Pages

Friday, September 28, 2012

नासापर्यंत पोहोचलेली स्वीटी

गणेश सुरसे | Sep 21, 2012, 22:27PM IST
 आर्टिकल Print Comment

भारताला महाशक्ती बनविण्याच्या मिशन-2020मध्ये आपलंही काही योगदान असावं, अशा विचाराने भारावलेल्या स्वीटी पाटेने जळगावचा झेंडा थेट नासात रोवला आहे. मूळची चाळीसगाव येथील स्वीटी लहानपणापासूनच गणित आणि विज्ञान या विषयांत अत्यंत तल्लख होती. तिच्या याच गुणामुळे परिवाराने तिला विज्ञान क्षेत्रात प्रगती करण्यासाठी कोटा येथे पाठविले.
बारावीपर्यंतचे शिक्षण कोटा येथे पूर्ण केल्यानंतर तिने चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठात प्रवेश घेण्याचे निश्चित केले.

 प्रवेशासाठी झालेली प्रवेश परीक्षा ती विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाली. स्वीटीने ठरवलेल्या मार्गावर जाण्यास तिला हिरवा कंदील मिळाला. एसआरएम विद्यापीठात तिने रोबोट, रिमोट कंट्रोल ग्लायडर तयार केले. महाविद्यालयीन तसेच विद्यापीठस्तरीय अनेक स्पर्धेत तिने स्वत:ला सिद्ध केले. विद्यापीठाला अनेक पारितोषिके मिळवून दिली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या कार्यशाळेत तिने बनविलेल्या ‘बल्सा ग्लायडर’ला पुरस्कार मिळाला. या वेळी इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन् आणि माजी राष्‍ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले होते. यानंतर स्वीटीने आता अजून काही जास्त करण्याची भूमिका घेतली आणि ती कल्पना चावला यांच्या कर्नाल या गावी हरियाणा एव्हिएशन क्लबमध्ये रुजू झाली. याठिकाणी तिने विमानाचे इंजिन आणि सुटे भाग यांचा सविस्तर अभ्यास केला. याचा तिला खूपच फायदा झाला. याच काळात एसआरएम विद्यापीठात एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग या विषयावर प्रकल्प सुरू करण्यात आला. हा प्रकल्प नासाच्या ‘ग्रीन एव्हिएशन 2011’च्या स्पर्धेत मांडण्यात आला. यासाठी स्वीटीची निवड झाली होती. मात्र, तिचे वय कमी असल्यामुळे तिला त्यावर्षी संधी नाकारण्यात आली. सुमारे एक वर्षानंतर हा प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर असताना स्वीटीला या प्रकल्पात काम करण्याची संधी देण्यात आली. यानंतर स्वीटी आणि तिच्या सहकाºयांनी या प्रकल्पात अहोरात्र अभ्यास करून ध्वनिप्रदूषण आणि किमान इंधनात उडू शकणारे डॉल्फिन आकाराच्या विमानाचे मॉडेल तयार केले. कमीत-कमी धावपट्टीची गरज भासेल असे हे मॉडेल होते. या संशोधनामुळे लवकरच अ‍ॅस्ट्रॉनॉटच नव्हे तर सर्वसामान्य माणसाला सुरक्षित अंतराळ सफरीचा आनंद घेता येणार आहे. 50 प्रवासी क्षमता असलेले हे स्पेस ‘अर्थ टू ऑरबीट’ पॅसेंजर व्हेइकल आहे. जगभरातील 152 विद्यापीठांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत स्वीटी पाटेला तृतीय क्रमांक मिळाला आणि नासाने त्यांच्या आगामी आंतरराष्‍ट्रीय संशोधन परिषदेत ‘रिसर्च प्रेझेंटेशन’साठी आमंत्रण दिले. अवघ्या 20 वर्षीय स्वीटीने अमेरिकेत भरारी घेऊन भारताच्या सन्मानात मानाचा तुरा रोवला. नासातर्फे झालेल्या या परिषदेत जगभरातून आलेल्या संशोधकांसमोर या चिमुरडीने केलेले प्रेझेंटेशन विशेष आकर्षण ठरले. सर्वच संशोधकांनी स्वीटीचे कौतुक केले. नासातील वरिष्ठ वैज्ञानिक फे. कोलीअर यांनी तिचा विशेष सन्मान केला.  एवढ्यावरच ती थांबली नाही तर भविष्यात यापेक्षाही काही उत्तम संशोधन करण्यासाठी तिचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. सध्या एका मानवरहित विमानाचे डिझाइनही तिने तयार केले आहे. हे डिझाइन पुढील मान्यतेसाठी नासाकडे पाठविण्यात आले आहे. लवकरच यातही यश मिळेल अशी अपेक्षा आणि विश्वास स्वीटीला आहे. सर्व तरुणांना प्रेरणादायी ठरेल असे काम स्वीटीने केले आहे.
‘नवक्षितिजवाहक’ची निर्मिती
अमेरिकेच्या एरॉनॉटिक्स व अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स फाउंडेशन (एआयएए) या जागतिक अंतराळ व्यवसायासाठी समर्पित असलेल्या संस्थेने आयोजित केलेल्या व्यावसायिक स्पेस ट्रान्सपोटेशन डिझाइन कॉम्पिटिशनमध्ये स्वीटी पाटेने आपल्या चेन्नईच्या एसआरएम विद्यापीठात तयार केलेल्या ‘नवक्षितिजवाहक’ स्पेश शटल डिझाइनला जगात तिसरा क्रमांक मिळाला. आता हे संशोधन स्पेस 2012 कॉन्फरन्स अँड एक्सपोझिशन या स्पेस कॉन्फरन्समध्ये सादर करण्यात येणार आहे. 50 प्रवासी क्षमता असलेले हे स्पेस अर्थ टू ऑरबिट व्हेइकल आहे. अवकाश संशोधनासाठी याचा उपयोग होणार आहे. तसेच स्वीटीने फ्रान्स येथे झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ मॅकेनिकल अँड एरोस्पेस इंजिनिअरिंग येथे अ‍ॅडव्हान्स एअरक्राफ्ट इंजिन डिझाइन अँड अ‍ॅडव्हान्स स्पेस व्हेइकल लॉँचिंग मेकॅनिझम या दोन संशोधन प्रबंधांना प्रेझेंट केले आहे. मानवरहित कार्गो विमानाचे डिझाइन तयार करून मान्यतेसाठी तिने नासाकडे पाठविले आहे.
साभार;http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-sweety-pate-made-india-proud-3819385-NOR.html

No comments: