Pages

Thursday, March 8, 2012

मी सावित्री जोतिराव ः एका महासंग्रामाची कादंबरी
उत्तम कांबळे
Tuesday, January 03, 2012 AT 02:00 AM (IST)
http://online2.esakal.com/esakal/20120103/5540810215544756510.htm 
सावित्रीबाई फुले म्हणजे आधुनिक महाराष्ट्रातील एक
 महान समाजनायिका. त्यांच्यावरील महाकादंबरी नक्कीच वाचनीय आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे एका अर्थाने आपल्याकडील आद्य शिक्षिका. समाजक्षेत्र ढवळून क्रांतीचे अनेक झेंडे फडकविणाऱ्या वीरांगना. व्यवस्था नमविण्यासाठी आणि नव्या व्यवस्थेसाठी नवे विचार व जुन्या लढायांची पेरणी करणाऱ्या झुंजार महिला. स्त्रीमुक्तीचा उद्‌गार त्यांच्यापासूनच सुरू होतो. आणि व्यवस्थेने सर्वहारा ठरवलेल्या समस्त महिलांच्या समोर खऱ्या अर्थाने शिक्षण जायला सुरवात होते ते त्यांच्यापासूनच. इतिहासात समाज क्रांतिकारक किंवा समाजक्रांतीचे पिता व माता म्हणून फुले दांपत्य प्रसिद्ध आहे. अजरामर झाले आहे. गेली अनेक दशके किंवा शतके जोतीराव आणि सावित्रीबाई म्हणजे उपेक्षितांच्या लढ्यांचे प्रेरणास्रोत बनले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महागुरू बनले. सावित्रीबाईंवर त्यांच्या हजारो, लाखो लेकींनी कथा लिहिल्या. कविता लिहिल्या, चित्रे काढली. आणखी काय काय केले, सांगता येत नाही. सावित्रीबाईंचे नायगाव हे माहेर. आता महाराष्ट्रातल्या लाखो लेकीबाळींचे प्रेरणास्थान बनले आहे. इतिहासात अशा गोष्टी खूप अपवादात्मक स्वरूपात घडत असतात. समाजाच्या इतिहासाला त्या सातत्याने वळण देत असतात. सावित्रीबाईंनी पुण्यात महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली नसती तर? हा तसा सोपा प्रश्‍न आहे; पण त्याचे उत्तर खूप कठीण आहे. इतिहासात महानायिका बनून राहिलेल्या सावित्रीबाईंवर आता मराठी साहित्यात एक महाकादंबरी जन्माला आली आहे आणि सोलापूरच्या कविता मुरूमकर यांनी ती लिहिली आहे. माझ्या माहितीप्रमाणे महानायिकेवर महाकादंबरी लिहिण्याचा कदाचित हा पहिलावहिला प्रयत्न असावा.


शिकलेल्या, लढणाऱ्या प्रत्येक महिलेमागे तशी सावित्रीबाईंची एक अदृश्‍य सावली विचार होऊन, हत्यार होऊन सतत वास करीत असते. असंख्य महिलांना ती लढण्याची आणि व्यवस्थेशी दोन हात करण्याची प्रेरणा सातत्याने देत असते. कविताने सावित्रीबाईंचे चरित्र वाचले आणि ती झपाटून गेली. चरित्र लिहिण्याचा तिने संकल्प सोडला. हजारो मैल भ्रमंती केली. फुले पती-पत्नीच्या सर्व क्रांतिकारी पाऊलखुणा शोधल्या. तिथली माती आपल्या कपाळावर लावली. अनेक कागदपत्रे चाळली. ग्रंथ वाचले. शेकडो व्याख्याने ऐकली आणि ती कादंबरी लिहू लागली. क्रांतिकारी समाजपुरुषावर किंवा समाज महिलेवर कविता लिहिणे सोपे असते. पण, कादंबरी लिहिणे महाकठीण असते. काळाचा एक अभेद्य पडदा चिरत-चिरत मागे जावे लागते. वर्तमानाच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तेथेच अनेक दिवस वास्तव्य करावे लागते. भिडे वाड्यात जावे लागते. नायगावात जावे लागते. सावित्रीबाईंनी सहन केलेल्या दगड-विटांचा माराही पाहावा लागतो. सगळ्या भूतकाळाची वीण उसवत-उसवत हा एक महासंग्राम पाहावा लागतो. समजून घ्यावा लागतो. इतिहासाचे गोडवे गाणे सोपे; पण त्याला हात लावणे तसे कठीण असते.


कविताने दोन-तीनशे पानांच्या मोठ्या आकाराच्या कादंबरीत सावित्रीबाईंच्या जीवनावर मोठ्या खुबीने युद्धपट साकारला आहे. त्यांच्या जीवनातील बहुतेक छोटे मोठे प्रसंग टिपले आहेत. त्यांचे सार्वजनिक जीवन जसे दिसते तसेच खासगी जीवनही दिसते. जोतीराव आणि सावित्री शरीराने दोन असले तरी विचाराने, वर्तनाने, लढायांनी एक होते. अभेद्य होते. सावित्रीबाईंच्या जीवनाचा पट उलगडत असताना स्वाभाविकच महात्मा फुल्यांचे क्रांतिदर्शन होणेही एकदम स्वाभाविक आहे. या कादंबरीतही तसे ते पाना-पानावर दिसते. सर्वसामान्य माणसांचे खासगी जीवन आणि सार्वजनिक जीवन अनेकदा वेगळे असते. काही वेळेला या दोन जीवनात अंतर पडतानाही दिसते. काही वेळेला ग्रंथातला माणूस वेगळा आणि जगण्यातला माणूस वेगळा वाटायला लागतो. अनेक महापुरुषांच्या बाबतीत मात्र असे घडत नाही. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती फुले त्यापैकी एक होते. त्यांचे अवघे जीवन, अवघा श्‍वास, अवघ्या हालचाली या समाजाशी, लढायांशी जोडल्या गेल्या आहेत. स्वयंपाकघरापासून दिवाणखान्यापर्यंत हे पती-पत्नी एकाच विषयावर चर्चा करताना दिसतात आणि तो विषय म्हणजे गड्या आपल्याला समाज बदलायचा, व्यवस्था बदलायची, माणसांचे अवमूल्यन थांबवायचे आणि त्यासाठीच जगायचे. समाजक्रांती हेच या दाम्पत्याच्या जगण्याचे प्रयोजन होते. त्यासाठीच ते जगले.
महात्मा फुले जिवंत असेपर्यंत सावित्रीबाई त्यांच्या सर्व लढ्यात सक्रिय सहभागी होत्या. त्यासाठी अनेकदा त्या स्वकियांशीही झगडा देतात. माहेरच्या माणसाशी भांडतात. तत्त्व आणि व्यवहार, समाज आणि खासगी नातीगोती असे जेव्हा-जेव्हा द्वंद्व सुरू होते, तेव्हा त्या तत्त्वाच्या, समाजाच्या, मूल्यांच्या बाजूने ठामपणे उभ्या राहताना दिसतात. फुले वाड्यातला हौद खुला करायचा असेल, नवी धर्मनीती, नवा धर्म जन्माला घालायचा असेल, इंग्रजांना निवेदने द्यायची असतील, व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे असेल, शूद्र-अतिशूद्रांसाठी शिक्षण खुले करायचे असेल, अनाथ मुलांचा, फेकून दिलेल्या मुलांचा सांभाळ करायचा असेल, घराचेच अनाथालय करायचे असेल किंवा अशा अनाथांचे आई-वडील बनायचे असेल तर प्रत्येक वेळी सावित्रीबाई आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहताना दिसतात. अशी भूमिका करताना त्या अनेकदा स्वतःची प्रज्ञा, स्वतःचा विचारही ठामपणे वापरतात. केवळ पतीभक्त आणि पतीनिष्ठा म्हणूनच त्या हे सारे करीत आल्या, असे नाही तर समाज बदलाची तीव्र आकांक्षा पतीप्रमाणे त्यांच्याही मनात सतत होती. पतीचे आदेश पालन करणारी एक पत्नी एवढीच त्यांची भूमिका नाही, तर स्वतंत्रपणे अनेक लढायांना निमंत्रण देणारी आणि त्या लढणारी वीर पत्नी, वीर महिला म्हणूनही त्यांची भूमिका होती. खरोखरच त्या स्वतःचा विचार आणि स्वतःचा कणा घेऊन जगणाऱ्या महिला होत्या, हे फुल्यांच्या निधनानंतरही सिद्ध झाले. फुल्यांच्या सर्व लढाया तर त्यांनी पुढे नेल्याच, शिवाय स्वतःच्या लढायाही त्या लढल्या. पायाला भिंगरी लावून त्या फिरल्या. अनेक आंदोलनांचे स्वतः नेतृत्व केले. रुग्णांची सेवा केली. शिक्षणाची चळवळ पुढे नेली आणि व्यवस्थेच्या मानेवर तर उभ्या राहिल्याच राहिल्या. या सर्व गोष्टी कविताने कादंबरीत अतिशय सुंदर मांडल्या आहेत. प्रबोधनासाठी किंवा सावित्रीबाईंच्या जीवनाचा धावता पट समजून घेण्यासाठी, नव्या पिढीसाठी ही कादंबरी उपयोगी ठरावी. कादंबरीतील काही मर्यादांचा विचार करूनही तिचे स्वागत करावे लागेल. जागतिकीकरणात महिलांची वस्तू होण्याच्या काळात आणि इतिहास संपणार, अशा घोषणा सुरू असल्याच्या काळात कादंबरी आली आहे. या अर्थाने कादंबरीचे स्वागत करावे लागेल. कारण ही एका महासंग्रामाची कादंबरी आहे.
(कविता मुरूमकर, मो.- 9822029318).

No comments: