Pages

Sunday, April 15, 2012

अनारोग्याच्या मुळाशी अंधश्रद्धा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Prahaar
पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कनिष्ठ असतात, हा सतत बिंबवला जाणारा गैरसमज हे स्त्रियांच्या अनारोग्याचं मुख्य कारण आहे. याचमुळे त्या अंधश्रद्धेच्या बळी ठरतात आणि वाहकही बनतात. लहानपणापासून मुलामुलींना स्वतंत्र व्यक्ती म्हणून, लिंगनिरपेक्षतेनं वाढवायला हवं. मुलींना विकासाच्या शक्य त्या सर्व संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. त्यांच्यामध्ये आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करायला हवी.


आरोग्याची व्याख्या फक्त शरीरस्वास्थ्याशी निगडित आजार, अस्वच्छता, कुपोषण यासंदर्भात करून चालणार नाही. आरोग्य म्हणजे आजार, रोग, अपंगत्व नसणं हे खरंच पण त्याबरोबरच व्यक्तीचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य चांगलं असणंही आवश्यक आहे. जेव्हा आपण स्त्रीआरोग्याबद्दल विचार करतो तेव्हा साहजिकच तिचा आर्थिक स्तर, जात, धर्म, सामाजिक स्थान अशा घटकांचा विचार करावा लागतो.
 बाई अंधश्रद्धेच्या आहारी जाते तेव्हा त्याच्या मुळाशी बहुधा आरोग्याशी संबंधित काही तरी प्रश्न असतो. देवळं, मठ, बुवाबाबांकडे जाणाऱ्या भक्तांमध्ये सुखी कुटुंब, नवऱ्याला यश, मुलाला नोकरी, लेकीचं लग्न यांपेक्षा घरातील कुणाच्या किंवा स्वत:च्या आजारपणाने अगतिक होऊन आलेल्या स्त्रियांची संख्या जास्त असते. आरोग्याच्या प्रश्नांवर वैद्यकीय मदत हा उपाय असूनही बायका नवससायास, कर्मकांडांचा मार्ग का अवलंबतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बाई घरातल्या सगळय़ांची काळजी घेते, दुखलं-खुपलं बघते, घराचा डोलारा सांभाळते. पण तिची काळजी घेणारं कुणी नसतं. आजारपण अंगावर काढून स्वत:चा विचार न करता कुटुंबासाठी झिजणं म्हणजे आदर्श स्त्री, हेच त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं असतं. बायकांनीच नेहमी त्याग करायचा, हे पिढय़ान् पिढय़ा ठसवलेलं असतं. त्यामुळे करपलेली भाकरी आपल्या नाहीतर मुलीच्या ताटात घालायची आणि उरलंसुरलं, शिळंपाकं आपण जेवायचं. त्यातच धन्यता मानायची. स्वत:च्या शरीराची, आहाराची काळजी घेणं हा त्यांना गुन्हा वाटतो. त्यांचा आहार थोडा आणि निकृष्ट असतो आणि त्याचा परिणाम त्यांना आयुष्यभर भोगावा लागतो. अन्नातून घेतल्या जाणा-या कॅलरीज आणि वापरली जाणारी शरीरशक्ती यांसंबंधीच्या एका अभ्यासात असं आढळलं आहे की रोजच्या कामामध्ये स्त्रिया आपली 53 टक्के शक्ती वापरतात तर पुरुष 31 टक्के. स्त्रिया गरजेपेक्षा 100 कॅलरीज कमी घेतात तर पुरुष 800 कॅलरीज जास्त घेतात. ग्रामीण भागातील 90 टक्के बायकांना अ‍ॅनिमिया असतो. याचं कारण स्त्री-पुरुष भेदभाव. गरीबीमुळे चांगलं आणि पुरेसं अन्न नसतं. त्यातही बाई म्हणून कमी आहार मिळतो. स्त्री-पुरुषांच्या कामाची लिंगभेदावर आधारित विभागणी पाहता बायकांवरचा कामाचा ताण आणि आहार याचा ताळमेळच बसत नाही. 

ग्रामीण भागात जिथे सार्वजनिक स्वच्छतेच्या अभावामुळे जंतांचं प्रमाण जास्त असतं तिथे तर या अन्नातलं एक चतुर्थाश अन्न जंतांच्याच आहारी पडतं, त्यामुळे कुपोषणाची समस्या वाढते. ज्या ठिकाणी शौचालयाची सोय नसते अशा भागातल्या 70 टक्के बायकांना पोटाचे विकार जडतात. ग्रामीण भागातील बाई स्वयंपाक चुलीवर करते. आयुष्यातील 73,000 तास स्वयंपाकात घालवते. या धुराचा तिच्या श्वसनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. रोजगार हमी योजना, बांधकाम उद्योग अशासारख्या, जड वस्तू उचलाव्या लागणा-या कामामुळे तिला मासिकपाळीचे किंवा गर्भाशयाचे आजार संभवतात. बाईचं आरोग्य म्हणजे फक्त ‘मातांचं आरोग्य’ असं म्हणणंही चूकच. सरकारच्या दृष्टीनंही ‘बाईचं आरोग्य म्हणजे आईचं आरोग्य’ असतं. एखादी स्त्री आई असो वा नसो, तिच्या आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेशी आरोग्याचा प्रश्न निगडीत आहे.
 
आजही भारतातल्या कित्येक भागात मुलगी जन्मली की तिला गळा दाबून, दुधात बुडवून, मारून टाकलं जातं. मुलीचा जन्म म्हणजे गेल्या जन्मीचं पाप. खेडय़ात अनेकदा नकोशी म्हणून मुलींची नावंसुद्धा नकुसा, नावडी अशी ठेवतात. नको असलेल्या मुलींचं भरण-पोषण लक्षपूर्वक कोण करणार? त्यात घरचं दारिद्रय़ असेल तर पाहायलाच नको. त्यामुळे शाळेत पाठवणं, कपडेलत्ते, इतर विकासाच्या संधी वगैरे सर्वच बाबतीत दुर्लक्ष केलं जातं. मुलगी जन्मली तर माहेरी आणि नंतर सासरी राबायला एक माणूस एवढीच तिला किंमत असते. धाकटय़ा भावंडांना सांभाळणं, स्वयंपाक, घरकाम, शेतकाम, सगळ्यासाठी कोवळ्या वयातच मुलींना राबवलं जातं. शहरी/सुशिक्षित कुटुंबातही मुलगी झाली म्हणून दु:ख झालं नाही तरी मुलाच्या जन्माची प्रतिष्ठा मिळत नाही.
 12 ते 14 या वयात येण्याच्या काळात मुलींचा आहार चांगला असायला हवा. त्यांच्या शरीराचं जाणीवपूर्वक पोषण व्हायला हवं. पण याही काळात त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आजही काही ठिकाणी जास्त खाऊ नये म्हणून त्यांचं मीठ तोडतात. इतरही बंधनं लादली जातात. शहरी भागातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसते. शरीरातील बदलांबाबत नीट माहिती दिली जात नाही. पालकांशी संवाद नसल्याने त्यांच्या मानसिक विकासावरही परिणाम होतो. 16 ते 18 या वयात खेडय़ामध्ये लग्न उरकलं जातं. अपरिपक्व वयात संसाराची जबाबदारी येते. लैंगिक संबंधांविषयी धड ज्ञान नसतं. सासुरवास असतो. अशातच गर्भारपणही लादलं जातं. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या मते गरोदर स्त्रीने 2500 कॅलरीज घेणं आवश्यक असतं. मुलगा किंवा मुलगी होणं सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असतं. पण मुलगाच हवा म्हणून उपासतापास बाईला करावे लागतात. सोळा सोमवारसारख्या व्रतांमुळे तर प्रकृतीवर गंभीर परिणाम होतात. तुटपुंज्या आहारामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. सरासरी 65 टक्के गर्भवती स्त्रियांना अ‍ॅनिमिया असतो. त्यामुळे गर्भपात किंवा अपुऱ्या दिवसाचं मूल जन्माला येणं, जन्मत: मुलाचं वजन कमी असणं यांसारखे परिणाम दिसून येतात. भारतात 33 टक्के मुलं 2.5 किलोहूनही कमी वजनाची असतात. इतर अविकसित देशांच्या तुलनेत भारतात बालमृत्यूचं प्रमाण जास्त आहे. 
