Pages

Monday, September 2, 2013

भारतात तासाला एक हुंडाबळी,

 नॅशनल क्राइम ब्युरोची धक्कादायक आकडेवारी


वृत्तसंस्था | Sep 02, 2013, 08:24AM IST 
नवी दिल्ली - हुंड्याशी संबंधित कारणांमुळे देशात सरासरी दर तासाला एका महिलेचा मृत्यू होतो. 2007 ते 2011 मध्ये हुंडाबळींच्या अशा प्रकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही समस्या केवळ कमी शिक्षित किंवा गरीब कुटुंबांमध्येच नव्हे तर उच्चशिक्षित, र्शीमंतांमध्येही हुंड्यांसाठी सुनांचा छळ करण्याचे प्रकार सर्रास घडतात.

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड संस्थेच्या (एनसीआरबी) अहवालामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी म्हणजेच 2012 मध्ये देशभरात विविध राज्यांमध्ये हुंडाबळींचा आकडा 8 हजार 233 वर पोहोचला आहे. त्यानुसार सरासरी काढली असता तासाला एक मृत्यू होत असल्याचे लक्षात येते. 2011 मध्ये हुंड्यासाठी महिलांच्या मृत्यूचा आकडा 8 हजार 618 होता. पण त्या वेळी अशा गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण 35.8 टक्के होते. 2012 मध्ये मात्र, हे प्रमाण घसरून 32 टक्क्यांवर आल्याचे ताज्या माहितीवरून समोर आले आहे.
2007 ते 2011 दरम्यान, हुंडा प्रकरणांमध्ये महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. 2007 मध्ये हुंडाबळीचा आकडा 8 हजार 93 होता. तो 2008 आणि 09 मध्ये वाढून अनुक्रमे 8 हजार 172 आणि 8 हजार 383 वर पोहोचला. तर 2010 मध्ये 8 हजार 391 महिलांचा मृत्यू झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे. ही संस्था राष्ट्रीय स्तरावर गुन्ह्यांची आकडेवारी एकत्रित करण्याचे काम करते. हुंडाबळींचा आकडा वाढण्यामागे विविध कारणे असल्याचे या प्रकरणांचा तापस करणार्‍या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
ही समस्या केवळ गरीब व मध्यमवर्गाशी संबंधित नाही, तर तथाकथित उच्चवर्गीय (र्शीमंत)ही यामध्ये मोठय़ा प्रमाणावर सहभागी असल्याचे, दिल्लीच्या अतिरिक्त उपायुक्त (महिला व बाल विशेष शाखा) सुमन नल्वा यांनी म्हटले आहे. आपल्या समाजव्यवस्थेत या प्रथेची मुळे खोलवर रोवली गेली आहेत. त्यामुळे र्शीमंत लोकही हुंड्याचा विरोध करत नाही, असेही त्या म्हणाल्या. हुंडाविरोधी कायद्यात 1983मध्ये झालेल्या सुधारणांमुळे बराच फरक पडला असला तरी, सध्याच्या कायद्यामध्ये अजूनही काही पळवाटा आहेत. या पळवाटा दूर करून हुंडाबळी रोखण्यासाठी कडक कायदा होण्याची गरज असल्याचेही नल्वा म्हणाल्या.

तपास वेगाने होणे गरजेचे
हुंडा प्रकरणांमध्ये प्राथमिक पातळीवर पोलिस तपासाची गती अत्यंत कमी असते. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेवर त्याचा परिणाम होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील कामिनी जैस्वाल यांचे म्हणणे आहे. अशा प्रकरणांमध्ये लवकरात लवकर दोषारोप सिद्ध होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यानेच हुंडाबळी वाढले

कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे हुंडाबळीचे प्रमाण इतके वाढत असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी म्हटले आहे. पोलिसांनी अधिक संवेदनशील होण्याची, तर नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होण्याची गरज असल्याचेही शर्मा म्हणाल्या.

Sunday, September 1, 2013

लाखो आदिवासींचे ते प्रेरणास्थान आहे.


नजूबाईच्या संघर्षाची कहाणी…

 
२० जानेवारी २०१३ रोजी नंदुबारच्या पिंपळनेर तालुक्यात कॉ. नजुबाई गावित, कॉ. डोंगर बागुल यांच्या नेतृत्त्वाखाली आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा या संघटनेच्या अंतर्गत ही रॅली काढण्यात आली होती.

देशात पहिल्यांदा १९७५ दरम्यान सुरू झालेल्या आदिवासी जमिनींच्या हक्कासंदर्भात नंदुबारच्या पिंपळनेर येथील हे घर नजुबाई यांच्या आंदोलनाचे प्रमुख केंद्र होते. आजही ते सत्यशोधक महिला सभा आणि सत्यशोधक जात्यंतक कष्टकरी महिला सभेचे कार्यालय आणि लाखो आदिवासींचे ते प्रेरणास्थान आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आदीवासी वस्तीत लहानाच्या मोठय़ा झालेल्या, आदिवासींच्या हक्कासाठी लढणार्या नजूबाई गावीत यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत झालेले.  एवढे कमी शिक्षण, कोणतेही साहित्यिक वातावरण आणि पार्श्वभूमी नाही, अशा नजूबाईंनी पुस्तके लिहिली, लिखाण केले याचे आश्चर्य वाटते. त्याच्या या लिखाणामागे त्यांना उर्मी मिळाली ती आदिवासींसाठी त्यांनी दिलेल्या लढय़ातूनच…आदिवासी समाजात जन्म झालेल्या नजूबाई गावीत यांची मुलाखत या आठवडय़ाच्या रविवारीसाठी घेण्याचे ठरले. त्यांचा फोन नंबर मिळविला आणि त्यांना फोन केला. सुरुवातीला मुलाखत हवी आहे म्हटल्यावर त्या चक्क नाहीच म्हणाल्या. मग मी त्यांना सांगितले की, तुम्ही केलेले काम, तुमचे लिखाण हे सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचायला हवे, शेवटी माझी विनंती मान्य करत त्या मुलाखत द्यायला तयार झाल्या.   मुलाखतीला सुरुवात करताना त्यांनी अगदी मोकळेपणानं सांगितलं की, तुमच्यासारखं मला स्पष्ट मराठी बोलता येत नाही. मला त्यात फारसं काही वावगं वाटलं नाही, उलट त्यांचा मोकळेपणाच मला आवडला. शैक्षणिक पार्श्वभूमीबाबत  त्यांनी सांगितले की, माझे शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले आहे. म्हणजे अगदी माझ्याविषयीचे सांगायचे झाले तर मी मावची’ या आदिवासी जमातीची. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या गोंडवी पाडय़ात माझा जन्म झाला. आमच्या मालकीचे ना घर, ना जमीन. आई तर लाकुडफाटा गोळा करायची आणि वडील गुरे राखीत. त्यामुळे आई आणि वडील दोघेही दिवसभर कामासाठी घराबाहेर असायचे. आमच्या झोपडीत तर दिवाही लागत नव्हता. त्यामुळे शिक्षण म्हणजे नेमके काय असते हेही माहिती नव्हते.  त्याच दरम्यान आमच्या वस्तीवर शाळा सुरू झाली आणि माझ्या वडिलांनी मला त्या शाळेत घातले. घरी सतत दारिद्रय असल्याने पुस्तकांची खरेदी आम्ही कधी केलीच नाही. पुढे माझा संपर्क क्रॉमेड शरद पाटील यांच्याशी आला, त्यांच्याबरोबर चळवळीत काम करू लागल्यानंतर मला खर्या अर्थाने शिक्षणाचं महत्व समजू लागलं.  या भागात आदिवासी समूहासाठी पोटापाण्याचा प्रश्न खूपच बिकट आहे आणि तो सोडविण्यासाठी क्रॉमेड पाटील प्रयत्न करीत होते. त्यासाठी त्यांनी अनेक मोर्चे काढले, आंदोलने केली. त्यांच्या या कामात आणि लढय़ात मी मला जमेल आणि उमजेल ते काम केले.              क्रॉमेड पाटील यांच्याविषयी काय सांगाल?
त्यांच्याबरोबर आदिवासींच्या हक्कांसाठी लढा चालू असताना मला जाणवायला लागले की आदिवसी समाज कायद्याच्या संरक्षणाबाहेर आहे. म्हणूनच आदिवासींना संघटित करण्याचा मी प्रयत्न केला. आम्ही सुरुवातील सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक महिला सभेची स्थापना केली. परंतु ती फारसी प्रभावी ठरली नाही. आदिवासी महिलांवर कोणत्याही प्रकारचे अन्याय झाले तरी त्यांना न्याय मिळणे कठीण होते. कारण आदिवासींच्या विविध जमातीच्या ज्या जातपंचायती होत्या, त्यांचे नेतृत्व पुरुषमंडळीच करीत. आदिवासी माहिलांना तेथे येऊ दिले जात नसे. यामुळे स्त्रियांच्या विरोधातच पंचायतीचे निकाल लागत. गावात कधी दुष्काळ पडला,  साथीचे आजार आले की, त्याचे खापर एखाद्या महिलेवर फोडले जायचे आणि तिला डाकीण समजून ठार मारले जायचे. गावानं एखाद्या स्त्रिला डाकीण जाहीर केलं की, तिला त्यातून तिचा नवराही वाचवू शकत नव्हता. यात कधीही डाकिण म्हणून पुरुषाला मारले जात नाही.  पुरुषांना दुसरी पत्नी करण्याचा अधिकार आहे. मात्र तेच स्त्री करत असेल तर तिला पहिल्या नवर्याकडे केलेला देजचा व्यवहार दुपटीने परत करावा लागतो. यामुळे आम्ही सत्यशोधक महिला सभेच्या माध्यमातून काम सुरू केलं.
त्या काळात आम्ही आदिवासी स्त्रियांच्या हक्कांसाठी न्यायालयात गेलो. परंतु आदिवासी स्त्रिया हिंदू नसल्यामुळे त्यांना हिंदू कोड बिल आणि कोणत्याही प्रकारचे कायदे लागू होत नसल्याचा धक्कादायक निकाल त्यावेळच्या न्यायाधीशांनी दिला.  तेव्हा मात्र मी अनेक स्त्री मुक्ती संघटना, इतर संघटना यांच्यासमोर आमच्या हक्काचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळीकडून अपयश आले. मग ठरवले की आता आपणच आपल्याला न्याय मिळवून द्यायचा. आमच्या मागण्या,  हक्क यासाठी आम्ही संघटित झालो.
 माझे आई-वडील दोघेही अशिक्षित. त्यामुळे त्यांच्याकडून साहित्यिक वारसा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. मग मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या साहित्यिकांचे लेखन वाचत होते. मुळात क्रॉमेड पाटील यांनी मला सतत वाचले पाहिजे, लिहिले पाहिजे असा सल्ला दिला होता. त्यामुळे मी ग्रामीण, दलित, आदिवासी साहित्य वाचायला सुरुवात केले. एक एक शब्द जोडून, वाचून मला त्याच अर्थ समजून घ्यावा लागायचा. त्यात माझा बराच वेळ जात असे. तसे असले तरी मी लेखन आणि वाचन याकडे लक्ष देऊ लागले. कोणे एके काळी मला स्वतःचे नावही नीट लिहिता येत नव्हते. मात्र मी चळवळीत काम करू लागल्याने आणि वाचन वाढविल्याने हळूहळू लेखन करू लागले. त्यानंतर मग मी नित्यनियमाने मला येणारे वेगवेगळे अनुभव लिहू काढू लागले. त्यातून माझ्या दोन कादंबर्या तृष्णा आणि भिवा फरारी यांचा जन्म झाला आणि लवकरच नवसा भागिनीचा एल्गार हा कथासंग्रह प्रकाशित होत आहे. नागपूरच्या रुपा कुलकर्णी यांनी या पुस्तकाला प्रास्तावना दिली आहे.  सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने पुढे ग्रामीण, दलित, आदिवासी साहित्याचे प्रवाह एकत्र करण्याची महत्वाची भूमिका बजावली. अनेक ठिकाणी याविषयीची साहित्य संमेलने झाली. साक्री येथील पाचवे दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलन होईपर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र काही लोकांनी ग्रामीण, दलित, आदिवासींसाठी सुरू झालेली साहित्याची चळवळ ती खंडित करण्याचा प्रयत्न केला.
साठीच्या दशकात दलित, ग्रामीण साहित्य प्रवाह उदयाला येत होता. परंतु आदिवासी साहित्याच्या संदर्भात पाटी कोरीच होती. हे प्रवाह परिवर्तनाच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे असा विचार कॉम्रेड शरद पाटलांनी पुढे आणला.  