Pages

Sunday, April 15, 2012

जातीसाठी पोटच्या पोरीला माती

जातीतल्या जातीत लग्न करणारी मुलगी ही मर्यादाशील, आदर्श वगैरे तर जाती-धर्माबाहेरचा जोडीदार शोधणारी कुळबुडवी कार्टी ठरते. तिच्याबरोबर कायमचे संबंध तोडण्यापासून ते तिला ठार मारण्यापर्यंतच्या प्रतिक्रिया उमटतात याचं कारण स्त्रीवरच्या मालकी हक्काची मानसिकता हेच आहे.


imageआपल्याला आवडलेल्या तरुणाची लग्नासाठी केलेली निवड आणि वडिलांनी पसंत केलेल्या मुलाला दिलेला नकार साता-यातल्या आशा शिंदेच्या जीवावर बेतला. नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहणा-या या तरुणीची तिच्या जन्मदात्याने त्यांच्या घरातच हत्या केली. ही परवाचीच गोष्ट. आपल्याच रक्ता-मांसाच्या मुलीला गळा घोटून, विहिरीत ढकलून, विष देऊन, गळफास लावून मारण्याच्या घटना आपल्याला नवीन नाहीत. स्त्री ही एक खासगी मालमत्ता आहे, या मानसिकतेतून कौटुंबिक हिंसेचे हे आविष्कार वारंवार प्रत्ययाला येत असतात. त्यातही ज्या लेकीला वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी करायचं तिच्याच जीवावर उठायचं, असं राक्षसी कृत्य करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. आताच्या या घटनेत कहर म्हणजे आशाच्या बापाने हा भयंकरगुन्हा ठरवून केल्याची निर्लज्ज कबुली स्वत: पोलिसांना दिलीय. कुटुंबाची इभ्रत आणि जाती-धर्माच्या संकल्पना हे आपल्याकडील एक विखारी वास्तव असल्याचंच यातून पुन्हा एकदा समोर आलं आहे. जातींच्या उच्चनीचतेची दृढमूल झालेली संकल्पना, त्यासंबधीची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. कारण या जन्माधिष्ठित जातीमागे कसलाही वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. बुध्दीला पटेल असं कोणतंही तर्कशास्त्र नाही. या जातीचं तथाकथित पावित्र्य राखण्यासाठी पुरूषप्रधान समाजानं नेहमीच स्त्रियांचा माध्यम म्हणून वापर केला.
 
