एकाधिकारशाही विरोधात नवापूर आणि साक्री भागातून एक आणि तळोजा, शहादा भागातून दोन मोर्चे आले. धुळे जेल रोडवर या माच्र्याची सभा झाली. छायाबाई सुरतवंती यांच्या भाषणानंतर मी बोलले. श्रोत्यांचा मूड बिघडला होता. मलाही हुटआऊट करण्याच्या पावित्र्यात होते. मी माझ्या भाषणाची सुरूवातच अशी केली की, ‘आदिवासी भगिनीमध्ये शहरी भगिनी पांढऱ्या साडय़ा नेसून बसलेल्या आणि बहुसंख्य आदिवासी भगिनी गडद रंगाच्या पेहरावात असल्यामुळे येथे जशा चांदण्या आकाशातून खाली उतरूल्या आहेत की, काय असे भासते’ इतक्यात जमलेल्या श्रोत्यांकडून टाळ्याचा कडकडाट झाला. मी अनेक गोष्टी अशा तऱ्हेने सांगत गेल्याने सभेचा मूड बदलला. लोक माझे बोलणे एकचित्ताने ऐकत होते. ही सभा सार्वत्रिक निवडणुकी अगोदरची होती. एकाधिकारशाही विरोधातली ती एक महासभा होती. धुळे जेल रोडचा परिसर आदिवासी आणि शहरी भगिनींच्या उपस्थितीने फुलून गेला होता. तो प्रसंग माझ्या जीवनात खूप महत्वाचा होता.
मी ‘मावची’ जमातीची. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या गोंडरी पाडय़ात माझा जन्म झाला. आमच्या पिढय़ान्पिढय़ा झोपडीतच राहत होत्या. आमच्या मालकीचे आम्हाला तसे घर ना जमीन. आई लाकुडफाटा गोळा करून ते ओझे कित्येक मैल डोक्यावरून वाहून आणीत असे. ते अल्पस्वल्प किंमतीत विकायचे. आमच्या घरात डझनभर लहान मुले होती. त्यातील मोठी मुले पै-पाव आण्याचे काम करीत असत. आणि वडील गुरे राखीत. आम्हाला जन्मापासूनच कधीच पोटाला पोटभर अन्न मिळाले नाही. अंगाला पुरेसा कपडा मिळाला नाही. त्यातच तीन मामा अन् त्यांच्या बायका व मुलेही आमच्यातच राहत असत. यामुळे कधी कोणाला काही मिळत नव्हते.
आमच्या झोपडीत सर्वत्र दारिद्रय वास्तव्य करून होते. घरकाम आणि शेतातील काम एवढयाच गोष्टी आम्हाला माहित होत्या. त्या दरम्यान आमच्या पाडय़ावर (वस्तीवर) शाळा निघाली. तोर्पयत माझे शाळेचे नेमके वय झाले होते. वस्तीवर शाळा सुरू झाली आणि वडिलांनी माझे नाव शाळेत टाकले. घरी संपूर्ण दारिद्रय नांदत असल्याने त्यावेळी दोन आण्याची पुस्तके घेण्याइतकीसुध्दा आमची परिस्थिती नव्हती. शाळा म्हणजे इमारत वगैरे असे काही नव्हते. ती कोणाच्या तरी घराच्या पडवीमध्ये भरत होती. सुरूवातील शाळेत एकुण ‘मावची’ आणि ‘भिल्ल’ जातीची मिळून साठ मुले-मुली होत्या. शाळेत सगळचे गुण्या-गोविंदाने राहत असू. माणूस शिक्षणामुळे माणूस सुधारतो हे आम्हाला माहित नव्हते. तशी सुधारण्याची आशाही नव्हती. शिक्षकांनी आमची नावं लिहून घेतली आणि आम्हाल नियमित हजर राहण्यास बजावलं. आम्ही पळून जायचो. झाडाझुडपात लपायचो. परंतु मला मामाने सक्तीनं शाळेत जायला लावलं. ‘मुलीन शाळेत जाण्यात काय हंशील आहे? असा प्रश्न माझ्यासकट सर्वाना पडत असे. चूल आणि मूल यापलिकडे मुलींचं विश्व असू शकते यावर त्यावेळी कोणाचाच विश्वास नव्हता. मी शाळेत जायला लागले. त्यावेळी सगळेच एकाच मडक्यातील पाणी पित असू, ही बाब आमच्या काही लोकांना रूचली नाही.
मावची जमातीच्या बायकांनी भिल्ल जमातीची मुले-मुली त्यांची पडवी, पणी, मुले बाटवितात असा कांगावा करून आम्हाला हाकलून दिले. यामुळे शाळा अडचणीत आली. परंतु गुरुजींनी आणि मामांनी गावाबाहेर झोपडी उभारून पुन्हा शाळा सुरू केली. काही दिवसांनी त्या पहिल्या मास्तरची बदली झाली. नंतर एक हरिजन(मागासवर्गीय) शिक्षक आमच्या शाळेवर आले. आमच्या मावची व भिल्ल लोकांना त्यांना खूप छळले. तरीही ते आम्हाला खूप चांगले शिकवत होते. नंतर त्यांना खूपच छळून अगदी पळवून लावले. मावची आणि भिल्लांच्या या वागणुकीमुळे इथे मास्तर यायला घाबरत होती. तरीही एका मास्तराने धाडस केले आणि तो मास्तर माझे शिक्षण संपेपयर्ंत टिकले. आम्हा सगळयांन त्यांचा खूप आदर वाटत होता.
-----
आम्ही सुरूवातीला सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक महिला सभेची स्थापना केली होती. परंतु ती फारसी प्रभावी ठरली नाही. आदिवासी महिलांची परिस्थिती खूप गंभीर होती. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय झाला की, त्यांना त्यासाठी न्याय मिळणे कठीण होते. कारण ज्या जमातीच्या जातपंचायती होत्या त्यांचे सर्व नेतृत्व पुरूषमंडळीच करीत. आदिवासी महिलांना तेथे येऊ दिले जात नसत. यामुळे स्त्रियांच्या विरोधातच जमातपंचायतीचे निकाल लागत. यामुळे एखाद्या आदिवासी स्त्रीला न्याय मिळत नव्हता. ती समाजाकडून आणि न्यायव्यवस्थेकडूनही पिडली जात होती. गावात कधी दुष्काळ पडला, कोणते साथीचे आजार आले की, तिला डाकिण समजून ठार मारले जाते.
सरकारकडून अनेक आजारावर औषधे उपलब्ध केली असली तरी त्यालाही किती अडचणी आहेत? एक तर आदिवासी दऱ्याखोऱ्यात असल्याने त्यांच्या पाडय़ांकडे रस्ते, शाळा, दिवा पोहोचत नाहीत, यामुळे ते कधी भूकबळीने तर कधी साथीच्या आजाराने मरत आहेत. गावात एखादा आजार कोणाला आला की, भगताकडे नेलं जातं. त्यात स्त्रियांचे काहीही चालत नाही. गावानं एखाद्या स्त्रिला डाकिण समजलं की, तिला त्यातून तिचा नवराही वाचवू शकत नाही. तिला कोणाचेच संरक्षण मिळत नाही. इतकी भीषण अवस्था आदिवासी स्त्रियांची आहे. ती अजूनही संपलेली नाही. यात कधीही डाकिण म्हणून पुरूषांला मारले जात नाही. त्याने कितीही बहुपत्नीत्व केले तरी त्याला समाज विचारत नाही, मात्र स्त्रियांना तसे अधिकार नाहीत. काही लोक आदिवासी स्त्रियांना स्वातंत्र्य असल्याचे बोलतात ते बरोबर नाही.
आदिवासी समाजात स्त्रियांची लग्ने ही घरच्या मंडळींच्या निर्णयाप्रमाणेच होतात. पुरूषांना दुसरी पत्नी करण्याचा अधिकार आहे, मात्र तेच स्त्री करत असेत तर तिला पहिल्या नवरा मंडळीकडे ‘देज’चा व्यवहार आहे तो दुपटीने परत करावा लागतो. तसे पुरूषांबाबत नाही. साक्री तालुक्यातील मोखड गावात उख्या नावाचा आदिवासी होता. शेतीबाडी होती. दोन बायकांच्या त्याला सात मुली होत्या. या सर्वाचीच पहिले लग्न झाल्यानंतर त्या परत आल्या. त्यामुळे उख्याला सगळी शेतीबाडी विकून देज दुपटीने द्यावा लागला होता. शेवटी जावयांना देजची भरती करण्यासाठी त्याला भूमिहीन व्हावे लागल्याचे माझ्यासमोरचे उदाहरण आहे. त्याच्या मुलांनी नंतर काही जमिन कष्टाने परत घेतली तरीही आदिवासींमध्ये असलेल्या जाचक रिवाजांचे प्रश्न कायम आहेत.
यामुळे आम्ही सत्यशोधक महिला सभेच्या माध्यमातून काम सुरू केलं. मात्र ते करत असताना आदिवासी महिलांना कायद्याचं कोणतंही संरक्षण मिळत नसल्याचे आम्हाला दिसून आलं. आदिवासी हे हिंदू नसल्याचे सांगून त्यांच्या महिलांसाठी हिंदू कोड बिलाचे कायदे लागू नव्हते. जे काही कायदेकानून होते त्याचा कोणताही फायदा आणि संरक्षण जसे हिंदू स्त्रियांना मिळत होते तसे आदिवासी स्त्रियांना नाही. यामुळे त्यांच्यावर कितीही अन्याय झाला तर त्यांना कोणी वाली नव्हता. तरीही आदिवासी स्त्रिया नव्याने दमाने आदिवासी चळवळीत पुढे येत होत्या.
त्या काळात आम्ही आदिवासी स्त्रियांच्या हक्कांसाठी जो लढा देत होतो, त्याबाबत मात्र काही ब्राह्मणी स्त्री संघटना आदिवासींच्या प्रश्नांबाबत शेपूट खाली घालून होत्या. आम्ही आदिवासी स्त्रियांच्या अनेक प्रश्नांसाठी न्यायालयात गेलो, परंतु तिथे आम्हाला न्याय मिळेल, अधिकार मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु आदिवासी स्त्रिया हिंदू नसल्यामुळे त्यांना हिंदू कोडबील आणि कोणत्याही प्रकारचे कायदे लागू होत नसल्याचा धक्कादायक निकाल त्यावेळच्या न्यायाधिशांनी दिला. पुरूष आदिवासी असो की, हिंदू त्याला कोणत्याही प्रकारचे बंधन नाहीत, एखाद्या स्त्रीने आपला पती सोडायचा विचार केला तर तिच्यावर जमातपंचायतीचे कायदेकानून सुरू होतात. तसे पुरूषांच्या बाबतीत घडत नाही, ते कधी बहुपत्नीत्वाचा व्यवहार करू शकतात. ही खरे तर आदिवासी स्त्रियांच्याबाबत ही कायद्याची कमजोरी आहे. मोठे धाडस करून एखादी आदिवासी महिला कोर्ट कचेरीत गेली तर तिला न्याय मिळेल असे दिसत नसल्याने आदिवासी स्त्रियांच्या हक्कांसंबंधीचा मुद्दा पुढे कमजोर होत गेला. आता तर या प्रश्नांवर सगळं सपाट झाल्यासारखं दिसतं.
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या माध्यमातून आम्ही आदिवासी भूमिहिनांना जमीनी मिळाव्यात यासाठी लढा सुरू केला होता. तो काळ ते सालच्या दरम्यानचा होता. या लढय़ात निम्म्यापेक्षा अधिक आदिवासी महिला होत्या. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भूमिहिन आदिवासींना जमिनी मिळाव्यात यासाठी सुप्रीम कोर्टात गेलो होतो. या लढय़ाचे नेतृत्वच माझ्याकडे होते. माझ्यासोबत कॉ. साजूबाई गावितसह अनेक स्वत:ला झोकून देणारे कार्यकर्त्यां महिला आणि पुरूषही होते. आदिवासी स्त्री पुरू षांनी पाडय़ापाडय़ात जाऊन याबाबत जागृतीचे काम केले होते. प्रत्येक आदिवासींची व्यक्तिगत माहिती गोळा करणे, त्यासाठी गावसभा घेणे, केससाठी लागणारे कागदपत्रे जमा करण्याचे काम आम्ही करत होतो. सुप्रीम कोर्टात आमची केस लढल्यानंतर इतर राज्यातील आदिवासींनीही आपले दावे कोर्टात दाखल केले. हे सर्व साक्री, नवापूर भागातील जंगलछेडूच्या भूमिहिन आंदोलन चळवळीच्या रेटयाने शक्य झाले. आम्ही जी देशात भूमिहिन आदिवासींसाठी लढाई सुरू केली त्यासाठी आता गेल्या दोन वर्षामध्ये प्रश्न तीव्र केला जात आहे. यासाठी आंदोलने आणि मोर्च काढले जात आहेत. मात्र आमच्या लढयामुळे हा प्रश्न राजकीय, व कायद्याच्या पटलावर प्रथम आणला गेला.
----
मी वेगवेगळया माध्यमातून सत्यशोधक कम्युनिष्ट पक्षाचे करत असताना दलित, आदिवासींच्या प्रश्नांवर भूमिका मांडत राहिले. तब्बल चाळीस वर्षापासून हे सुरूच आहे. भूमिहिनांचा प्रश्न, आदिवासी महिला आणि एकुणच स्त्रीमुक्ती चळवळ आणि स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न हे अजूनही मिटलेले नाहीत. राज्यात भटक्या-विमुक्त, आदिवासी आणि दलितांनी ज्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत त्या त्यांच्या नावावर केल्या जात नाहीत. सरकार वेगवेगळी कारणे सांगून त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवतं. आदिवासींची तर अत्यंत गंभीर अवस्था आहे. त्यांना तर घर ना दार, ना शेती सरकार द्यायला तयार नाही. थोडंसं मागे वळून पाहिलं तर त्यांना घटनाही पूर्ण न्याय देऊ शकली नाही. कायदे कानून आणि देशातील लोकशाही, स्वातंत्र्य, बंधुभावही त्यांच्यासाठी अपुरा पडतो. त्यांना अजूनही स्वातंत्र्यच नाही. अजूनही पोट भरण्यासाठी झगडावं लागतं. त्यांच्या हक्कांचं त्यांना मिळत नाही त्यामुळे आपल्या देशात खरी लोकशाही नांदतेय असे म्हणता येणार नाही. जे काही चालले आहेत ते चुकीच्या वाटेने जात आहेत. म्हणूनच शेतकरी, आदिवासी, दलित, कष्टकरी लोकं उद्ध्वस्त होत असून देशाला भांडवलदारी व्यवस्थेने जखडून टाकलं आहे. यामुळेच भ्रष्टाचार वाढला आहे.
माझ्या आयुष्यात नामांतराचा लढा खूप महत्वाचा ठरला. त्यासाठी मोर्चे काढले, सत्याग्रह केला. नाशिक येथे झालेल्या पहिल्या सत्याग्रहात आमच्या हजारएक लोकांना अटक करण्यात आली, मला परतवलं. आमचे शेकडो कार्यकर्ते दुसऱ्यांदा सत्याग्रहासाठी पुढे आले तेव्हाही चौदाशे लोकांना पकडून डांबण्यात आले. एक शंभर लोकांची तुकडी सुरतमार्गे मुंबईला पाठवण्यात आली होती त्यांनाही अटक करण्यात आली.
----
साठीच्या दशकात दलित, ग्रामीण साहित्य प्रवाह उदयाला येत होते, परंतु आदिवासी साहित्याच्या संदर्भात पाटी कोरीच होती. हे प्रवाह परिवर्तनाच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे असा विचार कॉम्रेड शरद पाटलांनी पुढे आणला. त्यांच्यात असलेली दरी कमी केली पाहिजे यातून पहिले दलित,आदिवासी, ग्रामीण, साहित्य संमेलनाची सुरूवात झाली. पहिलं साक्रीला, दोन संमेलन वाळव्याला आणि शेवटचं सटाण्याला झालं. आनंद यादव, बाबुराव बागुल अनेक जणांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्याकाळात दलित, ग्रामीण, आदिवासी साहित्य चळवळी बऱ्याच जोर धरत होत्या. या चळवळीजातीअंताच्या दिशेने पुढे जायला हव्या होत्या असे पाटलांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यांनी अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राची निर्मिती केली. मात्र यातील काहीजण व्यवस्थेला शरण गेल्याने ते एकत्र आले नाहीत. त्यामुळे या साहित्य चळवळी थंड झाल्यासारखे दिसत आहे. त्यावेळी साहित्य कशाला म्हणतात याचेही मला भान नव्हते. त्यानंतर मला पाटलांनी काही नामवंत साहित्यिकांच्या कादंबऱ्या मला वाचायला दिल्या. सुरूवातीला काही जाणवत नव्हतं, परंतु नंतर नंतर बरेच काही वाचल्यानंतर साहित्य कळलं. ते समाजव्यवस्थेचं त्यांच्या परिसराचं किंवा गाव पातळीवरचं साहित्य मी वाचलं. ते बरेच जाणिवेच्या पलिकडं गेल्याचं मला दिसलं नाही.
आमचा तसा साहित्याचा संबंध नव्हता. तसं साहित्य म्हणजे काय हे माहित नव्हतं. सत्यशोधक ग्रामीण साहित्य सभेच्या माध्यमातून ते आम्हाला पहायला मिळाले. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने पुढे ग्रामीण,दलित, आदिवासी साहित्याचा एक प्रवाह एकत्र करण्याची महत्वाची भूमिका बजावली. अनेक ठिकाणी याविषयींचे साहित्य संमेलन झाली. साक्री येथे पाचवे , दलित,आदिवासी,ग्रामीण साहित्य संमलेन होईर्पयत सर्व काही व्यवस्थीत सुरू होते. मात्र काही लोकांनी ग्रामीण, दलित, आदिवासींसाठी सुरू झालेली साहित्याची चळवळ खोडा घालून ती खंडीत करण्याचा प्रयत्न केला. आता जे काही सुरू आहे ते आदिवासींच्या नावाने ब्राह्मणी व्यवस्थेला आहारी आहेत. ग्रामीण, दलित,आदिवासींच्या चळवळीतून एकजुटीचे साहित्य निर्माण झाले. पुढे ती विभागली गेली. तरीही दलित, आदिवासी, ग्रामीण अशा विविध नावाने का असेना ती सुरू होती. आता मात्र काही वेगळया चुली मांडल्या त्याचीही अनेक शकले पडल्याचे दिसून येत आहे.
त्यातच आपण काय लिहावं असा प्रश्न माझ्यासमोर पडला आणि त्यातून मी ग्रामीण आणि दलित जीवनाच्या व्यथा वेदनांपेक्षा आदिवासींचे जास्त शोषण पिडन होत असल्याने त्यांच्यावर लिहिलं पाहिजे असे ठाम केलं. मला जसं तसं वेगळं वाटलं तसं मी त्यातून लिहून काढलं. सुरूवातीला ‘आधोर’चे चार भाग लिहले. पण ते कोणीही छापायला तयार नव्हते. आपण म्हणतो आपल्या भाषेत साहित्य लिहीलं पाहिजे, आदिवासी जिथं जिथं विखुरला आहे, तिथं तिथं त्याची संस्कृती आणि भाषा यात थोडासा वेगळा फरक आहे, या माध्यमातून माझ्या कांदबरीत समान आदिवासींची भाषा ठेवली होती, परंतु ती कादंबरी अक्षर लागत नाही, भाषा कळत म्हणून पुण्या-मुंबईच्या लोकांनी परत पाठवली.
त्यावेळी मी खूप नाराज झाले होते. आता काय करावे,असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला, परत मी आदिवासी भाषेत लिहिलेली कादंबरी मी मराठीत लिहून काढली. त्यावेळीही मला ही कादंबरी छापायला कर्ज घ्यावं होतं. त्यामुळेच ती पुढे आली. नाही तर ती लोकांपुढे गेली नसती.
पुढे माझी ‘तृष्णा’ ही आत्मवृत्तपर कादंबरी बाहेर पडली. तिला खूप प्रसिध्दी आणि पुरस्कार मिळाले तरीही तिला फारसा अजूनही न्याय मिळाला नसल्याचे मला वाटते. नंतर मी स्वतंत्र कादंबरी म्हणून ‘भिवा फरारी’ लिहिली. इंग्रजांच्या विरोधात आदिवासींचे अनेक नायक लढले होते. परंतु त्यांची काही ठिकाणी योग्य दखल घेतली जात नव्हती. आदिवासी समाजाच्या भिवाने इंग्रजांच्या विरोधात संघर्ष केला त्याचे चित्रण त्यात आहे.
-------
