सावित्रीबाई फुले यांचा उचित सन्मान
सागर भालेराव
| Oct 30, 2013, 02:43AM IST

‘कर्मठ’ पुण्याची ‘सांस्कृतिक’ पुणे ओळख निर्माण करण्यासाठी महात्मा फुले यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांत सावित्रीबाई खंबीरपणे जोतिबांच्या मागे उभ्या राहिल्या. ज्या समाजात स्त्रियांना ज्ञानार्जनबंदी होती, त्या समाजाच्या विरोधात उभे राहून परिवर्तनाचा एल्गार पुकारणारे हे दांपत्य ख-या अर्थाने या देशाचे कोहिनूर ठरले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये स्त्रियांना पंचम वर्ग म्हणून मान्यता होती. अस्पृश्यांपेक्षा कठोर वागणूक या स्त्रीवर्गाला भोगावी लागली होती. दास्यपणाची, गुलामगिरीची जाणीव शिक्षणाशिवाय रुजू घालू शकत नाही हे महात्मा फुले यांनी ओळखलं आणि स्त्री शिकली की, समाज शिकेल आणि कर्मठ प्रथा बंद होतील, हे जाणून त्यांनी आपल्या पत्नीला, म्हणजेच सावित्रीबार्इंना शिक्षण दिलं. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबार्इंचा जन्म झाला; पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. 1851 मध्ये पुण्यातच स्त्रियांसाठी भिडे वाड्यात त्यांनी सुरू केलेली मुलींसाठीची शाळा त्यांच्या दूरदृष्टीची आजही साक्ष देत आहे.
‘विद्येविना मती गेली । मतिविना नीती गेली । नीतिविना गती गेली । गतिविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले’
हे सत्य स्वीकारत त्यांनी दलितोद्धारासाठी आजन्म कार्य केले. ‘सत्यशोधक समाज’मध्ये असलेले सावित्रीबार्इंचे योगदानदेखील वादातीत असंच आहे. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती?’ हे समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते आणि महात्मा फुल्यांच्या पाठीवर हे काम सावित्रीबार्इंनी अविचलपणे पेललं.
आज महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर आकाशाला गवसणी घालणा-या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा अशा सगळ्या क्षेत्रांत ज्या महिला दिसत आहेत त्या सावित्रीबार्इंच्या ऋणी आहेत. काल जर त्यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रचली नसती, तर महिला सक्षमीकरणाचा पायंडा पडलाच नसता. बालविवाहाला विरोध करणा-या सावित्रीबाई, बलात्कारामुळे गरोदर असलेल्या बाईचं बाळंतपण करणारी सावित्रीबाई, पोटापाण्यासाठी शरीरविक्री करणा-या माय-माउलीला दुष्टांच्या तावडीतून सोडून आणणारी सावित्रीबाई आणि प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांना आईच्या मायेप्रमाणे शुश्रूषा करणा-या सावित्रीबाई आजदेखील एक अद्भुत रसायन वाटतात. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या नामविस्तारामुळे सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस नक्कीच न्याय मिळणार आहे. त्यांच्या कर्मभूमीत असलेल्या या विद्यापीठाला एक आणखी एक नवी ओळख मिळेल आणि येणा-या अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या कार्याचा महिमा हा विद्यापीठरूपाने सर्वांच्या नजरेत राहणार आहे. सध्या सिनेटचा हा निर्णय राज्य शासनाकडे विचाराधीन आहे, येणा-या काळात शासन किती लवकर निर्णय घेते हे पाहण्याजोगे असेल. गेल्या 7-8 वर्षांपासून काही संघटना पुणे विद्यापीठाचे नामांतर व्हावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत होत्या. सोशल मीडियावर या मागणीला पाठिंबा देणारे पेजदेखील बनवण्यात आले होते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या मागणीला पाठिंबा मिळवण्याचा उत्कृष्ट प्रयोग या प्रकरणामध्ये करण्यात आल्याचे आढळते. पुणे विद्यापीठ नामविस्ताराला कुणाची हरकत असेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही; परंतु भविष्यात काही समाजविघातक शक्तींकडून याला विरोध होऊ शकतो. याच सुसंस्कृत पुण्यात ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती. धर्मांध शक्तीकडे पुणे परत तर वळले जात नाही ना? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या एकजुटीचे प्रदर्शन दाखवून महाराष्ट्राची सुज्ञ जनता, पुरोगामी विचारांशी प्रामाणिक राहील अशी ग्वाही द्यायला हवी.
No comments:
Post a Comment