Pages

Tuesday, May 17, 2011

महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राचा इतिहास
आर्याचा शिरकाव महाराष्ट्रात केव्हा झाला हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. पाणिनी,कात्यायन आणि पातंजली यांच्या ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून डॅा.भांडारकरंानी असे अनुमान काढले आहे की,भारतीय आर्यांना इ.स.पूर्व सातव्या शतका पर्यंत विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील प्रदेशाचे ज्ञान नव्हते. इ.स.पूर्व सातव्या शतकाच्या सुमारास आर्य विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे सरकू लागले असावेत.साधारणपणे इ.स.पूर्व 350 च्या सुमारास त्यांना दक्षिणेकडील तंजावर -मदुरैपर्यंतच्या सर्व प्रदेशाची माहिती झाली असली पाहिजे.
ब्राम्हणी धर्मशास्त्रात घातलेल्या बंधनामुळे कदाचित आर्यांचा प्रवेश महाराष्ट्रात लवकर झाला नसावा. बैाध्दायनाच्या धर्मसूत्राप्रमाणे आनर्त अंग,मगध,सौराष्ट,दक्षिणापथ,उपवृत, सिंध आणि सौवीर ह्या देशातील लोक संकरापासून निर्माण झाले आहेत.जो
कोणी आर,कारल्कर,पूंद्र,सौवीर,वंग, कलिंग किंवा प्रणून ह्या देशातून पर्यटन करील त्याने पुनस्तोम सर्वपृष्टीचे प्रायश्चित्त घ्यावे.विज्ञानेश्वर किंवा
याज्ञवल्क्य ह्याने धर्मसुत्रकार देवलाच्या खालील सूत्राचा उल्लेख केला आहे.
जो कोणी सिंध,सौवीर,सौराष्ट,सरहद्दीवरचे प्रांत,अंग,वंग, कलिंग आणि आन्ध्र देशातून पर्यटन करील त्याने आपली मुंज परत करावी.
ज्याप्रमाणे आर्य किंवा ब्राम्हणी संस्कृती महाराष्ट्रात निश्चित केव्हा आली हे सांगणे कठीण आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव केव्हा व कसे मिळाले हेही सांगणे कठीण आहे.भाषावार राज्यांची विभागणी होऊन 1 मे 1960 रोजी जे हल्लीचे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, तसे राजकीय दृष्ट्या एकसंघी महाराष्ट्र राज्य कधीच अस्तित्वात नव्हते. पाली वाङ्मयात अपरांत, अवन्ती, विदिशा,कोसल,अस्सक, अलक, दक्षिणापथ, आन्ध्र, महारठ्ठ, कोकणपथ इत्यादी देशाचा नामनिर्देश आहे.
काव्य-मीमांसेमध्ये अपरांत म्हणजे देवसभा ह्या नगराच्या पश्चिमेकडील प्रदेश असे म्हटले आहे देवसभा म्हणजे कोणते शहर ह्याची ओळख अजून पटली नाही. डॅा.भांडारकरांच्या मताप्रमाणे अ
परांत म्हणजे उत्तर कोकण.परंतु अपरांत म्हणजे उत्तर कोकण,नासिक, गुजरात, सौराष्ट, राजस्थान आणि सिंध या देशांचा मिळून झालेला असा एक प्रदेश असावा असेही बऱ्याच विव्दानांचे मत आहे.अवन्ती प्रदेश विंध्य पर्वताच्या दक्षिणेस खानदेशापर्यंत असावा विदिशा म्हणजे हल्लीचे विदर्भ. विनयपिटकाच्या महावग्गसुत्तामध्ये दक्षिणपथाचा उल्लेख आहे .अवंती प्रदेशातून दक्षिणेकडील गोदावरीच्या खोऱ्यास दक्षिणपथ म्हणत असावे असे वाटते. सुत्तनिपाताच्या पारायण वग्गात असे म्हटले आहे की, कोसल देशवासी बावरी ब्राम्हण दक्षिणपथात गेला आणि तेथे अस्सक राज्यात अलक राज्याच्या सीमेवर गोदावरी नदीच्या किनारी आश्रम करून राहू लागला.ह्यावरून सिद्ध होते की,गोदावरी नदीच्या आसपासच्या प्रदेशास त्या काळी दक्षिणपथ म्हणत असत.गोदावरी अस्सक आणि अलक राज्यांच्या मधून वाहत होती.अलक गोदावरीच्या उत्तरेस आणि अस्सक दक्षिणेस होता.
सिलोनमध्ये लिहिलेल्या पाली भाषेतील दीपवंस आणि महावंस या बैाध्दांचा इतिहास सांगणाऱ्या ग्रंथात महारठ्ठ देशाचा उल्लेख आहे. पाली भाषेतील महारठ्ठ याचे संस्कृतात महाराष्ट्र असे रूपांतर संस्कृत पंडितांनी केले आहे.महावंस हा ग्रंथ इ.स.पाचव्या शतकात लिहिला गेला.दीपवंस त्याच्या बऱ्याच अगोदर लिहिला गेला आहे. महावंसात असे म्हटले आहे की,स्थविर मोग्गलीपुत्त तिस्स याने(तिसऱ्या) संगीताचे काम संपल्यावर पुढील काळावर दृष्टी ठेवून सीमांत देशसमूहाला धम्म स्थापनेसाठी कार्तिक महिन्यात स्थाविरांना पाठविले. कोणकोणत्या धर्मउपदेशकांना कोठेकोठे पाठविले याची सविस्तर माहिती महावंसामध्ये आढळते त्यात महारठ्ठ महाधम्मरक्खितत्स्थेर नामकमू म्हणजे महाधम्मरक्खिताला महारठ्ठ नावाच्या देशाला पाठविले असा उल्लेख आहे.
अहिहोळ येथील लेखात, महाराष्ट्र हा तीन देशांचा मिळून नव्याण्णव हजार गावे असलेला प्रदेश असा उल्लेख आहे. अहिहोळ लेख शके 556 म्हणजे इ.स. 634 चाआहे ह्यू-एन-त्संगने आपल्या प्रवासवर्णनात ज्या मो-हो-लो-च्छि या देशाचे वर्णन केले आहे, तो देश म्हणजेच महाराष्ट्र असे विव्दानांचे मत आहे ह्यू-एन-त्संग महाराष्ट्र इ.स. 641-42 मध्ये होता.
भूगोलशास्त्रज्ञ टोलेमीने आपल्याग्रंथात महाराष्ट्राला अरीयके असे म्हटले आहे. टोलेमीने इ.स.नंतरच्या दुसऱ्या शतकात इजिप्तमधील अलेक्झांड्रीया विश्वविद्यालयात खगोलशास्त्र आणि भूगोल शिकवीत होता. कर्नाटकातील कलगदगी येथील लोक आजही महाराष्ट्राला अरी असे संबोधतात असे ठाणे जिल्ह्याच्या बॉम्बे गॅझेटीयरमध्ये लिहिले आहे.
काही लोकांनी राष्ट्रकूटावरून महाराष्ट्राचे महाराष्ट्र नाव पडले असे म्हटले आहे. पण ते बरोबर वाटत नाही. एकतर राष्ट्रकूटांच्या कितीतरी अगोदर महाराष्ट्र असे नाव पडले होते हे सिद्ध झाले आहे. तसेच कोणत्याच
व्युत्पत्तिशास्त्रानुसार राष्ट्रकूटाचे महाराष्ट्र होत नाही.
मौर्य साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता. पण त्यापूर्वीच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची माहिती मिळत नाही. सम्राट अशोकाच्या पाचव्या धम्माज्ञेचे शिलालेख सौराष्ट्रातील गिरनार, कटकजवळील धौली, जंगम जिल्ह्यातील जौगढ, हिमालयाजवळ खालसी, अफगाणिस्तानावरील शाहबाझगढी आणि पाकिस्तानातील मानसेहरा येथील खडकांवर कोरलेले आढळतात. त्या शिलालेखांत आपली प्रजा नीतीने वागते की नाही, हे पाहण्यासाठी आणि धम्माचे प्रतिपालन करण्यात प्रजेला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सम्राट अशोकाने ज्या निरनिराळ्या प्रदेशात धम्माधिकारी पाठविले, त्यात रस्तिक, पेटेनिक आणि अपरांत या देशांचा उल्लेख आहे. डॉ. भांडारकरांच्या मते, अपरांत म्हणजे उत्तर कोकण. त्याची प्रांतिक राजधानी सुप्पारक म्हणजे हल्लीचे सोपारा होती. पेटेनिक म्हणजे हल्लीच्या पैठण शेजारील प्रदेश आणि रस्तिक म्हणजे रथी किंवा महारथी लोक राहत असलेला प्रदेश असावा.
महाराष्ट्रातील लेण्यात ठिकठिकाणी सापडणारे रसिक आणि भोज लोकांचे संदर्भ डॉ. आळतेकरांनी शोधून काढले आहेत. त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास महाराष्ट्राच्या इतिहासावर आणि समाजरचनेवर नवीन प्रकाश पडेल. नाणेघाट येथील लेण्यात महारथी त्रनाकयीरा आणि त्याची मुलगी-सातकर्णी राजाची राणी नयनीका यांचे पुतळे एकमेकांशी कोरलेले आहेत असे लिहिलेले आहे. कार्ल्यांच्या लेण्यात महारथी गोतीपुत्त अगिमितनाक आणि महारथी वसिथीपुत्त सोमदेव यांचा निर्देश केलेला आहे. महारथी वसिथीपुत्त सोमदेवाने कार्ल्याच्या लेणीला एक गाव इनाम दिल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ सोमदेवाचा अधिकार तेथील तालुका प्रदेशावर अथवा जिल्ह्यावर असला पाहिजे. आणि गाव इनाम देण्याचा अधिकार त्यांच्याकडे असला पाहिजे. कान्हेरीच्या लेण्यात महारथी नागमूलनिकाचे नाव आढळते, ती एका महाभोज राजाची बहीण आहे, असे म्हटले आहे. कार्ल्याला असलेल्या एका सिंहस्तंभावर तो स्तंभ महारथी अगिमितनाक याने दान केला आहे, असा उल्लेख आहे. कान्हेरीला असलेल्या एका शिलालेखात एका देणगीदार स्त्रीचे नाव नागमूलनिका असून तिच्या मुलाचे नाव स्कंधनाक आहे, असे म्हटले आहे.
डॉ. आळतेकर म्हणतात की, इ.स. पूर्वी तिसऱ्या शतकाच्या अगोदर असलेली रथी आणि महारथींची राज्ये, आंध्राचे राज्य, महाराष्ट्रावर आल्यावर संपुष्टात आली असली पाहिजेत. ते पुढे म्हणतात की, भोज आणि रथिक लोकांच्या नावापुढे "नाक' हे संबोधन लावलेले आढळते त्यावरून रथिक आणि भोज लोक हे स्थानिक "नाग' जमातीचे असावेत किंवा ते नागाची पूजा तरी करीत असावेत.
महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या बौद्ध लेण्यातील शिलालेखनात नावाच्या पुढे "नाक' हे उपपद असलेल्या नावांची यादी खाली दिली आहे.
कान्हेरी लेण्यातील शिलालेखात - नकनाक अपरनाक, धमनाक, गोलनाक, मित्तनाक.
भाजा येथील शिलालेखात - अंपीनाक, किंवा अहीकीनाक.
कुडा येथील शिलालेखात - वसूलनाक, पुसनाक.
बेडसा येथील शिलालेखात - नाशिकचा शेठ आनंदचा मुलगा पुसनाक अपरदेवनाक. याची बायको महाभोजाची मुलगी महारथीनी महादेवी सामादिनिका.
कार्ला येथील शिलालेखात - महारथी अगिमितनाक, मितदेवनाक, उसभनाक.
शिवनेरी येथील लेण्यातील शिलालेखात - वीररसेनाक.
नाशिक येथील लेण्यातील शिलालेखात - राजमंत्री अरहलय-चालीसनाक राजमंत्री अगीयतनाक, कफननाक, रामनाक, वगैरे.
"नाक' हे उपपद नावाच्या शेवटी असल्यामुळे रथी आणि भोज लोक हे स्थागित नाग जमातीचे असावेत किंवा ती नागाची पूजा करणारी जमात असावी या डॉ. आळतेकरांनी काढलेल्या निष्कर्षाला त्यांनी काही आधार दिलेले नाहीत. महाराष्ट्रात गेल्या शतकापर्यंत "नाक' हे उपपद नावाच्या शेवटी लावणारी महार जमात आहे. सातारचे राज्य स्थापण्यास शिदनाक महाराने शाहू महाराजांची बाजू घेतली व अनेक लढ्यात पराक्रम केला. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्याला सांगली जिल्ह्यातील कळंबची जहागिरी दिली. त्याचा नातू शिदनाक याने आणि त्याच्या सैन्याने खर्ड्याच्या लढाईत पठाणांनी केलेल्या हल्ल्यात परशुरामभाऊ पटवर्धनाचा जीव वाचवला. नागेवाडीच्या पाटीलकीचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी नागनाक महाराने छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून मोगलांच्यापासून वाई जवळील वैराटगट जिंकून घेऊन घारादिव्य केले. त्याचप्रमाणे अमृतनाक आणि अंबरनाक महारांनी निझामशाही आणि बिदरच्या बहामनी बादशहांकडून महाराजांच्या बावन्न हक्कांच्या सनदी मिळविल्या.
इ.स. 1818 साली कोरेगाव येथे पेशवाईची शेवटची लढाई झाली. पुणे-अहमदनगर रस्त्यावर भीमानदीच्या किनारी एक रणस्तंभ आहे. त्याचे मुळचे नाव महास्तंभ असे होते. त्या स्तंभावर कोरेगावच्या लढाईत कामाला आलेल्या ज्या शूर महावीरांची नावे आहेत ती "नाक' हे उपपद शेवटी असलेली आहेत. उदा. सोमनाक, कमलनाक, रामनाक, येमनाक, गोदनाक, कोठेनाक, येसनाक इत्यादी.
नाक हे उपपद लावण्याच्या रिवाजावरून पूर्वींचे रथी-महारथी आणि भोज महाभोज म्हणजेच हल्लीचे अस्पृश्य समजले जाणारे लोक असावेत असे वाटते. राजभोज हे आडनाव पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यात ठिकठिकाणी आढळते.
आंध्रच्या सातवाहनांची आपल्या राज्याचा महाराष्ट्रात विस्तार करतांना त्यांना रथी-महारथींनी तसेच भोज-महाभोजांनी बराच विरोध केला असला पाहिजे. म्हणून त्यांना "अरि' म्हणजे शत्रू असे नाव पडले असले पाहिजे. त्यावरूनच अरियके असे नाव रथी-महापरथींच्या प्रदेशाला इ.स. पूर्वी पहिल्या शतकात पडले असले पाहिले आणि म्हणूनच टोलेमीने आपल्या ग्रंथात महाराष्ट्राला अरियके असे म्हटले आहे असे वाटते.े
मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य(इ.स.पूर्वी 324 ते इ.स.पूर्वी 300)याच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होता किंवा नव्हता आणि होत असल्यास महाराष्ट्राच्या कोणत्या भागापर्यंत त्याचे साम्राज्य पसरलेले होते ह्याचा निश्चित पुरावा अजुन मिळाला नाही.पण त्याचा नातू सम्राट अशोक(इ.स.पूर्व274 ते 23) ह्याच्या साम्राज्यात महाराष्ट्राचा समावेश होत होता ह्याचा निश्चित पुरावा सापडतो.
सम्राट अशोकाच्या आठव्या आणि नवव्या धर्माज्ञेचे शिलाखंड ठाणे जिल्ह्याजील सोपारा येथे सापडले आहेत. सोपारा ही मौर्याची प्रांतिक राजधानी होती.
मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट बृहद्रथ हा आपल्या सैन्याची पाहणी करीत असता शुंग वंशातील पुष्पमित्र नावाच्या एका सेनापतीने त्याला कपटाने मारले(इ.स.पूर्वी 184) आणि मौर्याचे राज्य बळकावले.जरी उत्तरेत मौर्याचे राज्य संपुष्टात आले होते,तरी महाराष्ट्रात त्यांची छोटी छोटी राज्य बराच काळपर्यंत अस्तित्वात होती.चालुक्य घराण्यातील दुसऱ्या पुलकेशीने कोकणातील मौर्यांचा इ.स.625 च्या सुमारास विशेष प्रयास न करता पराभव केला असा ताम्रपटात उल्लेख आहे.
मा. श. मोरे



No comments: