हिंदु स्त्रियांची उन्नती अवनती : जबाबदार कोण?
महाबोधी : मे-जून १९५१
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द
राईस ऍन्ड फॉल आफ दी हिंदू वीमेन : हू वॉज रिस्पॉन्सीबल फॉर इट ?’ या
शीर्षकाच्या ‘महाबोधी’ नियतकालिकाच्या मे-जून १९५१ च्या अंकात प्रकाशित
झालेल्या मूळ इंग्रजी लेखाचा हा अनुवाद.
‘ईव्हज विकली’ च्या २१ जानेवारी १९५० च्या
अंकात भारतीय स्त्रियांच्या अवनतीला मुख्यत: बुद्धाची शिकवण कारणीभूत
असल्याचा आरोप करणारा लेख प्रसिद्ध झाला होता. या आरोपाचे खंडन करण्याच्या
उद्देशाने लामा गोविंद यांनी लिहिलेला ‘स्त्रियांचे हिंदू धर्म आणि बौद्ध
धम यातील स्थान’ या शीर्षकाचा इंग्रजीतील लेख ‘महाबोधी’ नियतकालिकाच्या
मार्च, १९५० च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. अशा आरोपाचे खंडन करणे
प्रत्येक बौद्ध धर्मियांचे कर्तव्य आहे. व ते लामा गोविंद यांनी पार पाडले.
परंतु हा प्रश्न येथेच संपविता येणार नाही. बुद्धावर आरोप करण्याचा हा
काही पहिलाच प्रसंग नव्हे. बुद्धाची महानता असलेल्या हितसंबंधी लोकांकडून
असे आरोप सहसा केले जातात. त्यामुळे या प्रश्नांच्या मुळांशी जाऊन वारंवार
होणार्या अशा आरोपाचा मूलत: शोध लावणे अगत्याचे आहे. मला खात्री आहे की हा
आरोप खूप गंभीर आणि तिरस्करणीय असल्यामुळे त्यांचा आणखी शोध घेण्याचे
‘महाबोधी’चे वाचक स्वागत करतील.
बुद्धाच्या विरूद्ध होणार्या या आरोपला फक्त दोन ठिकाणी आधार मिळू
शकतो. पहिला संभाव्य आधार ‘महापरिनिब्बाण सुत्ता’च्या प्रकरण पाचमध्ये
आनंदाच्या प्रश्नाला बुद्धाने उत्तर दिले, असे जे, सांगितले जाते तो असू
शकतो. तो येणेप्रमाणे,
९ ‘स्त्रियांशी वागताना आम्ही कसे वागावे?’ आनंदाने विचारले.
‘आनंदा, जणू त्यांना बघत सुद्धा नाही, असे’
‘परंतु त्यांना पहावे लागलेच तर आम्ही काय करावे?’
‘आनंदा बोलू नये’
‘परंतु त्या आमच्याशी बोलल्याच तर भगवंत, आम्ही काय करावे?’
‘आनंदा तुम्ही सर्वोपरी जागरूक असावे’
ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसने प्रकाशित
केलेल्या ‘महापरिनिब्बाण सुत्ता’ च्या मूळ भागात प्रस्तुतचा भाग पाहायला
मिळेल हे नाकारता येणार नाही. परंतु प्रस्तुत उतारा प्रत्यक्ष त्यात आहे
किंवा नाही, हा मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की, प्रस्तुत उतार्याच्या
आधारावर जर एखाद्या युक्तिवादाची उभारणी होत असेल तर तो संबंधित उतारा हा
मूळचा तसेच खरा असून नंतरच्या काळात भिक्खूंनी तो प्रक्षिप्त केलेला नाही
हे सिद्ध करण्याची गरज नाही काय?
खोटय़ा गोष्टीचे आवरण चढवून, त्यात मूळ
बौद्ध विचारांशी अगदीच परकीय असलेल्या ब्राह्मणी विचारांची भर घालून, तसेच
मठशाही विचारांना प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, सुत्तपिटकाला
संपूर्णपणे विद्रूप करण्यात आलेले आहे. ज्याला भगवान बुद्धाची मूळ शिकवण
माहीत आहे असे सुत्तपिटक वाचून वेडा झाल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नव्हे
तर र्हिस डेव्हिड यांना झालेल्या आश्चर्यात तो सहभागी होईल आणि विचारील :-
‘‘सुत्तपिटकाच्या या भागामध्ये बुद्धाचे
विचार कुठे आहेत? यापैकी किती भागामध्ये बुद्धाचे मूळ विचार स्पष्टपणे
मांडल्या गेलेत आणि किती भागामध्ये उत्तरोत्तर वर्षानुवर्षे झालेले निवेदक,
स्मृतिबद्ध तसेच कंठस्थ करणारे बहुसंख्य शिक्षक, तसेच मौखिक शिक्षण घेणारे
विद्यार्थी ही सर्व शिकवण, जी क्लिष्ट होती ज्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे
लागत होते. इतकेच नव्हे तर कधीकाळी संपादकांनी ती संपादित केल्यानंतर
इतक्या वर्षांनी तंतोतंतपणे कशी मांडली जावू शकते? हे सर्व निवेदक, शिक्षक
तसेच संपादक यांचे जीवन आणि त्यांचे आदर्श समाजातील इतर लोकांपेक्षा अत्यंत
वेगळे होते आणि काही तर बौद्ध जगताशी संबंधितही नव्हते, अशा सर्व
विपर्यास्त माध्यमांचे कोणीही अध्ययन करावे आणि या वचनासंबंधी स्वत:शी
विचारावे की ही शिकवण ज्या व्यक्तीने संपादीत केली, त्याने सर्वमान्य
शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्याकडून वदवून आणि तेच सत्य असल्याचे दर्शविले
जाण्याची शक्यता नाही काय?’’
त्यामुळे नंतरच्या काळात भिक्खूंनी हा
उतारा प्रक्षिप्त केला या विधानात फार अतिशयोक्ती नाही. पहिली गोष्ट ही की
सुत्तपिटक लिहिण्याकरिता बुद्धाच्या मृत्यूनंतर चारशे वर्षांचा काळ लोटला
होता. दुसरे असे की, ज्या संपादकांनी त्यांचे संकलन आणि संपादन केले ते
भिक्खू होते आणि त्यांनी भिक्खुंसाठीच त्यांचे संकलन आणि संपादन केले होते.
ब्रह्मचर्याचा नियम सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने असे विधान
बुद्धासंबंधी करणे भिक्खूला महत्त्वाचे वाटले आणि अशा परिस्थितीत भिक्खू
संपादकांनी असे लिहिणे असंभवनीय वाटत नाही.
प्रस्तुत उतारा नंतरच्या काळात प्रक्षिप्त केला या विधानाच्या पुष्टयर्थ अन्य दोन बाबी सहाय्यभूत ठरतात.
१) पहिली, प्रस्तुत सुत्ताला दिलेल्या
प्रस्तावनेच्या तत्त्यावरून (डेव्हिड्सच्या एस.बी.बी. मालिकेतील दीघ निकाय
भाग २ च्या पृष्ट ७२ वर पाहायला मिळेल.) असे निदर्शनास येते की, या
सुत्तातील बराचसा भाग इतर सुत्तातही आढळून येतो. परंतु प्रस्तुत उतारा
दुसर्या कोणत्याही सुत्तात आढळत नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तथापि
या सुत्तातील बर्याच उतार्याचा समावेश आढळून येत आहे, ही वास्तविकता
आहे.
२) दुसरे या सुत्ताचे चिनी भाषांतर
अस्तित्वात असल्याचे या सुत्ताच्या प्रस्तावनेतील पृष्ठ XXXVIII वरून
(डेव्हिड्सच्या एस. बी. बी. च्या खंड XI मध्ये प्रकाशित) निदर्शनास येते.
परंतु या चिनी भाषेतील ग्रंथात सुद्धा वरील विशिष्ट उतार्याचा समावेश
आढळून येत नाही.
आपण याला सत्याच्या कसोटीवर तपासून पाहू.
आनंदाने असा प्रश्न विचारण्याचे काही विशिष्ट प्रयोजन होते काय? बुद्धाचे
स्त्रियांशी सर्वश्रुत असलेले संबंध लक्षात घेऊन हा प्रश्न होता काय? खरे
तर आनंदाने असा प्रश्न विचारण्याची शक्यता नाही आणि जर आनंदाने असा प्रश्न
विचारलाच असता तर, बुद्धाने असे उत्तर दिले नसते, हे पुराव्यानिशी सांगता
येते. आनंद तसेच भगवान बुद्ध यांची पिटकामध्ये नमूद असलेली स्त्रियांप्रती
वागणूक आणि त्यासंबंधी निर्माण केलेला प्रश्न व दिलेले उत्तर हे दोन्हीही
अगदी विसंगत आहेत.
आनंदाने असा प्रश्न विचारणे खरोखरच गरजेचे
होते काय? या मुद्यावर हे नमूद करणे प्रसंगोचित होईल की, महापरिनिब्बाण
सुत्ताच्या त्याच प्रकरणात, वर ज्याचा उल्लेख आला आहे. त्यातील फक्त काही
गाथा वगळल्या आहेत. आनंदाची वर्तणूक किती आल्हाददायी होती आणि तो सर्वाचा
कसा आवडता होता याचे बुद्धाने वर्णन केले आहे. त्यातील दोन गाथा मी खाली
नमूद करतो.
१६ ‘बंधुंनो, आनंदामध्ये चार अतुलनीय आणि स्फुर्तिदायक सदगुण आहेत.’
तर बंधुंनो, संघातील भिक्खू आनंदाला
भेटण्यासाठी येत असत. त्याला भेटल्यानंतर ते प्रफुल्लित होत असत. आनंद
जेव्हा त्यांना धम्म शिकवित असे तेव्हा प्रवचन ऐकताना ते आनंदविभोर
व्हायचे. आणि बंधुंनो, आनंद जेव्हा मौन असे त्यावेळी मात्र ते अस्वस्थ होत
असत. आणि बंधुंनो संघातील भिक्खूणी किंवा धम्मोपासक... धम्मोपासिका त्याला
भेटल्यानंतर आणि आनंदाने त्यांना धम्म शिकविल्यानंतर ते प्रफुल्लित होत
असत. आणि बंधुंनो आनंद मौन असताना मात्र ते अस्वस्थ होत असत.
यावरून हे स्पष्ट होते की, आनंदाचे
स्त्रियांशी भेटणे, इतकेच नव्हे तर ज्या धम्म-उपासिका संघाच्या सदस्या
नव्हत्या, अशांनाही भेटणे ही नित्याची व सामान्य बाब होती. तो त्यांना पाहत
असे, भेटत असे आणि त्यांच्याशी बोलत असे. असे असतानाही आनंदाने असा प्रश्न
का विचारला? स्त्रिया आनंदाला भेटतात हे बुद्धाला माहीत होते. त्यांनी या
संबंधी कधीही हरकत घेतली नव्हती. असे असतानाही बुद्धाच्या मनात स्त्रियांशी
असलेले सर्व संबंध तोडण्याचा तसेच प्रतिबंधीत करण्याचा विचार का आला
असावा? हा संपूर्ण भाग इतका कृत्रिम आहे की तो नंतरच्या काळात मठशाहीने
प्रक्षिप्त केल्याचा प्रकार आहे हे निश्चित समजावे.
आनंदाच्या जीवनातील अत्यंत विरोधाभासी असा प्रसंग महापरिनिब्बाण सुत्ताच्या संबंधित भागात आलेला आहे.
हे सर्वविदित आहे की, पहिल्या संगितीत (परिषदेत) आनंदाच्या विरोधात पाच तक्रारी करण्यात आल्या त्या अशा,
१) बुद्धाच्या मतानुसार विनयातील कोणत्या भागात फेरफार आणि दुरूस्ती करण्याचा अधिकार संघाला दिला हे विचारण्यात तो अपयशी ठरला.
२) भगवंताचे चिवर शिवता शिवता मागे सरताना त्याचा चिवरावर पाय पडला.
३) भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर
त्यांच्या पार्थिवाला स्त्रियांना वंदन करण्याची परवानगी देऊन त्यांच्या
अश्रुमुळे भगवंताच्या पार्थिवाच्या झालेल्या विटंबनेस तो कारणीभूत आहे.
४) भगवंताला अधिक जगण्यासाठी तो बोलला नाही.
५) स्त्रियांचा, संघात प्रवेशासाठी तो तत्त्वत: कारणीभूत होता.
आनंदाने हे सर्व आरोप कबूल केले.
त्याने हे आरोप मान्य करणे किंवा नाकारणे
ही बाब वेगळी आहे. महत्त्वाचा आहे तो तिसरा आरोप. सध्याच्या चर्चेतील तो
महत्त्वाचा मुद्दा आहे. महापरिनिब्बाण सुत्तात उल्लेखिलेला भगवंताचा उपदेश
सत्य आहे ही जर वास्तविकता असेल तर आनंदाने भगवंताच्या पार्थिवाला
स्त्रियांना स्पर्श का करू दिला? बुद्धाने थोडय़ाच वेळेपूर्वी केलेल्या
उपदेशाची त्याने इतक्या उघडपणे आणि जाणीवपूर्वक अवहेलना केली असती का? याचे
उत्तर निश्चितपणे नकारात्मक असेल. या नकरात्मक उत्तरातून काय निष्पन्न
होते? त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपाप्रमाणे बुद्धाने असा काही उपदेश
केलाच नव्हता हेच निष्पन्न होते. आणि जर बुद्धाने असा उपदेश केलाच असता तर
आनंद त्या विरोधात वागला नसता. यावरून नि:संदिग्धपणे असे म्हणता येते की,
असा कोणताही उपदेश बुद्धाने केलेला नव्हता.
या प्रश्नासंबंधी बुद्धाचा दृष्टिकोन
विचारात घेता बुद्धाने स्वाभविकरित्या असे उत्तर दिले असते का? बुद्धाची
स्त्रियांप्रति असलेली वागणूक हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. बुद्धाने
आनंदाला उपदेश केल्याचे जे सांगितले जाते त्याप्रमाणे स्त्रियांना
भेटण्याचे टाळले होते काय? वस्तुस्थिती काय आहे.
दोन प्रसंग नजरेसमोर त्वरित येतात.
त्यातील एक विशाखाचे आहे. बुद्धाच्या ऐंशी प्रमुख शिष्यांपैकी ती एक होती
आणि ‘दानदात्यांची प्रमुख’ या पदवीने तिचा गौरव होता. विशाखा कधी काळी
बुद्धाचे प्रवचन ऐकावयास गेली नव्हती काय? तिने त्यांच्या संघारामात प्रवेश
केला नव्हता काय? बुद्धाने आनंदाला स्त्रियांशी जसे वागण्याचा उपदेश
केल्याचे सांगितले जाते तसे बुद्ध विशाखासोबत वागले होते काय? प्रवचनासाठी
उपस्थित असणार्या भिक्खूंनी त्यावेळी काय केले? त्यांनी प्रवचनातून
बहिर्गमन केले होते काय?
दुसरा प्रसंग नजरेसमोर येतो तो वैशालीच्या
आम्रपालीचा. ती बुद्धाला भेटायला गेली आणि तिने त्यांना तसेच त्यांच्या
भिक्खूंना भोजनासाठी तिच्या प्रसादात येण्याचे निमंत्रण दिले. ती एक
वारांगणा होती, ती वैशालीतील सर्वात देखणी स्त्री होती. बुद्धाने आणि
भिक्खूंनी तिला टाळले होते काय? याचवेळी लिच्छवींने दिलेले निमंत्रण
नाकारल्यामुळे त्यानां (लिच्छवींना) खूप अपमानीत झाल्यासारखे वाटले
असतानाही, बुद्धाने तिचे निमंत्रण स्वीकारले आणि तिच्या प्रासादात जाऊन
तिने दिलेल्या भोजनात सहभागी झाले.
याशिवाय आणखी उदाहरणांची गरज भासत नाही.
नंदकोवद सुत्तात, सांगितल्याप्रमाणे बुद्ध श्रावस्ती येथे वास्तव्यास
असताना त्यांच्याकडे महाप्रजापती गौतमी आपल्या सोबत पाचशे दानी-स्त्रियांना
घेऊन आली. तिने बुद्धाला धम्मासंबंधी मार्गदर्शन करण्यास विनंती केली
असताना बुद्धाने त्यांच्यापासून पलायन केले होते काय?
संयुक्त निकायात2 नमूद आहे की पज्जुनाची
कन्या कोकानदा, जिच्या सौंदर्याचे तेज संपूर्ण महावनात पसरले होते? ती
बुद्धाचे वास्तव्य वैशालीला असताना प्रात: समयी त्यांना भेटावयास आली होती.
राजा प्रसेनजीतची पत्नी राणी मल्लिका धम्मासंबंधीच्या उपदेशासाठी बुद्धाकडे वारंवार येत असल्याचे उल्लेख पिटकामध्ये ठिकठिकाणी आहेत.
या घटनावरून हे स्पष्ट आहे की, बुद्धाने
स्त्रियांना भेटण्यासंबंधी प्रतिबंद केला नव्हता तसेच स्त्रियांना
बुद्धाकडे जाण्याकरिता संकोच वाटत नसे.
स्त्रियांशी होणार्या वारंवार भेटी आणि
मानवी स्वभावातील कमकुवतपणा लक्षात घेत बुद्धाने भिक्खूंना सामान्य
अनुयायांच्या घरी वारंवार भेट न देण्याचा उपदेश केला हाता हे खरे आहे.
परंतु त्यांनी अशा भेटींवर प्रतिबंध केला नव्हता किंवा त्यांनी
स्त्रियांविषयी कधीही तिरस्कार दर्शविला नव्हता.
ब्रह्मचर्य पाळण्यासंबंधी बुद्धाची टोकाची
भूमिका होती हेही तितकेच खरे आहे. त्यांच्याच शब्दात ब्रह्मचर्याचे जीवन
कलंकित करण्याकरिता स्त्रिया कारण ठरू शकतात, या सत्य गोष्टींविषयी बुद्ध
अत्यंत जागरूक होते. पण त्यांनी कोणता उपदेश केला? स्त्रियांशी भेटतात
तेव्हा त्यांनी आपल्या मनात व्यक्तिनुरुप माता, भगिनी आणि कन्या असल्याची
भावना बाळगावी, म्हणजेच तुम्ही प्रसंगानुरूप स्वत:च्या माता, भगिनी आणि
कन्यासारखे त्या स्त्रीला समजावे.
स्त्रीयांच्या भिक्खू संघातील प्रवेशास
तसेच त्यांचा संघ बनविण्यास बुद्धाचा विरोध होता. (सरतेशेवटी त्यांनी
परवानगी दिली) आणि भिक्खू संघापेक्षा भिक्खूणी संघाला त्यांनी दुय्यम स्थान
दिले या आरोपांचा बुद्धाचे विरोधक आधार घेतात. आणि हेच दुसरे संभाव्य कारण
असू शकते.
येथे पुन्हा या परिस्थितीचे विश्लेषण करणे
गरजेचे आहे. महाप्रजापतीच्या परिव्रज्या घेण्याच्या मागणीला बुद्धाने
विरोध का केला? स्त्रियां हया निम्नच वर्गाच्या आहेत. ज्यांच्या
प्रवेशामुळे भिक्खू संघाचा दर्जा जनमानसात कमी होईल असा बुद्धाता समज होता.
म्हणून त्यांनी यास विरोध केला होता काय? किंवा स्त्रिया बुद्धाचे
तत्त्वज्ञान आणि शिकवण प्रत्यक्षात आणण्याकरिता बौद्धिक आणि नैतिक दृष्टय़ा
असमर्थ आहेत अशा मताचे ते होते म्हणून त्यांनी याला विरोध केला काय?
चर्चेच्या दरम्यान याविषयी बुद्धाची काहीशी कठोर भूमिका बघता या दोन
प्रश्नांपैकी दुसरा प्रश्न बुद्धाला निश्चितपणे आनंदाने विचारला होता.
इतकचे नव्हे तर शंकेला किंवा वादाला कोणत्याही प्रकारचा वाव राहू नये
म्हणून बुद्धाने नि:संदिग्धपणे त्याचे उत्तर दिले. त्यांनी सांगितले की,
त्यांचे तत्त्वज्ञान आणि शिकवण समजून घेण्यास स्त्रिया पूर्णत: समर्थ असून
त्यांच्या परिव्रज्या घेण्याच्या मागणीला विरोध असण्याचे हे कारण नाही.
यावरून हे स्पष्ट होते की पुरुषाच्या तुलनेत स्त्री बौद्धिक किंवा
चारित्र्याच्या दृष्टीने कमी दर्जाची आहे अशी बुद्धाची भूमिका नव्हती.
त्यांचा दर्जा कमी असल्याने त्या संघाच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील या
भीतीतून त्यांच्या प्रवेशाला त्यांनी विरोध केला या युक्तीवादात काहीही
अर्थ नाही. असेच जर त्यांचे मत असते तर त्यांनी कधीही त्यांना संघात प्रवेश
दिला नसता.
भिक्षू संघाच्या तुलनेत भिक्षूणी संघाला
त्यांनी दुय्यम स्थान दिले या युक्तीवादाचे उत्तर असे की, या व्यवस्थेमागे
श्रेष्ठपण किंवा कनिष्ठपणा कोणताही विचार नसून, ही भूमिका पूर्ण:
व्यावहारिक होती. स्त्रियांना परिव्रजीका म्हणून प्रवेश देताना बुद्धाला
दोन प्रश्नांना सामोरे जावे लागले. स्त्री आणि पुरुषांसाठी एकच संघ असावा
काय? यावर यांनी दोन स्वतंत्र संघ असावे असा निर्णय घेतला. पुरुष आणि
स्त्री परिव्राजकांचा जर एकत्र संघ असावे असा निर्णय घेतला. पुरुष आणि
स्त्री परिव्राजकांना जर एकत्र ठेवले तर ब्रह्मचर्याचा नियम पूर्णत: लयास
जाईल अशी त्यांना भीती वाटत होती आणि म्हणून स्त्रियांना प्रवेश देण्याबाबत
आपण आपल्या मताचा उपयोग करावा असे त्यांना वाटले आणि पुरुषांचे व
स्त्रियांचे दोन स्वतंत्र संघ असावेत त्या दोन संघाच्या दरम्यान गतिरोधक
असावे अशी त्यांनी भूमिक घेतली. दोन स्वतंत्र संघ निर्माण करण्याचा निर्णय
घेतल्यावर, त्यांना दुसर्या एका प्रश्नाला सामोरे जावे लागले तो म्हणजे एक
पुरुषांचा आणि एक स्त्रियांचा असे जर दोन स्वतंत्र संघं असतील तर ते
पूर्णत: स्वतंत्र आणि एक दुसर्यापासून वेगळे संघ असावेत की त्या
दोहोंमध्ये काहीसे परस्पर आंतरसंबंध असावेत?
पहिल्या प्रश्नावर, स्त्रियांचा संघ
पुरषांच्या संघापासून स्वतंत्र असावा याशिवाय दुसरा निर्णय शक्य नव्हता.
दोघांनाही बंधनकारक असणार्या ब्रह्मचर्याच्या नियमाची ही अनिवार्य
निष्पत्ती होती. पुरुष तसेच स्त्री या दोघांच्याही जीवनात उपजत, नैसर्गिक
वैषयिक वासनेचे स्थान किती प्रभावी होत. याची बुद्धाला जाणीव होती.
बुद्धाच्याच शब्दाचा उपयोग करावयाचे झाल्यास ही वासना पुरुषाला स्त्रिच्या
आणि स्त्रिला पुरुषाच्या दास्यत्वाकडे ओढते. या प्रभावाला थोडीही संधी दिली
तर ब्रह्मचर्याचा नियम एका क्षणासाठीही अस्तित्व राहू शकणार नाही.
ब्रह्मचर्याच्या नियमाचे संरक्षण करण्याकरिता त्यांना दोन स्वतंत्र संघाची
योजना करावी लागली.
दुसर्या प्रश्नाचा विचार करता, बुद्धाने
घेतलेल्या निर्णयाव्यतिरिक्त दुसरा निर्णय घेणे शक्य होते काय? ज्या
स्त्रियांनी त्यांचा धम्म स्वीकारला त्या अपरिपक्व स्त्रिया होत्या.
त्यानां धम्मतत्त्वज्ञानाची शिकवण देणे तसेच संघाच्या नियमांबाबत त्यांना
प्रशिक्षित करणे गरजेचे होते. ही जबाबदारी कोण घेऊ शकले असते? दुसर्या
कोणाला त्यांनी हे कार्य सोपविले असते? त्यांच्या संघातील पुरुष
भिक्खूशिवाय इतर कोणावरही नव्हे. कारण धम्मतत्त्वज्ञानाची शिकवण देऊन
संघाच्या नियमाबाबत त्यांना आधीच प्रशिक्षित करण्यात आले होते आणि त्यांनी
नेमके हेच केले. भिक्खुणींना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी भिक्खूवर
सोपविण्याकरिता त्यांच्यातील कोणते संबंध सुदृढ करण्यात आले? हा महत्त्वाचा
प्रश्न निर्माण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय भिक्खू संघापेक्षा भिक्खुणी
संघ दुय्यम स्थानी असण्याचे जबाबदारी भिक्खूंकडे सोपविल्यावर त्यांच्यातील
नाते, शिक्षक आणि विद्यार्थी असे राहील. शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यात
विद्यार्थ्यांच्या प्रति शिक्षकांना काही अधिकार आणि शिक्षकांच्या प्रति
विद्यार्थ्यांनी अधीनतेची आणि दुय्यमतेची भूमिका घेणे अंतर्भूत नाही काय?
यापेक्षा बुद्धाने वेगळे काय केले?
या संदर्भात ख्रिश्चन चर्चमधील पादरी आणि
मादरी यांच्यातील संबंधाची तुलना करणे सोयीचे होईल. मादरी, पादरीच्या
तुलनेत दुय्यम नाहीत काय? अर्थातच त्या आहेत यावरून कुणी असे म्हणू शकेल
काय की ख्रिश्चन धर्म पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी लेखतो? भिक्खू
आणि भिक्खूणी मधील संबंध नियमित करण्यासाठी बुद्धाने जर काही व्यवस्था केली
असेल तर त्यांचा वेगळा अर्थ का लावण्यात यावा?
जेथपर्यंत सुत्तपिंटकांचा संबंध आहे.
तेथपर्यंत बुद्धाचा स्त्रियांच्या प्रती पक्षपाती दृष्टिकोन होता आणि
पुरुषांनी त्यांच्यापासून सावध असावे असे आग्रही प्रतिपादन करण्याच्या
आरोपाला कुठलाही आधार नाही.
- २ -
विशिष्ट घटनांना बाजूला ठेवून बुद्धाचा
स्त्रियांकडे पाहण्याचा सर्वसामान्य दृष्टिकोन काय होता याकडे वळू या.
स्त्रिया निम्न दर्जाच्या आहेत अशी बुद्धाची धारणा आहे काय? मला खात्री आहे
की, बौद्धांच्या श्रेष्ठ साहित्यात बुद्धाने स्त्रीवर्गासंबंधी केलेले
उल्लेख जो कोणी वाचील त्यावरून त्याची खात्री पटेल की, स्त्रियांना खालच्या
पायरीवर जावे लागेल असे काहीही करणे तर दूरच उलट स्त्रियांना उदांत्तता
प्राप्त व्हावी, उच्च दर्जा प्राप्त व्हावा यासाठी ते सदैव प्रयत्नशील
राहिले. या दृष्टिकोनाच्या पृष्टीसाठी मी काही उदाहरणे देऊ इच्छितो.
सर्वसाधारणपणे भारतीय लोकांना प्राचीन
काळापासून मुलींचा जन्म ही एक अत्यंत दु:खद बाब वाटते. बुद्ध या भावनेशी
सहमत होते काय? त्यांचा या प्रश्नाच्याप्रती असलेला दृष्टिकोन, हा परंपरागत
दृष्टिकोनाच्या अगदी विरूद्ध होता. हे राजा प्रसेनजीतला त्यांनी केलेल्या
उपदेशावरून स्पष्ट होते. बुद्ध श्रावस्तीतील जेतवनात असताना एकदा राजा
प्रसेनजीतने बुद्धाची भेट घेतली. राजप्रसादातून एक सेवक आला आणि त्याने
कळविले की त्याची पत्नी राणी मल्लिका हिने एका कन्येला जन्म दिला. ही बातमी
ऐकल्यावर राजाच्या चेहर्यावरिल तेज मावळले. तो दु:खी आणि विषण्ण दिसायला
लागला. त्याच्या चेहर्यात झालेला बदल बुद्धाच्या लक्षात आला आणि त्याला
त्याचे कारण विचारले.त्याची माहिती मिळाल्यावर बुद्ध म्हणाले, ‘दु:ख का
करावे? हे राजपुरुषा, पुत्रापेक्षा कन्या अधिक चांगली अपत्य ठरू शकते. ती
ज्ञानी आणि सदगुणी होऊ शकेल. ज्या पुत्राला ती जन्म देईल त्याच्या हातून
महान कार्ये घडू शकतील. तो मोठमोठय़ा राज्यांवर अधिसत्ता गाजवू शकेल..’
काही कुटुंब उत्कर्षाला पोहचतात आणि इतर
नाश पावतात या प्रश्नांच्या उत्तरात बुद्धाने भिक्खूंना सांगितल्याचे नमूद
आहे की, भिक्खूंनो, जी काही कुटुंब मालमत्तेने मोठेपण मिळवितात ती, ते
मोठेपण दीर्घकाल टिकवू शकत नाही कारण की, ते गमावले ते परत मिळविण्याचा
प्रयत्न करीत नाहीत, जे नुकसान झाले त्याची भरपाई करीत नाही. जे अती खाणे
आणि पिणे यात दंग असतात. जे अनैतिक पुरुष आणि स्त्रिया यांच्यावर विसंबून
राहतात, ती कुटुंबे दीर्घकाल टिकत नाहीत. या सर्वास वरील चारपैकी एक अथवा
इतर कारणे कारणीभूत असतात.
भिक्खूंनो जी काही कुटुंबे दीर्घकाळ
टिकतात. ती सर्व गमावलेले परत मिळविण्याचा प्रयत्न करतात. नुकसान झाल्याची
भरपाई करतात. ती खाणे पिणे मर्यादित ठेवतात आणि सदगुणी स्त्री व पुरुष
यांच्याकडे जबाबदारी सोपवितात. अशी कुटुंबे दीर्घकाळ टिकतात. या सर्व
गोष्टींना या चार कारणांपैकी एक किंवा इतर कारणे कारणीभूत आहेत.
ज्यावेळी एखादा राजा सर्वांगीण
क्रांतिकारक परिवर्तनाचे कार्य करून जगात चक्रवर्ती (सम्राट) होण्याचा
संकल्प करतो अशावेळी काय होते हे बुद्धाने भिक्खूंना असे सांगितल्याचे नमूद
आहे की,
‘असा सम्राट जेव्हा केव्हा होतो त्यावेळी
सात साम्पत्तिक (भांडारे) लक्षणे अस्तित्वात येतात. ही साम्पत्तिक लक्षणे
म्हणजे रथ, हत्ती, अश्व, रत्न, स्त्री, गृहपिता आणि वारस होत.’
दुसर्या एका प्रसंगी, जगाला स्त्रीची महानता विशद करताना बुद्धाने सांगितले,
‘स्त्री ही सर्वोच्च उपयोगी असण्याचे कारण
की (जसा भाष्यकर्ता सुचवितो) ती अपरिहार्य उपयोगाची आहे कारण तिच्यापासूनच
बोधिसत्व आणि सम्राट जन्म घेतात.’
ज्यांच्या दृष्टीने मुलीचा जन्म दु:खद
प्रसंग नसून तो आनंदाचा प्रसंग आहे तसेच जी कुटुंबे स्त्रियांवर अवलंबून
राहतात अशा कुटुंबाचा नाश होण्यापासून बचाव होतो. सात सर्वोच्च मौल्यवान
वस्तूंपैकी स्त्री एक आहे असे ते नि:संकोचपणे प्रतिपादन करतात. त्यांना
स्त्रियांचा द्वेष करणारे आणि तुच्छ लेखणारे म्हणून समजावे काय?
स्त्रियांविषयी असलेल्या सर्वसामान्यांच्या भावना बुद्धाने समजून घेलत्या.
स्त्रियांचा उपहास आणि अनादर करण्याकरिता हे सर्व योजिले होते असे कोणी तरी
म्हणू शकेल काय?
- ३ -
भिक्खूणींना भिक्खूंच्या अधिपत्याखाली
ठेवून बुद्धाने सामाजिक चूक केली असे ज्यांना वाटते. ते बुद्धाने
स्त्रियांना संन्यास किंवा परिव्रज्या (भिक्खूणी) घेण्यास परवानगी
देण्याच्या क्रांतिकारक कार्याची दखल घेत नाहीत. ब्राह्मणी
तत्त्वज्ञानानुसार स्त्रियांना ज्ञानार्जन करण्याचा हक्क आधीच नाकारलेला
होता. जेव्हा भारतीय स्त्रियांनी संन्यास घेण्याचा प्रश्न उपस्थित झाला
तेव्हा त्यांनी (ब्राह्मणांनी) दुसरी चूक केली. इतिहासानुसार जे ब्राह्मण
वेद पूजा करीत होते आणि ज्यांनी उपनिषदांना पूजनीय मानण्यास दीर्घकाळ
नाकारले होते त्यांच्या दृष्टिने ‘संन्यास’ हा आदर्श नव्हता. संन्यास हा
उपनिषदांचा आदर्श होता. आणि संन्यासाची परिणती म्हणजे उपनिषदातील ‘आत्मा
हेच ब्रह्म’ या तत्त्वज्ञानाची अनुभूती करणे होय. संन्याशी जीवनाला
ब्राह्मणांचा प्रखर विरोध होता आणि सरतेशेवटी ते नमले व त्यांनी त्यास काही
अटीवर मान्यता दिली. त्यापैकी स्त्रिया (आणि शुद्र) हे संन्यासाला पात्र
नाहीत अशी एक अट होती.
स्त्रियांच्या प्रति असलेली ब्राह्मणांची
मानसिकता ही बुद्धाच्या अगदी विसंगत होती. यासाठी ब्राह्मणांनी स्त्रियांना
संन्यास घेण्यापासून प्रतिबंध का केला हे महत्त्वाचे कारण समजून घेणे
उपयुक्त ठरेल. मनूने याचे कारण दिले आहे ते असे,
9.18 स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार
नाही. त्यामुळे त्यांचे संस्कार वेदमंत्राविना करावे. स्त्रियांना धर्माचे
ज्ञान नसते. कारण त्यांना वेद शिकण्याचा अधिकार नाही. वेदमंत्राचे उच्चारण
पाप क्षालन करण्याकरिता उपयोगी आहेत. ज्याअर्थी स्त्रिया वेदमंत्र उच्चारू
शकत नाही त्याअर्थी त्या असत्य (पापमय) आहेत.
मनु बुद्धाच्या नंतर झालेला असला तरीही
जुन्या धर्मशास्त्रामध्ये अभिव्यक्त केलेला दृष्टिकोन त्याने प्रोत्साहित
केला. स्त्रियाबद्दलचा हा दृष्टिकोन भारतीय स्त्रियांचा अपमान आणि
त्यांच्यावर अन्याय करणारा आहे. विद्यार्जन करणे हा प्रत्येक मानवाचा
जन्मसिद्ध अधिकार आहे. तो कुठल्याही संयुक्तिक कारणाशिवाय स्त्रियांना
नाकारण्यात आला. हा स्त्रियावर केलेला अन्याय आहे. स्त्रियांना विद्यार्जन
करण्याची आधी संधी नाकारणे आणि नंतर तिला ज्ञान नसल्यामुळे ती अशुद्ध आणि
असत्य (पापमय) असल्याचे जाहीर करणे आणि म्हणून तिला संन्यास, जे ब्रह्माजवळ
जाण्याचे माध्यम होते. त्याची परवानगी न देणे हा तिचा अपमान होय.
ब्राह्मणांनी स्त्रियांना त्यांच्यातील आध्यात्मिक शक्तीची अनुभूति
घेण्याचा हक्कच केवळ नाकारला नाही तर तिच्यात आध्यात्मिक शक्तीचा पूर्णपणे
अभाव आहे असे जाहीर केले.
स्त्रियांशी केलेला हा क्रूर व्यवहार होय.
इतिहासात याला तोड नाही. प्रो. मॅक्समुल्लर यांनी सांगितल्याप्रमाणे
‘दैवीशक्तीपासून मानव कितीही दूर असला तरी या पृथ्वीवर ईश्वरासम
पुरुषाशिवाय कोणीही नाही. या पृथ्वीवर पुरुषाशिवाय ईश्वर सदृश्य कोणीही
नाही.’ हे पुरुषाच्या बाबतीत खरे आहे तर स्त्रीच्या बाबतीत हे खरे का नाही?
ब्राह्मणांजवळ याचे उत्तर नाही.
स्त्रियांना परिव्रजिकेच्या जीवनात प्रवेश
करण्याची मुभा देऊन बुद्धाने एकाच प्रहारात हे दोन्ही अन्याय नाहीसे केले.
त्यांनी त्यांना ज्ञानार्जनाचा हक्क देऊन पुरुषांच्या बरोबरीने आध्यात्मिक
शक्तीची अनुभूती घेण्याचा हक्क प्रदान केला. ही भारतीय स्त्रियांच्या
दृष्टीने क्रांती तसेच त्यांची मुक्ती दोन्हीही होत. प्रो. मॅक्समुल्लरच्या
शब्दात,
‘भारतीय इतिहास आपल्याला असे शिकवतो की,
जुन्या ब्राह्मणी गुलामी नियमांच्या जालीम शृंखला सरतेशेवटी तोडल्या
गेल्या. बौद्ध तत्त्वज्ञानाने, वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क,
मुख्यत्वेकरून सामाजिक विषमतेच्या पाशातून मुक्त होण्याचा हक्क, जसे की
इच्छेप्रमाणे रानात जाऊन संपूर्ण स्वतंत्र आध्यात्मिक जीवन जगण्याचा हक्क
प्रस्थापित केला हे मान्य करण्यास तिळमात्र शंका नाही.’
भिक्खूणी संघाला भिक्खू संघाच्या
अधिपत्याखाली ठेवल्याच्या लांच्छनाच्या तुलनेत बुद्धाने भारतीय स्त्रियांना
दिलेले स्वातंत्र्य हे कितीतरी महत्त्वाचे आणि श्रेष्ठ आहे. हे पोकळ
स्वातंत्र्य नव्हते. या स्वातंत्र्याचे त्यांनी मनापासून स्वागत आणि गुणगान
केले. खरोखरच स्वतंत्र आहे! मी असीमीत स्वतंत्र आहे, असे गुणगान भिक्खूणी
मुत्ता जी ब्राह्मण कन्या होती तिने केले. तसेच गुणगान दुसरी ब्राह्मण
कन्या, भिक्खूणी मेत्तिका हिने ही केले. मी येथे या पाषाणावर बसून मनसोक्त
स्वातंत्र्याचा श्वासोच्छास घेत आहे.
मिसेस र्हिस डेव्हिड्सच्यानुसार,
‘‘त्यांनी (स्त्रियांनी) या
स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याकरिता नंतर झालेल्या ख्रिश्चन भगिनीसारखे आपली
सर्व सामाजिक प्रतिष्ठा, सर्व ऐहिक वैभव आणि पूर्वीच्या जीवनाचा सर्वस्वी
त्याग केला. परंतु याच्या बदल्यात, अनुबंधित जीवनाचे कितीही उदात्तीकरण
झालेले असेल, कितीही उत्तेजन दिलेले असेल किंवा कितीही मोठा आश्रय मिळाला
असेल तरीही त्यांच्या तुलनेत त्यांनी वैयक्तिक प्रतिष्ठा प्राप्त केली
होती. धार्मिक पुरुषाप्रमाणे व स्त्री परिधान करून आणि मुंडन करून ही भगिनी
मुक्त होती, ती भगिनी कुठेही संचार करण्यास मुक्त होती. घनदाट अरण्यात
एकटी जाऊ शकत होती किंवा गिरी शिखरावर चढू शकत होती.’’
बुद्धाने स्त्रियांना भिक्खुणी बनण्याची
परवानगी देऊन त्यांच्याकरिता केवळ स्वातंत्र्याचाच मार्ग मोकळा केला नाही
तर त्यांनी त्यांना लिंगभेद विरहित प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्याचा
स्वतंत्र मताधिकार दिला. मिसेस र्हिस डेव्हिड्स यांच्या शब्दात,
‘तिला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे
बुद्धिप्रामाण्य असलेल्या तिच्या ‘अर्हत’ बंधुंनी तिच्याशी लिंगभेद न करता
तिच्या संन्याशी जीवनाला मान्यता दिली. या स्वातंत्र्यामुळे ती आध्यात्मिक
विश्वाची अनुभूती घेऊ शकली तसेच पिटकांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे ज्यांना
बौद्ध जगतात अत्यंत जागृत म्हणून संबोधण्यात आले अशा त्या निवडक श्रेष्ठ
अरियाबरोबर ती बौद्धिक संवाद करू शकली आणि ती त्यांच्याप्रमाणे सर्व
बाबींना सत्य स्वरुपात पाहण्याची शक्ती प्राप्त करू शकली.
भिक्खुणी सोमा म्हणजे, स्त्रीचे नैसर्गिक जीवन हे आमच्या आणि अरिया यांच्यामध्ये अडसर कसे ठरू शकते?’
‘ते कुणात काय असल्याचे सुचविते.
अंतर्ज्ञान सत्य प्रमाण समजाविते?
यात की एकाला प्रश्न निर्माण व्हावा :
अशावेळी मी स्त्री आहे काय, किंवा
मी पुरुष आहे? किंवा मी काहीच नसेल तर?
अशावेळी ‘मार’ च सांगण्यास समर्थ आहे.’
हेच सर्व काही नव्हे. बुद्धाने
स्त्रियांना भिक्खुणी होण्यास परवानगी देऊन त्यांना पुरुषाबरोबर समानतेचा
मार्ग खुला केला. मिसेस र्हिस डेव्हिड्सच्या निष्कर्षाप्रमाणे,
‘भिक्खुणींना तांत्रिकदृष्टय़ा कायम
स्वरुपात भिक्खूंपेक्षा कनिष्ठ नेमले हे खरे आहे. हेही तितकेच खरे आहे की,
थेरी आपल्या बौद्धिक आणि लौकिक सामर्थ्याच्या बळावर संघातील सर्वोच्च
व्यक्तीच्या बरोबरीचे स्थान प्राप्त करू शकली. Psalms मधील घटनेप्रमाणे
(XXXVII) बुद्धानंतर संघचा उत्तराधिकारी असणार्या कश्यपाच्या बरोबर
‘भद्दा’ हिने आध्यात्मिक पात्रता प्राप्त केली होती. त्यांनी विवाहित,
परित्यक्ता तसेच वारांगणा या सर्व वर्गातील स्त्रियांकरिता त्यांचा मार्ग
खुला ठेवला होता. त्या सर्व पुरुषांबरोबरीची योग्यता, स्वातंत्र्य,
प्रतिष्ठा आणि समता प्राप्त करू शकल्या.
- ४ -
एकेकाळी भारतीय स्त्रियांच्या असलेल्या
दर्जाचे कमालीचे अध:पतन झाले यात मुळीच शंका नाही. प्राचीन काळी राजकीय
घडामोडीत त्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल खूप काही सांगता येत नाही. परंतु
त्यांनी देशाच्या बौद्धिक आणि सामजिक जडणघडणीत अत्युच्च स्थान प्राप्त केले
होते यात मुळीच शंका नाही.
अथर्व वेदानुसार हे स्पष्ट आहे की,
ऐकेकाळी स्त्री ‘उपनयन’ या विधीला पात्र होती. जेणेकरून मुलीचे ब्रह्मचर्य
संपल्यानंतर ती विवाहयोग्य होत असे, असे बोलले जात होते. श्रौत सुत्रानुसार
हे स्पष्ट आहे की, स्त्रिया वेदमंत्रोच्चार करू शकत होत्या आणि त्यांना
वेद शिकविले जात होते. स्त्रिया गुरुकुलात (विद्यापीठात) जाऊन वेदांच्या
विविध शाखांचा अभ्यास करून त्याची मीमांसा करण्यात निष्णात होत्या.
पाणिनीचा ‘अष्टाध्याय’ हा या गोष्टीचा पुरावा आहे. स्त्रिया ह्या शिक्षिका
होत्या आणि त्यांनी विद्यार्थिनींना वेद शिकविले हे पतंजलीच्या
महाभाष्यावरून दृष्टीस येत. स्त्रिया पुरुषांशी धर्म, तत्त्वज्ञान आणि
मानसशास्त्र इत्यादी गहन विषयावर चर्चा करीत होत्या, अशा गोष्टींची वाण
नाही. मनुपूर्व काळात भारतीय स्त्रियांनी ज्ञान आणि विद्वतेच्या जोरावर
अत्युच्च शिखर गाठले होते हे जनक आणि सुलभा, याज्ञवल्क्य आणि गार्गी,
याज्ञवल्क्य आणि मैत्रयी तसेच शंकराचार्य आणि विद्याधरी यांच्यात झालेल्या
जाहीर वादविवादाच्या गोष्टींवरून दिसून येते.
एकेकाळी स्त्रियांचा मोठा आदर केला जात
असे यात दुमत नाही. प्राचीन भारतात राजाच्या राज्यभिषेक प्रसंगी महत्त्वाची
भूमिका पार पाडणार्या रत्नींमध्ये राणीचाही समावेश असे आणि इतरांप्रमाणेच
तो राणीला ही नजराणा देत असे. निवडलेल्या ह्या राजाने केवळ राणीचाच सन्मान
केला नव्हता तर त्याने कनिष्ठ जातीतील इतर पत्नींचा सुद्धा सन्मान केला
होता. तसेच राज्यभिषेकांच्या समारोहानंतर राजा प्रतिष्ठित स्त्रियांना वंदन
करीत असे.
स्त्रियांचा हा जगातील अत्युच्च दर्जा
होय. तर मग त्यांच्या अवनतीकरिता कोण जबाबदार आहे? तो हिंदुंचे कायदे
करणारा ‘मनू’ होता. याशिवाय दुसरे कुठलेही उत्तर नाही. याबाबत शंकेला
कुठलाही वाव राहू न देण्याच्या दृष्टीने मनूने स्त्रियांकरिता तयार केलेले
काही कायदे जे मनुस्मृतीत आढळतात, ते मी उद्धृत करतो.
२.२१३ पुरुषांना आकर्षिक करून भ्रष्ट
करणे, हे स्त्रियांचे वैशिष्ट होय. या कारणामुळे ज्ञानी लोक स्त्रियांच्या
सान्निध्यात कधीच बेसावध नसतात.
२.२१४ स्त्रिया केवळ मुर्खांनाच वाम मार्गाने नेतात असे नसून त्या ज्ञानी पुरुषांनासुद्धा काम आणि क्रोध यांचे गुलाम बनवितात.
२.२१५ वासना ह्या प्रबळ असल्यामुळे त्या
ज्ञानी पुरुषाला सुद्धा गुलाम बनवितात. म्हणून कुणीही आपल्या माता, भगिनी
किंवा कन्या यांच्यासोबत एकांतात राहू नये.
९.१४ स्त्रिया पुरुषांच्या सौंदर्याकडे
लक्ष देत नाहीत किंवा त्यांच्या वयाकडे बघत नाहीत. ‘हा पुरुष आहे’ एवढेच
मनात आणून स्त्रिया त्या पुरुषाच्या स्वाधीन होतात. मग तो सुंदर असो अथवा
कुरुप असो.
९.१५ स्त्रियांना कितीही ताब्यात ठेवले
तरीही, त्यांना पुरुषांबद्दल असलेल्या त्यांच्या वासनेमुळे त्यांच्या चंचल
स्वभावामुळे तसेच त्यांच्यात निसर्गत: असलेल्या निर्दयीपणामुळे त्या
त्यांच्या पतींचा ही विश्वासघात करतात.
९.१६ निर्मात्या ईश्वराने स्त्री
निर्मितीच्यावेळी त्यांची रचनाच अशी केली की, त्यांना ताब्यात ठेवण्याकरिता
प्रत्येक पुरषाने पराकाष्टाचे प्रयत्न करावयास पाहिजेत.
९.१७ मनूने स्त्रियांना कामवासनेची तीक्र इच्छा, शृंगार, अपवित्र वासना, क्रोध, अप्रामाणिकपणा, मत्सर आणि दुर्वर्तन बहाल केले.
मनूच्या दृष्टीने स्त्री किती नीच होती हे यावरून दिसते.
मनूचे स्त्रियांविरूद्ध असलेले कायदे हे त्याच्या ह्या दृष्टिकोनाचा पुरावा होय.
कुठल्याही परिस्थितीत स्त्रिया स्वतंत्र असू नयेत.
मनूच्या मतानुसार
९.२ पुरुषांनी आपल्या कुटुंबातील
स्त्रियांना रात्रंदिवस आपल्यावर अवलंबून ठेवावे. त्याची वैषयिक अभिरूची
निर्माण होत असेल तर त्यांना ताब्यात ठेवावे.
९.३ स्त्री तिच्या लहानपणात पिता, तरुणपणात पती आणि म्हातारपणात पुत्र यांच्या नियंत्रणात असते. ती कधीही स्वतंत्र राहू शकत नाही.
९.५ स्त्रीला विशेषकरून पापमय
प्रवृत्तीपासून परावृत्त केलेच पाहिजे. जर तिला त्यापासून परावृत्त केले
नाही तर क्षुल्लक बाब सुद्धा दोन्ही कुटुंबावर दु:ख ओढविते.
५.१४७ सर्व जातींचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे कमकुवत पतींनी सुद्धा आपल्या पत्नींच्या सुरक्षिततेची पराकाष्ठा करावी.
५.१४८ स्त्रीला तिच्या बालपणी तिच्या
पित्यावर, तरुणपणी तिच्या पतीवर आणि तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिच्या
पुत्रांवर अवलंबून राहायला हवे. ती कधीही स्वतंत्र राहू शकत नाही.
५.१४९ तिने पिता, पती किंवा पुत्र
यांच्यापासून विभक्त होण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्यापासून विभक्त
झाल्यामुळे ती दोन्हीकडील (स्वत:च्या आणि तिच्या पतीच्या) कुटुंबाला
तिरस्करणीय ठरते.
स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार नाही
९.४५ पतीचे पत्नीसोबत असणे बंधनकारक आहे, म्हणजेच एकदा विवाह झाल्यानंतर पत्नी वेगळी होऊ शकत नाही.
मनूने संस्कारित विवाहालाच सन्मानाचे
स्थान दिले आणि म्हणून घटस्फोटाला परवानगी दिली नाही. मनूचा घटस्फोटासंबंधी
असलेला हा कायदा, हाच सर्व काही आहे, असे बहुतांश हिंदू समाजात आणि येथेच
थांबतात. ते त्यांच्या विवेकाचे, ह्या विचाराने समाधान करतात तसेच त्याला
ईश्वरी मानतात. अर्थात, हे सत्यापासून कितीतरी दूर आहे. मनूच्या
घटस्फोटाविरूद्ध असलेल्या कायद्याचा उद्देश अगदी वेगळा होता. येथे पुरुषाला
स्त्रीच्या बंधनात ठेवावयाचे नसून स्त्रीला पुरुषाच्या बंधनात ठेवण्याची
आणि पुरुषाला मात्र स्वतंत्र सोडण्याची प्रक्रिया होती.
पुरुषाने पत्नीला सोडून देण्यावर मनूने
कुठलेही बंधन घातले नाही. खरे म्हणजे त्याने (मनूने) पत्नीचा पूर्णपणे
त्याग करण्याची पुरुषाला मुभा दिली. इतकेच नव्हे तर तो तिला विकण्याची
सुद्धा परवानगी देतो, परंतु तो पत्नीला स्वतंत्र होण्यापासून पूर्णपणे
प्रतिबंधीत करतो. मनू काय म्हणतो ते पहा,
९.४६ पत्नीला विकल्यानंतर किंवा तिचा अस्विकार केल्यानंतर सुद्धा ती पतीच्या बंधनातून मुक्त होत नाही.
याचा अर्थ असा की, पत्नीला पतीने विकले
किंवा तिचा अस्वीकार केला तरीही ती दुसर्याची (ज्याने तिला विकत घेतले
किंवा आश्रय दिला, त्याची) कायदेशीर पत्नी कधीच होऊ शकत नाही. याच्या इतके
क्रूर दुसरे काहीही असू शकत नाही. परंतु मनू कायदे करीत असताना न्याय आणि
अन्याय याची जाणीव ठेवण्याची चिंता करीत नव्हता. मनूला, स्त्रियांना बौद्ध
काळात मिळालेल्या स्वातंत्र्यापासुन तिला वंचित करावयाचे होते. तिला
मिळालेल्या हक्कांमुळे मनू दुरावला होता आणि त्याने त्यावर पूर्णपणे बंदी
घालून मिळालेल्या स्वातंत्र्यापासून तिला वंचित केले.
संपत्तीच्या बाबतीत मनूने पत्नीला गुलामाच्या स्तरावर आणले
९.४१६ पत्नी, पुत्र आणि गुलाम या
तिघांनाही कुठलीही संपत्ती संपादन करण्याचा हक्क नाही. त्यांनी मिळविलेली
संपत्ती ही ते ज्यांच्या मालकीचे आहेत त्यांची असते.
पती जर संयुक्त कुटुंबातील असेल तर मनू
पत्नी विधवा झाल्यावर तिच्या प्रतिपाळाची परवानगी देतो आणि जर पती
कुटुंबापासून विभक्त असेल तर त्यांच्या मालमत्तेच तिला गृहीत धरतो. परंतु
संपत्तीवरील तिच्या वर्चस्वाला मनू कधीही मान्यता देत नाही.
मनूच्या कायद्याप्रमाणे स्त्री देहदंडास पात्र आहे. तसेच मनू पत्नीला मारण्याचा अधिकार पतीला देतो.
८.२९९ पत्नी, पुत्र, गुलाम, विद्यार्थी
आणि सख्खा धाकटा बंधू, यांनी जर काही चूक केली असेल तर त्यांना दोरखंड
किंवा फोडलेल्या बांबूने मारता येते.
मनूनुसार स्त्रीला ज्ञानार्जन करण्याचा अधिकार नाही
मनूने वेद शिकण्याच्या तिच्या अधिकारावर पूर्णपणे बंदी आणली.
२.६६ स्त्रियांकरिता सुद्धा संस्कार करून घेणे आवश्यक आहे आणि ते करावे परंतु ते वेदमंत्राविना करावे.
ब्राह्मणी तत्त्वज्ञानाप्रमाणे यज्ञ करणे
हा धर्माचा मूळ आत्मा होय. मनू स्त्रियांना यज्ञ करण्यापासून प्रतिबंधित
करतो. तो असा कायदा करतो की :
९.३६.३७ वेदांनी निर्धारित केल्याप्रमाणे
स्त्रियांनी दैनंदिन यज्ञयागादी करू नयेत. तिने तसे केल्यास ती पापयोनीत
जाते. स्त्रिला अशाप्रकारचे यज्ञयागादी करता येऊ नये म्हणून मनूने तिला
ब्राह्मणांची मदत आणि त्यांचा उपयोग घेण्यास प्रतिबंधीत केले.
४.२०५.२०६ स्त्रीने यज्ञ केल्यानंतर तिने
दिलेले अन्न ब्राह्मणांनी ग्रहण करू नये. स्त्रियांनी केलेले यज्ञ हे अमंगल
असून ते देवाला मान्य नाही म्हणून ते टाळावे. शेवटी मनूने स्त्री पुढे
जीवनाचा आदर्श जसा मांडला तो त्याच्याच शब्दात सांगणे योग्य आहे.
५.१५१ पित्याने अथवा पित्याच्या संमतीने
तिच्या बंधूने तिला ज्या पुरुषाला दान केले असेल, तिने तो जिवंत असेपर्यंत
त्याच्या आज्ञेत राहावे आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतीचा सुद्धा
अपमान करू नये.
५.१५४ प्रामाणिक पत्नीने तिचा पती कितीही दुर्गुणी, व्यभिचारी किंवा सद्गुणविरहीत असला तरीही त्याची ईश्वर समजून सतत पूजा करावी.
५.१५५ स्त्रियांनी आपल्या पतीशिवाय यज्ञ,
नवस, उपवास करू नये ती पतीच्या आज्ञेत राहिली, केवळ ह्या कारणामुळे ती
स्वर्ग लोकांमध्ये गौरवास पात्र ठरते.
यानंतर मनूने स्त्रियांकरिता निर्धारित केलेले मूलभूत निवडक कायदे देत आहे,
५.१५३ जो पुरुष तिच्याशी पवित्र
मंत्रोच्चाराने विवाहबद्ध झाला तो तिच्याकरिता अनुकूल तसेच प्रतिकुल काळात
या जन्मी तसेच पुढच्या जन्मी सतत सुखाचा जनक ठरतो.
५.१५० तिने नेहमी आनंदी राहावे. घरगुती
कामकाजात आणि व्यवस्थापनात कुशल असावे, काळजीपूर्वक भांडी स्वच्छ करावी आणि
खर्चात काटकसरी असावे. हिंदू याला स्त्रियांकरिता असलेला उदात्त असा आदर्श
मानतात.
‘स्त्री हत्या’ हे केवळ उपपातक म्हणजेच
क्षुल्लक गुन्हा आहे, असा मनूने नवीन नियम करून त्याने स्त्रियांच्या
निर्बलीकरणाच्या इमारतीवर कळस चढविला.
११.६७ स्त्रिया, शुद्र, वैश्य, क्षत्रिय आणि निरिश्वरवादी इत्यादींचा शिरच्छेद तसेच मद्यपान हे सर्व क्षुल्लक गुन्हे होत.
शुद्र, वैश्य आणि क्षत्रिय यांच्या हत्या,
हे केवळ उपपातक होते, असे मनूने का म्हटले हे कोणीही सहज समजू शकतो.
ब्राह्मण या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे आणि केवळ ब्राह्मणांचीच हत्या हे
महापातक होते हे प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न होता. परंतु त्याने तसाच
नियम स्त्रियांकरिता का वापरला? याचे एकमेव कारण असे की, मनूच्या दृष्टीने
’स्त्री’ ही कुठलीही किंमत नसलेली वस्तू होती.
वरील उदाहरणांच्या वैशिष्टय़ांवरून मनू हा
भारतीय स्त्रियांच्या अवनतीस कारणीभूत होता याबद्दल कोणीतरी शंका घेऊ शकेल
काय? बर्याच लोकांना ह्या बाबींची बहुतेक जाणीव आहे. परंतु त्यांना दोन
बाबी माहीत नसल्याचे जाणवते. त्यांना यामध्ये विशेष असे काय आहे माहीत
नाही. मनूच्या स्त्रियांविषयी कायद्यामध्ये नवीन अथवा आश्चर्यकारक असे
काहीही नाही. भारतात ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा जेव्हापासून उदय झाला
तेव्हापासून ब्राह्मणांचा असाच दृष्टीकोन आहे. मनूच्या आधी ते केवळ सामाजिक
सिद्धांत होते. या सामाजिक सिद्धांताला राज्याच्या कायद्यामध्ये रुपांतरित
करण्याचे काम मनूने केले. मनूने स्त्रियांवर हे निर्बलीकरणाचे कायदे का
लादले हे त्यांना माहीत नसणे, ही दुसरी बाब आहे. आर्य समाजात शूद्र आणि
स्त्रिया हे महत्त्वाचे दोन घटक होते. ब्राह्मणी धर्माच्या मूलगामी
तत्त्वांना सुरुंग लावून ते समुहा-समुहाने बुद्धांच्या धम्मात प्रवेश
करण्याकरिता जात होते. बौद्ध धम्माकडे जाणार्या स्त्रियांच्या ह्या लाटेला
मनूला थोपवायचे होते.
मनूने स्त्रियांवर निर्बलीकरणाचे कायदे
लादून त्यांना कायमचे पंगू केले. याबद्दल ज्यांना शंका आहे त्यांनी
मनूस्मृतीतील खालील आदेशांचा विचार करावा.
५.८८ मिश्र विवाहापासून, संन्याश्यापासून
तसेच आत्महत्या केलेल्या व्यक्तीपासून जन्मलेल्यांचे ‘मृत्यू आणि
त्यानंतरचे संस्कार’ सामान्य व्यक्तीच्या मृत्यू आणि अंत्यसंस्काराप्रमाणे
करण्यास मनाई केली आहे.
५.८९ ज्या स्त्रियांनी निरिश्वरवादी
संप्रदायात प्रवेश घेतला, ज्या स्वच्छंदी वागतात, गर्भात असणार्या
अर्भकाला तसेच स्वत:च्या पतीला ज्या इजा पोहचवितात, तसेच ज्या मद्यपान
करतात अशांनी ही वरील संस्कार नाकारले.
हे आदेश इतर उद्देशाशिवाय जे (१) संन्याशी वृत्तीचे आहेत आणि (२)
ज्या स्त्रियांनी निरिश्वरवादी संप्रदायात प्रवेश घेतला अशांना दृष्टीत
ठेवून जाणीवपूर्वक करण्यात आलेले आहेत. या आदेशामधील संन्याशी हे
परिव्राजकाला, म्हणजेच ज्यांनी आपले घरदार पूर्णपणे सोडून संन्यास घेतला
आहे अशांना संबोधून आहे. मनूने निरिश्वरवादी संप्रदायाचा उल्लेख करताना
त्यांच्या मनात बौद्ध धर्म होता यात कुठलीही शंका नाही. यावरून हे स्पष्ट
होते की, संन्याशी किंवा ज्या स्त्रीने निरिश्वरवादी संप्रदायात प्रवेश
घेतला असेल त्यांचे कुठलेही अंत्य व उत्तर संस्कार करण्यात येणार नाहीत,
इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता तो पुरुष अथवा स्त्री,
तसेच ज्याने बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे अशांचेही अंत्य आणि उत्तर
संस्कार करण्याची मनाई केलेली आहे.
दुसर्या शब्दात त्यांचा जणू त्या
कुटुंबाशी संबंधच नसून आणि ते त्या कुटुंबाचे घटकच नाहीत अशी मनूला
त्यांच्याशी वागणूक ठेवायची होती. मनू हा बौद्ध धम्माचा कट्टर विरोधक होता.
स्त्रियांवर लादल्या अनेक अन्यायाचे हे मर्म आहे. त्याला हे माहीत होते की
जर आपले घर बौद्ध तत्त्वज्ञानाच्या आक्रमणापासून सुरक्षित ठेवायचे असेल तर
ती केवळ स्त्री आहे जिला बंधनात ठेवणे अत्यावश्यक आहे आणि ते त्याने केले.
भारतीय स्त्रियांच्या अवनतीला आणि र्हासाला कारणीभूत दोष बुद्धावर नसून
तो संपूर्णपणे मनूवर येतो.
या काही पृष्ठात मी हिंदू स्त्रियांचे
उत्थान आणि पतन याची हकीगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या अवनतीचा
जनक कोण आहे आणि त्याने हे सर्व का केले याचे सुद्धा स्पष्टीकरण देण्याचा
केला आहे. पूर्वग्रहदूषित नसलेले तसेच नि:पक्ष लोक जाणतील की या सर्व
शोकांतिकेला बुद्धाला जबाबदार धरता येणार नाही, अशी मी अपेक्षा करतो. बुद्ध
झटले, ते स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांचा
दर्जा पुरुषांच्या बरोबरीने आणण्यासाठीच!!
No comments:
Post a Comment