Pages

Saturday, September 8, 2012

‘स्त्रीदास्य घालवण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या स्त्रियांचा हा सन्मान
अफाट समूदायाने अनुभवला लीलाताईंचा कृतज्ञता सोहोळा
नागपूर, १९ ऑगस्ट/ प्रतिनिधी

सामाजिक परिवर्तनासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या लीलाताई चितळे यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा मर्मस्पर्शी सोहोळा अफाट समुदायाच्या साक्षीने संपन्न झाला. नागपूरची सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा प्रतिबिंबित करणारा हा कार्यक्रम सर्वच स्तरातील महिलांच्या मनात लीलाताईंविषयी असलेले प्रेम, आदर, आपलेपण व्यक्त करणारा होता. क्वचित एकत्रित येणाऱ्या महिला आज एकदिलाने लीलाताईंच्या गौरवकार्यात आपापली जबाबदारी पार पाडताना दिसल्या. सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात लीलाताईंच्या ६८ वर्षांच्या सेवाकार्याचा लेखाजोखा त्यांच्या जीवाभावाच्या सख्या, सोबती, नातेवाईक आणि समविचारी महिलांनी मांडला. लीलाताईंनी १६ ऑगस्टला ८१ वर्षांत पदार्पण केले म्हणून ८१ तेवत्या दिव्यांची रास व्यासपीठावर प्रज्वलित करण्यात आली.

अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्यां नलिनीताई लढके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. कुसुमताई वांकर, ज्येष्ठ समीक्षक पुष्पा भावे, प्रमुख पाहुणे निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, भन्साळी आश्रमाच्या पुष्पाबेन देसाई, उषा मिश्रा, महापौर अर्चना डेहनकर आणि गौरवमूर्ती लीलाताई चितळे व्यासपीठावर विराजमान होत्या.
पुष्पा भावे म्हणाल्या, फुले-आंबेडकरांचा जसा महाराष्ट्रात एक विचारप्रवाह आहे तसा गांधी-विनोबा-धर्माधिकारी यांच्या विचारांचा आहे. लीलाताई दुसऱ्या प्रकारच्या विचारांशी साधम्र्य राखणाऱ्या असल्या तरी, आधुनिक स्त्रीवादाशी त्यांचे नाते अतूट आहे. नलिनीताई लढके म्हणाल्या, विविध जबाबदाऱ्या पार पाडून सामाजिक जीवन घडवण्यासाठी लीलाताईंनी केलेल्या त्यागाचा, परिश्रमाचा हा सन्मान सोहोळा असून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे सर्वाचेच कर्तव्य आहे. डॉ. कुसुम वांकर यांनी लीलाताईंमधील अन्यायाला कडाडून विरोध करण्याची आत्मिक शक्ती आणि कठीण परिस्थितीतही मार्ग काढण्याचे कसब या गुणांचा गौरव केला. समाजवादी कार्यकर्ते पन्नालाल सुराणा म्हणाले, लोकशाही मूल्य टिकवण्यासाठी आणि जनसामान्यात ते रूजवण्याचा लीलाताईंचा आग्रह असे. त्यासाठी जोखीम स्वीकारण्यास त्या सदैव अग्रेसर असत. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचेही यावेळी भाषण झाले. संघर्ष आणि विधायक कार्याचा अनोखा समन्वय लीलाताईंनी साधला असून त्यांच्याप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता असल्याचे  धर्माधिकारी म्हणाले.
लीलाताई चितळे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, या कार्यक्रमासाठी माझ्याकडून परवानगी घेतली गेली नाही. ज्यांना मी सहकार्य केले, तो जीवन संघर्षांचाच एक भाग असून त्यात काही विशेष केले असे मला वाटत नाही. व्यासपीठावरील पडद्यावर अधोरेखित केलेले विचारवंत दादा धर्माधिकारी, आई भागिरथीबाई, राधाबाई ओक, कमलाबाई होस्पेट’ आणि ताराबेन मश्रुवाला या असामान्य व्यक्तित्वाने केलेल्या संस्काराचे बळ आयुष्यभर पुरले. विभूतीपूजा सांघिक शक्ती दुबळी करते. त्याला माझा विरोध आहे. मात्र, आजचा नेत्रदीपक सोहोळा अनुभवल्यानंतर स्त्रीदास्य घालवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणाऱ्या सर्व स्त्रियांचा हा सन्मान असल्याचे वाटते. संघटित होऊन सामाजिक अन्यायाचा विरोध करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी सोडला. जगण्याची इच्छा वृद्धिंगत करणारा क्षण या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
यावेळी पुष्पाबेन देसाई, सुनंदा मोहनी, हरिभाऊ केदार, अर्चना डेहनकर, ईश्वरी डेमला आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाला निवृत्त न्या. मीरा खडक्कार, निवृत्त न्या. कुमकुम सिरपूरकर, शांताताई गवई, शैलजा सुभेदार, सोमा सेन, डॉ. प्रमिल आसोलकर, कुमुदिनी यावलकर, कल्पना उपाध्याय, दमयंती पांढरीपांडे, शुभलक्ष्मी चितळे, कल्याणी बुटी, शैल जेमिनी, अ‍ॅड. तेजस्विनी खाडे, नलिनी सोमकुवर, सुषमा पनकुले, नलिनी निसळ आणि अनुराधा कुरकुरे उपस्थित होते. प्रास्ताविक विशाखा बागडे यांनी केले. संचालन मनीषा कोठेकर यांनी केले.    
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=94730:2010-08-19-21-19-49&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56

No comments: