काश्मिरातील पंचायत निवडणुकीत
महिला सरपंचांचे प्रमाण एक टक्कासुद्धा नाही
देश-विदेश श्रीनगर, २४ जुलै / पी.टी.आय.
पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात महिलांना आरक्षणाच्या माध्यमातून संधी देण्याचे कितीही प्रयत्न सरकारतर्फे सुरू असले तरी जम्मू-काश्मीर मधील पंचायत समित्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महिला सरपंचांचे प्रमाण एक टक्कासुद्धा नाही. राज्यातील २२ जिल्ह्य़ांमधील पंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या ४ हजार ११३ सरपंचांमध्ये फक्त २८ महिला असून याची टक्केवारी अवघी .६८ एवढी आहे. जम्मू-काश्मिरच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने केलेल्या संकलनात २२ जिल्ह्य़ांपैकी ११ जिल्ह्य़ांमध्ये एकही महिला सरपंच निवडून आलेली नाही. सर्व जागी पुरुष सरपंचांचे वर्चस्व आहे. खोऱ्यातील १० जिल्ह्य़ांपैकी ८ जिल्ह्य़ांमध्ये एकही महिला सरपंच नाही. उत्तर काश्मिरातील बारामुल्ला आणि दक्षिण काश्मिरातील शोपियाँ जिल्ह्य़ात तीन महिला सरपंचपदी निवडून आल्या आहेत. परंतु, ४५३ पदांपैकी फक्त तीनच पदांवर महिलांची निवड होणे हे लिंगभेद अद्याप संपुष्टात न आल्याचेच लक्षण असल्याचे मानले जात आहे. आश्चर्य म्हणजे लेह आणि कारगिल या दोन जिल्ह्य़ात महिलांचे राजकारणातील अस्तित्व दखल घेण्याजोगे असूनही या जिल्ह्य़ांमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीत एकही महिला विजयी होऊ शकली नाही. जम्मू विभागातील किश्तवार जिल्ह्य़ात एकाही महिलेला विजय मिळवता आलेला नाही. उर्वरित ९ जिल्ह्य़ांमध्ये महिला निवडून आल्या असल्या तरी त्यांचे अस्तित्व अत्यंत तुरळक आहे. उधमपूर आणि पूंछ या जिल्ह्य़ात प्रत्येक पाच आणि चार महिला सरपंचांची निवड झाली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी बी.आर. शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पंचायत निवडणुकीत महिला मोठय़ा संख्येने सहभागी होण्यास तयार नसल्याने प्रमाणात विसंगती निर्माण झाली असावी. तसेच अनेक पंचायत समित्यांमध्ये महिला सरपंचांसाठी आरक्षण नव्हते. शिवाय कित्येक वर्षांनंतर पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. घटनातज्ज्ञांच्या मते ७३ व्या घटनादुरुस्तीचा प्रभावी अंमल करण्यात अपयश आल्याने असे घडले असावे. महिलांसाठी आरक्षण नसल्याने पुरुषांच्या वर्चस्वाला शह देण्यात त्या अपयशी ठरल्या. विरोधी पक्षनेत्या व पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी पंचायत समित्यांची निवडणूक हा ग्रामीण भागातील महिलांसाठी नवा अनुभव असल्याचे सांगितले. पहिलीच निवडणूक असल्याने महिला मोठय़ा प्रमाणात समोर आल्या नाहीत. परंतु, पुढच्या वेळी चित्र कदाचित बदललेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment