मोलकरीण भगिनी होणार स्वावलंबी
नागपूर। दि. ९ (प्रतिनिधी)
आधुनिक समाजात सामाजिक सुधारणांचे मोठमोठे दावे केले जातात. त्यावर
वातानुकूलित चेंबरमध्ये चर्चासत्रे होतात. पांढरपेशे लोक त्यावर सकारात्मक
बदलांकरिता जोर टाकतात. मात्र प्रत्यक्षात दिव्याखालीच अनेकदा अंधार दिसून
येतो. याच लोकांच्या घरचे चित्र पाहिले तर यांच्याकडे घरकाम करणार्या
महिलांना (सामान्यांच्या भाषेत मोलकरीण) अक्षरश: गुलामाप्रमाणे वागविले
जाते, असे चित्र दिसून येते. मग कुठून घडणार सामाजिक क्रांती आणि कधी
मिळणार वंचितांना त्यांचे हक्क.. सुशिक्षितांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा
प्रश्न कोण्या विचारवंताने नव्हे तर घरकाम करणार्या भगिनींनी विचारला
आहे.लोकांच्या घरी घरकाम करणार्या भगिनींना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांना समाजात सन्मान मिळावा, याकरिता विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता त्यांनी राज्य व केंद्र सरकारकडेदेखील वारंवार आपले म्हणणे मांडले. केंद्र सरकारने यासंदर्भात किमान वेतन कायद्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच घरकाम करणार्या महिलांना कामगार कायद्याचे संरक्षण मिळेल, यासाठीदेखील पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी यांच्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली होती. याच कायद्यातील तरतुदींबाबत या भगिनींचे नेमके मत काय, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेण्याचा ह्यलोकमतने प्रयत्न केला.
याकरिता मोलकरीण संघटनेच्या सदस्यांना चर्चेकरिता लोकमत भवनात आमंत्रित करण्यात आले होते. रूपाताई कुळकर्णी यांच्यासोबत या महिलांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.
नागपुरातील मोलकरणींची स्थिती:
आजच्या तारखेला नागपुरात ८0 हजाराहून जास्त घरकाम करणार्या महिला आहेत. यातील बहुतांश महिला या केवळ एकाच घरी सर्व काम न करता निरनिराळ्या घरी काम करतात. असंघटित खासगी क्षेत्रात काम करताना त्यांना कामगार मानल्या जात नाही. रूपाताई कुळकर्णी यांनी विदर्भ मोलकरीण संघटनेची स्थापना करून, या महिलांना एकत्र आणले व त्यांना लढण्याची प्रेरणा दिली. गेल्या ३२ वर्षांंपासून त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला जात आहे.
अपराध माझा काय जाहला..
गुलामासारखी वागणूक
आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसर्यांच्या घरी घरकाम करणार्या महिलांना अनेक ठिकाणी अक्षरश: गुलाम असल्यासारखी वागणूक देण्यात येते. कुठल्या तरी संकटामुळेच त्या नाईलाजाने दुसर्यांकडे काम करतात . यावेळी त्यादेखील माणूस असून, त्यांना इतरांसारखा सन्मान आहे, या गोष्टींचा घरमालकांना अनेकदा विसर पडतो. आमच्याकडून काही चूक झाली किंवा त्यांनी सुटी मागितली वा पगारवाढ मागितली तर अक्षरश: शिव्यांची लाखोळी वाहण्यात येते; मात्र हे बोलणेदेखील नाईलाजाने ऐकावे लागते, अशी खंत या भगिनींनी व्यक्त केली. अनेक घरांमध्ये समोरच्या दाराने प्रवेशदेखील नाकारला जातो व मागील दरवाजाने या, असे सांगितल्या जाते. त्यांना पिण्यासाठी पाणी अथवा चहा हे देखील वेगळ्या ठेवलेल्या कपांमधून देण्यात येते. अनेक फ्लॅट स्कीम्समध्ये तर मोलकरणींना लिफ्ट वापरण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. उन्हातान्हातून इतके पायी फिरल्यावर जिन्याने पाच पाच मजले चढावे लागतात व यामुळे पायदुखीचा खूप त्रास होतो, असे या महिलांनी सांगितले.
कामगार आहोत चोर नाही..
समाजात प्रतिष्ठेची पोकळ वल्गना करणार्या अनेक श्रीमंतांचे मन किती गरीब असते, याचे प्रत्यंतर तर घरकाम करणार्या महिलांना नेहमीच येते. अनेकदा तर घरी चोरी झाल्यावर मालकांकडून पहिला आळ आमच्यावरच घेण्यात येतो. अनेक धनदांडग्यांची मुले पॉकेटमनी संपला की घरातील पैसे चोरतात आणि पोलिसांत मात्र आम्हाला दिले जाते, असे बोलताना मनातील विषण्णता त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.
मोलकरीण नव्हे गृहसेविका म्हणा.
शासनाने आता किमान वेतन कायदा करण्यासाठी प्रस्ताव ठेवल्याने आम्हाला एक संवैधानिक दर्जा मिळेल. कधीही न मिळालेली सामाजिक प्रतिष्ठा मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीदेखील होऊ, असे या भगिनींनी सांगितले. मात्र यालादेखील सुशिक्षितांकडून विरोध होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र ज्यावेळी वंचित वर्गातील न्यायाची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा सुशिक्षितांना भीती वाटतेच, असा इतिहास राहिला आहे. मात्र एकत्रितपणे राहिल्यास मोलकरणींनादेखील समाजात न्याय मिळेल, अशी आशा रूपाताई कुळकर्णी यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे मोलकरीण किंवा बाई, असे न म्हणता यांना गृहसेविका किंवा घरसहाय्यिका म्हणा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
गृहिणींनो घाबरू नका.
घरकामगारांचा किमान कायदा लागू झाला की, आज जिथे ४00 ते ६00 रुपये धुण्याभांड्याकरिता दिले जातात, तेथे ३४00 रुपये द्यावे लागतील की काय, असा गैरसमज गृहिणींमध्ये निर्माण झाला आहे. मात्र एकाच वेळी एकाच घरमालकावर याचा भार येणार नाही. फक्त घरकाम करणार्या या महिलांना स्वत:चे आयुष्य आहे, त्यांनादेखील समाजात मानाचे स्थान मिळविण्याचा अधिकार आहे, हे विसरू नका.
चर्चेत सहभागी सदस्य :
छाया चवरे, सुरेखा डोंगरे, रंजना नागोसे, इंदू मांडवे, रजनी वंजारी, वनमाला लोखंडे, नंदा नेवारे (सदस्य, विदर्भ मोलकरीण संघटना)
रूपाताई कुळकर्णी (अध्यक्ष, विदर्भ मोलकरीण संघटना)
विलास भोंगाडे (सचिव, विदर्भ मोलकरीण संघटना)
No comments:
Post a Comment