राममंदिराच्या विनाशक वादाची सोडवणूक
कॉ. शरद् पाटील, धुळे
राजकीय सत्तांतर(पाक्षिक) 14 जानेवारी 2001
सीता रामास-
"" न कथंचन सा कार्या गृहीतधनुषा त्वया
बुध्दिर् वैरं विना हन्तुं राक्षसान् दण्डकाश्रितान्!''
(""दंडकारण्यात राहणाऱ्या राक्षसांचा वध वैरावाचून करण्याची ती बुध्दी हातात धनुष्य धारण करुन, आपण कधीही आणू नका'')
3 जानेवारी 2001च्या "सकाळ'च्या पहिल्या पानावर "राममंदिराची प्रतिकृती आज अलाहाबादला आणणार' या शीर्षकाची बातमी आणि उपान्त्य पानावर पंतप्रधान वाजपेयींच्या राममंदिरावरील लेखाचा त्यांच्याच सांगण्यावरुन केलेला अनुवाद आहे. या लेखात बाजपेयींनी रामचाी धर्मातीत महत्ता दाखविण्यासाठी इक्बालची रामरबतक कविता उध्दृत केली आहे.
इक्बाल उर्दूचा महाकवी असला, तरी तो अश्रफ असल्यामुळे वाल्मिकी व व्यास या महाकवीप्रमाणे ब्राह्मणी कवी होता. तर एका बाजूला तो पाकिस्तानवादी होता, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या राष्ट्रगीतातील "हे आबरुहे गंगा वो दिन है याद तुझको, उतरा तेरे किनारे जब कारवॉं हमारा' हा चरण त्याचे ब्राह्मण्य दाखवतो. भारत व पाकिस्तानचा इतिहास आक्रमक आर्य गंगेकाळी उतरल्यापासून सुरु होतो काय? आर्यांचे आगमन भारताबाहेरुन न होता गंगेच्या पूर्वखोऱ्यातून झाले, हा "शोध' संघपरिवाराच्या "व्हाइस ऑफ इंडिया'च्या "आर्यन इव्हेजन थिअर अँड इंडियन नॅशनलिझम'(1993) या प्रकाशनाचे लेखक श्रीकांत तेलगेरी यांनी लावला आहे. भारत व पाकिस्तानचा इतिहास वैदिक श्रुतीच्या ब्राह्मणी ॠग्वेदाऐवजी सिंधू संस्कृतीच्या आद्य स्त्रीराज्याची राणी व तांत्रिक अब्राह्मणी ॠग्वेदाची उद्गाती निर्ॠती इच्यापासून सुरु होतो. हे मी "दास शुद्राची गुलामगिरी' व "प्राचीन भारताचा सिंधोत्रीचा संघर्ष' यात दाखवले आहे.
अयोध्येला वादगस्त जागेपासून अगदी जवळच्या वर्कशॉपमध्ये राममंदिराचे सर्व भाग तयार करुन ठेवलेले आहेत, इफ्तार मेजवानीस बाजपेयींचे ""राममंदिर हे सोमनाथमंदिराप्रमाणे राष्ट्रीय भावनेचे प्रतीक आहे'' हे विधान आणि त्यावरील संसदीय वादळी चर्चा ही मंदिरबांधणी आधीची चाचपणी होती. एप्रिल 2001 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत डाव्या आघाडीचा पराभव, मेमध्ये राममंदिराची बांधणी, त्यावर देशभर अभूतपूर्व धार्मिक दंगली, सरहद्दी व देशाचे गंभीरतम प्रश्न पुढे करुन दुसरी आणीबाणी आणि "प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट' या मिसापेक्षा जालीम कायद्यान्वये दडपशाही! पण, तोफखान्याचा पहिला भडीमार राममंदिराच्या बांधणीने होणार असल्याने या वादाची वास्तविकता समजून घेऊन तो युध्द पातळीवर सोडवला पाहिजे.
