महिला दिनाचा इतिहास
8 मार्च 1857 ला न्यूयॉर्क इथे कापड गिरण्यात काम करणाऱ्या महिला कामगार स्वत:वर होत असलेल्या अमानुष शोषणाच्या विरोधात पहिल्या प्रथम लढा करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. त्यांना स्वत:साठी काही अधिकार देखील हवे होते. त्यांचा लढा सशस्त्र पोलीस, घोडेस्वार वगैरेंच्या मदतीने भांडवलदारांनी मोडून काढण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु लढयाचे हे लोण अमेरिकेतच नव्हे तर युरोपमध्ये देखील पसरले. 1866 मध्ये कामगारांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात स्त्री कामगारांच्या प्रश्नावर ठराव पास करण्यात आला. ह्या ठरावाने स्त्रियांचे काम फक्त घराच्या चार भिंतीत असे ह्या सर्वसाधारण समजुतीचा रहस्यभेद केला. स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टिने हे एक महत्वाचे पाऊल होते. पुढे 1871 मध्ये फ्रांसची राजधानी पॅरीसमध्ये झालेल्या सुप्रसिद्ध पॅरिस कम्यूनमध्ये स्त्रियांनी हजारोंच्या संख्येने भाग घेऊन कामगार वर्गाने स्थापित केलेल्या सरकारचा बचाव करण्यासाठी भांडवलदारी शक्तीने केलेल्या हल्ल्यांच्या विरोधात प्रत्यक्ष लढाईत भाग घेऊन अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. 1889 मध्ये 19 जुलै ह्या दिवशी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात भाषण देताना क्लारा झेटिकनने स्त्रियांचा कामाचा अधिकार, मुले आणि मातृत्वाची रक्षा व आंतरराष्ट्रीय राजकारण व घडामोडींमध्ये स्त्रियांच्या सहभागाची आवश्यकता ह्यावर जोर दिला. त्यानंतर 1899 मध्ये युद्धाच्या विरोधात स्त्रियांचे पहिले आंतरराष्ट्रीय अधिवेशन झाले व त्यापुढे युद्धविरोधी आंदोलन अधिकच मजबूत होत चालले. 1910 मध्ये समाजवादी महिलांचे कोपनहेगन इथे दुसरे आंतरराष्ट्रीय अधिवेशन झाले. ह्या अधिवेशनात क्लारा झेटिकनद्वारा एक ऐतिहासिक ठराव मांडण्यात आला. ह्या ठरावात म्हटले होते की, 'दरवर्षी एक विशेष दिवस साजरा केला जावा ज्या दिवशी विश्वशांती, स्वातंत्र्य आणि स्त्रियांचे अधिकार ह्या मुद्यांवर संघर्ष करणाऱ्या जगभरच्या स्त्रिया आपली एकजूट दाखवण्यासाठी जागोजागी एकत्र येतील' ह्या अधिवेशनाला आलेल्या जगातील 17 देशांच्या प्रतिनिधी स्त्रियांनी हा ठराव एकमताने पास केला. ह्या ठरावाला एवढया प्रचंड प्रमाणात मान्यता मिळण्याचे कारण हेच होते की, तो देशोदेशीच्या स्त्रियांच्या दैनंदिन अनुभवांवर आधारलेला होता. ह्या ठरावावर ठिकठिकाणी चर्चा झाल्या आणि अत्यंत अनुकूल अशा प्रतिक्रिया आल्या. अखेर शेवटी 8 मार्च 1911 ला जर्मनी, डेन्मार्क, स्वित्झर्लंड आणि ऑस्टि्रया ह्या देशातील महिलांनी पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिवस कामगार स्त्रियांच्या न्यूयॉर्कमध्ये झालेल्या पहिल्या लढयाची आठवण म्हणून साजरा केला.
No comments:
Post a Comment