मातेर बाया!
आपल्या देशात कष्टकरी बायाचं काय जीवन
आहे, हे मी बाजार समितीच्या मातेर बायांना पाहून जाणलं. स्त्री म्हणून आज
बायांची तेही अत्यंत हलकं समजल्या जाणार्या कष्टकरी जीवन जगणार्या
बायांना आज समाज कसा वागवतो हे चित्र विदारक आहे. त्याचं असं झालं
वर्ध्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीतील ५० बायांना ‘मातेर बायांना’
(त्यांना तसेच म्हणतात किती भयानक शब्द आहे हा.) कामावरून काढून टाकण्यात
आले, असा फोन १७ एप्रिल २०१० ला दुपारी डॉ. हरिश धुरट, नागपूर यांना आला.
ते गेल्या ३० वर्षांपासून असंघटितांसाठी काम करीत आहेत. त्यांनी मला बाजार
समितीच्या संचालकांची करामत सांगितली आणि मी ताबडतोब धाव घेतली आणि
वस्तुस्थिती पाहिली तर असं दिसून आले की गेल्या १२ ते १५ वर्षांपासून कृषि
उत्पन्न बाजार समितीमध्ये पैसा व मातेरे वेचणार्या या बायांना शासनाने
माथाडी कामगार कायदा लागू केला तेव्हा त्यांना लेव्हीचे पैसे द्यावे असा
शासनाकडून आदेश आला म्हणून त्यांचा ७०० रुपये मेहनाताना लेव्हीमुळे तो ३००
रु. वाढवून म्हणजे १००० रुपये झाला. तेव्हा या ५० बायांना हा पैसा देणे
त्यांच्या जीवावर आले आणि त्यांनी बायांवर या चोरी करतात हा आरोप लावून
त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले व त्या बेरोजगार झाल्या.
यापेक्षा जास्त म्हणजे त्यांना पोलीस आणून बाहेर हाकलण्यात आले आणि त्यांना
अत्यंत लाजिरवाणी अशी वागणूक देण्यात आली. मी याबद्दल पत्रकारांना बोलावले
जेणेकरून या गरीब, निराधार असंघटीत बायांची बाजू त्यांनी लोकांसमोर
मांडावी असे वाटले पण पत्रकार मात्र व्यवस्थेच्या बाजूने गेले आणि बायांवर
चोरीचा आरोप देऊन, त्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची बाजू घेऊन
नामानिराळे झाले.
डॉ. हरिश धुरट, बाया व आम्ही
कार्यकर्त्यांनी असं ठरवले की रोज इथे येऊन बसायचे व बैठा सत्याग्रह
करायचा. मग त्यानुसार दररोज स्त्रिया यायला लागल्या. तर दोन दिवसांनी मग या
लोकांनी त्या बायांना पोलीस स्त्रियांकडून खूप धक्काबुक्की करून बाहेर
घालवलं. जिथे खूप ऊन आहे जिथे अजिबात सावली नाही, तिथे त्यांना फाटका बाहेर
बसायला लावले. जिथे झाड आहे, सावली आहे तिथे बायांना बसू दिले नाही.
अक्षरश: तिथून घालवून दिले आणि त्यांना एवढी मानवता राहिली नाही की भर
दुपारच्या ऊन्हात त्या बायांना ज्या पद्धतीने तिथे वागवलं जाते ते केवळ
तेव्हा अंगावर शहारे येत होते.
आता आम्ही बायांना कामाच्या ठिकाणी लैगिंक
अत्याचार केला तर त्यांच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे, तसे कायदे आहेत
हे सांगितले जाते पण त्या बायांकडून या देशातले कायदे, विचार सारेच दूर
आहे. मी भाषण देताना त्यांना गाडगेबाबा माहित आहेत का असे विचारले तर,
त्यांना कोण गाडगेबाबा? असा प्रश्न पडला. त्यांना काहीच माहित नव्हते.
त्यांना फक्त सर्व लोकांकडून शिव्या त्याही अत्यंत गलिच्छ लैगिंक शिव्या
त्याच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांकडून, पुरुषांकडून अत्यंत निर्लज्जपणाने
सर्रास वापरल्या जातात. त्यांच्या कोणी कधी आईच्या पेक्षा मोठय़ा आहेत,
वयांनी मोठय़ा आहेत म्हणून आदर केला पाहिजे असं कोणालाच वाटत नाही. एका
बाईंनी जी ६५ वर्षांची होती तिला २६, २७ वर्षांचा क्लार्क अत्यंत अनादाराने
तिच्या शरीराला लैगिंकतेला धरून शिवी देऊन बसला आणि ती बिचारी गप्प
राहिली. हा अनुभव भयानक होता. त्या बाईने स्वत: का असे बोलणे सहन करावे? १
रुपये पोतं मजुरी मिळते व पसाभर मातेर मिळते त्या अत्यंत गरीब बायांनी ह्या
चिटभर मजुरीसाठी हे सहन करावं लागते हे केवढी भयंकर बाब आहे.
या मातेरे बायांच्या जगात केवळ लैगिंक
शोषणाचे राज्य आहे. एक म्हातारीबाई (६५ वर्षांवरील) मला अनुभव सांगत होती.
बाई माझा नवरा चौकीदारी करीत होता. आता घरीच आहे. तो मला म्हणाला, मी परत
काम मागायला जातो. पण त्याचे डोळं गेलं आहेत मी त्याला म्हटलं, ही रांड आहे
ना’ तुम्ही घरात बसा चूपचाप. आणि बाई माझा नवरा माझं ऐकून घरीच राहतो. एक
अपंग पोरगी आहे. घरात मीच एकटी कमावती आहे. आणि त्यात कामावरून काढलं.! मला
त्या बाईचं खूप आश्चर्य वाटलं. तिची एवढी दयनिय स्थिती आणि ती स्वत:ला
‘रांड’ म्हणते. मी तिला म्हटले, बाई लोकांनी म्हटले तर वाईट आहे, असे आपण
स्वत:लाच असं म्हणायचं हे काय चांगल आहे? यावर ती कसनुसं तोंड करून
म्हणाली, नाईबाई, चुकलचं माझं.
म्हणजे ह्या समाजात असं झालं की ह्यांना
सारं जग खराब, घाणेरडय़ा पद्धतीने वागवते तर त्याही स्वत:लाच हे समजायला
लागल्या असं दिसून येत असं मला वाटते. जगाने बाईला खालचं ठरवलं आणि आपणही
स्वत:ला तेच समजावं, तेही वाईट ही केवढी भयंकर अशी बाब आहे, गुलाब बनवलं
आणि आम्ही गुलामी मान्य करतो आहे.