे आणि त्यांनी अनेकदा स्त्रिया पूर्णतया निष्क्रिय असतात असा विचार मांडला आहे.'' शास्त्रज्ञांचे हे मत चुकीचे आहे असे रॉयर म्हणत असे.
क्रॅथरिन ट्न्ेल : (१८०२-१८९९) वयाच्या तिशीपर्यंत सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या ह्या मूळच्या इंग्रज स्त्रीने क्रॅनडात गेल्यावर तेथील निसर्गाची व वनस्पतींची जगाला ओळख करून दिली. १८३० पर्यंत क्रॅनडाबद्दल व तेथील वृक्षवनस्पतींबद्दल जगाला काहीच माहिती नव्हती. तेथील जंगलातून ती मुक्तपणे भटकली. ब्रिटनपेक्षा येथील भूप्रदेश वेगळा. त्यामुळे फुले-पाने वनस्पतीही भिन्न. तिला ९ मुले होती. एवढा मोठा संसाराचा भार सांभाळण्यासाठी तिने पुस्तके लिहिली. पानाफुलांचे वर्गीकरण करण्यात तिने कौशल्य प्राप्त केले. स्थलांतर करून आलेले युरोपियन लोक क्रॅनडातील नैसर्गिक पर्यावरणाचा नाश करीत असल्याबद्दल तिने निषेध दर्शवला. आपल्या कामासाठी इंग्लंडमधून अनुदान मिळवण्यात ती यशस्वी झाली. जंगली फुलांना नावे देण्यासाठी तिने शास्त्रीय संज्ञा वापरल्या. मात्र त्यांची वर्णने अत्यंत लालित्यपूर्ण भाषेत तिने केली व क्रॅनडातील वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासाचा तिने पाया घातला. जगाला क्रॅनडाची ओळख करून दिली.
लुई मेरिडिथ : (१९१२-१९९५) क्रॅथरिन ट्न्ेलने जगाला क्रॅनडाची ओळख करून दिली तर लुई मेरिडिथने अस्ट्न्ेिलॉयातील निसर्गाचा परिचय जगाला करून दिला. अस्ट्न्ेिलॉयात जाण्यापूर्वी तिने इंग्लंडमधील फुलांबद्दल लिहिले होते. इंग्लंडमध्ये जेव्हा फुले, रोपे धुंडाळण्यासाठी ती हिंडत असे तेव्हा तिचा हा उद्योग लोकांना विक्षिप्तपणाचा वाटत असे. तिला इंग्लंडपेक्षा अस्ट्न्ेिलॉयात मुक्तपणे पानाफुलांच्या शोधात फिरता आले. कोणतीही टिका तिच्यावर केली गेली नाही. तिने लिहिलेल्या पुस्तकात पानाफुलांची चित्रे तसेच त्यांची वनस्पतिशास्त्रातील नावे असत. त्यांची वर्णनेही काव्यमय असत. तिच्या पुस्तकातून सामान्य माणसाला अस्ट्न्ेिलॉयाची ओळख होत असे. तिने दिलेली काही महिती नंतरच्या काळात पूर्णतया चुकीची ठरली. तेथील आदिवासींचे तिने केलेले वर्णन कदाचित माणुसकीला धरून केलेले आहे असे म्हणता येणार नाही. तिने लिहिले आहे, `आदिवासी प्राण्यांसारखे हिंस्रपणे वागतात. त्यामुळे ते मृत्यूला पात्र ठरतात.'
एडिथ क्रॅव्हेल : (१८६५ ते १९१५) फ्लॉरेन्स नाइटिंगेलचे नाव तिने केलेल्या परिचारिकेच्या कामामुळे तसेच त्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिल्याबद्दल सर्वांना माहीत आहे. तिच्यानंतर सुमारे ४५ वर्षांनी जन्माला आलेल्या एडिथ क्रॅव्हेलनेही ़़़़़़तोच व्यवसाय स्वीकारला. लहानपणापासून तिच्यावर परोपकाराचे संस्कार झाले होते. त्यामुळे सतत दुसऱ्यांना मदत करण्यात तिला आनंद मिळत असे. बेल्जियममधील परिचारिकांच्या प्रशिक्षण संस्थेची ती प्रमुख होती. १९१४ मध्ये तिने तेथील इस्पितळाचे रेडक्रॉस दवाखान्यात रूपांतर केले. पहिल्या महायुद्धातील जखमी सैनिकांवर ती उपचार करू लागली. सर्व देशातील जखमी सैनिक त्यामध्ये असत.
एका हेराने तिच्या कृत्याची बातमी वरिष्ठांना दिल्यावर तिला अटक करण्यात आली. तिने आपण सर्व देशातील जखमी सैनिकांवर उपचार करतो असे खरे सांगितल्यावर तिला गोळया घालून ठार करण्यात आले. (बेल्जियम वगैरे देश तेव्हा हिटलरच्या ताब्यात होते.)
एलिझाबेथ ब्लॅकवेल : (१८२१-१९१०) ही पहिली अमेरिकन डॉक्टर. तिचा जन्म इंग्लंडमध्ये झाला पण स्थलांतर करून ती अमेरिकेत आली. तिला डॉक्टर व्हावयाचे होते आणि शिक्षणातील स्त्री-पुरुष समानतेविरुद्ध लढा द्यायचा होता. अमेरिकेतील १७ वैद्यकीय कॉलेजांनी तिला प्रवेश नाकारला. न्यूयॉर्कमधल्या एका
कॉलेजने चुकून तिला प्रवेश दिला. पण लिंगविषयक (सेक्स) माहिती देणाऱ्या आणि पुनरुत्पादनाची माहिती देणाऱ्या तासांना तिला हजर राहण्यास मनाई करण्यात आली. नंतर ती पॅरिसला अधिक चांगले शिक्षण घेण्यासाठी गेली; पण तिथे तिचा भ्रमनिरास झाला. तिला फक्त परिचारिकेचे शिक्षण घेता येईल असे सांगितले गेले. त्यामुळे ती पुन्हा अमेरिकेत आली. तिने दवाखाना सुरू केला पण रुग्णांचा तिच्यावर विश्वास नव्हता आणि पुरुष डॉक्टरांना तिने व्यवसाय करणे रुचत नव्हते. इ.स.१८६८ मध्ये तिने न्यूयॉर्कमध्ये स्त्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली. मात्र लवकरच ते आपल्या बहिणीच्या हाती सोपवून ती इंग्लंडमध्ये गेली. तिथे तिने महिला डॉक्टरांना मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीविरुद्ध मोहीम सुरू केली. अस्वच्छता हे अनेक रोगांचे कारण आहे हे ती लोकांना पटवून देऊ लागली. जेव्हा ती डॉक्टर झाली तेव्हा एका अमेरिकन वार्ताहराने म्हटले, `युरोप किंवा अमेरिकेमध्ये घडलेले हे पहिलेच उदाहरण आहे. माणुसकीच्या सन्मानार्थ हे उदाहरण अखेरचेच ठरावे अशी मी आशा करतो.' त्या वार्ताहराच्या दुर्दैवाने तसे घडले नाही. स्त्रिया डॉक्टर झाल्या व होत आहेत. त्या क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
तिला अनेक प्रकारची टीका सहन करावी लागली तरीही तिने न डगमगता तरुण मुलींना वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. पहिली महिला डॉक्टर म्हणून इंग्लंडच्या वैद्यकीय नोंदणी पुस्तकात तिची नोंद झाली.
(डॉ. आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय डॉक्टर. १८८३ मध्ये कलकत्त्याहून फिलाडेल्फियाला डॉक्टर बनण्यासाठी आल्या होत्या. १८८६ मध्ये वैद्यकीय शास्त्रातील पदवी प्राप्त करून त्या भारतात परतल्या. २६ फेब्रुवारी १८८७मध्ये त्यांचे निधन झाले.)
एलिझाबेथ गॅरेट अँडरसन : (१८३६-१९१७) एलिझाबेथ कट्टर स्त्रीवादी होती. एलिझाबेथ ब्लॅकवेलचा आदर्श तिने स्वत:पुढे ठेवला होता. त्यामुळे डॉक्टर होण्याचे तिचे ध्येय होते. तिलाही ब्लॅकवेलसारखाच अनुभव आला. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश नाकारला गेल्यावर तिने परिचारिकेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पण ती वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तासांना हजर राहू लागली. तिला तिथेही येण्यास मज्जाव केला, तरीही ती चिवटपणे तेथे उपस्थित राहू लागली. तेथील परीक्षांमध्ये ती नेहमी प्रथम क्रमांक पटकावू लागल्यामुळे इस्पितळातील डॉक्टरांचे धाबे दणाणले. ऑपरेशन थिएटरमध्ये ती हजर राहिल्यामुळे पुरुषांच्या चित्तवृत्ती चाळवतात असे कारण सांगून तिला तेथेही प्रवेश नाकारला जाऊ लागला.
तिला विद्यापीठात जाऊन प्रगत वैद्यकीय अभ्यास करण्याची इच्छा होती. त्यासाठी तिला पॅरिसला जावे लागले. तिथे तिने अर्धशिशीच्या रोगाचा (मायग्रेन) अभ्यास केला आणि १८७० मध्ये फ्रान्सची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान तिला मिळाला. नंतर इंग्लंडमध्ये येऊन तिने वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली, पण इंग्लंडमधील वैद्यकीय व्यावसायिकांनी तिच्या फ्रान्समधील पदवीला काहीच किंमत दिली नाही. स्त्रियांवर उपचार करण्यासाठी तिने दवाखाने व इस्पितळे स्थापन केली. ब्रिटिश मेडिकल असोसिएशनची १९ वर्षे ती एकटीच महिला सदस्य होती. तिनेही ब्लॅकवेलप्रमाणेच स्त्रियांचे आरोग्य व शिक्षण सुधारण्यासाठी स्त्रीचळवळीमार्फत सतत प्रयत्न केले.
हर्था आयर्टन : (१८५४-१९२३) हर्था आयर्टन ही केंब्रिजच्या गिर्टन महाविद्यालयाची विद्यार्थिनी. एक वैज्ञानिक म्हणून स्वत:ला घडविताना तिला खूप झगडावे लागले. त्यामुळेच ती कट्टर स्त्रीवादी बनली. आपल्यानंतर येणाऱ्या मुलींना आपल्यासारखा त्रास होऊ नये म्हणून ती सतत प्रयत्नशील राहिली. उत्कृष्ट क्षमता असूनही तिला नेहमीच कमी गुण मिळत; पण तिने त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या संशोधनावर लक्ष केंद्रित केले. तिला भौतिकशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापकाशी तिने विवाह केला. मात्र विवाहानंतर घरकाम, मुले व नवरा यांच्याकडे लक्ष देण्यात दिवसाचा बराचसा वेळ जाऊ लागल्यावर ती निराश झाली. पण विवाहानंतर १० वर्षांनी तिने विद्युतशक्तीवरील आपल्या संशोधनावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले. नंतर वाळूतील तरंगचिन्हावर (रिपल पॅटर्नस्) ती संशोधन करू लागली. विद्युतशक्तीवर तिने एक पुस्तक लिहिले व इतर अनेक विषयांवर शोधनिबंधही तिने प्रसिद्ध केले. तिने अनेक शास्त्रीय उपकरणांचा शोध लावला. त्यापैकी एक होते आयर्टन फ्लॅपर पंखे. पहिल्या महायुद्धातील सैनिकांना शत्रू-सैन्याने सोडलेला विषारी वायू दूर करण्यासाठी उपयोगी पडतील अशी या पंख्यांची रचना केलेली होती. त्यामुळे पहिल्या महायुद्धात त्या पंख्यांचा खूपच उपयोग झाला. आयर्टनचा विद्युतशक्तीवरील पहिला शोधनिबंध तिच्या नवऱ्याच्या मित्राने लंडनच्या रॉयल सोसायटीच्या सभेत वाचला; पण १९०४ मध्ये `ओरिजन अँड ग्रोथ ऑफ रिपल मार्क्स' हा तिचा शोधनिबंध तिने स्वत: रॉयल सोसायटीत वाचला. रॉयल सोसायटीच्या ८ फेलोंनी तिला रॉयल सोसायटीचे सदस्यत्व द्यावे म्हणून तिचे नाव सुचवले होते. परंतु ती विवाहित असल्याचे कारण सांगून तिला अपात्र (डिस्क्वालिफाइड) ठरवण्यात आले.
जेव्हा तिने केलेले काम तिच्या नवऱ्याच्या नावावर दाखवले जात असे तेव्हा ती अतिशय संतापत असे. त्यातूनच ती कडवी स्त्रीवादी बनली. विज्ञानाच्या क्षेत्रातीलच नव्हे तर सर्वत्रच केला जाणारा स्त्री-पुरुष भेदभाव तिला मान्य नसल्यामुळे ती सतत स्त्रियांना पुरेशा संधी दिल्या जात नाहीत याबद्दल तक्रार करीत असे व स्त्रियांनाही अशा संधी मिळवून देण्यासाठी झटत असे.
इडा फ्रंड : (१८६३-१९१४) इडा फ्रंडचे बालपण ऑस्टि्न्यात गेले. केंब्रिजला शिक्षणासाठी तिला जावे लागले. ती केंब्रिजच्या न्यूनहॅम महिला महाविद्यालयात मुलींसाठी खास रसायनशास्त्राचे वर्ग चालवीत असे. तिने रसायनशास्त्रावरील पाठ्यपुस्तके लिहिली. शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या. अध्ययन करताना मुलींना उत्तम प्रकारची उपकरणे उपलब्ध व्हावीत म्हणून प्रयत्न केले. सायकलच्या अपघातात तिला आपला एक पाय गमवावा लागला. त्यामुळे ती नेहमी चाकाच्या खुर्चीवरून हिंडत असे. लोकांनी त्याबद्दलही तिची टिंगलटवाळी केली व अशा प्रतिकूल परिस्थितीतही तिने तळमळीने केलेल्या कार्याकडे दुर्लक्ष केले. तिच्या बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष केले व तिच्या पोषाखाचीही टर उडवली जात असे. शिक्षकांनी-कोणत्याही स्तरावरच्या असोत-कोणता पोषाख करावा हे ठरवणे स्त्रियांनाही अवघड जात असे कारण टीकाकार नेहमीच दुतोंडी असतात असे तिने म्हटले आहे.
एलिझाबेथ अगासी : (१८२२-१९०७) मुलींना विज्ञानाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावे म्हणून एलिझाबेथ अगासीने अमेरिकेत मोहीमच उघडली होती. बोस्टनमधील एका धनाढ्य कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे शिक्षण खाजगीरीत्या झाले होते. लुई अगासी या जीवशास्त्रज्ञाशी तिचा विवाह झाला. तो हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक होता. त्याने हिमनद्या, जीवावशेष व मासे यावर संशोधन केले. तिने नवऱ्याला इंग्रजी शिकवले. त्याच्याबरोबर दौऱ्यावर जाऊन तिने त्याने केलेल्या निरीक्षणांच्या नोंदी केल्या. दोघांनी मिळून ब्राझिल, क्यूबा व दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीच्या प्रदेशात जाऊन संशोधन दौरे केले. त्याची दैनंदिनी एलिझाबेथने तयार केली. हिमनदीबद्दलची उपपत्ती त्याने समुद्रप्रवासातील नोंदीवरून मांडली. त्यावरील लेख एलिझाबेथने लिहिले, पण त्या सर्वाचे श्रेय फक्त तिच्या नवऱ्याला दिले गेले. मोहिमेतील इतर सहकाऱ्यांच्या साहाय्याने एलिझाबेथने हार्वर्ड विद्यापीठाशेजारीच रॅडक्लिफ येथे मुलींसाठी महाविद्यालय स्थापन केले. त्याआधी तिने मुलींसाठी एक शाळाही ८ वर्षे चालवली होती. रॅडक्लिफ येथील महाविद्यालयाची ती पहिली अध्यक्ष होती. तिच्या प्रयत्नानेच मुलींना उच्च स्तरावरील विज्ञानाचे अध्ययन करता येऊ लागले. कारण १९४३ पर्यंत हार्वर्ड विद्यापीठ मुलींना वर्गात बसण्यास परवानगी देत नव्हते.
सोफिया कोवालेव्हस्कया : (१८५०-१९०१) सोफिया कोवालेव्हस्कया ही रशियन गणितज्ञ होती. चांगले शिक्षण मिळावे म्हणून तिने युरोपभर पायपीट केली. रशियाबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट मिळावा म्हणून तिने व्हादिमिर कोवालेव्हस्कया या माणसाशी लग्न केले. अखेरीस तिला जर्मनीत गणित आणि विज्ञानाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. बर्लिनमध्ये तिच्या वर्गाला शिकवणाऱ्या प्राध्यापकांनाही एक स्त्री वर्गात येऊन बसते हे रुचत नव्हते. त्यामुळे तिला हुसकावून लावण्यासाठी तिला अतिशय अवघड उदाहरणे देण्याचा परिपाठ त्यांनी सुरू केला; पण ही त्यांची युक्ती सफल झाली नाही. कितीही अवघड समस्या दिली तरी सोफिया ती सोडवून आणीत असे. तिचे प्रयत्न व तिची हुशारी पाहून तिच्या नवऱ्यानेही तिला पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण पुरे करण्यासाठी पाठिंबा दिला.
तिला पीएच.डी. मिळाल्यावर ती दोघेही रशियात परतली. पण तिथे तिला नोकरी मिळाली नाही. तिने गणित वगैरे सर्व सोडून सुखासीन आयुष्य जगण्यास सुरुवात केली परिणामी जवळची सर्व पुंजी संपुष्टात आली. नवऱ्याने आत्महत्या करून इहलोकीची यात्रा संपवली. त्यानंतर स्वीडनमध्ये स्टॉकहोम विद्यापीठात तिला कशीबशी प्राध्यापकाची नोकरी मिळाली. ही नोकरी मिळाल्यावर तिने अनेक लेख प्रसिद्ध केले. तिला पारितोषिकेही मिळाली व सर्व युरोपभर तिचे नाव लोकांच्या परिचयाचे झाले. फ्रान्समध्ये एका स्पर्धेत भाग घेऊन तिने पहिले बक्षीस पटकावून परीक्षकांना प्रभावित केले. त्यांनी बक्षिसाची रक्कम वाढवून तिला बक्षीस दिले. शनिग्रहाभोवतीच्या कड्यांच्या रचनेचे कोडे सोडविताना व भौतिकशास्त्रातील इतर समस्या सोडविताना तिने गणितातील प्रगत ज्ञानाचा उपयोग केला. गणित विषयाचे अभ्यासक रुक्ष व भावनाहीन व कल्पकता नसलेले हा लोकांचा समज तिने नाटके व कादंबऱ्या लिहून दूर केला. लुई क्रॅरॉल या केंब्रिजच्या गणिताच्या प्राध्यापकानेच `अॅलिस इन वंडरलँड' हे जगभरच्या लोकांना खिळवून ठेवणारे पुस्तक लिहिले व आजही ते तितक्याच आवडीने वाचले जाते. स्टि्न्ंडबर्ग ह्या स्वीडीश नाटककाराने तिच्याबद्दल म्हटले,`ती म्हणजे अपायकारक, दु:खदायक ... राक्षसीपणाचे दृश्य होते.' ती दुसऱ्या लग्नाचा विचार करीत असतानाच न्युमोनियाने तिला गाठले व त्यातच तिचा अंत झाला.
ग्रेस हॉपर : (१९०६-१९९२) ग्रेसचे वसार कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले. तिने अमेरिकेतील येल विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळवल्यावर १२ वर्षे वसार महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले. नंतर तिने अध्यापनाचा व्यवसाय सोडून दिला. स्त्री-पुरुषात भेदभाव केला जात असताना व विशेषत: गणित
व स्थापत्यशास्त्र यासारख्या विषयात मुलींनी प्रवेश घेतला तर नाके मुरडली जात अशा परिस्थतीत तिच्या आईवडिलांनी तिच्या गणिताच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. तिला नौदलासाठी काम करण्याची इच्छा होती. त्यासाठी ती नौदल अधिकाऱ्यांकडे गेली तेव्हा तिचे वय अधिक असल्याचे सांगून तिला धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला. स्त्रियांनी लढण्याच्या क्षेत्रात उतरण्यापेक्षा अध्यापनाचे काम करावे असाही सल्ला तिला नौदल अधिकाऱ्यांनी दिला. अखेरीस नौदलाने तिला हार्वर्ड विद्यापीठातील मार्क वन या पहिल्यावहिल्या संगणकावर नौदलासाठी काम करण्याची परवानगी दिली. तिने त्या संधीचे सोने केले. संगणकाची उजइजङ ही भाषा शोधून काढण्याचे श्रेय तिला मिळाले. तसेच `डीबग' ही संज्ञाही तिनेच तयार केली.
तिच्या वयाच्या ४० व्या वर्षी नौदलाने तिला सेवानिवृत्त होण्यास सांगितले. त्यानंतर तिने उद्योगक्षेत्रात उपयुक्त ठरणारा संगणक तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले. वैयक्तिक संगणक (पीसी) अथवा लॅपटॉपची सुरुवात होण्यापूर्वी मोठमोठ्या अवाढव्य संगणकावर काम करावे लागे. तेव्हा आजच्यासारखे सॉफ्टवेअरही उपलब्ध नव्हते. ग्रेस हॉपरने संगणकाच्या आज्ञावलीसाठी (प्रोग्रॅमिंग) नवी भाषा शोधून काढली. १९६७ साली अमेरिकन नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारपत्रकात (पे-रोल) सारख्या चुका होऊ लागल्या. तेव्हा ग्रेस हॉपरचे वय लक्षात न घेता त्यांनी तिला विनंती करून बोलावून घेतले. तिने त्यांचा तो कार्यक्रम दुरुस्त करून दिला. वयाच्या ८० वर्षे होईपर्यंत ती नौदलासाठी काम करीत होती म्हणून नौदलाने तिला नौदलातील रिअर अॅडमिरल हा सर्वोच्च हुद्दा देऊन तिचा गौरव केला. तिने आपल्या उदाहरणाने मुलींना संगणक क्षेत्रात कार्य करण्यास प्रोत्साहन दिले. तिला अनेक पदके मिळाली पण तिचा सर्वात मोठा बहुमान अमेरिकेच्या डाटा प्रोसेसिंग मॅनेजमेंट असोसिएशनने १९६७ साली तिला `मॅन ऑफ द इयर' हा पुरस्कार देऊन केला.
डोरोथी हॉगकिन : (१९१०-१९९४) ब्रिटिश स्फेटकविज्ञानतज्ज्ञ असलेली डोरोथी ब्रिटिश होती पण तिचा जन्म कैरो येथे झाला. तिचे शिक्षण ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठात झाले. सॉमरव्हिल कॉलेजात ती ट्यूटर व फेलो म्हणून आरंभी काम करीत होती. रॉयल सोसायटी वूल्फसन रिसर्च, ऑक्सफर्ड येथे प्राध्यापक म्हणून तिची १९६० साली नेमणूक झाली. तिने १९५९ साली पेनिसिलीन व बी १२ यांची संरचना उलगडून दाखवली. अमेरिका व ब्रिटन या दोन्ही देशातल्या रसायनशास्त्रज्ञांची या शोधासाठी स्पर्धा चालली होती. या शोधाबद्दल तिला १९६४ साली नोबेल पारितोषिक मिळाले. (हे पारितोषिक जाहीर झाले तेव्हा ती घानामध्ये होती.) पेनिसिलीनचा गाभा तीन कार्बन एक नायट्नेजन यांच्या वलयांनी (रिंग) बनलेला असतो. ही रचना खूप अस्थिर असल्याचे मत व्यक्त करून अस्ट्न्ेिलॉयन रसायनशास्त्रज्ञ `जर पेनिसिलीनची संरचना अशी असेल तर (म्हणजे डोरोथीची रचना बरोबर असेल तर) मी रसायनशास्त्रातील संशोधन बंद करून भूछत्र वाढवण्याचा व्यवसाय करीन' असे जॉन कॉर्नफोर्थी मोठ्या गर्वाने उद्गारला. (त्याने खरोखरच तसे केले की नाही हे मात्र समजले नाही.) १९४८ मध्ये तिने बी-१२ ह्या व्हिटॅमिनची संरचना शोधून काढण्यास सुरुवात केली ; पण त्याची रचना गुंतागुंतीची असल्यामुळे त्या संशोधनाला अधिक वेळ लागला. नंतर तिने इन्शुलीनचीही संरचना शोधली. मधुमेही रुग्णांकरिता जगभर इन्शुलीनचा उपयोग होत असतो. त्या काळात आजच्यासारखे सॉफ्टवेअर उपलब्ध नसल्यामुळे-मुळात संगणकही नसल्यामुळे संशोधनाचे निष्कर्ष काढण्यास वेळ लागत असे.
१९६४ साली नोबेल पारितोषिक मिळवणारी ती तिसरी महिला होती. त्याच वर्षी ऑर्डर ऑफ मेरिटचा मान मिळवणारी ती दुसरी महिला ठरली. (हा मान मिळवणारी पहिली महिला होती फ्लॉरेन्स नाईटिंगेल) आयुष्यभर डोरोथीने समाजवादाचा पुरस्कार केला. १९८७ मध्ये तिला लेनिन शांतता पुरस्कार प्राप्त झाला. १९७० ते १९८० या कालावधीत ती ब्रिस्टोल विद्यापीठाची चॅन्सेलर होती. त्याच काळात विकसनशील देशातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित करण्यासाठी तिने खूपच मदत केली. तिला संधिवाताचे दुखणे होते. त्यामुळे संशोधनाचे काम करताना तिला खूप वेदना होत. तरीही ती उत्साहाने व निर्धाराने काम करीत होती. ती दिसायला सुंदर होती. तिच्याबरोबर काम करणारे तिचे पुरुष सहकारी तिच्या सौंदर्याची स्तुती करीत. खरे म्हणजे तिच्या अविरत संशोधनाबद्दल स्तुती करावयास हवी पण बहुसंख्य पुरुषांना तो स्वत:चा कमीपणा वाटतो. विख्यात शिल्पकार हेन्री मूरने तिचे चित्र काढले त्यात तिचे वेडेवाकडे झालेले हात दाखवले. या उलट मॅगी हॅब्लिंगने तिच्या हाताबरोबरच तिचे वैज्ञानिक क्षेत्रातील यश कागदांच्या फाइल्स व तिने शोधलेल्या संरचनेची प्रतिकृती तिच्या टेबलावर मांडून दाखवले.
जेन गुडाल : (१९३४-) ४० वर्षांहूनही अधिक काळ आफ्रिकेच्या जंगलात राहून जेन गुडालने चिंपांझींचा अभ्यास केला. ती मूळची इंग्रज. लुई लीवी हा मानववंशशा़़स्त्रज्ञ माकडांचा अभ्यास करण्यासाठी योजना आखत होता. त्याची चिटणीस म्हणून प्रथम तिने नोकरी स्वीकारली. लुई लीवीच्या मते जेनजवळ दोन गुण होते. एक म्हणजे ती ह्या विषयात प्रशिक्षित नव्हती. त्यामुळे ह्या
प्रकल्पाबाबत तिचा कोणताही पूर्वग्रह नव्हता. दुसरे म्हणजे जेन ही स्त्री असल्यामुळे प्राणी व आफ्रिकेतील आदिवासी यांच्याशी तिला जमवून घेता येईल. (खरे म्हणजे लीवीचा हा दुसरा दृष्टिकोन स्त्रियांना हलका, क्षुद्र व पशुसमान मानणारा आहे व त्यामुळेच तो संतापजनक आहे.) अर्थात त्या काळात इतकेच नव्हे तर आजही असा दृष्टिकोन बाळगणारे कितीतरी पुरुष आपल्याला समाजात दिसतात.
गुडाल आपल्या आईसमवेत टांझानियाच्या जंगलात गॅम्बे येथे राहू लागली. सुरुवातीला तेथील दलदल व डास यामुळे दोघीही सतत आजारी पडत. गुडालने तिथल्या चिंपांझींना नावे दिली व त्या नावाने ती त्यांना हाक मारू लागली आणि ओळखू लागली. प्रथम तिने चिंपांझींनी जवळ यावे म्हणून त्यांचा हात पोचेल अशा अंतरावर केळी ठेवण्यास सुरुवात केली. हळूहळू चिंपांझींनीही या बाईपासून आपल्याला धोका नाही हे ओळखले व ती नियमाने जवळ येऊ लागली. माणसांप्रमाणे चिंपांझीही कौटुंबिक आयुष्य जगतात असा तिने निरीक्षणातून निष्कर्ष काढला.
माणूस हत्यारे बनवण्यास शिकला हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. चिंपांझीही मुंग्यांचे वारूळ खणण्यासाठी जाड धारदार गवताच्या पात्याला योग्य तो आकार देऊन त्याचा उपयोग करतात. याखेरीज त्यांचे एकूण वर्तन बव्हंशी माणसासारखेच असते असेही तिला आढळून आले. जर एखाद्या पिलाची आई मरण पावली तर दुसरी एखादी चिंपांझी मादी जणू त्या पिलाला दत्तक घेते व त्याचा सांभाळ करते. चिंपांझींनाही निसर्गातील काही भौतिक दृश्ये पाहून भय व अचंबा वाटतो. उदा. धबधब्याचे कोसळणारे पाणी पाहून ते नाचतात असे तिने म्हटले आहे.
गुडालने चिंपंाझी नष्ट होऊ नयेत म्हणून अनेक प्रकल्पही हाती घेतले. त्यामुळे चिंपांझींचा नष्ट होण्याचा वेग कमी झाला. प्रसारमाध्यमातून चिंपांझीबद्दलची माहिती गुडाल देत राहिली. त्याविषयी तिने पुस्तकही लिहिले. प्रसारमाध्यमांनीही तिच्या कामाला प्रसिद्धी दिली. त्यामुळे तिचे वेगळया प्रकारचे काम जगाला माहीत झाले.
डायन फॉसी : (१९३२-१९८५) अमेरिकन प्राणिशास्त्रज्ञ असलेल्या फॉसीने जेन गुडालप्रमाणेच प्राण्यांचा ऱ्हास थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. जेन गुडालने चिंपांझींवर काम केले तर फॉसीने २२ वर्षे गोरिलांच्या सहवासात राहून त्यांचा अभ्यास केला. गोरिला हे स्वभावत:च कमालीचे लाजाळू असतात. त्यातच शिकारी त्यांच्या हद्दीत शिरून त्यांना ठार मारीत असल्यामुळे गोरिला माणसांच्या सहवासापासून दूर राहणे पसंत करतात असे फॉसीला आढळले. त्यामुळे फॉसीने रवांडातील डोंगराळ भागात राहणाऱ्या गोरिलंाच्या वर्तणुकीचा तसेच त्यांच्या संरक्षणाचा निर्धार केला. `गोरिलाज इन द मिस्ट' हे तिचे पुस्तक गाजले. परंतु जेन गुडालप्रमाणे ती तितकीशी प्रसिद्धीच्या झोतात आली नाही. गोरिला शांतपणे कुटुंबात रमत आयुष्य घालवतात ही गोरिलांची वैशिष्ट्यपूर्ण बाब फॉसीने जशी दाखवली तसेच गोरिलांच्या काही बाबतीतील रानटीपणावरही तिने आपल्या लेखनातून भर दिला. श्रीमंतांचे दिवाणखाने सजवण्यासाठी क्रूरपणाने गोरिलांची शिकार करणाऱ्यांना वचक बसावा म्हणून तिने गोरिलांची शिकार करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी छोटेसे खासगी संरक्षकदल नेमले. ती डोंगरावर ज्या केबिनमध्ये राहत होती त्या केबिनमध्येच तिचा खून झाला. खुनी आजतागायत सापडलेला नाही.
कार्सन राशेल : (१९०७-१९६४) कार्सन राशेलला हरितक्रांतीची प्रणेती मानले पाहिजे. फिलाडेल्फियातील स्ंप्रिगडेल हे तिचे जन्मस्थान. तिचे शिक्षण हॉपकिन्स विद्यापीठात झाले. तिने मेरीलँड विद्यापीठात काम केले. नंतर तिने `द वूड्स होल मरिन बॉयॉलॉजिकल लॅबोरेटरी', मॅसाच्युसेट्स, इथे काम केले. त्यानंतर जलचरांविषयीची जीवशास्त्रज्ञ म्हणून तिने यूएसएच्या `फिश अँड वाइल्ड लाईफ' मध्ये काम केले. १९५२ साली ती त्या संस्थेची प्रमुख संचालक बनली. स्त्रिया निसर्गाच्या अधिक जवळ असतात. त्यामुळे त्यांनी झाडेझुडुपे, प्राणी यांवर संशोधन करावे असा लुई लीवीप्रमाणेच बहुसंख्य पुरुषांचे मत व आग्रह होता. प्रथम राशेल कार्सन जेव्हा लेखनाची आवड व अभ्यास असल्यामुळे सागर व सागरी प्राणीजीवनाबद्दल काव्यमय भाषेत लिहू लागली तेव्हा वर उद्धृत केलेल्या मतानुसार तिचे काम चालले आहे असा अनेकांचा समज झाला. तिच्या पुस्तकांना पुरस्कारही मिळाले. पण तिने वयाची पन्नाशी ओलंडल्यावर `सायलेंट स्प्रिंग' हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकातून तिने निसर्गसौंदर्याचे वर्णन करण्याऐवजी वैज्ञानिकांवर, कीटकनाशके तयार करणाऱ्या कंपन्यांवर जोराचा हल्ला चढवला. त्यामुळे निसर्गाचे अतोनात नुकसान होत आहे हे तिने ठासून सांगितले. तिच्या मते निसर्ग हा जुळवून घेणारा आहे. मात्र निसर्गाच्याही काही मर्यादा आहेत. त्या लक्षात घ्यायलाच हव्यात. दुसऱ्या महायुद्धात जपानवर टाकलेल्या अणुबाँबमुळे झालेल्या विध्वंसक परिणामांमुळे लोक चक्रावून गेले. सर्वांनी भौतिकशास्त्रज्ञांचा अशा शोधाबद्दल धिक्कार केला. राशेलने कीटकनाशकांची निर्मिती कशासाठी असा प्रश्न विचारून त्यातील जीवघेण्या रसायनांमुळे पक्षी तर मृत्युमुखी
पडतातच शिवाय ही रसायने अन्नसाखळीत शिरकाव करून मनुष्यप्राण्यांनाही हानी पोचवतात ह्या वस्तुस्थितीवर भर दिला. तिच्या `सायलेंट स्प्रिंग' या पुस्तकामुळे पर्यावरणविषयक नव्या प्रकारच्या लेखनातून वैज्ञानिक प्रगतीच्या भयावह परिणामांची सामान्य माणसाला ओळख पटली. त्यामुळे पृथ्वीचे वाढते तापमान, जेनेटिकली मॉडिफाइड अन्नाचे परिणाम इत्यादी विषय फक्त विद्यापरिषदांमध्ये (अॅक्रॅडेमिक कॉन्फरन्स) चर्चा करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर त्या तातडीच्या राजकीय समस्या बनल्या आहेत हे लोकांच्या लक्षात येऊ लागले.
लियॉन मेरी फ्रॅन्सिस : (१९२५) इंग्लंडमधील नॉरविच परगण्यात जन्माला आलेल्या जीवशास्त्रज्ञ मेरीने १९४८ साली व १९५० साली अनुक्रमे पदवी व पीएच.डी प्राप्त केली. त्याच वर्षी ती येल मेडिकल रिसर्च कौन्सिलमध्ये काम करू लागली. तिचे नाव प्रामुख्याने तिने १९६१ साली मांडलेल्या `लियॉन हायपोथिसिस' शी जोडले गेले आहे. उंदरामधील गुणसूत्रांच्या (क्रोमोझोन्स) संशोधनातून तिने उंदरांच्या जननिकतेचा अभ्यास केला. या अभ्यासातून माणसाच्या आनुवंशिक रोगांबद्दलच्या समस्या जाणून घेता येतात हे तिने दाखवून दिले. तसेच सस्तन प्राण्यामध्ये उंदीर हा किती उपयुक्त प्राणी आहे हे तिने संशोधनातील निष्कर्षातून स्पष्ट केले. १९७३ साली लंडनच्या रॉयल सोसायटीची फेलो म्हणून ती निवडून आली व १९८४ साली रॉयल सोसायटीने पदक देऊन तिचा सन्मान केला. १९६२ पासून ती मेडिकल रिसर्चच्या जेनेटिक्स विभागाची प्रमुख म्हणून काम करीत होती. १९८६ ते १९९० पर्यंत त्या संस्थेच्या उपसंचालकपदावर ती कार्यरत होती. निवृत्तीच्या वेळी फॉरिन असोसिएशन ऑफ द यूएस नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस म्हणून ती काम पाहात असे. ती फॉरिन ऑनरेरिया ऑफ द जेनेटिक्स सोसायटी, जपान या संस्थेचीही सन्माननीय सदस्य होती. तिने सस्तन प्राण्यांच्या जननिकतेच्या अनेक पैलूंवर आणि मेटॅजेनेसिसवर अनेक शोधनिबंध लिहिले. तिच्या नेतृत्वाखाली झालेल्या मूषक समित्यांमार्फत तिने उंदरांच्या जननिकतेच्या अभ्यासाला चालना दिली. आज अनेक प्रकारच्या औषधांचे प्रयोग प्रथम उंदरांवर केले जातात. उंदरांची ही उपयुक्तता मेरी फ्रान्सिसने जगासमोर मांडली.
बार्बरा मॅकक्लिन्टॉक (१९०२-१९९२) लियॉन मेरी फ्रान्सिसने ज्याप्रमाणे उंदरांच्या गुणसूत्रांच्या संशोधनातून सस्तन प्राण्यांच्या आनुवंशिक रोगांबाबतच्या समस्यांचा शोध घेता येतो हे जगाला दाखवून दिले त्याप्रमाणे बार्बरा मॅकक्लिन्टॉकने १९२७ साली पीएच.डी. पदवी प्राप्त केल्यावर मक्यावर संशोधन सुरू केले. गुणसूत्रातील बदलांचा परिणाम मक्याच्या गाभ्याच्या रंगावर होतो व त्याचे भौतिक स्वरूप बदलते हे तिने दाखवून दिले. गुणसूत्रांच्या आनुवंशिकतेचा हा निश्चित पुरावा होता. तिचे हे संशोधन १९३१ साली प्रसिद्ध झाले. १९४० मध्ये तिने जनुकातील मूलघटकांवर नियंत्रण ठेवून मक्याची जनुके सक्रिय (अॅक्टिव्हेट) व निष्क्रिय (इनअॅक्टिव्हेट) करता येतात हे सिद्ध केले. जी जनुके दुसऱ्या जनुकांवर नियंत्रण ठेवतात त्यांची गुणसूत्र ते गुणसूत्र अशी नक्कल करता येते हे तिने दाखवून दिले. ह्या संशोधनावरील शोधनिबंध तिने १९५१ साली कोल्डस्प्रिंग हार्बर येथे भरलेल्या चर्चासत्रात सादर केला; पण तेथे जमलेले बहुसंख्य शास्त्रज्ञ बॅक्टेरियावर काम करणारे असल्यामुळे तिच्या या संशोधनाची फारशी दखल घेतली गेली नाही. तिचे हे संशोधन १९७० पर्यंत दुर्लक्षित राहिले. १९७६ मध्ये तिच्या संशोधनाला मान्यता प्राप्त झाली. १९८३ मध्ये तिच्या या संशोधनाबद्दल तिला शारीरविज्ञानक्रिया विभागातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी स्त्रियांच्या कार्याला थोड्याफार प्रमाणात का होईना मान्यता दिली जाऊ लागली. भारतात पंतप्रधानपदी महिला होती तसेच आज राष्ट्न्पतीपदही एका महिलेने भूषविले आहे. स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन जितक्या प्रमाणात बदलायला हवा तसा बदललेला नाही. एकीकडे सुनीता विल्यम्स, किरण बेदी, कमला सोहोनी यांच्यासारख्या स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात बहुमोल कामगिरी केलेली आहे. पण त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनाही संघर्ष करावा लागला आहे. रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग अशी स्थिती आजही कायम आहे. अर्थात ही परिस्थिती बदलेल अशी आशा करायला हरकत नाही.
- वासंती फडके, मुंबई

No comments: