महिलांसाठी स्वतंत्र तांत्रिक विद्यापीठाचा संकल्प
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 09, 2010 AT 12:00 AM (IST)
सांगली - महिलांसाठी स्वतंत्र तांत्रिक विद्यापीठ स्थापन करण्याचे माझे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्याची ताकद मला रेणुकादेवी देवो असा संकल्प साखर उद्योगाद्वारे जग जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या रेणुका शुगर्स लिमिटेडच्या संचालिका विद्या मुरकुंबी यांनी आज येथे व्यक्त केला. महिला दिनाच्या निमित्ताने नाबार्ड आणि सांगली अर्बन बॅंकेच्या एकात्म समाज केंद्राच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. \
फोर्बच्या श्रीमंतांच्या यादीत झळकणाऱ्या विद्याताई यांनी खेड्यापाड्यांतून आलेल्या महिलांना आपल्या साध्या वर्तणुकीने जिंकले. ब्राझीलमधील दोन साखर कारखाने टेकओव्हर केल्यानंतर त्या प्रथमच जाहीर व्यासपीठावरून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ""महिलांसाठी तांत्रिक विद्यापीठ स्थापन करण्याची माझी इच्छा मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलले आहे. या विद्यापीठात महिलांना उद्योगासाठी लागणारे छोटे छोटे तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम राबवले जातील. येत्या वीस वर्षांत उद्योगामधील कोणत्या क्षेत्रात वाव आहे ते ओळखून तेथे अभ्यासक्रम तयार केले जातील. त्याच्या प्रमाणपत्राद्वारे बॅंका कर्ज देऊ शकतील. सांगलीतही जिल्हा परिषद किंवा एकात्म समाज केंद्राने महिलांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. आज माझ्या उद्योगातील अनेक छोटी छोटी केमिकल्स किंवा वस्तू बनवण्याची कामे अशा प्रशिक्षित महिलांकडे देता येतील.''
रेणुका शुगर्सचे यश केवळ मी आणि माझ्या मुलाचे नसून टीम वर्कचे असल्याचे नमूद करून श्रीमती मुरकुंबी म्हणाल्या, ""माझ्या आई-वडिलांनी कधीही मला मुलगी असल्याचे भासवून दिले नाही. 1967 ला त्यांनी मला व्यापाराच्या क्षेत्रात संधी दिली. पुढे पतीनेही मला घरातच बसू दिले नाही. मला माझ्या आजूबाजूच्या कुटुंबीयांनी जी संधी दिली ती प्रत्येक स्त्रीला मिळाली पाहिजे. तसे झाले तर महिलादिन साजरा करण्याची अजिबात आवश्यकता राहणार नाही. वर्षाचे 365 दिवस महिला दिनाचेच असतील. कामाचा तसा धडाका लावा, यश तुमचेच आहे.''
या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आनंदा डावरे, जिल्हाधिकारी श्याम वर्धने, सांगली अर्बन बॅंकेचे कुटुंबप्रमुख बापूसाहेब पुजारी, अध्यक्ष प्रमोद पुजारी, संचालक अनिल गडकरी यांची भाषणे झाली.
श्रीमती मुरकुंबी यांनी बचत गटांच्या स्टॉल्सना भेट देऊन कौतुक केले.
.......................
विद्याताईंचा सल्ला
0पापड-लोणची विक्रीची खूप मोठी बाजारपेठ काबीज करण्यासाठी सज्ज व्हा.
0बचत गटाच्या उत्पादनांचा सांगलीत साप्ताहिक बाजार भरवा.
0ठिकठिकाणच्या सहकारी व सरकारी इमारतीमध्ये महिलांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरूपी जागा द्या.
0योग्य प्रशिक्षण मिळाल्यास फौंड्रीसारख्या उद्योगातही महिलांना संधी.
No comments:
Post a Comment