अक्काराणी ते याहामोगी डाकीण प्रथा विरोधी संवाद यात्रानंदुरबार जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व विविध संस्थांच्या
सहभागाने नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 4 वर्षापासून डाकीण प्रथा विरोधी प्रबोधन मोहीम सुरु आहे. या विषयावरील भारतातील हा पहिला संघटीत प्रबोधनाचा प्रयत्न. त्यातीलच एका उपक्रमाचा हा वृत्तांत...
''डाकीण नाहा आमू बायऱ्या, याहा मोगीन् आमू हाय पोयऱ्या''. (आम्ही स्त्रीया डाकीण नसून देवमोगरा मातेच्या मुली आहोत.) अशी घोषणा घेऊन 'अक्काराणी ते याहामोगी' म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडयाच्या कुशीत वसलेल्या धडगाव गावापासून ते गुजरात राज्यातील आदिवासी जमातीची कुलदैवत देवमोगरादेवी पर्यंत 300 किमीचा प्रवास करत संवाद यात्रा संपन्न झाली. सुमारे 7000 व्यक्तिंशी संवाद साधत डाकीणीची अमानुष, अघोरी प्रथा नष्ट करण्यासाठी समाजातील सर्व प्रमुख घटकांना या प्रबोधनाच्या प्रवाहाचा भाग होण्यास संकल्पित केले. शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण व आंदोलने अशा विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधींनी यात्रेत सहभागी होऊन प्रबोधनाला अधिक व्यापक बनविले.
दिनांक 21 डिसेंबर 2007 रोजी यात्रेची सुरुवात अक्काराणीच्या किल्ल्यावरून संवाद मशालीचे प्रज्वलन करून झाली. आदिवासी जमातीच्या इतिहासातली एक कर्तबगार अध्याय म्हणजे अक्काराणी. भग्न अवस्थेतला किल्लाही आज त्या इतिहासाची साक्ष देतो. सातपुडयाच्या दऱ्याखोऱ्यांना मागे टाकत मध्येच एका खोल छोटया पठारावर बांधलेला अक्काराणीचा किल्ला. जेवढा भग्न तेवढाच उपेक्षित. तेथून मोहीमेच्या कार्यकर्त्यांनी कार्यवाह अविनाश पाटील व यात्रेचे संयोजक गुजऱ्या हनुमान वळवी यांच्या नेतृत्वात डाकीण प्रथा नष्ट करण्यासाठी संवाद मशालीच्या साक्षीने 'हम होंगे कामयाब' गीताचे गायन केले, आणि या आशावादी गीताने संवाद यात्रेचा प्रवास सुरू झाला, धडगाव तालुक्यातीलच मुंगबारी गावाकडे, यात्रेच्या उद्धाटनासाठी. धडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते संवाद ज्योतीस अभिवादन करुन यात्रेचे उद्धाटन झाले. आपल्या उद्धाटनपर मनोगतात आमदारांनी डाकीण प्रथेचे मूळ कारण आदिवासी भागातील शिक्षण व आरोग्य यांच्या समस्येत असल्याचे सांगितले. जोपर्यंत आदिवासी समाजात गुणवत्तापूर्ण शिक्षण व चांगले आरोग्य मिळत नाही तोपर्यंत आदिवासी मन हे अंधश्रध्दच राहणार आणि त्यातून डाकीणीसारख्या अघोरी प्रथा, जीवंतच राहतील अशी मांडणी त्यांनी केली. मोहीमेचे ब्रीद वाक्य 'संवादातून परिवर्तनाकडे असे आहे, त्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त करत ह्याप्रश्नाच्या निराकरणासाठी संघर्षापेक्षा संवादाची अधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी नंदुरबार जि.प.च्या महिला बालकल्याण विभागाच्या सभापती विजयाताई पावरा होत्या, तर अध्यक्षस्थानी माजी आमदार जनार्दन महाराज पोहऱ्या वळवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहीमेचे कार्याध्यक्ष प्रा. बी. एस. पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. अर्जुन लालचंदाणी, प्राचार्य मधुकर पाटील, कार्यवाह अविनाश पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यू. जी. पाटील, उ.म.वि. चे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. विलास चव्हाण, जिल्हा समन्वयक प्रा. सुनिल कुंवर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचलन आदिवासी एकता परिषदेचे राजीव बी. पावरा यांनी केले.
धडगाव येथून दिनांक 21 डिसेंबर रोजी निघालेली संवाद यात्रा सातपुडयाच्या पर्वतरांगेतील गावागावात जाऊन, आश्रमशाळांमध्ये जाऊन संवाद साधत होती. प्रबोधन करत होती. शिकवत होती आणि नवीन शिकत होती. डाकीणीच्या प्रश्नाचे दाहक वास्तव अधिक ठळकपणे समजून घेता आले. आश्रमशाळांच्या 90 टक्के विद्यार्थ्यांचा डाकीण असण्याबाबतचा पक्का समज असल्याचे विदारक चित्रही बघायला मिळाले. सेंन्सेक्सची विक्रमी भरारी आणि महाशक्तीच्या गप्पात रंगणाऱ्या भारतातीलच एका प्रगतीशील आणि पुरोगामी राज्यातील आश्रमशाळांतील कोवळया मनाला आजही डाकीणीसारख्या कल्पना वास्तव वाटतात, आपली शिक्षणव्यवस्था येथे अपयशीच ठरली, हेच म्हणावे लागेल. डाकीण, भूत अशी पात्रे आज वेताळाच्या काल्पनिक कथांमध्येच वाचायला मिळतात, असाच सर्वांचा समज, पण आजही प्रत्यक्षात महिलांना डाकीण ठरविले जाते, तिचा शारीरिक मानसिक छळ केला जातो. तिला गावात जाहीर फिरण्यास मज्जाव केला जातो, कधी गावातून हाकलून लावले जाते तर कधी जीवे मारले जाते. हे आजही येथे घडतेय.
संवाद यात्रेच्या निमित्ताने ह्या प्रश्नाची सामाजिक, वैज्ञानिक दृष्टीकोनातून मांडणी करण्यात आली. सर्व आश्रमशाळांत आदिवासी बोलीभाषेतच हा विचार पोहोचविण्यात आला. मुले संपूर्ण कार्यक्रम उत्साहाने बघत होती व सहभागीही होत होती. मुलांबरोबर गावकरीही कार्यक्रमात सहभागी होत होती. त्याचबरोबर यात्रेदरम्यान अनेक पिडीत महिलांशी संवाद साधण्यात आला. चित्रलेखा साप्ताहिकाच्या संध्या नरे पवार यांनी पूर्णकाळ यात्रेत उपस्थित राहून अशा अनेक पिडीत महिलांना बोलतं केलं. मांडवी, सुखाणी, मोजरा, कात्री, भांग्रापाणी, सुरगस, डाब, मोलगी, पेचरीदेव अशा गावातील आश्रमशाळांना संवाद यात्रेचे कार्यक्रम झाले. आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, परिसरातील जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच पोलिस पाटील असे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहत होते.
संवाद यात्रेत मोलगी, देवमोगरानगर, व खापर या प्रमुख गावांना जाहीर मेळावे घेण्यात आले. लक्षणीय उपस्थिती होती. मोलगी येथील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जि.प.चे शिक्षक सभापती सी. के. दादा पाडवी होते, उद्धाटक म्हणून प्रज्ञा कला महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष सायसिंग भाऊसाहेब हे होते. रामसिंग वळवी, धनसिंग पाडवी हे प्रमुख अतिथी होते. शिक्षण सभापती सी. के. दादा पाडवी यांनी डाकीणीच्या अघोरी प्रथेच्या विरोधात आम्ही लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या, विचारधारेच्या अस्मिता बाजूला ठेवून एकत्रितपणे लढू असे आश्वासन दिले. खापर गावातील जाहीर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र पाडवी होते. त्यांनी आपल्या मनोगतात डाकीण प्रथेची भयानकता प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची माहीती देत स्पष्ट केली. डाकीणीच्या प्रथेमुळे आदिवासी महिलेस भोगाव्या लागणाऱ्या यातनांची माहीती जेव्हा श्रोतृसमुदाय ऐकत होता, तेव्हा या प्रश्नांची विदारकता सर्वांच्याच काळजाचा ठेका चुकवत होती.
खापर येथून यात्रा दिनांक 25 डिसेंबर रोजी गुजराथ राज्यातील देवमोगरादेवी येथे पोहोचली. तेथे देवमोगरा मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष केसरसिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात केसरसिंग यांनी आदिवासी जमातीतील अंधश्रध्दांवर कडक टीका केली, कोणत्याही समाजाला प्रगतीची पाऊले टाकायची असतील तर ती अंधश्रध्दा मानसिकतेसोबत कधीच पुढे पडणार नाही, म्हणून ही मानसिकता टाकूनच विकासाच्या दिशेने जाता येते, असे त्यांनी मांडले. कार्यक्रमात मोहीमेच्या कार्यकर्त्या हेमलता पाटील यांनी अंगात येऊन जळता कापूर खाऊन दाखविला. तेव्हा मंदिरात अंगात येऊन घुमत असणाऱ्या अन्य स्त्रियांनी हेमलता पाटील यांचा चमत्कार बघून अचानकपणे आपले स्वतःचे घुमणे बंद केले. ही बाब कार्यकर्त्यांच्या नजरेतून सुटू शकली नाही.
शेवटी मोहीमेचे कार्यवाह अविनाश पाटील यांच्या नेतृत्वात सर्वांनी संकल्प घेतला - ''आदिवासी जमातीतील आमच्या आया-बहिणींना आज डाकीण ठरवून छळले जात आहे. या अघोरी प्रथेविरोधात प्रबोधनाची व संघर्षाची धार अधिक तीव्र करणार आणि या मोहीमेचे नेतृत्व भविष्यात तरुण आदिवासी कार्यकर्त्यांनी करण्यासाठी कटिबध्द राहणार..'' असा संकल्प घेऊन संवाद यात्रेची सांगता झाली. समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहादुरसिंग पाडवी यांनी केले व सुत्रसंचालन विनायक सावळे यांनी केले. डाकीणीच्या प्रश्नाची भयानकता अधिक प्रखरतेने या संवादयात्रेतून पुन्हा समोर आली. या यात्रेच्या निमित्ताने सातपुडयाच्या दऱ्याखोऱ्यात महिलांना डाकीण ठरवून त्यांचा दबलेला हुंकार ओठावर आला. पिडीत महिला आपल्या कुटूंबियांसह पुढे येऊन आपली कैफियत मांडू लागल्या. पोलीस ठाण्यात जाऊन कार्यकर्त्यांनी डाकीणीबाबतच्या गुन्ह्यांची माहीती घेतली. पिडीत महिलेस सुरक्षा व न्याय देण्याबाबत दबाव निर्माण करण्यात आला. आदिवासी समाजातील पारंपारीक न्याय व्यवस्था असलेल्या जातपंचायतीत महिलांना प्रतिनिधीत्व असावे ही मागणी समाजासमोर मांडण्यात आली. लोकप्रतिनिधींनी आपापल्या पक्षाच्या अस्मिता आणि विचारधारा बाजूला ठेवत डाकीण प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याची स्पष्ट भूमिका घेतली, हे या संवाद यात्रेचं फलित.
या यात्रेत कार्यवाह अविनाश पाटील, समन्वयक विनायक सावळे, प्रा. केशव पावरा, आर.सी. वसावे, गुजऱ्या हनुमान वळवी, वीरसिंग वळवी, मोतीराम खात्र्या पाडवी, बहादुरसिंग पाडवी, विजय चितोड, सुरेश बोरसे, माणिकलालभाई पाटील, प्रदीप केदारे, भिवसाणे, हेमलता पाटील,. स्मिता शिरसाळे इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले. यात्रेच्या यशस्वीतेसाठी संयोजन संपर्क गुजऱ्या हनुमान वळवी यांनी केले. शेवटी एवढेच सांगू इच्छीतो, की, तथाकथित विकासाच्या स्वप्नांवर झुलणाऱ्या नागरी समाजास आपल्या वास्तव विकासाचे वस्तुनिष्ठ भान येण्यास ही संवाद यात्रा निमित्त ठरेल, अशी आशा वाटते.