भारतातील बहुतांश स्त्रिया अजूनही ख-या अर्थानं स्वतंत्र नाहीत, हेही वास्तव आहे. आज मुलामुलींना शिक्षणाच्या समान संधी मिळतात, ही गोष्ट खरी असली तरी ग्रामीण भागात स्त्रीशिक्षणाचं महत्त्व आजही पटवून द्यावं लागतं. आजही लग्न आणि संसार हीच बाईच्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानली जाते. स्वत:च्या आयुष्याचं ध्येय ठरवायचं स्वातंत्र्य अजूनही त्यांना नाही. आणि स्वातंत्र्य ही देण्याची गोष्ट नसून तो हक्क आहे म्हणून मिळवायची तयारी बाईनं दाखवली तर घरचे-जवळचे लोक कुटुंबसंस्था धोक्यात आल्याची ओरड करताना दिसतात. ज्या सामाजिक-आर्थिक स्तरामध्ये बाईला शिक्षण आणि करिअरचं स्वातंत्र्य आहे, तिथेही घरकाम, स्वयंपाक, मुलं सांभाळणं हे तिला टाळता येत नाही. नोकरी करत असलं तरीही घर सांभाळण्याची एकंदर जबाबदारी अजूनही बाईचीच असते. कर्तृत्ववान पुरुष कुटुंबात नवरा, बाप अशा भूमिका कशा निभावतात, हे कोणी विचारत नाही पण कर्तृत्ववान बाईची कहाणी तिच्या घरच्या जबाबदारीशिवाय पूर्ण होत नाही. ज्या वेगानं बायकांनी घराबाहेरचं क्षेत्र काबीज केलंय त्या वेगानं घराकडे लक्ष देऊन कमावणाऱ्या बायकांची सहकार्याची अपेक्षा पुरी करणं पुरुषांना जमलेलं नाही, हेही खरंच आहे. गर्भाशय हा स्त्रीच्या शरीरातील अवयव असला तरी त्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण बरेचदा पुरुषाचंच असतं. किती मुलं, किती अंतरानं व्हावीत, गर्भपात करावा की करू नये हे सगळं नवरा आणि कित्येकदा तर सासू-सासरेही ठरवतात. ‘स्वत:च्या शरीरावरील हक्क’ ही स्त्रीवादी चळवळींची सुरूवातीपासूनची तर्कशुद्ध भूमिका असली तरी अजूनही ते प्रत्यक्षात आलेलं नाही. परिणामी मातृप्रेम ही गोष्टसुद्धा बाईवर लादली जाते, असंच खेदानं म्हणावं लागतं. अशा परिस्थितीत मनाजोगता जोडीदार निवडण्याची मोकळीक ही फारच मोठी गोष्ट झाली. त्यात जातीबाहेर लग्न म्हणजे कहरच. जातीतल्या जातीत लग्न करणारी मुलगी ही मर्यादाशील, आदर्श वगैरे तर जाती-धर्माबाहेरचा जोडीदार शोधणारी कुळबुडवी कार्टी ठरते. तिच्याबरोबर कायमचे संबंध तोडण्यापासून ते तिला आणि शक्य असेल तर संबंधीत मुलालाही ठार मारण्यापर्यंतच्या प्रतिक्रिया उमटतात याचं कारणच स्त्रीवरच्या मालकी हक्काची मानसिकता आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली होणा-या ऑनर किलिंगबाबत प्रस्तावित कायदा लवकरात लवकर होऊन त्याची कठोर अमलबजावणी होणं म्हणूनच गरजेचं आहे.
 वटपौर्णिमेला वडाभोवती फे-या मारण्याचा निर्थक प्रकार अनुसरताना सावित्रीला मिळालेलं नवरा शोधण्याचं स्वातंत्र्य मात्र आपण सोयीस्करपणे डोळ्यांआड करतो. पारंपरिक पद्धतीनं विवाहसंस्था स्वीकारताना कोणाबरोबर लग्न करायचं, याचं स्वातंत्र्य मुलीला नाही. तसं असतं तर जातीव्यवस्था केव्हाच कोलमडून पडली असती. पण नातेवाईक-समाज काय म्हणेल, असा निर्थक प्रश्न उपस्थित करून स्वातंत्र्याचा मुद्दाच बाद करून टाकला जातो. अर्थात एरवी आयुष्यात आपण अनेक गोष्टी अशा करत असतो ज्याबद्दल कुणी ना कुणी काही ना काही म्हणतच असतं. अशावेळी मात्र आपण सोयीचं तेवढंच ऐकतो. मात्र स्वत:च्या मुलीबाबत, तिच्या प्रेमासाठी तिच्या मनासारखं वागणं आपल्याला सोयीचं वाटत नाही. कारण, अशाच वेळी आपला धर्माबद्दलचा, जातीबद्दलचा, भाषेबद्दलचा आणि कुटुंबप्रमुख म्हणून मालकीच्या भावनेतून आलेला अहंकार उफाळून येतो. अस्मितेच्या नावाखाली अहंकाराचं स्तोम माजतं तेव्हा होणारं कृत्य राक्षसीच असतं ज्यात प्रेम, वात्सल्य अशी धर्मानंही शीरोधार्य मानलेली मूल्यं पायदळी तुडवली जातात. आधुनिक काळाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वातंत्र्य आणि समतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी जातीपातीचं जोखड आजही वागवतोय हे सत्य आहे. तंत्रज्ञान आणि भौतिकदृष्टय़ा आपण कितीही प्रगती केली तरी अशा घटना आपला वैचारिक मागासलेपणाच अधोरेखित करतात, हे निश्चित.

  साभार; http://www.prahaar.in/madhyantar/streevidha/56848.html
फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

No comments: