Pages

Friday, September 7, 2012

दोन मुलांना पोसण्यासाठी मातेने विकले तान्हे बाळ!


दोन मुलांना पोसण्यासाठी मातेने
 विकले तान्हे बाळ!
दलालांच्या सापळ्यात सापडलेल्या महिलेचे कृत्य
सुहास बिऱ्हाडे ,मुंबई 
नवऱ्याने घराबाहेर काढले, पोटात अन्नाचा कण नाही.. तीन लहान मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. छोटा मुलगा तर अवघा दीड महिन्याचा. पोरांना काय खाायला घालू या विवंचनेत असलेली ती आई अगतिक झाली होती.. मदतीच्या आशेने रस्त्यावरच इकडेतिकडे पाहात होती. दोन महिला तिच्यासमोरच उभ्या राहिल्या. कनवाळू नजरेनं त्यांनी तिला न्याहाळलं आणि तिला जणू देव भेटल्याचा भास झाला. त्या महिलांबरोबर ती चालू लागली. त्यांनी आसरा दिला, पण मुलांसह सगळ्यांचा सांभाळ करायचा असेल तर पैसे लागतील, अशी अट त्यांनी घातल्यानं ती भेदरली. आता काय वाढून ठेवलंय, या चिंतेनं पुन्हा सैरभैर झाली. पण आसरा तर हवाच होता. तिची ही अवस्था ओळखून त्या महिलांनीच तिला उपाय सुचविला. दीड महिन्यांचं तान्हुलं बाळ विकायचं आणि हाती पैसे येतील, त्यात पुढचं आयुष्य जगायचं!.. नाइलाजाने ती तयार झाली.. आणि एका स्वयंसेवी संस्थेकडे सौदाही झाला. दीड लाखाचा.. 
..आणि, मुले विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला! या स्वयंसेवी संस्थेने हा प्रकार ‘लोकसत्ता’ला कळविला आणि टोळीची पाळेमुळे खणण्यासाठी जाळे टाकण्यात आले. कांदिवलीच्या चारकोप येथे एका असहाय्य मातेचे बाळ विकण्याच्या धक्कादायक प्रकाराला वाचा फुटली! !
अमृता साळवी ऊर्फ अमृता झुबेर मोहम्मद खान (२०) ही महिला कांदिवलीच्या एकता नगर येथे नवऱ्यासोबत राहात होती. पाच वर्षांची सिमरन, दीड वर्षांचा अर्शद आणि अवघे ४५ दिवसांचे तान्हुले बाळ. तिचा नवरा वायरमनचे काम करायचा. आíथक परिस्थिती अतिशय हलाखीची. त्यात गेल्या शनिवारी घरात भांडय़ाला भांडं लागलं आणि रागावलेल्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढले. भुकेल्या मुलांना खायला काय देणार या विवंचनेत फिरत असताना रेश्मा खान (३५) आणि ललिता पासवान (२२) या दोन महिला तिला भेटल्या. त्यांनी अमृताला आसरा दिला, पण पैशांसाठी तिसरे बाळ विकण्यासाठी गळ घातली. बाळ विकून थोडे पसे येतील त्यातून दोन मुलांचे संगोपन कर, असा सल्ला त्यांनी दिला. परिस्थितीपुढे हतबल झालेली अमृता तयार झाली..


 या दलालांनी मालाडच्या आशापुरा फौंडेशन अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टशी संपर्क साधला. एक बाळ विकायचे आहे असे त्यांनी सांगितले. संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. लगेच त्यांनी ‘लोकसत्ता’शी संपर्क साधला आणि ही बाब प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितली. मग पोलिसांच्या मदतीने सापळा रचला गेला.
सोमवारी चारकोपच्या एका हॉटेलात ही महिला दोन दलालांसह आपले बाळ विकायला येणार होती. सध्या वेशातील महिला पोलीस, संस्थेचे कार्यकत्रे सज्ज झाले. चार वाजता सर्वजण हॉटेलमध्ये भेटले. बाळ विकायचा सौदा ठरला. एक लाख २० हजार द्यायचे नक्की झाले आणि तेवढय़ात पोलीस पुढे आले आणि या सर्वाना रंगेहाथ ताब्यात घेतले. स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हा प्रकार पोलिसांनी हाणून पडला. गरिबीमुळे पोटचा गोळा विकायला आपण तयार झालो, अशी अगतिक कबुली अमृताने पोलिसांना दिली. या पशांतून अवघे २० हजार रुपयेच तिला मिळणार होते. या महिला दलाल मुले विकण्याच्या टोळीशी संबंधित असाव्यात, असा पोलिसांचा संशय आहे. चारकोप पोलीस आता या प्रकरणाची पाळेमुळे शोधणार आहेत.

__________

असहाय अमृताच्या आयुष्याला असंख्य हातांचा आधार!
प्रतिनिधी / मुंबई
परिस्थितीने आलेली हतबलता आणि दलालांच्या तावडीत सापडून पोटचे मूल विकण्यास तयार झालेल्या अमृता ऊर्फ आफरिन शेख हिच्या शोकांतिकेचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसारित होताच तिला मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले आहेत. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या उपायुक्तांनी या वृत्तानंतर अमृताला सरकारी मदतीचा हात देऊ केला आहे. अनेक स्वयंसेवी संस्थादेखील अमृता आणि तिच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी पुढे आल्या आहेत. 
मद्यपी नवऱ्याने घराबाहेर काढलेली अमृता साळवी ऊर्फ आफरिन शेख आपल्या तीन लहान मुलांना घेऊन विमनस्कपणे भटकत असताना दोन महिला दलालांनी तिला गाठले आणि तिचे दीड महिन्यांचे तान्हे बाळ विकण्यास प्रवृत्त केले. परिस्थितीमुळे हतबल झालेली अमृता नाइलाजाने बाळ विकायला तयार झाली. सोमवारी ‘लोकसत्ता’ने पोलिसांच्या मदतीने सापळा लावून दलालांचा डाव उधळून लावला होता. कायद्यातील तरतुदींमुळे अमृताचीही रवानगी दलालांबरोबर तुरुंगात झाली आहे, तर तिची तीनही मुले तिच्यापासून दुरावून बालगृहात ठेवण्यात आली आहेत. 
राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागात जातपडताळणी विभागात उपायुक्त असलेले रतन बनसोडे यांनी अमृताची ही व्यथा वाचली आणि सरकारी मदतीचे आश्वासन दिले. 
निराधार महिला आणि मुलांसाठी सरकारच्या अनेक योजना असून, त्याद्वारे अमृताचे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अमृता आणि तिच्या तीन मुलांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी समाजकल्याण विभागाला प्रस्ताव पाठवून ते अमृताची भेट घेणार आहेत.
आशापुरा फाऊंडेशनने या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी उचलण्याचे तसेच अमृताला नोकरी देऊन स्वावलंबी करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. बोरिवलीच्या ईशान होम फाऊंडेशन फॉर एज्युकेशन या संस्थेने अमृताला जामीन मिळवून देण्याची आणि या प्रकरणातून अमृताला सोडविण्यासाठी तिला कायदेशीर मदतही देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत बोलताना संस्थेच्या अध्यक्षा डॉ. हेमा कुलकर्णी म्हणाल्या की, समाजातल्या अशा महिलांना आधार देण्यासाठी सर्वानी पुढे येण्याची गरज आहे. आमच्या संस्थेमार्फत तिला आणि तिच्या मुलांना आम्ही सर्वतोपरी मदत करू. मालाडची बोथोले फाऊंडेशन ही अनाथ मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. अमृताच्या तीनही मुलांना संस्था सांभाळणार असून, आई मुलांसोबत राहावी म्हणून अमृतालाही संस्थेत कामावर ठेवण्यास तयार असल्याचे संस्थेने सांगितले.     

सरकारही पुनर्वसनासाठी तयार
प्रतिक्रियांचा पाऊस
अमृताची शोकांतिका ‘लोकसत्ता’ने समोर आणल्यानंतर अमृताबद्दल सहानुभूती दर्शविणारे अनेक दूरध्वनी कार्यालयात येऊ लागले. अनेक वाचकांनी तिच्या व्यसनी पतीच्या कृतीबद्दल तीव्र संताप नोंदविला. फेसबुक आणि ट्विटरवरसुद्धा तिच्याबद्दल सहानुभूती दर्शविणाऱ्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला.
------------------------------------
साभार;





No comments: