Pages

Wednesday, March 19, 2014

विडी कामगारांची परिस्थिती हालाखीची

 विडी कामगारांची परिस्थिती हालाखीची


विडी कामगार महिलांची परवड सोलापूर म्हणजे विडी उत्पादनाचे माहेरघर. संपूर्णपणे शारीरिक श्रम आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांवर अवलंबून असलेल्या या  उद्योगाला औद्योगिकीकरण व स्पर्धेच्या काळात घरघर लागलेली आहे. अनेक कारखाने बंद आहेत. जे सुरू आहेत तेथील  कामगारांची परिस्थिती हालाखीची आहे, ज्यात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. दिवसभर 8 ते 9 तास काम करून  आठवड्याला जेमतेम 500 रुपये मोबदला मिळवणार्‍या त्या महिलेने जी माहिती सांगितली त्यामधील काही ठळक मुद्दे  सांगावेसे वाटतात.
पती काम करीत नाही, चार मुली, दोन मुलगे असे एकूण आठ जणांचे कुटुंब. मुली विवाहित असून आता मुलेही विडी कामगार  म्हणून काम करतात. रोज 8 ते 9 तास काम करून 500-600 विड्या तयार करायच्याच. आठवडाभर असे काम केल्यावर  मोबदला मिळणार 500 रुपये. कंपनीच्या पिळवणुकीचे उदाहरण म्हणजे 500 विड्या तयार करण्यासाठी लागणार्‍या पान व  तंबाखू या कच्च्या वस्तू गरजेपेक्षा कमी दिल्या जातात. परिणामी कामगारांना बाजारातून उर्वरित कच्चा माल विकत आणावा  लागतो, खर्च येतो 150 रु. म्हणजे आठवड्याचा मोबदला फक्त 350 रुपये.
कंपनीच्या या पिळवणुकीविरोधात तक्रार करावी तर कोणी मदत करीत नाही. सरकार लक्ष देत नाही. आयुष्यभर काम  केल्यानंतर निवृत्तीनंतरही पेन्शन अतिशय तुटपुंजी. आरोग्यविषयकही सुविधा नाहीत, सरकारी आदेश व कायद्यानुसार शैक्षणिक  शिष्यवृत्ती फक्त एकाच अपत्यास मिळते त्यामुळे अज्ञानाचे प्रमाण अधिक.
1995मध्ये राज्य सरकार आणि 1997मध्ये केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी उद्योजकांच्या दबावामुळे  अजूनही झालेली नाही. आणि झाली तरीही अपूर्णच. रेल्वे रुळाच्या बाजूला राहणारी आणि 30 वर्षांपासून निरंतर विडी  कामगार असणारी ती महिला कामगार म्हणजे 8-9 तास काम करून मिळणार्‍या त्या तुटपुंज्या वेतनावर खाचका खात जीवन  जगणार्‍या अनेकांची प्रतिनिधी आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अशा सर्व बाजूंनी असुरक्षित जीवन जगणार्‍या या  कामगारांकडे झोपलेल्या सरकारने जागे होऊन ठोस निर्णय घेऊन पिळवणूक करणार्‍या उद्योजकांविरुद्ध कारवाई करायला हवी.  पेन्शन, शैक्षणिक सुविधा द्यायला हव्यात.

No comments: