
केईएममध्ये नर्स असलेल्या अरुणांवर 1973 मध्ये लैंगिक अत्याचार झाले होते. वॉर्डबॉय सोहनलाल वाल्मीकीने बलात्कार करण्याआधी त्यांचा साखळीने गळा आवळला होता. त्या वेळी झटापटीत त्यांच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद होऊन त्या कोमात गेल्या मात्र त्या परत कधीच शुद्धीवर आल्या नाहीत. तेव्हापासून केईएममध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होत. गेल्या चार-पाच दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडली होती. अरूणा शानबाग यांना न्यूमोनिया झाला होता. तसेच त्यांच्या फुप्फुसांना संसर्ग झाला होता. त्यानंतर श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने ताबडतोब अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते.
गेली तीन-चार दिवस शानभाग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. तेव्हापासून अरुणा या व्हेंटिलेटरवरच होत्या. त्यांची प्रकृती गंभीर होती मात्र, त्या उपचाराला थोडीफार प्रतिसाद देऊ लागल्या होत्या. त्यामुळे शानबाग या आजारातूनही बाहेर येतील अशी होती मात्र अखेर त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.
गेली 42 वर्षे केईएम रुग्णालयात कोमात असलेल्या नर्स अरुणा शानबाग यांचा मागील चार दिवसापासून मृत्यूशी संघर्ष सुरु होता. न्यूमोनिया झाल्याने अरुणाला श्वासोच्छ्वास घेणे कठीण जात असल्याने त्यांना व्हेंव्हिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्यांचे निधन झाल्याची अफवा शनिवारी सायंकाळी पसरली होती. मात्र केईएमच्या डॉक्टरांनी ते वृत्त फेटाळले होते.
27 नोव्हेंबर 1973... तो काळा दिवस!
27 नोव्हेंबर 1973 हा दिवस अरुणांच्या जीवनात भयंकर घटना घेऊन आला. केईएममधील एक अतिशय उत्साही व देखणी नर्स म्हणून अरुणांची ख्याती होती. विशेष म्हणजे सर्वांना मदत करण्यासाठी ती कायम पुढे असायची. मात्र, या दिवशी ड्यूटी संपवून त्या घरी परतण्याच्या तयारीत होत्या. कपडे बदलण्यासाठी त्या केईएमच्या सीव्हीटीसी इमारतीच्या तळघरात गेली होती आणि ही वेळ साधून वॉर्डबॉय सोहनलाल वाल्मिकीने त्यांचा गळा आवळला. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी अरुणाने प्रचंड धडपड केली. मात्र, साखळी मानेत घट्ट रुतल्याने अरुणाच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाला आणि त्या कोमात गेल्या. त्यानंतर त्या आज तागायत म्हणजे तब्बल 42 वर्षे कोमात होत्या. घटना घडली तेव्हा अरूणा जेमतेम 20 वर्षाच्या होत्या. अरुणाला एक बहीण सोडली तर नातेवाईक नव्हते. बहिणीची परिस्थिती जेमतेम असल्याने कोमात गेलेल्या अरुणाला सांभाळणे तिच्यासाठी कठीण होते; पण केईएमने त्यांची जबाबदारी उचलली. केईएममधील नर्सेसनी त्यांना आपली मोठी बहीण मानत गेली 42 वर्षे अतिशय आपुलकीने त्यांची सेवा केली. केईएमच्या परिवारानेही त्यांची आनंदाने सेवा केली. अरुणाचे गेली चार दशके केईएम हेच घर होते.
जगण्याने छळले होते, मृत्यूने सुटका केली-
अरूणा यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर त्यांच्या जीवनावर एक नाटक आले होते. वैजंयती आपटे यांनी त्यांच्या आयुष्यावर व घडलेल्या घटनेवर नाटक लिहले होते. त्यांनी अरूणा यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. शानभाग यांना इच्छामरण द्यावे, अशी याचिका त्यांच्या जीवनावर पुस्तक लिहिणा-या लेखिका पिंकी विराणी यांनी केली होती. मात्र विराणी यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती. पिंकी विराणींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. जगण्याने तिला छळले होते, मृत्यूने तिची सुटका केली अशी दु:खद प्रतिक्रिया पिंकी विराणी यांनी दिली आहे. शिवसेनेच्या नेत्या व आमदार निलम गो-हे यांनीही अरूणा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
-------------------
सोहनलालने अरुणावर अत्याचार केल्यानंतर कुत्र्याच्या गळ्यातील साखळीने
तिची मान आवळली. त्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबल्याने व तिला हा
धक्का सहन न झाल्याने ती कोमात गेली. पोलिसांना पुढे काही पुरावे सापडले व
सोहनलालला अटक केली. अरुणा पोलिसांना हे सांगू शकली नाही की तिच्यासोबत
नेमके काय काय घडले. पुढे सोहनलालवर कानातील बाळी लुटणे व हत्या करण्याचा
प्रयत्न यानुसार खटला चालला. त्याला सात वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर तो
तुरुंगातून बाहेर आला. सूत्रांच्या माहितीनुसार, सोहनलाल सध्या आपले नाव बदलून दिल्लीतील एका रूग्णालयात काम करीत आहे.
link : http://divyamarathi.bhaskar.com/news-ht/MAH-MUM-aruna-shanbhag-no-more-finaly-42-yearss-struggle-stoped-4996459-NOR.html