मुलगी झाली तर परत परत बाळंतपण लादलं जातं. छळ, मारहाण केली जाते. नवससायास, व्रतवैकल्यं वाढतात. परिणामी प्रसूतीमध्ये मृत्यू पावणा-या स्त्रियांचं प्रमाण स्त्री मृत्यूंच्या अर्धा टक्के इतकं आहे. बाईला मूलच झालं नाही तर खेडय़ात काय आणि शहरात काय त्रास होतोच. मूल होण्यातच इतिकर्तव्यता मानल्यामुळे ते न झाल्यास बाईला समाजात प्रतिष्ठा मिळत नाही, पदोपदी अपमान होतो. अशा वेळी ‘हमखास संतानप्राप्ती करून देणा-या’ बुवाबाबांचं फावतं. आपल्याकडे पुरुषाची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. तसं करणं हा त्याचा अपमान मानला जातो. अशा परिस्थितीत बुवापासून मूल झालं तरी प्रतिष्ठेच्या मोहाने त्याची वाच्यता केली जात नाही आणि नव-याचं नपुंसकत्व झाकलं जातं. ही आपल्या समाजातील विसंगती आहे. 
एकूण काय मुलं भाराभार झाली तरी सलग बाळंतपणामुळे बाई शारीरिकदृष्टय़ा दुर्बल होत जाते. त्यात मुलगा न झाल्यास शारीरिक छळ आणि मानसिकदृष्टय़ा खचते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून असतं. त्यामुळे अखेरीस मानसिक संतुलन बिघडतं. परिणामत: अंगात येणं, झपाटणं, भानामती यांना बायका बळी पडतात. खरं तर या सगळ्यावर वैद्यकीय मदत हाच उपाय आहे. पण ग्रामीण भागात अनेकदा शारीरिक आजाराचं कारणही ‘बाहेरचं’ समजलं जातं. तिथे अंगात येण्याला किंवा झपाटण्याला आजार कोण समजणार? आपली प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि दवाखाने अशिक्षित, मोलमजुरी करणा-या बायाबापडय़ांच्या मनात परकेपणा निर्माण करतात. तिथल्या कर्मचा-यांची उदासीन वागणूक, रांगा लावणं, पेपर काढणं यांमध्ये कामाचे दिवस, मजुरी बुडते. आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास आणि सोबत करणा-यांसाठी लागणारे पैसे परवडत नाही. त्यापेक्षा देवऋषी बरा. तो त्यांच्या भाषेत बोलतो, आपुलकी दाखवतो आणि काही मनोकायिक आजार तसे बरे होतातही. त्यामुळे त्याच्यावर श्रद्धा म्हणजे खरं तर अंधश्रद्धा बसते.
 शहरातील सुशिक्षित मिळवत्या स्त्रीवर वेगळे ताणतणाव असतात. नोकरी, घरचं काम, मुलं, अधिक इतर जबाबदाऱ्या यात इच्छा असून स्वत:कडे लक्ष देता येत नाही. कुटुंब आणि कामाच्या जागी बाई म्हणून येणारे अनुभवही त्यात भर टाकतात. हाताखालचे लोक त्रास देतात. वरिष्ठ डाफरतात. कधी लैगिंक छळवणूकही असते. याचा परिणाम मन-शरीरावर होतच असतो. औषधाने बरं वाटत नाही. मग मन:शांतीसाठी एखाद्या बापूंचा सत्संग केला जातो. अर्थात त्यानंही बरं वाटत नाहीच, पण पर्याय नसतो. घरीदारी असणारी स्त्री-पुरुष विषमताच या सगळ्यांच्या मुळाशी आहे, हे उमजत नाही. बाई स्वत:च स्वत:ला कमी समजते. सतत झिजणं, सहन करणं हेच आपलं भाग्य, यातून सुटका मिळणं देवाधर्माच्याच हाती म्हणून ती अंधश्रद्धेच्या आहारी जाते. लहानपणापासून मुलामुलींना स्वतंत्र व्यक्ती म्हणून, लिंगनिरपेक्षतेनं वाढवायला हवं मुलींना विकासाच्या शक्य त्या सर्व संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. आपली मानसिकता चुकीची घडली तरी ती बदलायला हवी. आत्मसन्मानाची जाणीव स्वत:मध्ये निर्माण करायला हवी. ही परिस्थिती भोवतालीही बदलावी लागणार. त्यासाठी प्रत्येक पातळीवर संघर्ष उभा राहणार. त्याला खंबीरपणे सामोरं जायला हवं. निसर्गत: बाई पुरुषापेक्षा शरीरानं दुबळी असली तरी मनानं अधिक खंबीर असते. तिचं भावबळ मोठं असतं. त्याच जोरावर यावर मात करता येईल.
अंधश्रद्धेच्या सर्वात जास्त बळी 
साधारण स्त्रियांसोबत ज्यांचा विचारच केला जात नाही असा एक स्त्रीगट ग्रामीण तसंच शहरी भागातही असतो. या स्त्रिया कायमच उपेक्षित असतात. वेश्याव्यवसाय करणा-या स्त्रिया मुळात त्यात ढकलल्या जातात. त्यालाही बहुतांश देवदासीसारख्या अंध रूढी आणि दारिद्रय़ कारणीभूत असतं. ज्यांच्या व्यवसायाचं भांडवलच शरीर असतं त्यांच्याच आरोग्याची सर्वात जास्त हेळसांड होते. त्यांची कामाची वेळ, जागा, भोवतालची परिस्थिती अनारोग्याला कारणीभूत ठरते. पण ज्यांना समाजात स्थानच नाही त्यांच्या आरोग्याचा विचार कोण करणार? त्वचारोग, गुप्तरोग यांच्या जोडीला एड्सही असतो. शारीरिक, आर्थिक, मानसिक शोषणात पर्यावसान शरीराच्या हानीत आणि अखेर बेवारशी मरणात होते. या स्त्रिया अंधश्रद्धेला सर्वात जास्त बळी पडतात.
मानवी हक्कांची पायमल्ली
 आरोग्याच्या व्याख्येनुसार, स्त्रियांच्या आरोग्याचा आढावा घ्यायचा झाल्यास एका गोष्टीचा विचार करायलाच हवा, तो म्हणजे स्त्रियांवरील वाढता हिंसाचार. बाईचं सामाजिक स्थान आणि हिंसाचाराचा जवळचा संबंध आहे. पुरुषांचे बहुतांश अपघात रस्त्यावर होतात, पण स्त्रियांचे मात्र बहुतांशी त्यांच्या घरातच होतात, असं म्हटलं जातं. 15 ते 44  या वयोगटातील स्त्रियां मुख्यत: भाजल्याने मृत्युमुखी पडतात. नव-याकडून होणारी मारहाण आजही आपल्या समाजात चूक समजली जात नाही. शरीरावर होणारे घाव भरले तरी मनावर झालेला आघात पुसला जात नाही. अनेकदा स्त्रियांच्या आजारपणामागे हिंसाचार हे कारण असतं. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच स्त्रियांवरील अत्याचाराकडे आज एक सार्वजनिक आरोग्याचा पैलू म्हणून पाहण्याचे प्रयत्न अनेक संस्था करत आहेत. लैंगिकतेच्या आधारावर होणारा हिंसाचार ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे. या सगळ्याच्या मुळाशी असलेली स्त्री-पुरुष विषमता लहानपणापासूनच तुमच्या-आमच्या, सर्वाच्या मनात भिनलेली असते.

No comments: