धम्मक्रांतीनंतरच्या बौद्ध स्त्रिया

भारतीय संस्कृतीत भारतीय स्त्री जीवनाचा
इतिहास पाहिला तर वेदकालीन स्त्रियांना पुरुषांप्रमाणे सामाजिक, आर्थिक,
शैक्षणिक स्वातंत्र्य होते. त्याचप्रमाणे स्त्रिया समाजाकडून सुरक्षित
होत्या. तिच्याकडे पाहण्याची सामाजिक दृष्टी स्वच्छ होती. परंतु नंतरच्या
काळात इथल्या स्त्रीचे स्थान, तिची मानसिकता ही संस्कृतीने घटविली आणि
समाजव्यवस्थेने तिला दुय्यम स्थान देऊन तिच्या मनाचा कोंडमारा केला. हिंदू
धर्मातील वर्णाधिष्ठित समाजव्यवस्थेने संपूर्ण स्त्री जातीलाच ‘शूद्र’
संबोधून तिची अवहेलना केली. या सामाजिक स्थितीचा विचार केला तर ‘मानव’
म्हणनू स्त्रीचे अस्तित्व नाकारले. मानवी हक्कापासून अलिप्त असलेल्या
पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीतील स्त्रीची मानसिकता व इतर व्यवस्थेतील
स्थान पाहता दुय्यम नव्हे, तर तिचे स्थानच विचारात घेतले गेले नाही. यामुळे
तिचे स्थान पशूपेक्षाही गौण मानले जायचे.
गौतम बुद्धांनी तर स्त्रियांना प्रथमता
निर्वाणाची संधी उपलब्ध करून देऊन स्त्रीमुक्तीचे पहिले क्रांतिकारक पाऊल
उचलले. तिच्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून ‘एक मानव’ म्हणून बघितले.
स्त्रियांना समानतेचा हक्क प्राप्त करून देऊन तिला सामाजिक, सांस्कृतिक,
बौद्धिक स्वातंत्र्य प्राप्त करून देऊन स्त्रियांच्या गुणांना संधी उपलब्ध
करून दिली. तिचे स्थान उच्च आहे, असे वैचारिक वातावरण निर्माण करून समानता
आणली.
एकोणिसाव्या शतकात ‘क्रांतिबा जोतिबा फुले
व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांनी स्त्रीमुक्तीसाठी आशेचा किरण
दाखविला. समानतेची वाटचाल करण्यासाठी शिक्षणाचा पाया रोवला. स्त्रियांना
शिक्षणाने जागृत होऊन तिला आपण ‘मानव’ आहोत आणि आपणास जीवन घडविण्याचा व
आदर्श समाज निर्माण करण्याचा हक्क आहे, याची जाणिवही झाली.
डॉ. आंबेडकर यांनी बुद्ध, कबीर, फुले
यांना आदर्श मानल्यामुळे या महान विभूतींनी स्त्रियांना दिलेले महत्त्व
ओळखले होते. आदर्श समाजामध्ये स्त्रीचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. हे
अभ्यासल्यामुळे त्यांनी १९२७ साली महाड येथे झालेल्या चवदार तळ्याच्या
सत्याग्रहावेळी स्त्रियांना उद्देशून जे भाषण केले त्यात ते म्हणतात,
‘जातीदर्शक साडय़ा नेसू नका, कथलाच्या बांगडय़ा, मण्यांच्या गळसर्या घालू
नका, ब्राह्मण स्त्रिया नेसतात, तशी लगुडी नेसा’ असा उपदेश केला होता.
समाजव्यवस्थेत स्त्रियांना समानतेने
वागविले जात नाही. म्हणून त्यांना कायदेशीर हक्क व अधिकार मिळावे, यासाठी
घटनेच्या तिसर्या भागातील मूलभूत अधिकारातील कलम क्र. १४, १५, १६ मार्फत
त्यांना समानतेचे अधिकार दिले. इतकेच नव्हे तर, त्यांना अधिकार मिळाले तर
समाजाची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने सोयीचे होईल. या सहेतूने ‘हिंदू कोड
बिल’ आणले. त्यावेळी झालेला सनातन्यांचा विरोध लक्षात ठेवून स्त्रियांना
माणुसकीची, समानतेची वागणूक मिळवून देण्यासाठी धम्मक्रांती घडवून आणली, असे
आपणास म्हणता येईल.
समाजामध्ये सतत बदल होत असतात. त्यातून
क्रांती झाली तर समाज व्यवस्थेमध्ये मोठय़ा प्रमाणात बदल होत असतात, असे
बदल सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आचार-विचारातून घडून आलेले
असतात. यामुळे जूनी विचारसरणी नष्ट होवून, नव्या विचारसरणीनुसार
समाजव्यवस्था निर्माण होऊन समाजाची प्रगती होत असते. हिंदू संस्कृतीत
वाढलेल्या स्त्रियांच्या मनामध्ये धम्मक्रांतीनंतर वैचारिक, सांस्कृतिक
पातळीवर मोठय़ा प्रमाणात परिवर्तन झाले. असे परिवर्तन आंबेडकरी चळवळीतील
स्त्रियांमध्ये विशेषत: बौद्ध स्त्रियांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणात झालेले
आहे. यातील उल्लेख करण्यासारख्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत.
शैक्षणिक परिवर्तन
स्त्री शिक्षणाचे प्रतिनिधित्व करणार्या
पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून मान मिळालेल्या
‘क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले’ यांनी स्त्री शिक्षणाचा पाया १९ व्या
शतकात रचला. ‘स्त्री’ ही एक माणूस आहे, असा विचार करून समाजात स्त्री-पुरुष
समानतेचा पुरस्कार केला. पुढे या जागृतीसाठी फुले दांपत्यांनी स्त्री
शिक्षणावर भर दिला. स्त्री शिकलीच पाहिजे, या विचारांचा धागा डॉ.
बाबासाहेबांनी मांडून ‘ज्ञान’ व ‘विद्या’ या गोष्टी केवळ पुरुषांसाठी नाहीत
तर स्त्रियांनाही आवश्यक आहेत, असे मत व्यक्त करून स्त्री शिक्षणाचे
महत्त्व हे पुढील पिढी सुधारण्यासाठी आहे. त्यातून समाज परिवर्तन घडवून
येते, अशी भूमिकाही स्पष्ट केली.
डॉ. आंबेडकरांच्या समतेच्या विचाराने
भारावून ते विचार आत्मसात करून आज बौद्ध स्त्रियांच्या ज्ञानाच्या कक्षा
रुंदावल्या आहेत. बौद्ध स्त्रिया स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा उत्कर्ष
शिक्षणाने करीत आहेत. २००१ च्या जनगणनेमधील धर्मावर आधारित पहिल्या
अहवालातील बौद्धांचा सरासरी साक्षरता दर ७२.७ आहे. यातील बौद्ध स्त्रियांचा
सरासरी साक्षरतेचा दर ६१.७ दिसून येतो. हे प्रमाण इतर धर्मियांच्या तुलनेत
अधिक आहे. यावरून आपणास असे दिसून येते की, जिथे धम्मक्रांतीपूर्वी अक्षर
ओळख नसणार्या स्त्रियांची शैक्षणिक प्रगती अतुलनीय आहे. हे परिवर्तन केवळ
त्यांना धम्मक्रांतीतून मिळालेल्या मानसिक बळातून मिळाले आहे. कुटुंबाच्या
भविष्यातील प्रगतीसाठी त्या स्वत: वाहून घेत आहेत. त्याचप्रमाणे
शिक्षणामुळे अंधश्रद्धा नाहीशी होऊन वैज्ञानिक दृष्टीकोन आलेला आहे.
त्यामुळेच बौद्ध स्त्रिया वास्तववादी विचार मांडू लागल्या आहेत.
शिक्षणामुळे आज स्त्रिया चळवळीमध्ये सहभागी होऊन समाजपरिवर्तनाचे कार्य
करीत आहेत. शिक्षणामुळे आज स्त्रिया चळवळीमध्ये सहभागी होऊन
समाजपरिवर्तनाचे कार्य करीत आहेत. शिक्षणामुळे त्या स्वत:चे विश्व निर्माण
करीत आहेत. शिक्षण घेऊन साहित्यविश्वामध्ये त्यांनी आपले स्थान बळकट केले
आहे. या बौद्ध स्त्री साहित्यिकांमध्ये शांताबाई कांबळे (माझ्या जन्माची
चित्तरकथा), कुमुद पावडे (अंत:स्फोट), उर्मिला पवार (कवच, चौथी भिंत,
आयदान) याचबरोबर मीनाक्षी मून, हिरा बनसोडे, डॉ. ज्योती लांजेवार, आशा
थोरात, उषा भालेराव, उषा अंभोरे, सुरेखा भगत या सारखींचा उल्लेख
विशेषरुपाने करता येईल.
आर्थिक परिवर्तन
‘आर्थिक प्रश्न’ हे सामाजिक व शैक्षणिक
स्तराशी संबंधित आहेत. शिक्षण घेण्याची प्रेरणा, त्यांना धम्मक्रांतीतून व
पर्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारातून आलेली आहे. हे
कोणासही नाकारता येणार नाही. शिक्षणामध्ये आघाडी मिळविल्यानेच
स्त्रियांमध्ये आर्थिक परिवर्तन अधिक प्रमाणात घडून आले. शिक्षणाचे बौद्ध
स्त्रिया विविध क्षेत्रात अग्रेसर असल्याने आर्थिकदृष्टय़ा त्या आज प्रबल
आहेत. त्याचप्रमाणे अर्थोत्पादन करण्यासाठी घरगुती उद्योग, व्यवसायही करीत
आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून अर्थोत्पादनाच्या ज्या काही संधी
आहेत, त्या संधी तसेच त्यास अनुसुरुन प्रशिक्षण घेऊन याचा फायदा घेत आहेत.
‘अनुसूचित जाती’ व ‘बौद्ध’ महिला
उद्योजिकांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी अनेक योजना आहेत. याचा परिपूर्ण
फायदा आज बौद्ध स्त्रिया घेत आहेत. त्या आपल्या संसाराला आर्थिकदृष्टय़ा
मदत करीत आहेत. जेथे स्त्रियांचा आर्थिक स्तर उच्च असतो तेथे त्यांचा
सामाजिक दर्जाही उंचावतो. अशा स्त्रियांचे ‘कुटुंब’, ‘समाज’ तसेच देशही
प्रगती करू शकतो. अशा अर्थाने ‘बौद्ध स्त्री कुटुंब’, ‘समाज’ व ‘देश’
याच्या विकासात मोलाचे योगदान करीत आहेत. अर्थव्यवस्थेतील अनेक
क्षेत्रामध्ये आपले पाऊल नव्या उमेदीने टाकीत आहेत. यातील वैद्यकीय
व्यवसायामध्ये कर्हाडमधील ‘शेणोली’ गावच्या डॉ. प्रमिला गायकवाड, डॉ.
चारूशिला गायकवाड (शिर्के), डॉ. रत्ना कांबळे, डॉ. शकुंतला खरात, डॉ.
पानतावणे यासारख्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. आता तर कितीतरी बौद्ध
स्त्रिया वैद्यकीय व्यवसायात उतरत आहेत. याचबरोबर इंजिनिअर, संगणक
क्षेत्रात सुद्धा संध्या वाघमारे (चालखुरे), नीता गाडे (यु.एस.ए.),
प्रियांका फुलझेले, मीनाक्षी रंगारी, मिनल सोनटक्के, विनया खोब्रागडे,
स्मिता दंडगे (यु.एस.), दीपाली खैरनार (न्यू जर्सी) इत्यादी प्राविण्य
मिळवून यामध्ये आपला ठसा उमटवित आहेत.
मानसिक परिवर्तन
हिंदू संस्कृतीत प्रत्येक नैसर्गिक तसेच
दैनंदिन सामाजिक जीवनात घडणार्या घटनेमागे देव-देवतांचा संबंध जोडला जातो.
त्यामुळे देवदेवतांना अनुसरून आराधना व त्यावर आधारित कर्मकांड होत
असल्याने त्याचा पगडा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य स्त्रियांवर शैक्षणिक
अज्ञानामुळे मोठा होता. अशा घटनांचे अवलोकन करण्याची शास्त्रीय सवय
स्त्रियांना नव्हती. डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीने स्त्रियांना शिक्षणाविषयी
जागृती निर्माण करू दिली. तशीच नवी मनोधारणासुद्धा बनविली. आपले हक्क व
अधिकार याची पूर्णार्थाने जाणीव करून दिली. अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्याची
मानसिकता दिली.
या नव्या मानसिकतेमुळे बौद्ध धम्म
स्वीकारल्यानंतर अनेक कुटुंबामध्ये स्त्रियांना समानतेची वगाणूक मिळू
लागली. याचबरोबर घरी असणार्या पती, दीर किंवा इतर पुरुष मंडळींकडून
प्रबोधनात्मक साहित्य वाचण्यास मिळू लागले. यामुळे त्यांना आपण
अंधश्रद्धेला किती प्रमाणात बळी जात होतो याचे भान आल्याने त्यांनी
अंधश्रद्धेला तिलांजली दिली. अज्ञानाच्या जोखंडातून मुक्त होऊन बौद्ध
धम्माचा वसा घेऊन त्या आता आपल्या कुटुंबातील लहान सदस्यांना प्रबोधनात्मक
विचार देत आहे.
धार्मिक परिवर्तन
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर ज्या
स्त्रियांनी धम्मदीक्षा घेतली, तो सोहळा आणि बाबासाहेबांचे विचार ऐकून,
मानसिक परिवर्तन झाले. त्यांनी आपल्या घरातील देव-देवतांच्या मुर्तींचे
विसर्जन केले. नंतरच्या काळात धार्मिक विधीस अनुसरून पशू-पक्षी बळी
देण्याचे सोडून दिले. धार्मिक सण, यात्रा, उत्सव साजरे करणे सोडून दिले.
बौद्ध धम्माची दीक्षा घेताना बाबासाहेबांनी सांगितलेल्या ‘पंचशील’ व ‘बावीस
प्रतिज्ञा’ स्वीकारून त्या आचरणात आणू लागल्या. हेच धम्माचे संस्कार
त्यांच्या मुली, सुना व नातलगांच्या मनावर झाल्याने धम्माचे विचार संक्रमित
झाले.
यानंतरच्या दुसर्या आणि तिसर्या पिढीतील
बौद्ध स्त्रियांनी प्रज्ञा, शिल, करुणा, पंचशील अशा नावांची महिला मंडळे
स्थपून त्याद्वारे समाजातील इतर महिलांच्या मानसिकतेतून धम्मविषयीच्या
तत्त्वज्ञानाविषयी जागृती निर्माण केली. आज त्या ‘बौद्ध’ म्हणून अभिमानाने
सांगत आहेत. जुन्या धार्मिक प्रथा, परंपरा पूर्णत: मोडीत काढल्या. उदा.
विवाह विधीवेळी असणार्या अनेक विधींना फाटा दिला आहे. याचबरोबर ‘नागपंचमी’
हा सण ब्राम्हणी धर्मात महिलांचा सण म्हणून साजरा करतात. हा सण साजरा करीत
असताना नवीन विवाह झालेल्या मुलीला तिच्या ‘माहेरी’ आणले जाते. याचबरोबर
अशा स्त्रिया झिम्मा, फुगडी व इतर खेळ खेळत असतात. परंतु धम्म
स्वीकारल्यानंतर हे सर्व प्रकार बंद झाले. याऐवजी डॉ. आंबेडकर जयंतीवेळी
विवाहित मुलीला आपल्या माता-पित्यांच्या घरी आणले जाते. यावेळी हा उत्सव
साजरा करीत असताना लिंबू चमचा, संगीत खुर्ची यासारखे खेळ खेळण्याचे प्रकार
सुरू झाले. याचप्रमाणे विवाहाच्या वेळी बहिण आपल्या विवाहित भावाला विवाह
झाल्यानंतर घरी नववधू समवेत आल्यानंतर दार अडविणे. (बहिण आपल्या मुलासाठी
वधू म्हणून पूर्वनिश्चिती करणे) हा प्रकार सर्रास व्हायचा. परंतु बौद्ध
पद्धतीत या गोष्टी गौण मानल्या आहेत. त्यामुळे वास्तववादावर आधारित व
कोणत्याही व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार्या गोष्टी टळू लागल्या
आहेत. एकंदरीत धम्मक्रांतीनंतर बौद्ध स्त्रियांनी, बौद्ध तत्त्वाचे आचार व
विचार आत्मसात केले आहेत, तसेच त्या वैज्ञानिक विचारसरणीचा पुरस्कार करताना
आढळतात.
बौद्ध धम्मानुसार विवाह विधी पार पाडले
जातात व बावीस प्रतिज्ञांचे पालन करण्यावर भर दिला जाऊन त्या पद्धतीने जीवन
जगले जाते. नामकरण, साक्षगंध, विवाहविधी, अंत्यसंस्कार असे सामाजिक
कार्यक्रम हे धम्म प्रतिज्ञानुसार जीवनामध्ये अंमलात आणतात. पंचशील ग्रहण
करून वर्षांच्या चार पौर्णिमा पवित्र सण म्हणून पाळल्या जातात, तसेच डॉ.
आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तनदिन, वर्षावास या
दिनानिमित्त ठिकठिकाणी प्रबोधनात्मक किंवा जाणीव जागृतीपर व्याख्यानमाला
आयोजित केल्या जातात. याचबरोबर बौद्ध स्त्रिया धम्मप्रसाराचे कार्य
‘उपासिका’ म्हणून करतात. सध्य परिस्थितीत तर बौद्ध स्त्रिया धार्मिक विधी
करण्यात पुढाकार घेताना दिसत आहेत. अशा घटनेकडे पाहिले तर असे दिसून येते
की, ब्राम्हणी धर्मामध्ये धर्माला वाहून घेण्याचा स्त्रियांना कोणताही
अधिकार नव्हता. विधवा स्त्रियांना तर मुळीच अधिकार नव्हता व नाही. परंतु
धम्मक्रांतीनंतर धम्माचे कार्य खेडोपाडी पोहोचण्यासाठी ‘उपासक’ व ‘भिक्खू’
यांची गरज होती. ही गरज ओळखून पुरषांप्रमाणे बौद्ध स्त्रिया आपल्या
घरादाराचा, संसाराचा त्याग करून ‘भिक्षुणी’ म्हणूनही धम्मप्रचारात उतरल्या.
यामध्ये लक्ष्मीबाई नाईक, अकोल्याच्या भिक्षुणी नंदशीला (देवकी चंद्रभान
खंडारे), चंद्रशीला (चंद्रभागा तोथमल) यांचा विशेष उल्लेख करता येईल.
आंबेडकर चळवळींची सर्व संघटनांनी मातृत्व संघटना म्हणून जिचा उल्लेख केला
जाते. त्याचे नेतृत्व मीराताई आंबेडकरांपासून ते विविध शहरात, खेडोपाडय़ात
अनेक ‘उपासिका’ म्हणून महिला धम्मप्रचार व धम्मप्रसादाच्या कार्यात सहभाग
घेताना दिसून येतात.
सामाजिक परिवर्तन
बहुजन स्त्रियांचे ‘सामाजिक प्रश्न’ हे
इतर स्त्रियांपेक्षा वेगळे आहेत. इतर स्त्रिया केवळ लिंगभेदाच्या शिकार
आहेत. परंतु बहुजन स्त्रिया या लिंगभेदाबरोबर जातीभेदाच्याही शिकार,
याचबरोबर कनिष्ठ जातीमुळे तिचा दर्जा हा कनिष्ठ राहिला असल्याने त्या
वर्गभेदाच्या सुद्धा शिकार होत असतात. धम्मक्रांतीमुळे बौद्ध स्त्रियांना
वैचारिक व सांस्कृतिक नवसंजीवनी मिळाली आहे. धम्मक्रांतीमुळे या अशा
भेदभावात वावरत नाहीत किंवा यासारख्या अनिष्ट प्रवृत्तींना बळीही जात
नाहीत. (ज्या जात आहेत, त्या बौद्ध स्त्रिया नव्हेत) बौद्ध स्त्रियांमध्ये
शिक्षणाने जे मोठे परिवर्तन झाले आहे, त्या परिवर्तनामुळे त्यांची स्वत:ची
अस्मिता जागृत झाली आहे. तसेच जेथे स्त्रियांचे मानसिक, शारिरीक व लैंगिक
शोषण होते. त्या ठिकाणी अशा घटनांविरूद्ध आवाज उठवीत आहेत. अन्याय,
अत्याचाराविरोधात आज मागासवर्गीय स्त्रिया संघटितपणे लढत आहेत.
त्याबरोबर स्त्रिया महिला मंडळे, बचत गट,
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती, डॉ. आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती असे
सामाजिक परिवर्तन सोहळे घडवून आणत असताना एकत्र येऊन ग्रामीण स्त्रियांचे
मानसिक परिवर्तन करू पाहात आहेत. त्याचबरोबर घरातील कुटुंबामध्ये विवाहाचे
निर्णय मुलामुलींवर सोपविले जात आहेत. घरातील कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय
घेत असताना स्त्रियांना यामध्ये सामावून घेतले जाते. अशा अर्थाने कुटुंबात
तिला समान दर्जा दिला जातो. अशा स्त्रिया स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडवीत
असतानाच मुला-मुलींचे व्यक्तिमत्त्व घडविण्यामध्ये दक्ष आहेत.
भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समतेचे
तत्त्व मान्य केले असले तरी प्रत्यक्षात मात्र सामाजिक व्यवहारात मात्र
आजही स्त्रियांना असमानतेची वागणूक मिळते. हिंदू कुटुंबात स्त्रियांना केवळ
दुकानामधील शोरुममध्ये ठेवलेल्या ‘बाहुली’ (शो पीस) सारखी वागणूक दिली
जाते. परंतु बौद्ध धम्मात स्त्री-पुरुषांचा दर्जा समान आहे व स्त्रियांनाही
पुरुषांइतके स्वातंत्र्य आहे. या कारणानेच बौद्ध स्त्रिया या
दीक्षाभूमीच्या विचारांच्या माहेरवासीन असल्याने त्या स्वातंत्र्याचा मोकळा
श्वासोच्छवास घेत आहेत. या कारणानेच धम्मक्रांतीमुळे स्त्री जीवनाचा
मानसिक, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक पातळीवर झालेला हा बदल कितीतरी पटीने
अधिक आहे, हे मान्य करावेच लागेल.
-प्रा. सुजाता कराडे
+९५९८५०१९५०२७
साभार; http://www.krantijyoti.abhiyan.org/index.php?option=com_content&view=article&id=78:2011-07-25-11-00-38&catid=1:article&Itemid=14
No comments:
Post a Comment