Pages

Sunday, April 15, 2012


कल्पकतेला मेहनतीची जोड

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story
कोणत्याही ऑटोमोबाइल उत्पादनांचं छायाचित्रण करणं ही तशी खर्चिक बाब आहे. अ‍ॅक्शन ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी छायाचित्रण करणारी श्रद्धा कडाकिया ते कमी खर्चात आणि अचूकतेने करते. शास्त्रशुद्ध प्रशिक्षणानंतर श्रद्धाने छायाचित्रणासाठी फॅशन किंवा चंदेरी दुनियेसारख्या ‘लाइम लाइट’खाली असणा-या क्षेत्रांची निवड न करता यंत्रासारख्या अवजड क्षेत्राची केली. त्या क्षेत्रात अमीट ठसा उमटवला. अ‍ॅक्शन-ऑटोमोबाइल इंडस्ट्रीतली महिला छायाचित्रकार म्हणून श्रद्धा कडाकियाची ही भरारी थक्क करून टाकणारी आहे.
imageगुगल सर्च इंजिनवर ‘भारतातल्या नामवंत अ‍ॅक्शन ऑटोमोबाइल फोटोग्राफर्सची यादी’ असं इंग्रजीतून टाका.  आपल्यासमोर अमोघ ठाकूर, शशी नायर, हरदेश धिंग्रा, केदार मालेगावकर, अशी लंबी चौडी फोटोग्राफर्सची यादी त्यांच्या वेबसाइट्ससहित समोर येते. त्या यादीतलं एकच नाव आपलं लक्ष वेधून घेतं.  ते आहे श्रद्धा कडाकियाचं. ऑटोमोबाइल  क्षेत्रासाठी छायाचित्रण करणारी एकमेव महिला छायाचित्रकार. कुतूहलापोटी तिच्या वेबसाइटवर क्लिक केलं जातं. त्यावरचे तिने काढलेले फोटो पाहताना थक्क व्हायला होतं. 
 
गुजराथी त्यातही पारंपरिक विचार जोपासणा-या कुटुंबात जन्मलेल्या श्रद्धाचा कल लहानपणापासूनच इतरांपेक्षा वेगळं करण्याकडे होता. त्यामुळेच तिने आजच्या घडीला स्वत:ची ‘जस्ट क्लिक’ ही अ‍ॅड एजन्सी उभी केली आहे. छायाचित्रणाच्या कलेसाठी आवश्यक असलेली जगातील सर्व अत्याधुनिक साधनं आजच्या घडीला  तिच्याकडे उपलब्ध आहेत. या साधनांच्या मदतीनेच ती कोणत्याही ऑटोमोबाइल उत्पादनांची जाहिरात आत्मविश्वासाने करते. विक्रेत्याला त्याच्या उत्पादनातलं जे वैशिष्टय़ ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं असतं ते ती त्याच्या अपेक्षेप्रमाणे पोहोचवते. कसं काय तिने छायाचित्रणातलं ‘अ‍ॅक्शन ऑटोमोबाइल फोटोग्राफी’ हे क्षेत्र निवडलं? त्या मागाची प्रेरणा काय होती?


लहानपणी तिला चित्रं काढण्याची आवड होती. याच आवडीतून मग छायाचित्रणाचा छंद जडला. तिने काढलेली छायाचित्र इतरांना आवडू लागली. तेव्हाच आपल्याकडे छायाचित्रणासाठी लागणारं निराळं कौशल्य असल्याची जाणीव तिला झाली. मुंबईच्या ‘सोफिया पॉलिटेक्निक आर्ट अँड डिझाइन’ या महाविद्यालयातून पाच वर्षाचा छायाचित्रणाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. आजकाल प्रकल्प हे    अभ्यासक्रमांचे भाग झाले आहेत. श्रद्धानेही छायाचित्रणाच्या अभ्यासक्रमातल्या प्रकल्पासाठी ‘मेकिंग ऑफ गणेशा’ हा विषय निवडला. लालबाग परिसरातील गणेशमूर्ती तयार करतानाचे तिने
 
काढलेल्या छायाचित्रांची तारीफ झाली. ती छायाचित्रं इतकी अप्रतिम होती की, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या ‘गणपती विशेषांका’साठी वापरण्यात आली.  या असाइन्मेंटनंतर मिळालेल्या रकमेनंतर फोटोग्राफी हे क्षेत्र करियर म्हणून निवडण्याचा निर्णय योग्य असल्याचं ती सांगते. ऑफबिट करियर निवडल्यामुळे त्यांना घरातूनच अगदी सुरुवातीला विरोध झाला. पण मुलीने निवडलेले क्षेत्र तिच्या आवडीचं आहे आणि त्यात काम करताना तिला आनंद मिळतो आहे. याची जणीव जशी तिच्या पालकांना झाली, तसा त्यांचा विरोध हळूहळू मावळत गेला. करियर ग्राफला वेग मिळत नसताना वडिलांनी दिलेली साथ लाखमोलाची असल्याचं तिला वाटतं.
पाच वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर ‘टेक्निकल आणि क्रिएटिव्ह फोटोग्राफी’ शिकण्यासाठी श्रद्धाने उटी शहरातल्या ‘लाइट अँड लाइफ अकॅडमी या संस्थेत प्रवेश घेतला. दोन वर्षाचाअभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने सहाय्यक फोटोग्राफर म्हणून काम धडपड सुरू केलं. काही केल्या फोटोग्राफीतलं निराळं क्षेत्र तिला क्लिक होत नव्हतं.  दुस-यांनी ठरवून दिलेल्या नियमांवर काम करणंही तिला कुठेतरी खटकत होतं. त्यामुळे स्वत: निवडलेलं क्षेत्र स्वत:च्या पद्धतीने उंचीवर नेण्याच्या ईष्र्येतून ‘जस्ट क्लिक’ कंपनी तयार झाल्याचं श्रद्धा सांगते. श्रद्धाच्या ‘व्हिजन’मधून तयार झालेली ‘जस्ट क्लिक’ ही कंपनी आज फक्त तीन वर्षाची आहे. इतक्या कमी वयात ‘स्कोडा ऑटो लिमिटेड’, ‘बजाज ऑटो’, ‘अपोलो टायर्स’, ‘डीसी डिझाइन्स’, ‘मारुती’ अशा अनेक नामांकित कंपन्यांनी त्यांच्या ऑटोमोबाइलच्या मॉडेल्ससाठी श्रद्धाच्या कॅमेराची निवड केली आहे. दृष्यांतून चित्र पाहणं कधीही एक्सायटिंग असतं. त्यामुळे अशी अनोखी दृष्यं टिपण्याचा निर्णय फार पूर्वी घेतल्याचं ती सांगते.  
करियरच्या सुरुवातीला ‘फिल्म पब्लिसिटी पोस्टर्स’, ‘लाइफ स्टाइल शूट’ या छायाचित्रणाच्या विविध प्रकारांवर तिने काम केलं. ‘जेट एअरवेज’, ‘सिने वॉटर प्युरिफायर’,अशा कंपन्यांचे फोटोशूट करत असताना कुठेतरी आपली दिशा चुकत असल्याची जाणीव तिला होत होती. तेव्हाच विक्रेत्याला ग्राहकांपर्यंत नेमकेपणाने काय पोहोचवायचं आहे, यावर विचार सुरू असतानाच ‘स्कोडा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’साठी छायाचित्रण करण्याचं काम मिळालं. ‘इमेज ऑफ ओव्हरसिज कार’ या संकल्पनेनुसार तिने दीडशे छायाचित्रांचा संग्रह तयार केला.  या कामासाठी श्रद्धा सलग तीस दिवस अहोरात्र मेहनत करत होती. तिच्या या कामाची खूपच प्रशंसा झाली. या कामाने तिच्या करियरला एकदमच गती मिळाली. तिला एकापाठोपाठ एक कामं मिळण्यास सुरुवात झाली. फोटोग्राफीचे दौरे सुरू झाले.
‘ऑटोमोबाइल’सारख्या क्षेत्रातली महिला फोटोग्राफर म्हणून तिची ओळख होऊ लागली होती.  ‘स्कोडा’ पाठोपाठ ‘बजाज’च्या ‘ऑटो’, ‘पल्सर’, ‘मॅनिया’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या उत्पादनांसाठी तिला तिच्यातलं छायाचित्रणाचं कला वापरण्याची संधी मिळाली. या सगळ्या कामांतून तिचा आत्मविश्वास वाढल्याचं श्रद्धा सांगते.

‘ऑटोमोबाइल फोटोग्राफी’ या छायाचित्रणाच्या क्षेत्रात महिलेचा वावर सुरू झाल्याने सुरुवातीला काही पुरुष छायाचित्रकारांनी अडथळे आणायला सुरुवात केली. मात्र, श्रद्धाच्या कामाच्या वेगळेपणामुळे तिच्या कामाची दखल घेण्यात आली. ‘पुरुषांचे प्राधान्य असलेल्या या क्षेत्रात त्यांच्या बरोबरीने काम करायला मिळणं हा गौरव वाटतो. पुरुषांपेक्षा महिलांच्या नजरेतून गाडी किंवा ऑटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित वस्तूंची छायाचित्रे टिपणं हे निश्चितच कौशल्याचे काम आहे,’ असं श्रद्धा अभिमानाने सांगते. 
 ‘अपोलो टायर’च्या एरियल फोटोशूटचा अनुभव थरारक असल्याचं तिचं म्हणणं आहे. श्रद्धाला जेव्हा अपोलो टायरची असाइन्मेंट मिळाली, तेव्हा आर्थिक मंदीचा काळ सुरू होता. त्यामुळे ‘अपोलो टायर्स’ने या कामासाठी होणारा अतिरिक्त खर्च टाळण्याची श्रद्धाला विनंती केली. तिने आणि तिच्या टीमने एका उंच वॉटर टँकरवर चढून स्थिर छायाचित्रण केलं. क्लाइंटला अपेक्षित असणारी योग्य सुविधा देणं एवढय़ा एकच ध्यासातून कमी खर्चात उत्कृष्ट छायाचित्र काढून दिल्याचं श्रद्धाने सांगितलं. गाडी चार चाकी असो किंवा दुचाकी, छायाचित्र पाहताच ती विकत घेण्याची इच्छा ग्राहकांच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे. याच हेतूने श्रद्धा छायाचित्र काढते. हल्ली तर वाहनांची साहसी दृश्यं कॅमे-यात बंदिस्त करण्याचा भन्नाट प्रकार सुरू केला आहे. कमी खर्चात आपल्या उत्पादनांची सर्व उद्दिष्ट्य प्रकाशझोतात आणून त्यांना चांगली बाजारपेठ मिळावी, याकडे कंपन्यांचा कल असतो. त्यादृष्टीने श्रद्धा वाहनांच्या साहसी दृष्यांचंही छायाचित्रण करते. म्हणूनच तर भन्नाट कल्पनाशक्तीच्या जोरावर या क्षेत्रात खूप काही करता येईल, यावर श्रद्धाचा ठाम विश्वास आहे.

No comments: