जटिल प्रश्न विधवांचे
भारतामध्ये येत्या काही वर्षांमध्ये वृद्ध महिलांचे प्रमाण वाढणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच एका सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे. या महिलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी व त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी केंद्र सरकारने आतापासून तरतुदी करायला हव्यात, अशी सूचनाही या सर्वेक्षणामध्ये करण्यात आली आहे. त्याच वेळी तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त म्हणजे 8.8 टक्के विधवा आणि घटस्फोटित महिलांचे प्रमाण आढळून आले. महाराष्ट्रातही विधवांचे, एकाकी आयुष्य जगणा-या महिलांचे प्रमाण मोठे असून पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
महिलांंना स्वतंत्र न करण्यात पुरुषांचे हित होते. नोकरी करणा-या किंवा स्वत:च्या हिमतीवर घर चालवणा-या महिलांची संख्या काही कमी नाही. पण त्यांच्या समस्या आणखी वेगळ्या आहेत. या पुरुषसत्ताक समाजामध्ये एक मुलगी म्हणून वडील, भाऊ तिचे संरक्षण करतात किंवा तिच्या गरजा भागवल्याचा दावा करतात. मग लग्न झाल्यावर नवरा असतो. त्यानंतर म्हातारपणी आधाराची काठी म्हणून मुलगा असतो. असे पूर्वापार चालत आले आहे. पण हे चक्र एवढे सहजसोपे नाही. प्रत्येक पायरीवर तिचे स्वतंत्रपणे पायावर उभे राहण्याचे पंख कापले जातात. घर-संसार याच तिच्या जबाबदा-या असल्याची जाणीव तिला सतत करून दिली जाते. अगदी नोकरी, व्यवसाय करणारी किंवा नव-याच्या बरोबरीने शेतात राबणारी बाईही त्याला अपवाद नाही. दोन्ही कामांची कसरत करत ती जीवन जगत राहते, आपल्या कपाळावरच्या कुंकवासाठी. पण जेव्हा ते कुंकू पुसले जाते, तेव्हा तिला पहिल्यांदा तिच्या एकाकी असण्याची किंवा घरातल्या स्थानाची जाणीव होते. पुरुषाशिवाय बाईचे जीवन व्यर्थ आहे, ही हिंदू धर्मातच दिली जाणारी शिकवण त्याला कारणीभूत आहे. अनेक जणांना तर ती ओझे वाटते आणि अशा विधवांना वाराणसीसारख्या हिंदू धर्मासाठी पवित्र मानल्या जाणा-या ठिकाणी आजही सोडून देण्यात येते.
अगदी शहरांच्या बाहेर डोकावून पाहिले की विधवांची स्थिती किती दयनीय आहे याचा प्रत्यय येतो. त्यात त्या बाईने स्वत:साठी किंवा तिच्या नव-याने मृत्यूआधी काही पैशांची तरतूद केली असेल तर तिला कुटुंबातील पोरं-बाळं विचारतात तरी. मात्र तिच्याकडे पैसेही नसतील तर तिचा उपयोगच काय, असा व्यवहारी दृष्टिकोन तिच्याप्रती ठेवला जातो. सरकारकडूनही अशा महिलांना फारसे अर्थसाहाय्य किंवा मदत मिळतेच असे नाही. पैशाची तरतूद नाही, वाढते वय, आजारपण, मानसिक आधार नाही हे दृश्य तर सार्वत्रिक आहे. अगदी वृद्धाश्रमातही पैसे असतील तरच महिलांची काळजी घेतली जाते. पण बाईच्या घरात राबण्याला पैसे कमावण्याप्रमाणे प्रतिष्ठा कधीच मिळत नाही. घरातल्या कामाचा दर्जा आधीपासूनच दुय्यम मानला गेला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा तितक्याच बरोबरीने ओढणा-या या बाईची काम करण्याची क्षमता संपली की तिचे अस्तित्वही नकोसे होऊन बसते, हे वास्तव आहे. हसत्या-खेळत्या, भरल्या घरात राहणा-या त्या बाईलाही आपल्यावर ही वेळ येईल, असे कधीच वाटत नाही.
त्यातच त्या विधवांना नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी खूप कमी मिळते. अलीकडेच नागपूर येथे एकाकी राहणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मेळावा आयोजिला होता. लग्न करून पुन्हा त्याच धबडग्यातून जाण्याऐवजी एकमेकांना आधार देत ‘लिव्ह इन रिलेशन’चा पर्याय त्यांना देण्यात आला. विश्वास बसणार नाही, पण अनेक वृद्धांनी तो स्वीकारला. त्यामुळे समाजामध्ये विधवांसाठी अशा पद्धतीने होणा-या सकारात्मक प्रयत्नांची गरज सर्वात जास्त आहे.
-श्रुति गणपत्ये
http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-widow-woman-issue-3081108.html
No comments:
Post a Comment