पर्यावरण संरक्षण जागृती करणारी ‘वृक्षमाता’
वंगारी मथाई यांची 25 सप्टेंबर 2012 ही पहिली पुण्यतिथी आहे. कोण या वंगारी मथाई? त्यांचे कार्य काय? असे प्रश्न पडले असतीलच. वंगारी मथाई या काही साध्यासुध्या व्यक्ती नव्हत्या, तर नोबेल पारितोषिक विजेत्या पहिल्या आफ्रिकन स्त्री होत्या. त्या एक केनियन पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्त्या होत्या. पर्यावरण, महिलांचे अधिकार आणि स्वच्छ प्रशासन यावर त्यांचा भर होता. मथाई यांनी सामाजिक चळवळीबरोबरच पर्यावरण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
पर्यावरण, वृक्ष याबाबत ठामपणे भूमिका मांडणा-या या वंगारी मथाई यांचा जन्म केनियातील नैरी येथे 1940 मध्ये झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण येथील स्थानिक शाळेमध्येच झाले. स्लोलास्टिका येथील महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झाले. त्यानंतर पिट्सबर्ग विद्यापीठामध्येही त्यांनी काही धडे घेतले. मात्र पुन्हा त्या केनियाच्या नैरोबी विद्यापीठात संशोधन सहायक म्हणून आल्या. बायोलॉजी सायन्समध्ये पीएच. डी. करणा-या त्या आफ्रिकेतल्या पहिल्याच महिला होत्या.
1970 च्या दशकात हरितपट्टा (ग्रीन बेल्ट) आंदोलनाची मुळे रोवून त्यांनी पर्यावरण संरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले. कधीकाळी घरामागील हिरवागार दिसणारा डोंगर आता व्यापारी हेतूने झालेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या जंगलतोडीमुळे ओसाड पडला आहे. जमिनीची धूप, पाण्याचे प्रदूषण झाले आहे. स्थानिक लोकांना या प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जंगलापासून मिळणारे उत्पन्न आता थांबले, तसेच महिलांना जळणाच्या लाकडासाठी वणवण फिरावे लागत आहे. या समस्या त्यांच्या डोळ्यासमोर फिरत होत्या. त्या प्रचंड अस्वस्थ झाल्या. या प्रश्नाबाबत काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. त्यांनी या विषयावर सखोल अभ्यास केला आणि वृक्षतोडीवर वृक्ष लागवड हेच एक उत्तर त्यांच्यापुढे आले .
तीन वर्षांतच त्यांनी तीन कोटींच्या वर झाडे लावली. त्यांनी गरीब महिलांमध्ये प्रबोधन घडवून आणून त्यांच्याकडून हे कार्य करवून घेतले होते. महिला आपल्या मुलांच्या भविष्याबाबतीत जबाबदार असतात. त्यांना उपासमारीपासून वाचवण्यासाठी त्यांनी रिकामे बसायला नको, असे त्या कायम म्हणत. त्यांनी आपल्या कामात आधी गरीब महिलांना सामील करून घेतले. इथल्या कमी शिकलेल्या गरीब जनतेत आपण कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय अथवा भांडवलाशिवाय पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे काम करू शकतो, हा विश्वास निर्माण केला. पुढच्या पिढीसाठी एक भरगच्च सावली आणि पोटापाण्यासाठी अन्नाची सोय लावण्यासाठी जनतेला प्रवृत्त केले. त्यामुळे ही चळवळ लोकचळवळ झाली. त्यांनी पर्यावरण, महिलांचा विकास या क्रमाने लोकांच्या जीवनात सुधारणा आणून आफ्रिकेत गुणवत्तायुक्त समाज तयार करण्यासाठी आफ्रिकन क्षेत्राला प्रोत्साहित केले.
ग्लोबल वर्ॉमिंगसारख्या विषयावर फक्त उच्चभ्रू वर्गाचीचअसलेली मक्तेदारी खोडून काढून सामान्य माणसांना पर्यावरणवादी चळवळीत सक्रिय करण्याचे महान कार्य त्यांनी पार पाडले. ‘झाड लावा झाड जगवा’ हा संदेश देऊन आपण पर्यावरण संरक्षक कसे बनू शकतो, हे त्यांनी इथल्या जनतेला शिकवले. जनतेने वंगारी मथाई यांना ‘मामामीटी’ अर्थात वृक्षमाता ही पदवी दिली. जनतेने दिलेली ही पदवी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाची ठरली. केनियातील उजाड माळरानावर झाड वाढवणा-या वंगारी मथाई यांना 2004 चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या पर्यावरणाचा विकास आणि शांतता या कार्याबद्दल देण्यात आला. 2005 मध्ये त्यांना जवाहरलाल नेहरू पुरस्काराने सन्मानित केले गेले.
सामाजिक चळवळीसोबत त्यांचा राजकारणात सहभाग होता. 1991 मध्ये केनिया सरकारला नैरोबी जंगल तोडणीला विरोध करताना त्यांना वारंवार जेलमध्ये जावे लागले. तर 1999 ला त्यांना जंगलतोड विरोधातील आंदोलनात डोक्याला मार सहन करावा लागला. महिला एकजुटीने उभ्या राहिल्या तर त्या भीतिमुक्त जीवन जगू शकतात, या विश्वासावरच आफ्रिकन महिला एकत्र आल्या आणि आपण करत असलेले कार्य अति महत्त्वाचे आहे आणि हे होणे जरुरी आहे, असा विश्वास त्यांनी महिलांमध्ये निर्माण केला. आफ्रिकन जनतेला हाताशी धरून त्यांचा लढा चालू होता. 2002 मध्ये त्या संसद सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्यांना सहायक पर्यावरण मंत्रिपद देण्यात आले होते. 2003 ते 2007 या कालावधीमध्ये त्या या पदावर होत्या. आपल्या कार्यक्षेत्रातील अनेक टप्पे गाठत त्या पर्यावरणमंत्री झाल्या. पण पर्यावरणमंत्री झाल्या म्हणून काही त्यांची वाट सुकर झाली असे नाही.
पर्यावरण हा मुद्दा विकासाच्या विरोधी आहे. त्यामुळे पर्यावरणवादी म्हणजे विकासाला विरोध करणारे असे मानून आजवर अनेकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. मथाईदेखील त्यातून सुटल्या नाहीत. मात्र प्रसंगी विरोध सहन करून आपल्या भूमिकेवर त्या ठाम राहिल्या. केनियाच्या बाहेर आफ्रिकेतील कांगो बेसिन जंगल वाचवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. 2007 मध्ये ब्रिटिश आणि नॉर्वे सरकारने कांगो जंगलांच्या रक्षणासाठी मदत करण्यासाठी त्यांना कांगो फंडचे अध्यक्ष होण्याचे आमंत्रण दिले. शांततेसाठी दिल्या जाणा-या पुरस्काराचे स्वरूप एक कोटी स्वीडिश क्रोनर म्हणजे साधारणपणे 10 लाख 30 हजार अमेरिकन डॉलर असते. असे अनेकांना कळल्यावर त्या एवढ्या पैशाचे काय करणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. मात्र मथार्इंना या पैशाचे काय करायचे हे माहीत होते. त्या म्हणाल्या, पहिल्यांदा या रकमेचे व्यवस्थापन करणार. त्यातील रक्कम पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रकल्पावर खर्च केली जाईल. मात्र सर्वात अगोदर या रकमेतून मक्याची पोती खरेदी केली जातील. कारण भुकेल्या पोटी या कार्यात साथ देणा-या जनतेची ती आज गरज आहे, असे त्यांचे मत होते.
वंगारी मथाई एक अतिशय हुशार, दूरदर्शी विचार करणा-या, गरिबांसाठी लढणा-या, निम्न स्तरातील लोकांना एकत्र करून आपले कार्य शांततेत पार पडणा-यांपैकी होत्या. एक टिकाऊ भविष्याची देण त्यांनी केनियन जनतेला दिली आहे. मथाई मानव अधिकार आणि महिला सशक्तीकरण यासाठी जागतिक स्तरावर सन्मानित अशी व्यक्ती होत्या. त्या मानव अधिकार, गरिबी, पर्यावरण संरक्षण आणि सुरक्षा व्यवस्था यामधला एक दुवा होत्या. जगभरातील युवा पिढीसाठी त्या एक आदर्श बनल्या आहेत. त्यांच्या निधनामुळे केनिया, ग्रीन बेल्ट आंदोलनासह त्यांचा विस्तारलेला परिवार पोरका झाला आहे.
-अनघा हिरे
साभार: http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-wangari-maathai-green-belt-movement-3832319-NOR.html
No comments:
Post a Comment