अंतराळशास्त्रतज्ज्ञ डॉ. हेलन ओकोआ
सुनीता पेठे
Saturday, December 18, 2010 AT 02:30 AM (IST)
अंतराळ क्षेत्राशी संबंधित विविध अभ्यासशाखांमध्ये आज अनेक महिला कार्यरत आहेत. "ऑप्टिक्स' (दृष्टीविषयक प्रकाशशास्त्र), "ऑप्टिकल रोबोटिक्स' (यंत्रमानवशास्त्र), "इमेजिंग टेक्नॉलॉजी, "स्पेसक्रॉफ्ट कम्युनिकेशन' अशा विद्याशाखांमध्ये केलेल्या संशोधनासाठी ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, त्या अंतराळशास्त्रतज्ज्ञ डॉ. एलन ओकोआ यांच्या कार्याची माहिती
कर्तृत्वासाठी स्त्रियांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नाही, हे सिद्ध करणारी आजच्या काळातली एक प्रसिद्ध अंतराळशास्त्रतज्ज्ञ म्हणजे डॉ. एलन ओकोआ. सध्या डॉ. एलन या अमेरिकेतील ह्यूस्टन येथील "जॉन्सन स्पेस सेंटर'च्या उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. एलन यांचा जन्म मे 1958 मध्ये कॅलिफोर्नियातील ला मेसा इथे झाला. त्यांचे वडील किरकोळ वस्तूंची विक्री करणाऱ्या एका दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करत असत तर त्यांची आई साधी संसारी महिला होती. आपली मुलगी पुढे अंतराळात विहार करणार आहे, याची कसलीही कल्पना या दांपत्याला तेव्हा नसणे स्वाभाविकच होते. एलन यांनी मात्र पुढे ती प्रत्यक्षात आणली.
शाळेत शिकत असतानाच त्यांना भौतिकशास्त्राविषयी विशेष आवड निर्माण झाली होती; मात्र अभ्यासाबरोबरच व्हॉलिबॉल आणि सायकल चालवणे, हेही आवडीचे विषय होते; तर बासरी वाजवणे हा त्यांचा अतिशय लाडका छंद होता. ग्रॉस मॉंड हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर एलन सान दिएगोच्या स्टेट युनिव्हर्सिटीमधून भौतिकशास्त्र हाच विषय घेऊन पदवीधर झाल्या. त्यानंतर स्टॅनफोर्डमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवीही मिळवली. एमएस केल्यावर याच विषयात त्यांनी डॉक्टरेटही प्राप्त केली.
ऑप्टिक्स (दृष्टीविषयक प्रकाशशास्त्र) आणि ऑप्टिकल रोबोटिक्स (यंत्रमानवशास्त्र) या विषयातील त्यांच्या संशोधनाबद्दल "नासा'तर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. "ऑप्टिकल सोसायटी ऑफ अमेरिका' (O.S. A.) आणि "अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ऍस्ट्रोनॉटिक्स' अशा दोन्ही संस्थांच्या त्या सभासद आहेत. एमएस झाल्यावर लगेच त्या "सॅनडिआ नॅशनल लॅबोरेटरी'मधल्या "इमेजिंग टेक्नॉलॉजी डिव्हिजन'च्या त्या सभासद होत्याच. तिथे आणि नासाच्या "एम्स रिसर्च सेंटर' या दोन्ही ठिकाणी त्यांनी संशोधनाचे विशेष कार्य केले. एम्स सेंटरच्या इंटेलिजंट सिस्टिम टेक्नॉलॉजी ब्रॅंचच्या त्या प्रमुख होत्या. अंतराळविषयक संगणकीय प्रणालीच्या संशोधनकार्य संस्थेत त्या पर्यवेक्षकही होत्या. या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली पस्तीस इंजिनिअर्स आणि शास्त्रज्ञ-संशोधकांनी काम केले.
विज्ञानविषयक विविध नियतकालिकांतून त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच विज्ञानविषयक अनेक परिषदा, चर्चासत्रे, परिसंवादांतून त्यांनी शोधनिबंधवाचन केले आहे. त्यावर स्वतंत्र व्याख्यानेही दिली आहेत. 1990 मध्ये "नासा'मध्ये त्यांची निवड झाली आणि 1991 च्या जुलैमध्ये त्या अंतराळवीरही झाल्या. अंतराळयानात असलेल्या संगणकीय प्रणालीवर देखरेख करणाऱ्या मंडळाच्या त्या प्रमुख होत्या. एलन यांनी ज्याप्रमाणे "ऍस्ट्रोनॉट ऑफिस'च्या स्पेस सेंटरच्या सहायक म्हणून काम केले, त्याचप्रमाणे मिशन कंट्रोलमध्ये स्पेसक्रॉफ्ट कम्युनिकेटर म्हणूनही भूमिका बजावली. फ्लाइट क्रूझ ऑपरेशनच्या उपसंचालक आणि संचालक या पदावरही त्या होत्या.
प्रत्यक्ष अंतराळप्रवासाच्या कार्यातही त्यांचा सहभाग होता. 1993 च्या "डिस्कव्हरी'च्या नऊ दिवसांच्या मिशनमध्ये त्या होत्या. सूर्याच्या पृष्ठभागावरील घटनांमुळे पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतात, याविषयीच्या संशोधनात त्यांचा प्रामुख्याने समावेश होता. सूर्याच्या अतिनील किरणांमुळेसुद्धा पृथ्वीवरील हवामान आणि वातावरण यामध्ये काय बदल होतात याचा अभ्यास करणाऱ्या "स्पेसलॅब'च्या उड्डाणातही त्यांचा सहभाग होता. 1999 मधील "डिस्कव्हरी'च्या दहा दिवसांच्या मिशनसाठी "इंटरनॅशनल स्पेस स्टेशन'मध्ये कामासाठी राहणाऱ्या अंतराळवीरांच्या सोयीसाठी निरनिराळ्या सुविधा पुरवण्याचे काम त्यांनी केले. अंतराळवीरांच्या कामात "रोबोटिक आर्म' (यांत्रिक हात) वापरण्याच्या कामात त्यांनी साह्य केले होते.
या सर्व कार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. एलन वेळोवेळी अनेक पुरस्कार आणि मानसन्मानांच्या मानकरी ठरल्या. "डिस्टिंग्वुइश सर्व्हिस मेडल', "एक्सेप्शनल सर्व्हिस मेडल', "आउटस्टॅंडिंग लीडरशिप मेडल' अशी पदके देऊन "नासा'ने त्यांच्या कार्याची पोच दिली आहे. संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी केलेल्या तंत्रज्ञानविषयक कार्याचा गौरव "हिस्पॅनिक इंजिनिअर अल्बर्ट बेझ ऍवॉर्ड' प्रदान करण्यात आले. पास्को (वॉशिंग्टन) येथे त्यांच्या नावाने "एलन ओकोआ लर्निंग सेंटर'ही स्थापन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment