Pages

Sunday, November 3, 2013

सावित्रीबाई फुले, फातिमा शेख

सावित्रीबाई फुले यांचा उचित सन्मान

सागर भालेराव | Oct 30, 2013, 02:43AM IST
 
http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-article-on-savitribai-fule-4419586-NOR.html
Email Print Comment
 
सावित्रीबाई फुले यांचा उचित सन्मान
पुणे शहर म्हणजे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाचं सांस्कृतिक वैभव! आजवरच्या प्रत्येक शैक्षणिक चळवळीत, परिवर्तनवादी चळवळीत हे शहर पुढारलेलं आहे. ‘विद्येचं माहेरघर’ असलेल्या पुण्याने जगभरात आपली ओळख आणि परंपरा निर्माण केलेली आहे. संपूर्ण भारतातूनच काय, पण जगातून अनेक विद्यार्थी येथे ज्ञानार्जनासाठी येत असतात. उत्तम शैक्षणिक वातावरण, नावाजलेली शिक्षण संस्था, प्रगल्भ सांस्कृतिक वातावरण यामुळे अनेक विद्यार्थी या विद्याभूमीकडे आकर्षित होत असतात. पुणे विद्यापीठ ही या सर्व कारणांची मातृसंस्था. 1948 मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठाने आजवर अनेक नामांकित व्यक्ती जगाला दिल्या आहेत, ज्यांनी पुढे जाऊन जग घडवण्यात मोलाची कामगिरी केली आहे. अशा या विद्यापीठाचा येत्या काळात नामविस्तार होणार आहे. नुकत्याच झालेल्या सिनेट सदस्यांच्या बैठकीत विद्यापीठाचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार व्हावा, असा निर्णय झाला आहे आणि या मागणीचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आलेला आहे.
‘कर्मठ’ पुण्याची ‘सांस्कृतिक’ पुणे ओळख निर्माण करण्यासाठी महात्मा फुले यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांत सावित्रीबाई खंबीरपणे जोतिबांच्या मागे उभ्या राहिल्या. ज्या समाजात स्त्रियांना ज्ञानार्जनबंदी होती, त्या समाजाच्या विरोधात उभे राहून परिवर्तनाचा एल्गार पुकारणारे हे दांपत्य ख-या अर्थाने या देशाचे कोहिनूर ठरले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये स्त्रियांना पंचम वर्ग म्हणून मान्यता होती. अस्पृश्यांपेक्षा कठोर वागणूक या स्त्रीवर्गाला  भोगावी लागली होती. दास्यपणाची, गुलामगिरीची जाणीव शिक्षणाशिवाय रुजू घालू शकत नाही हे महात्मा फुले यांनी ओळखलं आणि स्त्री शिकली की, समाज शिकेल आणि कर्मठ प्रथा बंद होतील, हे जाणून त्यांनी आपल्या पत्नीला, म्हणजेच सावित्रीबार्इंना शिक्षण दिलं. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबार्इंचा जन्म झाला; पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. 1851 मध्ये पुण्यातच स्त्रियांसाठी भिडे वाड्यात त्यांनी सुरू केलेली मुलींसाठीची शाळा त्यांच्या दूरदृष्टीची आजही साक्ष देत आहे.
‘विद्येविना मती गेली । मतिविना नीती गेली । नीतिविना गती गेली । गतिविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले’ 
 हे सत्य स्वीकारत त्यांनी दलितोद्धारासाठी आजन्म कार्य केले. ‘सत्यशोधक समाज’मध्ये असलेले सावित्रीबार्इंचे योगदानदेखील वादातीत असंच आहे. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती?’  हे समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते आणि महात्मा फुल्यांच्या पाठीवर हे काम सावित्रीबार्इंनी अविचलपणे पेललं.
 आज महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर आकाशाला गवसणी घालणा-या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा अशा सगळ्या क्षेत्रांत ज्या महिला दिसत आहेत त्या सावित्रीबार्इंच्या ऋणी आहेत. काल जर  त्यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रचली नसती, तर महिला सक्षमीकरणाचा पायंडा पडलाच नसता. बालविवाहाला विरोध करणा-या सावित्रीबाई,   बलात्कारामुळे गरोदर असलेल्या बाईचं बाळंतपण करणारी सावित्रीबाई, पोटापाण्यासाठी शरीरविक्री करणा-या माय-माउलीला दुष्टांच्या तावडीतून सोडून आणणारी सावित्रीबाई आणि प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांना आईच्या मायेप्रमाणे शुश्रूषा करणा-या सावित्रीबाई आजदेखील एक अद्भुत रसायन वाटतात.  त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या नामविस्तारामुळे सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस नक्कीच न्याय मिळणार आहे. त्यांच्या कर्मभूमीत असलेल्या या विद्यापीठाला एक आणखी एक नवी ओळख मिळेल आणि येणा-या अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या कार्याचा महिमा हा विद्यापीठरूपाने सर्वांच्या नजरेत राहणार आहे. सध्या सिनेटचा हा निर्णय राज्य शासनाकडे विचाराधीन आहे, येणा-या काळात शासन किती लवकर निर्णय घेते हे पाहण्याजोगे असेल.   गेल्या 7-8 वर्षांपासून काही संघटना पुणे विद्यापीठाचे नामांतर व्हावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत होत्या. सोशल मीडियावर या मागणीला पाठिंबा देणारे पेजदेखील बनवण्यात आले होते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या मागणीला पाठिंबा मिळवण्याचा उत्कृष्ट प्रयोग या प्रकरणामध्ये करण्यात आल्याचे आढळते. पुणे विद्यापीठ नामविस्ताराला कुणाची हरकत असेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही; परंतु भविष्यात काही समाजविघातक शक्तींकडून याला विरोध होऊ शकतो. याच सुसंस्कृत पुण्यात ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती. धर्मांध शक्तीकडे पुणे परत तर वळले जात नाही ना? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या एकजुटीचे प्रदर्शन दाखवून महाराष्ट्राची सुज्ञ जनता, पुरोगामी विचारांशी प्रामाणिक राहील अशी ग्वाही द्यायला हवी.

Monday, October 28, 2013

स्त्री जन्मा...

दिव्‍य मराठी | Oct 28, 2013, 03:05AM IST
Email Print Comment
 
स्त्री जन्मा... (अग्रलेख)
‘थांबा! या जगात जन्म घेण्याआधीच मला का मारुन टाकताय? मी एक मुलगी आहे म्हणून?’ असा मर्मभेदी सवाल ‘स्त्री भ्रूणहत्या’ या विषयावरील एका कवितेत प्रारंभीच केला आहे. देशात पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलींना केवळ जन्मापासूनच नव्हे तर त्यांचा जन्म होण्याआधीपासूनच कायम दुय्यम स्थान देण्यात आलेले आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे धनाची पेटी असे कुविचार या संस्कृतीतूनच रुजले व फोफावले. त्यातूनच स्त्री भ्रूणहत्येसारख्या अतिशय निंदनीय गोष्टीही जन्माला आल्या. विविध शास्त्रीय शोधांमुळे वैद्यकीयसह सर्वच क्षेत्रांतील ज्ञान-तंत्रज्ञान अद्ययावत झाले. समाजाची झपाट्याने प्रगती होत आहे असे चित्र रंगवण्यात आले. मात्र समाजाची पुरुषप्रधान संस्कृतीची चौकट तशीच कायम राहिली असल्याने बहुतांश व्यक्तींची मने मात्र मागासच राहिली. आधुनिक वैद्यकज्ञानाचा फायदा उपटत गर्भलिंगनिदान चाचणी करण्याचे पेव फुटले. मातेच्या उदरात मुलीचा गर्भ असल्यास स्त्री भ्रूणहत्या करण्याचे प्रमाणही वाढू लागले होते. सामाजिक भान जपणारा संवेदनशील अभिनेता आमिर खान याने आपल्या ‘सत्यमेव जयते’ या मालिकेत स्त्री भ्रूणहत्या या विषयावर सादर केलेले दोन भाग बहुचर्चित ठरले होते. स्त्री भ्रूणहत्येस काही डॉक्टरही कसे जबाबदार आहेत याचा उघड पंचनामाच आमिर खानने या कार्यक्रमात केला होता. स्त्री भ्रूणहत्येचा विषय आता पुन्हा प्राधान्याने चर्चिला जाण्याचे कारण एका सकारात्मक घटनेत दडलेले आहे. महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे 813 इतका वेगाने घसरला होता. मात्र यंदाच्या वर्षी मुलींचा जन्मदर राज्यात 931 तर शहरांमध्ये 915 इतका झालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सार्वजनिक रुग्णालयांतून यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात 2011-12 या वर्षातील एप्रिल ते जुलै या महिन्यांचा तुलनात्मक अभ्यास 2013-14च्या सोबत करण्यात आला. जळगाव, नंदुरबार, नाशिक, धुळे, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी घसरलेला मुलींचा जन्मदर यंदाच्या वर्षी वाढल्याचे राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीतूनही स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात स्त्री भ्रूणहत्येला चाप लागल्यानेच मुलींचा जन्मदर वाढला आहे. स्त्री भ्रूणहत्येच्या विरोधातील कायदा अस्तित्वात असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यात होत नव्हती. बीड जिल्ह्यातल्या परळी येथील डॉ. सुदाम मुंडे याच्या रुग्णालयामध्ये गेल्या वर्षी एका महिलेचा गर्भपात शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला होता. स्त्री भ्रूणहत्येचे हे प्रकरण असल्याने त्यावरून संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. स्त्री भ्रूणहत्यांसाठी गेल्या 10-12 वर्षांपासून डॉ. सुदाम मुंडे याचे रुग्णालय सतत चर्चेत असायचे. 2010 मध्ये या रुग्णालयातील स्टिंग ऑपरेशननंतर सोनोग्राफी मशीन सील झाले होते. त्यानंतरही पुढील दोन वर्षे या रुग्णालयात गर्भलिंगनिदान व गर्भपातही चोरीछुप्या पद्धतीने सुरू होते, असेही पोलिस तपासात उघड झाले होते. डॉ. सुदाम मुंडे व त्याची पत्नी डॉ. सरस्वती यांच्यावर यथोचित कायदेशीर कारवाईही झाली. या प्रकरणानंतर मुळापासून हादरलेल्या राज्य सरकारने स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यातूनच ‘मुलगी वाचवा’ अभियानाचा प्रारंभ झाला. स्त्री भ्रूणहत्येला जबाबदार असणाºयांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला. गर्भलिंगनिदान करण्यास भाग पाडणारे नातेवाईक आणि गर्भपात शस्त्रक्रिया करणाºया डॉक्टरांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्याची तरतूद करावी, अशी मागणीही काही लोकप्रतिनिधींनी त्या वेळी केली होती. डॉ. सुदाम मुंडेचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकारी यंत्रणेने राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर धाडी टाकण्याचा सपाटा सुरू केला व त्यातून अजून काही प्रकरणेही उजेडात आली. या सर्वांचा एकत्रित परिणाम स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण कमी होण्यात झाला. समाजात मुलांच्या तुलनेत मुलींना जी दुय्यम वागणूक देण्यात येते त्याविरोधात 19 व्या शतकापासून समाजधुरिणांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली होती. पुरुषप्रधान समाजव्यवस्था स्त्रीला तिचे मूलभूत हक्क नाकारते त्याविरोधात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बंड पुकारले. त्या काळात स्त्रियांची स्थिती किती विदारक होती याचे अत्यंत भेदक वर्णन महात्मा फुले यांच्या शिष्या ताराबाई शिंदे यांनी केलेल्या लेखनातूनही आले आहे. विधवा स्त्रियांची होणारी पिळवणूक हा त्या काळचा मोठा सामाजिक प्रश्न होता. त्याला गोपाळ गणेश आगरकर, न्या. रानडे आदी समाजसुधारकांनीही आपल्या लेखन-भाषणांतून वाचा फोडली होती. स्त्रियांच्या उद्धारासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अविस्मरणीय कार्य केले. त्यांचे चिरंजीव र. धों. कर्वे हे तर संततिनियमनाच्या कार्याचे देशातील आद्य प्रवर्तक ठरले. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र. धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे प्रबोधन फार मोलाचे आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखायला हव्यात, मुली व मुलांच्या प्रमाणातील नैसर्गिक समतोल ढळू देता कामा नये, असे विचार   र. धों. कर्वे यांनी आपल्या ‘समाजस्वास्थ्य’ मासिकात प्रसंगोपात केलेल्या लेखनामध्ये व्यक्त केलेले होते. 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर केले. 1975 ते 1985 हे महिला दशक म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानिमित्त जगभर स्त्रियांच्या प्रश्नांसंबधी विचारमंथन सुरू झाले. देशातील अनेक  राज्यांत त्याचे परिणाम जाणवू लागले. घटनेने स्त्री-पुरुष समानता हे मूल्य मान्य केले असले तरी वास्तवात वेगळीच परिस्थिती होती. 1979 मध्ये मंजुश्री सारडा हिचा गूढ मृत्यू आणि 1980 मध्ये मथुरा बलात्कार घटना यातून हुंडा आणि बलात्कारविरोधी मोहिमेने वेग घेतला. महाराष्ट्रात महिलांच्या प्रश्नांबाबत जागृती करण्यासाठी स्त्री मुक्ती चळवळीमार्फत सुसंघटित प्रयत्न होऊ लागले. ‘मुलगी झाली हो’ हे नाटक लिहिण्याची ज्योती म्हापसेकरांना प्रेरणा मिळाली ती याच काळात. या नाटकातील ‘मुलगी झाली, आता काय मी करू?’ या गाण्याने असंख्य लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले होते. ‘मुलगी झाली हो’ नाटकाचे तीन हजारच्या वर प्रयोग झाले. इतर सामाजिक  संस्थांनीही स्त्री भ्रूणहत्याविरोध, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीमुक्ती यासंदर्भात महत्त्वाचे कार्य करूनही समाजातील मागासलेले विचार पूर्णपणे दूर झालेले नाहीत. सरकारने कारवाईचा दंडुका उगारल्यानंतर अनेक  वाईट गोष्टींना काही काळापुरता चाप बसतो, असे मागील काही उदाहरणांवरून स्पष्टपणे दिसते. डॉ. सुदाम मुंडे प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारने तत्परतेने पावले उचलल्यामुळेच राज्यातील स्त्री भ्रूणहत्यांचे प्रमाण कमी झाले व मुलींचा जन्मदर वाढला. मात्र हा चांगला बदल तात्पुरता न ठरता कायमस्वरूपी व्हावा. त्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी जागरूक राहायला हवे.