स्त्रियात्तमा विरुध्द पुरुषोत्तम
महाभारत इतिहासाचे साधन तर रामायण कल्पित काव्य मानले गेल्याने आणि लोकमानसाने काय, जातिविरोधी डॉ. राम मनोहर लोहियानींही राम व कृष्ण यांना देशाचे श्रेष्ठतम महापुरुष मानल्याने महाकाव्यांच्या प्रमेयात्मकतेचा फायदा घेऊन भाजप व संघपरिवाराने अयोध्या, काशी मथुरेच्या मंदिराचे प्रश्न उचलेले. मात्र रामायणाबद्दल प्रमेयात्मकताही नसल्यामुळे त्यांनी कृष्णापेक्षा रामाला अग्रक्रम दिला. पण रामायणही इतिहासाचे विश्र्वसनीय साधन असल्याची संशोधनाअंती माझी खात्री झाली आहे. महाराष्ट्राचा खरा इतिहास नाशिकची पंचवटी ते त्र्यंबकेश्वरपर्यंत सीमा असलेल्या जनस्थान या स्त्रीराज्यापासून सुरु होतो. राजकुलात रावण ज्येष्ठतम असूनही त्याने स्त्रीराज्याच्या समय या तोंडी कायद्यानुसार धाकटी बहीण शूर्पणखा हिला राणीपदावर अभिषिक्त केले आणि आपल्या धाकटया सख्या भावासह त्याने लंकेकडे निर्गमन केले. मी डिसेंबरच्या मध्यात त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो आणि तेथली अभिषेक मंगल पुष्करिणी वा पुष्कर पाहून जनस्थानाची ती राजधानी असल्याची माझी खात्री झाली. काळाला न जुमानता टिकून राहणारे स्त्रीराज्याचे चिन्ह म्हणजे पुष्कर(अजमेरजवळचे पुष्कर क्षेत्र हे राणी उर्वशीची राजधानी होते, हे ॠग्वेद 7.33.11 वरुन स्पष्ट होते. वैदिक राजवंश तिच्यापासून सुरु होतो.) दशरथाने कैकेयीला राज्यशुल्क म्हणून दिलेले वर पाळण्यासाठी आर्य रामाने राजपद त्याग करुन वनवास पत्करला. या महतीत रावण या अनार्य मराठा महाबलीने "समया'नुसार वनवास पत्करला हे विसरलेे जाते. शूर्पणखा या नावाचा ब्राह्मणी अर्थ "सुपडयाएवढे नखे असलेेली अक्राळविक्राळ राक्षसी' असाच घेतला जातो. अथर्ववेदातील भातावरील मंत्रानुसार शूर्प म्हणजे खळयात भात उपनायचे सुपडे. शेतीचा शोध जगभर स्त्रीने लावल्यामुळे या नावाचा काव्यमय अर्थ आहे "सुपडे अलगद नखांवर धरुन भात उपनणारी!'
रामाने दंडकारण्यातील जनस्थानात प्रवेश करण्याआधी ब्राह्मण वसाहतकारांना राक्षसनिर्दालनाचे वचन दिले. निरपराध राक्षसांचा संहार न करायची सीतेने रामाला जी विनंती केली ती लेखाच्या प्रारंभी दिली आहे.( सीता ही विदेहांची पदच्यूत व बहिष्कृत राणी अहल्या भूमाता इची मुलगी होती. हे लक्षात घेतले जात नाही.पुरुषोत्तम रामाने ती धुडकावून उलट तिचा त्याग करायची धमकी दिली.
""अप्प्यहं जीवितंजह्यांत्वां वा, सीते, सलक्ष्मणाम्!
न तु प्रतिज्ञां संसृत्य ब्राह्मणेभ्यो विशेषतः!! 3.10.18!!
जनस्थानात प्रवेश केल्यानंतर रामाने युध्द शास्त्राच्या लॉजिस्टिवनुसार सरहद्दीवरचे पंचवटीचे स्थान निवडून संरक्षित झोपडी बांधली. होमरच्या ग्रीक महाकाव्यांनी स्त्रीराज्याच्या राण्या सुसंस्कृत व अतिथ्यशील दाखवल्या याचे कारण तो ब्राह्मण नव्हता हे आहे. शूर्पणखा त्यांचे कुशल विचारण्यासाठी ताटकेप्रमाणे एकटीच आली, यावरुन तिचाही मानस आक्रमक नव्हता, हे स्पष्ट होते. उलट रामाने कुरापत काढून लक्ष्मणाकरवी तिचे नाककान कापून तिला हाकलून दिले, यावरुन त्याचा आक्रमक हेतू स्पष्ट होतो.("जय श्रीराम'ची घोषणा देणाऱ्या शिवसेनेने त्याच नाशिक जिल्ह्यातील आभोण्याच्या ख्रिश्चन आदिवासी महिला मेळाव्यावर हल्ला केला, यावरुन त्यांनी रामाची स्त्रीविरोधी परंपरा चालविलेली आहे असे दिसते!) नंतर त्याने व सशस्त्र ॠषींनी गोदावरीतून चालून आलेल्या राक्षससैन्यांची कत्तल केली. ही स्त्रीराज्ये समताधिष्ठित होती म्हणून रामाने त्यांचा नाश चातुर्वर्ण्यहितार्थ केला. विश्वामित्राने ताटकेला ठार मारायचा जो आदेश दिला त्यावरुन निर्विवादपणे स्पष्ट होते
""न हि ते स्त्रीवधकृते ...... नरोत्तमा!
चातुवर्ण्याहितार्थ हि कर्तव्य राजसुनना''!! बालकाण्ड, शु. 17!!
रावणाने सीताहरण बहिणीच्या विद्रपीकरणाचा सूड म्हणून केले असे सांगणारे शरद जोशी हे एकमेव ब्राह्मण असावेते! पण, रामाविरुध्द रावणाला महात्मा ठरवणे ह नकारात्मक ब्राह्मणेतरी प्रबोधन ठरते. रामाचे राज्य शूद्रप्रथाधिष्ठित होते तर रावणाचे दासप्रथाधिष्ठित. विधायक अब्राह्मणी प्र्रबोधनाच्या समतावादी नायिका ताटका, शूर्पणखा व सीता होत्या, तर समतावादी नायक शूद्र शंबूक.
धर्मनिरपेक्षता ः ब्राह्मणी व अब्राह्मणी
भाजप संघपरिवाराने राममंदिराचा प्रश्न काढल्यानंतर डाव्या पक्षांची भूमिका पाकिस्तान व शिखिस्तानाबाबत घेतलेल्या भूमिकाप्रमाणे अल्पसंख्य धर्मानुनयाची राहिलेली आहे. मार्क्सवादी इतिहासतज्ज्ञांनी तर अयोध्या मध्ययुगापूर्वी अस्तित्वात नव्हती आणि बाबरच्या सेनाधिकाऱ्यांने मशीद बांधली तेथे राममंदीर नव्हते, असे सिध्द करायचा आटापिटा चालविला! बुध्दोत्तर काळात इसवीसनापूर्वी होऊन गेेलेल्या भास या आद्यनाटककारची "प्रतिमा' व "अभिषेक'ही नाटके रामावर आहेत. आणि त्यात अयोध्येचा वारंवार उल्लेख आहे, हा निर्विवाद पुरावाही दुर्लक्षिला गेला. रामाचे मुल्यमापन जरी अब्राह्मणी अन्वेषणपध्दतीने केलेले असले, तरी ती रामाने भारतीय समाजविकासाला केलेले योगदान दुर्लक्षीत नाही. स्त्रीसत्ताक व मातृवंशक त्रैवर्ण्य समाजापेक्षा जास्त उत्पादक असलेल्या चातुर्वर्ण्य समाजाचा रामाने केलेला प्रसार हे राजवाडयांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितच क्रांतिकारी कार्य होते. त्यामुळे तो जनमानसात प्रभू या कोटीला गेला. त्याची दरवर्षी रामनवमी साजरी करणारा समाज त्याच्या जन्मभूमीत महामंदिर बांधणार नाही हे कसे शक्य आहे? आणि जे तुर्की जेते सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करतात ते राममंदिर पाडून तेथे मशीद बांधणार नाहीत हे प्रितप्रादन हास्यास्पद आहे. शिवाजी आग्य्राहून निसटून गेल्यानंतर औरंगजेबाने सूडापोटी काशीचे विश्वनाथ मंदिर व मुसलमानही विद्यार्जन करती असलेली शिक्षणसंस्था आणि मथुरेचे केशवमंदिर पाडून मशिदी बांधल्या असे खुद्द डॉ. सैयद अथर अब्बास रिझवी त्यांच्या प्रा. हबीबांनी प्रास्तावित केलेल्या "मुस्लिम रिव्हायव्हलिस्ट मुव्हमेन्ट्स इन नॉर्दर्न इंडिया इन सिक्स्टीन्थ अँन्ड सेव्हन्टीन्थ सेन्चरीज'(1965) या प्रमाणभूत गं्रथात नमूद करतात. तुर्की शासकांना हिंदू प्रजेवर राज्य करायचे होते, धर्म लादायचा नव्हता हे जरी खरे असले, तरी त्यांनी धार्मिक दुरभिमानाची कृत्ये केलीच नाहीत असे या सूत्रापोटी म्हणणेे अनैतिहासिक ठरते. आर्यापासूनचे सर्व जेेते कमीअधिक प्रमाणात हिंसक व विध्वंसक राहिलेले आहेत. जितांना पूज्य असलेल्या वास्तूंचा विध्वंस त्यांचे नैतिक धैर्य खचवण्यासाठी जेते करीत आलेले आहेत. शशांकासारख्या ब्राह्मणी राजांनी बौध्द भिक्षूंची कत्तल व बौध्द महावस्तूंचा नाश याच हेतूने केला.
बहुसंख्य धर्मियांच्या वाजवी भावना दुखावून अल्पसंख्यधर्मियांच्या गैरवाजवी भावनांनची तरफदारी करणे हा जो धर्मनिरपेक्षतेचा अर्थ लावला जातो, त्यामुळे भाजप व संघपरिवाराचे फावते. म्हणून ही धर्मनिरपेक्षता ब्राह्मणीच म्हणावी लागते.
तुर्की शास्त्यांनी केलेल्या धार्मिक अत्याचारांना आजचे मुसलमान जबाबदार नसले, तरी या अत्याचाराचें वाजवी निराकरण करायची जबाबदारी आजचे मुसलमान नाकारु शकत नाहीत. शशांकाने 6 व्या शतकात बोधी वृक्ष तोडून बुध्दमंदिरातील बुध्दमुर्तीच्या जागी महेश्वरमूर्ती बसवून ते ब्राह्मण महंताच्या हवाली केले होते. ते बौध्दांच्या हवाली करायची नवबौध्दांची मागणी जर न्याय्य ठरु शकते, तर राममंदिरावरील अत्याचारांच्या निराकरणाची मागणी संघपरिवाराने केली म्हणून ती धर्मवेढी ठरु शकत नाही. बाबरी मशीर पाडायचे समर्थन पंतप्रधान बाजपेयीही करु शकत नाहीत. आणि काशी व मथुरेच्या मशिदी पाडून अनुक्रमे विश्वनाथ आणि केशव मंदिरांची पुनर्उभारणी करावी असे संघपरिवारही म्हणू शकत नाही, हे अवशिष्ट धर्मनिरपेक्षतेचा प्रभाव दाखवते. पण न्याय दिला गेला पाहिजे एवढेच नाही, तर तो दिला गेल्याचे दिसले पाहिजे. या आधुनिक न्यायतत्वानुसार हिंदूंना न्याय दिला गेल्याचे दिसले पाहिजे. म्हणून सर्व संबंधित पक्षांनी व दोन्ही धर्माच्या नेत्यांनी एकत्र बसून एकमताचा निर्णय घेणे व तो सरकारकने अंमलात आणणे निकडची आहे. हा वाद धुमसत ठेवला तर धर्मनिरपेक्षतेचा अवशिष्ठ प्रभाव नष्ट होऊन हा वाद सोडवणे अशक्य हाेईल. औरंगाबादच्या नामांतराचे उदाहरण येथे उचित ठरेल. शिवसेनेने सुचविलेेलेे औरंगबादचे संभाजीनगर हे नामांतर मलिकंबराबाद असे करावे असे सुचवून त्यासाठी मोहिम करायची मागी केली तेव्हा मी "लोकमत'मध्ये लेख लिहून संभाजीचा औरंगादच्या उभारणीशी संबंध नसल्याने त्याचे नामांतर हिंदू-मुसलमानाच्या प्रबोधनाची व ऐक्याची होईल असे मांडले. प्रा. रहमानींना "लोकमत'मध्येच दोन लेख लिहून औरंगझेब धार्मिक बाबतीत अकबरापेक्षाही कसा पुरोगामी होता हे दाखविण्यसाठी मुघल सैन्यात अकबराच्या काळापेक्षा औरंगझेबाच्या काळात हिंदूंची संख्या जास्त असल्याचे उदाहरण दिले. ते सप्रमाण खोडून काढणारा माझा लेख "लोकमत'न े प्रसिध्द केला नाही.हिंदूची मते जातील म्हणून औरंगाबादच्या संबंधित पक्षांनी नामांतराची मोहीम हाती घेतली नाही. हायकोर्टान े स्टे दिल्याने हा वाद तहकू ब झालेला असला, तरी तो पुन्हा उसळू शकतो, हे विसरता कामा नये, कारणे औरंगझेबाने महाराष्ट्राचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी संभाजीला अमानुषपणे मारले, ही वस्तुस्थिती या वादामागे आहे.
अपूर्ण