
‘‘हिजाब’’ या अरबी शब्दाचे उर्दू भाषांतर ‘परदा’ असे करण्यात आले आहे. ‘हिजाब’ हा शब्द कुरआनोक्तीतून घेण्यात आला आहे. त्या आयतीत अल्लाहनेप्रेषित मुहम्मद (स.) यांच्या घरांत निःसंकोचपणे ये जा करणार्यांना मनाई केली. घरातील महिला कडून काही हवे असेल तर ते पडद्या आडून मागावे असे आदेश देण्यात आले. याच आदेशाच्या अनुषंगाने बुरखा पध्दत अस्तित्वात आली. तद्नंतर बुरख्या संबंधात आलेल्या इतर आदेशांना बुरख्याचे आदेश (अहकामे हिजाब) असे संबोधण्यात आले.
बुरखा बाबतच्या आदेशांचे तपशीलवार वर्णन कुरआनच्या चोवीस व तेहंतीस या दोन अध्यायात (सूरहमध्ये) दिले गेले आहे. ज्यात म्हटले आहे की महिलांनी आपल्या घरात मोकळेपणाने व थाटाने वावरावे. इस्लाम धर्माच्या प्रसारापूर्वीचे असभ्य राहणीमान सोडून द्यावे व नटून सजून आपल्या सौदंर्याचे सर्वत्र प्रदर्शन करत फिरू नये. घराबाहेर जातांना डोक्यावर एक चादर पांघरावी. ज्या दागिण्याने मधुंरनाद (ध्वनि) निर्माण होत असेल असे दागिणे काढून ठेवावेत. घरातील सदस्यांसमोर वावरतांना विशेष खबरदारी बाळगावी. ज्यांच्याशी विवाह करता येते (गैर महरम) अशा नातेवाईकांसमोर श्रृंगार करून जाण्याचे टाळावे. घरातील आप्तजना (महरम नातेवाईका) समोर जातांना सुध्दा आपल्या वक्षस्थळा वर ओढनी (दुपट्टा) पांघरून आपले संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्त्र धारण करावे. पुरुषांना आदेश देण्यांत आले आहेत की त्यांनी आपल्या आयाबहिणीच्या खोलीत जाताना परवानगी घ्यावी. जेणे करून अचानक प्रवेशाने बेसावध बसलेल्या महिलांवर खजील होण्याची पाळी येणार नाही. उपरोक्त आदेश कुराआनात देण्यांत आले आहेत व त्यालाच ‘परदा’ (बुरखा पध्दत) म्हणतात. प्रेषित (स.) यांनी या बाबत अधिक खुलासा करताना म्हटले आहे की
‘‘स्त्रियानों, आपल्या सख्ख्या भावा व वडीलांसमोर जाताना सुध्दा चेहरा हाताचा पंजा व घोट्या पर्यंत पाया व्यतिरिक्त संपूर्ण शरीर वस्त्राने आच्छादित करूनच जावे.असे पारदर्शक व घट्ट वस्त्र धारण करू नये की ज्यातून शरीर प्रदर्शन घडेल.’’
तसेच प्रेषित (स.) यांनी म्हटले आहे की ‘‘आपल्या घरातील आप्तजनां (महरम) शिवाय इतर कोणत्याही नात्याच्या पुरुषाच्या सोबत एकांतात बसू नये.’’ त्यांनी स्त्रियांना सुगंध (अत्तर वगैरे) लाऊन घराबाहेर जाण्याबाबतही मनाई केली आहे. मशीदीत महिलांना नमाज पढण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. एकाच रांगेत स्त्री-पुरुषानी नमाज अदा करण्यास अनुमति नाकारण्यात आली आहे. नमाज अदा झाल्यानंतर महिला निघून जाई पर्यंत प्रेषित (स.) व इतर मुसलमान पुरुष मशीदीत आपल्या बसल्या ठिकाणावरून उठत नसत. या आदेशाची कुराआनातील सूरहा (अध्याय) नूर व अहजाब व प्रेषितांच्या आदेशा (अहादीस) मध्ये पडताळणी करता येईल. बुरख्या मध्ये हल्ली बरीच विविधता दिसून येते. मात्र बुरख्या बाबतच्या मूळ तत्वांत व उद्देशांत फरक झालेला नाही. मी कोणाचे नांव घेऊ इच्छित नाही मात्र मला सांगावेसे वाटते की जे लोक सांगतात की बुरखा आमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करतो, ते दुतोंडीपणाचे धोरण प्रगट करीत आहेत. त्यांचे वक्तव्य अल्लाह व प्रेषित (स.)यांच्या विरोधात आहे. दुसर्या शब्दात सांगायचे म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार अल्लाह व प्रेषित (स.) यांनी आमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. खरोखर आम्ही जर अशा प्रकारचे विचार बाळगत असू तर आम्ही स्वतःला मुस्लिम कसे मानावे ? ज्या अल्लाह व प्रेषित (स.) यांनी असा अन्याय केला आहे ते त्यांच्या पासून पूर्णतः अलिप्त का होत नाहीत ? अल्लाह वप्रेषित (स.) यांनी बुरख्याचा आदेश दिलेलाच नाही असे म्हणताच येणार नाही. मी आताच सांगितले आहे की ज्याची इच्छा असेल त्यांने कुरआन वा हदीस चे अध्ययन करून शंका समाधान करून घ्यावे. एखाद्यास हदीसच्या अध्ययनाने समाधान होत नसेल तर त्यानी कुरआनाचे आदेश पडताळून पाहावेत.बुरखा पध्दती बाबत थोडे बारकाईने अभ्यास केल्यास तीन महत्वाचे उद्देश लक्षांत येतील.
(१) पहिला उद्देश असा की पुरुष व स्त्रियांच्या चारित्र्यांचे रक्षण करण्यांत यावे व अशा दूर्वतनां पासून त्यांना अलिप्त ठेवावे जे स्त्री-पुरुषांच्या स्वैर सहजीवनामुळे निर्माण होतात.
(२) दुसरा उद्देश असा की स्त्री पुरुषांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात यावे. नैसर्गिकरित्या जी कर्तव्यें स्त्रियांनी पार पाडावयाची आहेत ती त्यांनी निश्चिंतपणे पार पाडावीत व ज्या जबाबदार्या पुरुषांच्या वाटयास येतात त्या त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण कराव्यात. (३) तीसरा उद्देश कुटूंब व्यवस्था मजबूत व सुरक्षित करावी हा आहे. कुटूंबव्यवस्था जीवनाच्या इतर व्यवस्थांपेक्षा अधिक
महत्वाची बाब आहे. बिनबुरख्याच्या कुटूंबव्यवस्थेने महिलांना कुटूंबात गुलामांचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्या सर्व प्रकारच्या हक्कांपासून वंचित झाल्या आहेत. तसेच ज्यांनी महिलांना त्यांचे हक्क तर दिले आहेत मात्र बुरख्याच्या बंधनातून मुक्त ठेवले आहे, अशा कुटूंबांची व्यवस्था अस्तव्यस्त झाली आहे. इस्लाम स्त्रियांना सर्व अधिकार ही देऊ पाहतो,
त्याच बरोबर घरातील व्यवस्थाही सुरक्षित ठेवू इच्छितो. हे केवळ बुरखा पध्दतीचा अवलंब केल्यानेच शक्यहोऊ शकते. बंधू भगिनीनों,मी आपणास विनंति करते की आपण कृपया उपरोक्त तीन उद्देशांवर शांतपणे विचार करावा. चारित्र्य रक्षणाच्या समस्ये बाबत जर कोणी उदासीन असेल तर त्यांच्या बाबतीत मी काही करू शकत नाही. जे चारित्र्याबाबत गंभीर आहेत
