‘वै-याच्या रातीनं’ दिलं जगण्याचं बळ........
वयाच्या अठराव्या वर्षी सुनीता कोंडबत्तुनवार यांचं
लग्न झालं. त्यानंतर विसाव्या वर्षी पतीचं कर्करोगानं निधन झालं.
लग्नापूर्वी पतीला कर्करोग असल्याची माहिती त्यांच्यापासून सासरकडच्या
मंडळींनी लपवली होती. विश्वासाच्या नात्याची सुरुवातच अविश्वासानं झाली
होती. मात्र, पतीच्या मृत्यूनंतर छोट्या श्रुतिकाला घेऊन सासरकडच्या
मंडळींना दोष देऊन, माहेरचा आसरा घेणं सुनीता यांना मंजूर नव्हतं.
स्त्रीवादी
लेखनाविषयी चर्चा होत असताना महिलांचे वैयक्तिक संघर्ष आणि सोसलेपणाचीच
चर्चा अधिक होते. निदान लेखकाकडून तशी अपेक्षा तरी केली जाते. बंडखोर
स्त्रीवादी लेखनातही लेखिकेच्या वैयक्तिक संघर्षाचे पैलू रेखाटले जातात.
विदर्भातील चंद्रपूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील सुनीता कोंडबत्तुनवार या
लेखिकेच्या बाबतीत मात्र स्त्रीवादाचे हे परंपरागत पैलू तोकडे पडतात.
पतीच्या मृत्यूनंतर समाजातील प्रस्थापित व्यवस्था आणि कुटुंबाकडून
मिळालेल्या उपेक्षेतून जगण्याचं बळ एकवटणा-या कोंडबत्तुनवार यांच्या
लेखनातून निसर्ग व स्त्रीमनाचे अंतरंग उलगडत जातात. मात्र त्यामुळेच
लेखनातून येणारी सहनशीलता सोसलेपणाकडे न झुकता स्त्रीवादी संघर्षाला कारण
झाली. या संघर्षातूनच स्वत:सह मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करण्यात
येणा-या प्रयत्नांना ताकद मिळाली.

‘चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील लोकसाहित्याचे संकलन’ याविषयी
सादर केलेल्या प्रबंधावर सुनीता कोंडबत्तुवार यांनी डॉक्टरेट मिळवली आहे.
विदर्भ साहित्य मंडळाच्या त्या सदस्य आहेत. आज त्यांची मुलगी श्रुतिका
कोंडबत्तुवार-सिंग या पुरुषांचीच मक्तेदारी मानल्या जाणा-या ‘मॅकेनिकल इंजिनीअर’ या
पदावर अमेरिकेतील एका कंपनीत कार्यरत आहेत. प्रस्थापित मक्तेदारीला आव्हान
देऊन त्यावर विजय मिळवण्याची कला श्रुतिकानेही आईकडूनच आत्मसात केली आहे.
वयाच्या
अठराव्या वर्षी सुनीता कोंडबत्तुनवार यांचं लग्न झालं. त्यानंतर विसाव्या
वर्षी पतीचं कर्करोगानं निधन झालं. लग्नापूर्वी पतीला कर्करोग असल्याची
माहिती त्यांच्यापासून सासरकडच्या मंडळींनी लपवली होती. विश्वासाच्या
नात्याची सुरुवातच अविश्वासानं झाली होती. मात्र, पतीच्या मृत्यूनंतर छोट्या श्रुतिकाला घेऊन सासरकडच्या मंडळींना दोष देऊन, माहेरचा आसरा घेत सहानुभूतीवर आयुष्य काढणं सुनीता यांना मंजूर नव्हतं. याबदल्यात जगण्याचा अटळ संघर्ष, प्रस्थापित
समाजाची संकुचित मानसिकता आणि सासरकडून होणारी कौटुंबिक अवहेलना पदरात
पडणार होती. अशा स्थितीत सास-यांकडून मिळणारं मानसिक बळ ही एकच गोष्ट आशेचा
किरण दाखवणारी होती. पण सहा वर्षात हा किरणही मावळला.
‘आत्मसन्मानानं जगण्यासाठी’ चिकाटी आणि परिश्रमाला पर्याय नव्हताच. दारोदारी साबण, काडेपेटी, कपडे
विकून गुजराण सुरू झाली. सोबतच महिन्याला 200रुपये मिळकतीसाठी शिकवण्या
घेऊ लागल्या. राहायला सासरकडच्या घरातला एक कोपरा मिळाला. स्वत:च्या
ताकदीवर स्वत:ची ओळख उभी करतानाच स्वाभिमानाशी तडजोड करायची नाही हे
कोंडबत्तुनवार यांनी पक्कं ठरवलं होतं. स्वत:च्या शिक्षणासह छोट्या
श्रुतिकाच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार होताच. कुठल्याही परिस्थितीत तिच्या
शिक्षणात खंड पडता कामा नये, हा निर्धार करून उगवणारा रोजचा दिवस रेटण्यासाठी संघर्ष करायचा, यात मुलीची फरफट होता कामा नये याचीही काळजी घ्यायची. एकाच वेळेस आयुष्यातील अशा अनेक कसरती सुनीता कौशल्यानं पार पाडत होत्या.
विदर्भातील
नक्षलग्रस्त परिसरातच वाढलेल्या सुनीत यांनी आदिवासींच्या रोजच्या
जगण्यातला संघर्ष पाहिला होता. त्यातूनच जगण्याचं बळ मिळत गेलं. बारावीनंतर
पुढे काय, या प्रश्नाला
या पाहणीतूनच उत्तर मिळालं आणि आदिवासींच्या लोकसाहित्यावर सखोल अभ्यास
करायचा ठरलं. आदिवासी कुटुंबातली मातृसत्ताक पद्धती सुनीता यांनी पाहिली
होती. त्यामुळेच स्त्रीविषयक जाणीवेचा प्रवास सोशिकतेकडून सक्षमतेकडे होऊ
लागला. आदिवासी जीवन व लोककलेचा अभ्यास करताना स्वत:च्या आयुष्यातील
समस्यांचीही उत्तरं मिळत गेली. शेजा-या-पाजा-यांची रेशनकार्ड गोळा करून
त्यातून धान्य व गरजेच्या गोष्टी मिळवण्यात येऊ लागल्या. रेशनच्या
लाल-तांबड्या गव्हामुळे पोळ्या काळ्या-लालसर होऊ लागल्यावर, छोट्या श्रुतिकाने शाळेतल्या इतर मुलींच्या डब्यातल्या पोळ्या पांढ-या व माझ्या डब्यातल्या पोळ्या काळ्या का होतात, असा निरागस प्रश्न विचारला. त्यानंतर रेशनच्या लाल गव्हाच्या पिठाच्या गोळ्यावर मैद्याचा थर चढवून ‘पांढ-या’ पोळ्या
लाटल्या जाऊ लागल्या. रोजच्या जगण्यातल्या वेदनेवर सुखाचा वरवरचा थर लावून
सुखाची पोळी लाटून तीच छोट्या श्रुतिकाला दाखवली जात होती. मात्र, त्यामुळेच
यशाचं ध्येय गाठण्याची मायलेकींची भूक वाढत गेली. अशा अनेक आठवणी अमेरिकेत
मॅकेनिकल इंजिनीअर झालेली श्रुतिका आणि डॉक्टरेट मिळवलेल्या सुनीताताई आज
सांगतात. ही यशाची भूक आणि बंड करण्याची प्रवृत्ती त्यांच्या लेखनात
उतरणारच होती. त्याला आदिवासी समाजजीवनातील संघर्षाची जोड मिळाली. म्हणूनच
त्यांच्या ‘विश्वंभर’, ‘विस्तवाचं वास्तव’ आदी कथा व कवितासंग्रहातून हाच संघर्ष पाहायला मिळतो.
एक जमाना गेलावं
मिरूग पडे रिचवत
कसं आभाळ उडालं
नाही चालत औत..
झाली सरकारी बोली
कडू निंबाची निंबोळी
रात वै-याची गेली
रात वै-याची गेली..
कोंडबत्तुनवार यांच्या अशा कवितांचं ग्रामजागर साहित्य संमेलनातून कौतुक होतं ते त्यातील ग्रामीण लोकजाणीवेमुळेच. संघर्षमय जीवनातील ‘वै-याची
रातीनं’ जाताना मायलेकींना जगण्याचं दिलेलं बळ कौतुक करण्यासारखंच आहे.
म्हणूनच अण्णा हजारे, डॉ. विठ्ठल वाघ, नारायण सुर्वे आदी समाज आणि
साहित्यक्षेत्रातील दिग्गजांनी कोंडबत्तुनवार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
दिली आहे.
No comments:
Post a Comment