यातून पहिले दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. पहिलं साक्रीला, दोन संमेलन वाळव्याला आणि शेवटचं सटाण्याला झालं. आनंद यादव, बाबूराव बागूल अशा अनेक जणांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले होते. त्याकाळात दलित, ग्रामीण, आदिवासी साहित्य चळवळी बर्याच जोर धरत होत्या. या चळवळी जातीअंताच्या दिशेने पुढे जायला हव्या होत्या असे पाटलांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यांनी अब्राह्मणी सौदर्यशास्त्रांची निर्मिती केली. मात्र यातील काहीजण व्यवस्थेला शरण गेल्याने ते एकत्र आले नाहीत. त्यावेळी साहित्य कशाला म्हणतात याचेही मला भान नव्हते. त्यानंतर मला पाटलांनी काही नामवंत साहित्यिकांच्या कादंबर्या वाचायला दिल्या. सुरुवातीला काही जाणवत नव्हतं, परंतु नंतर नंतर बरेच काही वाचल्यानंतर साहित्य क्ळलं. समाजव्यवस्थेच, त्यांच्या परिसराचं किंवा गाव पातळीवरच साहित्य मी वाचलं. ते बरेच जाणिवेच्या पलिकडं गेल्याचं मला दिसत नाही.
त्यातच आपण काय लिहावं असा प्रश्न माझ्यासमोर पडला आणि त्यातून मी ग्रामीण आणि दलित जीवनाच्या व्यथा, वेदनापेक्षा आदिवासीचे जास्त शोषण पिडण होत असल्याने त्यांच्यावर लिहिलं पाहिजे असं ठरवलं. मला जसं सुचत गेलं, तसं मी लिहून काढलं. सुरुवातीला आघोरचे चार भाग लिहले. पण ते कोणीही छापायला तयार नव्हते. आपण म्हणतो आपल्या भाषेत साहित्य लिहीलं पाहिजे, आदिवासी जिथं जिथं विखुरला आहे तिथं तिथं त्यांची संस्कृती आणि भाषा यात थोडासा फरक आहे, या माध्यमातून माझ्या कादंबरीत समान आदिवासीची भाषा ठेवली होती. परंतु ती कादंबरी अक्षर लागत नाही, भाषा कळत म्हणून पुण्या-मुंबईच्या लोकांनी परत पाठवली. त्यावेळी मी खूप नाराज झाले होते. आता काय करावे असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला, मी आदिवासी भाषेत लिहिलेली कादंबरी मराठीत परत लिहून काढली. त्यावेळी मला ही कादंबरी छापायला कर्ज घ्यावं लागलं होतं. त्यामुळेच ती पुढे आली. नाहीतर ती लोकांपुढे गेली नसती. पुढे माझी तृष्णा ही आत्मवृत्त्पर कादंबरी बाहेर पडली. तिला खूप प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळाले तरीही तिला फारसा अजूनही न्याय मिळाला नसल्याचे मला वाटतं. नंतर स्वतंत्र कादंबरी म्हणून भिवा फरारी लिहिली. इंग्रजांच्या विरोधात आदिवासीचे अनेक नायक लढले होते. परंतु त्यांची योग्य दखल घेतली जात नव्हती. आदिवासी समाजाच्या भिवाने इंग्रजांच्या विरोधात संघर्ष केला त्याचे चित्रण त्यात आहे.
मी गुजरातमधील डांगला गेले होते. तेथे शबरीकुंभ मेळा भरतो ते राणीचं राज्य होतं, असं म्हटलं जातं. परंतु तिचं नाव कोणी सांगत नव्हते. मी तिथं गेल्यानंतर पाहणी केली. नंतर माझ्या लक्षात आले की भारतातील मातृसत्ताक राणी म्हणजे ही शबरी आदिवासी आणि तिचं ते स्त्री राज्य असले पाहिजे असे मला वाटते. तिथल्या घनदाट जंगलात सीता सरोवर आदी मी पाहून आले. त्यानंतर खूप विचार करुन मी ही कादंबरी लिहिली. सुरुवातीला मी कथाच लिहित होते. कवितेकडे मी कधी गेले नाही, आदिवासी स्त्रियांवर होणार्या अन्यायाबाबत मी कथा लिहिल्या. बांबूची मोळी, कुतारखांब, जानकी, उमराचं झाड, आदी कथा मी लिहिल्या. त्या खूप गाजल्या. गिरीश कर्नाड, विजय तेंडूलकरांपासून अनेकांनी त्यांचा गौरव केला. माझ्या बाबूची मोळी या कथेवर तेंडूलकर चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते, परंतु नंतर ते आजारी पडल्याने मागे राहिले. दलित, ग्रामीण साहित्य खूप मोठय़ा प्रमाणात लिहिलं गेलं असले तरी आदिवासींच्या बाबत अजूनही फारस लिहिलं गेलं नाही. त्यांच्यातून जे शोधून पुढे आणायला पाहिजे होतं ते पुढे आले नाही. याची मला अजूनही खंत वाटते.
वर्षा फडके-आंधळे