त्यांनी विचार करायला हवा की ज्या समाजात स्त्रिया नटून थटून स्वैराचरण करत असतील, व पुरुषा सोबत सर्वच क्षेत्रात एकत्र काम करीत असतील तर तेथील लोकांचे चारित्र्य कसे व कुठवर सुरक्षित राहू शकेल ? आपल्या देशांत जसजशी स्वैराचारी परिस्थिति निर्माण होत आहे तसतशी लैंगिक अपराधांची संख्या सारखी वाढत चालली आहे. त्या बाबत वर्तमान
पत्रात आपण रोजच वाचत असतो. बुरखा पध्दतच लैंगिक अपराधाचे मूळ कारण आहे तसेच बुरखा न राहिल्यास लोकांमधील स्त्रियां बद्दलचे कुतुहल व आकर्षण आपोआप कमी होईल असे म्हणणे व मानणे साफ चुकीचे आहे. ज्या काळात बुरखापध्दत नव्हती त्या काळात ही लैंगिक आकर्षण कमी झाले नव्हते. त्यांच्या वासना पूर्तीने नग्नतेची सीमा गाठली होती. नग्नतेने समाधान होत नव्हते म्हणून खुलेआम कामक्रिडा होऊ लागली व आता तर लैंगिकसंबंधाचे परवाने देऊन ही वासनात्मक भूक क्षमण्याचे चिन्ह दिसत नाहीत. अमेरिका इंग्लंड व इतर देशांच्या वर्तमानपत्रांत अनेक लैंगिक अपराधां बाबतच्या बातम्या प्रसिध्द होत असतात. ही काय समाधानकारक परिस्थिति मानली जाईल ? ही केवळ वैयक्तिक चारित्र्याची समस्या नसून संपूर्ण सामाजिक संस्कृतीचा प्रश्न बनला आहे. समाजात सहजीवनाची प्रथा जितकी जास्त वाढत जात आहे तितकाच जास्त स्त्रियांच्या शृंगारिक प्रसाधनाचा खर्च वाढत जात आहे. हा वाढता खर्च काबाडकष्ट करून मिळालेल्या रास्त कमाईने पुरा होत नाही म्हणून लाच, अफरातफर व इतर भ्रष्टचाराने वाढता खर्च पूरा केला जात आहे. त्यामुळे पूर्ण समाज पोखरला जात आहे. कोणत्याच कायद्याची योग्यरित्या अंमलबजावणी होऊ शकत नाही. जे लोक आपल्या स्वतःच्या इच्छांवर ताबा ठेवू शकत नाहीत ते दुसर्यांवर शिस्तीचे नियम कसे लागू करू शकतील ? जो आपल्याच कौटुंबिक जीवनात विश्वास पात्र नसेल तो समाज व देशाशी एकनिष्ट कसा राहू शकेल ?स्त्री पुरुषांचे कार्यक्षेत्र वेगळे असावे ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. स्त्रीला मातृत्वपद देऊन तिचे कार्यक्षेत्र दाखवून देण्यात आले आहे. पुरुषाला पितृत्वाचा अधिकार देऊन इतर जबाबदार्या त्याच्या वर सोपविण्यात आल्या आहेत. स्त्री-पुरुषांच्या शरीर रचनेत आवश्यक ते फरक निर्माण करून, दोहोंना वेगळी मानसिकता, शारीरिक क्षमता व गुण प्रदान करण्यांत आले आहेत. मातृत्वाची जबाबदारी कौशल्याने पार पाडता यावी म्हणून तिला अधिक संयम व सहनशील प्रवृत्ती प्राप्त झाली आहे. तिच्या ममत्व व कोमल भावनामुळें बालकांचे संगोपण व पालनपोषण अत्यंत सहृदपणे पार पाडले जाते. पुरुष त्या मानाने कणखरवृत्तीचा असतो. त्याच्यावर कुटूंबाच्या रक्षणाच्या व उदरनिर्वाहा च्या कठीण जबाबदार्या टाकण्यात आल्या आहेत. स्त्री पुरुषांचे नैसर्गिक कार्यक्षेत्र वाटप जर आपणांसमान्य नसतील तर जगास मातृत्वाला मुकावे लागेल
व परिणामतः संपूर्ण मानव समाज हैड्रोजन वा अणुबॉम्ब विना संपुष्टात येईल.स्त्रियांनी मातृत्वाच्या नैसर्गिक जबाबदारी बरोबरच पुरुषांसह राजकीय, आर्थिक, औद्योगिक व इतर जबाबदार्या पार पाडाव्यात अशी अपेक्षा करणे म्हणजे महिलांवर अन्याय व अत्याचार करणे आहे. मानवजातीच्या उत्पत्ती व सेवाशुश्रुसेची संपूर्ण जबाबदारी ती एकटीच पार पाडीत असते. त्यांत पुरुषांचा काडीमात्र सहभाग नसतो. या उलट पुरुषांच्या जबाबदारीत ही तिने सहभागी व्हावे हे कितपत न्याय ठरेल? स्त्रियांनी परिस्थितिनुरुप अन्यायकारक जबाबदार्यांचा स्वीकार केला आहे. एवढेच नव्हे तर आता तर अधिकाधिक सामाजिक स्वातंत्र्य व अधिकार मिळविण्याकरिता त्यांनी सामुहिक चळवळी सुरु केल्या आहेत. आपण मातृत्वाचा उपहास केला आहे. गृहणीचा अपमान केला आहे. महिलांनी घरात राहून केलेल्या सेवा शुश्रुसेला तुच्छ लेखले आहे. तिच्या सेवाकार्याचे महत्व पुरुषांचे राजकारण, उद्योगधंदे व युध्दाच्या जबाबदार्यांपेक्षा कमी मानता येणार नाही. बिचार्या स्त्रियांनी विवश होऊन पुरुषांच्या जबाबदार्या स्वीकारल्या आहेत. पुरुषांची कामे न केल्यास तिला सन्मान जनक वागणुक देण्यास परुष तयार होत नव्हता.
इस्लामने महिलांना घरगुती स्त्री सुलभ जबाबदार्या पार पाडण्याचा आदेश दिला होता.
मातृत्व व बालकांच्या संगोपनाच्या उदात्त कार्यामुळे तिला समाजात सम्मानजनक स्थान प्राप्त होते. मात्र आता कुटूंब व्यवस्थे बाबतचा आपला दृष्टीकोनच बदलत चालला आहे. आपला आग्रह आहे की स्त्रियांनी मातेची कर्तव्यें पार पाडावीत, त्या बरोबरच तिने उच्चशिक्षण प्राप्त करून मॅजिस्ट्रेट सारखे पद भूषवावे, पुरुषांच्या मनोरंजनासाठी नृत्य व संगीताच्या महफिली ही सजावाव्यात. अशा अनेक प्रकारच्या कामांचे ओझे तिच्या वर लादले गेल्या मुळे ती एक ही जबाबदारी पूर्णतः समाधानकारकपणे पार पाडू शकत नाही. ज्या कामाकरिता तिचा जन्म झालेला नाही, जे तिच्या शरीराला पेलवणार नाही, जे तिच्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही अशी कामें तिच्यावर सोपवण्यात आली आहेत. मात्र तिचे कौतुक झालेच तर ते केवळ तिच्या सौंदर्य व स्त्रीत्वामुळेंच होते! बंधू भगिनीनों, सूज्ञ व चारित्र्यवान नागरिक निर्माण करणार्या कुटूंबव्यवस्थेला आपण गौणस्थान देत आहोत. पादात्राणे व दारूगोळा निर्माण करणार्या कारखान्यापेक्षा कुटुंब संस्था निश्चितच श्रेष्ठतर आहेत. स्त्रियांना चारित्र्य घडविण्यांची आवश्यक क्षमता व कोमल मानसिकता निसर्गाने देऊ केली आहे. घरगुती जबाबदार्या पार पाडणार्या कर्तव्यनिष्ट महिलां घरांत सदैव कार्यमग्न असतात. त्यांनी त्यांच्या जबाबदार्या सक्षमपणें व नैपुण्याने पार पाडाव्यात म्हणून त्यांना उच्च शिक्षण व योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कुटूंब संस्थेचे संचालन तिने आत्मविश्वासाने, निश्चितपणे, संतोषजनकरित्या अमलांत आणावेत म्हणून बुरखापध्दत अवलंबण्यात आली होती. त्यामुळे स्त्रिया विचलित न होता आपली कर्तव्यें कौशल्याने पार पाडू शकत होत्या. गृहणी सक्षम आणि सुरक्षित असून घरकारभार व्यवस्थितपणे पार पाडीत आहे. या विश्वासाने पुरुष ही निश्चितपणे आपल्या घराबाहेरील जबाबदार्या पार पाडू शकत होते. आता आपण या प्रकारच्या गृहव्यवस्थेस नवयुगाच्या प्रगतीसाठी नाकारू पाहात आहोत. याकरिता एकतर आपणांस पुरातन कुटूंबव्यवस्थेचा अवलंब करून
स्त्रियांना गुलामीचे जीवन द्यावे लागेल किवा घरांना पादात्राणे वा दारूगोळा सारख्या वस्तू निर्मितीच्या कारखान्यांचे स्वरूप द्यावे लागेल. मला वाटते की बुरखापध्दत नष्ट करून आणि इस्लामने महिलांना दिलेले कायदेशीर व आर्थिक अधिकार कायम ठेवून कुटूंब व्यवस्था सुरक्षित ठेवता येणार नाही. आपणास नवयुगाची प्रगति हवी आहे की कुटूंब
व्यवस्था सुरक्षित ठेवायची आहे ? या बाबत शांतपणे विचार करून निर्णय घ्यायचा आहे.प्रगति ही फार विस्तृत संज्ञा आहे. या संज्ञेची कोणतीच निश्चित परिभाषा नाही. एकेकाळी बंगालच्या आखातापासून थेट अटलांटिक महासागरा पर्यंत मुस्लिमांचे राज्य पसरले होते.
ज्ञान विज्ञानाच्या क्षेत्रात ते अग्रेसर होते. सांस्कृतिक व वैचारिक पात्रते च्या बाबतीत त्यांची बरोबरी करणारा कोणीही नव्हता. मात्र त्या काळात बुरखापध्दत अस्तित्वांत होती. इस्लामी इतिहासाचे अध्ययन केल्यास लक्षात येईल की त्या काळात मोठमोठे नावाजलेले मुस्लिम संत, विचारवंत, विद्वान, राज्यकर्ते, लेखक व शूरवीर होऊन गेलेत. ते सर्व महापुरुष अशिक्षित व अडाणी मातांच्या पोटी जन्माला आले नव्हते. बुरखा पध्दत अमलांत असूनही अनेक महिलांनी ज्ञान व विद्वतेच्या क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त केले होते. विज्ञान, कला, वाड्ःमय आदि क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केले होते. तत्कालीन मुस्लिमांच्या प्रगतीच्या मार्गात बुरखा पध्दतीने कोणतीच अडचण निर्माण झाली नाही. आजही बुरखा पध्दतीचा अवलंब करून मुस्लिम समाजास प्रगति करणे शक्य आहे. मात्र पाश्चात्य देशांतील प्रगतीस बुरखा पध्दत अडगळीची सिध्द होऊ शकते. त्यांनी नीतिमत्ता व कौटुंबिक व्यवस्थेच्या विनाशाचा धोका पत्करून
प्रगति प्राप्त केली आहे. महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रांतून मुक्त करून पुरुषांच्या कार्यक्षेत्रांत प्रवेश दिला आहे. या पध्दतीद्वारा त्यांनी आपल्या कार्यालयात व कारखान्यांसाठी दुप्पट मानवी शक्ती प्राप्त करून प्रगति केली आहे. मात्र असे करताना त्यांना गृहसुखाला मुकावे लागले आहे. आज ही काही गृहणीमुळें त्यांची घरे सुस्थितीत असल्याचे निदर्शनास येतात. पुरुषांसोबत धनार्जनकरणार्या स्त्रिया कौटुंबिक जबाबदार्या योग्यरित्या पार पाडू शकत नाहीत. त्यांच्या वैवाहिक जीवनाचा अंत घटस्फोटात होतो. त्यांची मुले वाईट वळणावर जातात. त्यांचा बहुतेक वेळ हॉटेल्स व क्लब मध्ये जातो. त्यांना घर स्वर्गमय वाटत नाही. त्यांनी समाजासाठी चांगले नागरिक निर्माण करण्याचे कार्य सोडून दिले आहे. अशा प्रगतीस प्रगति कशी म्हणता येईल ?
* स
http://islamdarshan.org/node/832
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
1 comment:
हा ब्लॉग मुस्लिम धर्माचे प्रतिनिधित्व करतो का ?
आणि ब्लॉग निर्माता स्वतः बुरखा पद्धतीचे समर्थन करतो का ?
Post a Comment