Pages

Monday, September 2, 2013

भारतात तासाला एक हुंडाबळी,

 नॅशनल क्राइम ब्युरोची धक्कादायक आकडेवारी


वृत्तसंस्था | Sep 02, 2013, 08:24AM IST 
नवी दिल्ली - हुंड्याशी संबंधित कारणांमुळे देशात सरासरी दर तासाला एका महिलेचा मृत्यू होतो. 2007 ते 2011 मध्ये हुंडाबळींच्या अशा प्रकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही समस्या केवळ कमी शिक्षित किंवा गरीब कुटुंबांमध्येच नव्हे तर उच्चशिक्षित, र्शीमंतांमध्येही हुंड्यांसाठी सुनांचा छळ करण्याचे प्रकार सर्रास घडतात.

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड संस्थेच्या (एनसीआरबी) अहवालामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी म्हणजेच 2012 मध्ये देशभरात विविध राज्यांमध्ये हुंडाबळींचा आकडा 8 हजार 233 वर पोहोचला आहे. त्यानुसार सरासरी काढली असता तासाला एक मृत्यू होत असल्याचे लक्षात येते. 2011 मध्ये हुंड्यासाठी महिलांच्या मृत्यूचा आकडा 8 हजार 618 होता. पण त्या वेळी अशा गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण 35.8 टक्के होते. 2012 मध्ये मात्र, हे प्रमाण घसरून 32 टक्क्यांवर आल्याचे ताज्या माहितीवरून समोर आले आहे.
2007 ते 2011 दरम्यान, हुंडा प्रकरणांमध्ये महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. 2007 मध्ये हुंडाबळीचा आकडा 8 हजार 93 होता. तो 2008 आणि 09 मध्ये वाढून अनुक्रमे 8 हजार 172 आणि 8 हजार 383 वर पोहोचला. तर 2010 मध्ये 8 हजार 391 महिलांचा मृत्यू झाल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे. ही संस्था राष्ट्रीय स्तरावर गुन्ह्यांची आकडेवारी एकत्रित करण्याचे काम करते. हुंडाबळींचा आकडा वाढण्यामागे विविध कारणे असल्याचे या प्रकरणांचा तापस करणार्‍या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
ही समस्या केवळ गरीब व मध्यमवर्गाशी संबंधित नाही, तर तथाकथित उच्चवर्गीय (र्शीमंत)ही यामध्ये मोठय़ा प्रमाणावर सहभागी असल्याचे, दिल्लीच्या अतिरिक्त उपायुक्त (महिला व बाल विशेष शाखा) सुमन नल्वा यांनी म्हटले आहे. आपल्या समाजव्यवस्थेत या प्रथेची मुळे खोलवर रोवली गेली आहेत. त्यामुळे र्शीमंत लोकही हुंड्याचा विरोध करत नाही, असेही त्या म्हणाल्या. हुंडाविरोधी कायद्यात 1983मध्ये झालेल्या सुधारणांमुळे बराच फरक पडला असला तरी, सध्याच्या कायद्यामध्ये अजूनही काही पळवाटा आहेत. या पळवाटा दूर करून हुंडाबळी रोखण्यासाठी कडक कायदा होण्याची गरज असल्याचेही नल्वा म्हणाल्या.

तपास वेगाने होणे गरजेचे
हुंडा प्रकरणांमध्ये प्राथमिक पातळीवर पोलिस तपासाची गती अत्यंत कमी असते. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेवर त्याचा परिणाम होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील कामिनी जैस्वाल यांचे म्हणणे आहे. अशा प्रकरणांमध्ये लवकरात लवकर दोषारोप सिद्ध होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यानेच हुंडाबळी वाढले

कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे हुंडाबळीचे प्रमाण इतके वाढत असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी म्हटले आहे. पोलिसांनी अधिक संवेदनशील होण्याची, तर नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होण्याची गरज असल्याचेही शर्मा म्हणाल्या.

Sunday, September 1, 2013

लाखो आदिवासींचे ते प्रेरणास्थान आहे.


नजूबाईच्या संघर्षाची कहाणी…

 
२० जानेवारी २०१३ रोजी नंदुबारच्या पिंपळनेर तालुक्यात कॉ. नजुबाई गावित, कॉ. डोंगर बागुल यांच्या नेतृत्त्वाखाली आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा या संघटनेच्या अंतर्गत ही रॅली काढण्यात आली होती.

देशात पहिल्यांदा १९७५ दरम्यान सुरू झालेल्या आदिवासी जमिनींच्या हक्कासंदर्भात नंदुबारच्या पिंपळनेर येथील हे घर नजुबाई यांच्या आंदोलनाचे प्रमुख केंद्र होते. आजही ते सत्यशोधक महिला सभा आणि सत्यशोधक जात्यंतक कष्टकरी महिला सभेचे कार्यालय आणि लाखो आदिवासींचे ते प्रेरणास्थान आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आदीवासी वस्तीत लहानाच्या मोठय़ा झालेल्या, आदिवासींच्या हक्कासाठी लढणार्या नजूबाई गावीत यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत झालेले.  एवढे कमी शिक्षण, कोणतेही साहित्यिक वातावरण आणि पार्श्वभूमी नाही, अशा नजूबाईंनी पुस्तके लिहिली, लिखाण केले याचे आश्चर्य वाटते. त्याच्या या लिखाणामागे त्यांना उर्मी मिळाली ती आदिवासींसाठी त्यांनी दिलेल्या लढय़ातूनच…आदिवासी समाजात जन्म झालेल्या नजूबाई गावीत यांची मुलाखत या आठवडय़ाच्या रविवारीसाठी घेण्याचे ठरले. त्यांचा फोन नंबर मिळविला आणि त्यांना फोन केला. सुरुवातीला मुलाखत हवी आहे म्हटल्यावर त्या चक्क नाहीच म्हणाल्या. मग मी त्यांना सांगितले की, तुम्ही केलेले काम, तुमचे लिखाण हे सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचायला हवे, शेवटी माझी विनंती मान्य करत त्या मुलाखत द्यायला तयार झाल्या.   मुलाखतीला सुरुवात करताना त्यांनी अगदी मोकळेपणानं सांगितलं की, तुमच्यासारखं मला स्पष्ट मराठी बोलता येत नाही. मला त्यात फारसं काही वावगं वाटलं नाही, उलट त्यांचा मोकळेपणाच मला आवडला. शैक्षणिक पार्श्वभूमीबाबत  त्यांनी सांगितले की, माझे शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले आहे. म्हणजे अगदी माझ्याविषयीचे सांगायचे झाले तर मी मावची’ या आदिवासी जमातीची. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या गोंडवी पाडय़ात माझा जन्म झाला. आमच्या मालकीचे ना घर, ना जमीन. आई तर लाकुडफाटा गोळा करायची आणि वडील गुरे राखीत. त्यामुळे आई आणि वडील दोघेही दिवसभर कामासाठी घराबाहेर असायचे. आमच्या झोपडीत तर दिवाही लागत नव्हता. त्यामुळे शिक्षण म्हणजे नेमके काय असते हेही माहिती नव्हते.  त्याच दरम्यान आमच्या वस्तीवर शाळा सुरू झाली आणि माझ्या वडिलांनी मला त्या शाळेत घातले. घरी सतत दारिद्रय असल्याने पुस्तकांची खरेदी आम्ही कधी केलीच नाही. पुढे माझा संपर्क क्रॉमेड शरद पाटील यांच्याशी आला, त्यांच्याबरोबर चळवळीत काम करू लागल्यानंतर मला खर्या अर्थाने शिक्षणाचं महत्व समजू लागलं.  या भागात आदिवासी समूहासाठी पोटापाण्याचा प्रश्न खूपच बिकट आहे आणि तो सोडविण्यासाठी क्रॉमेड पाटील प्रयत्न करीत होते. त्यासाठी त्यांनी अनेक मोर्चे काढले, आंदोलने केली. त्यांच्या या कामात आणि लढय़ात मी मला जमेल आणि उमजेल ते काम केले.              क्रॉमेड पाटील यांच्याविषयी काय सांगाल?
त्यांच्याबरोबर आदिवासींच्या हक्कांसाठी लढा चालू असताना मला जाणवायला लागले की आदिवसी समाज कायद्याच्या संरक्षणाबाहेर आहे. म्हणूनच आदिवासींना संघटित करण्याचा मी प्रयत्न केला. आम्ही सुरुवातील सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक महिला सभेची स्थापना केली. परंतु ती फारसी प्रभावी ठरली नाही. आदिवासी महिलांवर कोणत्याही प्रकारचे अन्याय झाले तरी त्यांना न्याय मिळणे कठीण होते. कारण आदिवासींच्या विविध जमातीच्या ज्या जातपंचायती होत्या, त्यांचे नेतृत्व पुरुषमंडळीच करीत. आदिवासी माहिलांना तेथे येऊ दिले जात नसे. यामुळे स्त्रियांच्या विरोधातच पंचायतीचे निकाल लागत. गावात कधी दुष्काळ पडला,  साथीचे आजार आले की, त्याचे खापर एखाद्या महिलेवर फोडले जायचे आणि तिला डाकीण समजून ठार मारले जायचे. गावानं एखाद्या स्त्रिला डाकीण जाहीर केलं की, तिला त्यातून तिचा नवराही वाचवू शकत नव्हता. यात कधीही डाकिण म्हणून पुरुषाला मारले जात नाही.  पुरुषांना दुसरी पत्नी करण्याचा अधिकार आहे. मात्र तेच स्त्री करत असेल तर तिला पहिल्या नवर्याकडे केलेला देजचा व्यवहार दुपटीने परत करावा लागतो. यामुळे आम्ही सत्यशोधक महिला सभेच्या माध्यमातून काम सुरू केलं.
त्या काळात आम्ही आदिवासी स्त्रियांच्या हक्कांसाठी न्यायालयात गेलो. परंतु आदिवासी स्त्रिया हिंदू नसल्यामुळे त्यांना हिंदू कोड बिल आणि कोणत्याही प्रकारचे कायदे लागू होत नसल्याचा धक्कादायक निकाल त्यावेळच्या न्यायाधीशांनी दिला.  तेव्हा मात्र मी अनेक स्त्री मुक्ती संघटना, इतर संघटना यांच्यासमोर आमच्या हक्काचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळीकडून अपयश आले. मग ठरवले की आता आपणच आपल्याला न्याय मिळवून द्यायचा. आमच्या मागण्या,  हक्क यासाठी आम्ही संघटित झालो.
 माझे आई-वडील दोघेही अशिक्षित. त्यामुळे त्यांच्याकडून साहित्यिक वारसा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. मग मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या साहित्यिकांचे लेखन वाचत होते. मुळात क्रॉमेड पाटील यांनी मला सतत वाचले पाहिजे, लिहिले पाहिजे असा सल्ला दिला होता. त्यामुळे मी ग्रामीण, दलित, आदिवासी साहित्य वाचायला सुरुवात केले. एक एक शब्द जोडून, वाचून मला त्याच अर्थ समजून घ्यावा लागायचा. त्यात माझा बराच वेळ जात असे. तसे असले तरी मी लेखन आणि वाचन याकडे लक्ष देऊ लागले. कोणे एके काळी मला स्वतःचे नावही नीट लिहिता येत नव्हते. मात्र मी चळवळीत काम करू लागल्याने आणि वाचन वाढविल्याने हळूहळू लेखन करू लागले. त्यानंतर मग मी नित्यनियमाने मला येणारे वेगवेगळे अनुभव लिहू काढू लागले. त्यातून माझ्या दोन कादंबर्या तृष्णा आणि भिवा फरारी यांचा जन्म झाला आणि लवकरच नवसा भागिनीचा एल्गार हा कथासंग्रह प्रकाशित होत आहे. नागपूरच्या रुपा कुलकर्णी यांनी या पुस्तकाला प्रास्तावना दिली आहे.  सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने पुढे ग्रामीण, दलित, आदिवासी साहित्याचे प्रवाह एकत्र करण्याची महत्वाची भूमिका बजावली. अनेक ठिकाणी याविषयीची साहित्य संमेलने झाली. साक्री येथील पाचवे दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलन होईपर्यंत सर्व काही व्यवस्थित सुरू होते. मात्र काही लोकांनी ग्रामीण, दलित, आदिवासींसाठी सुरू झालेली साहित्याची चळवळ ती खंडित करण्याचा प्रयत्न केला.
साठीच्या दशकात दलित, ग्रामीण साहित्य प्रवाह उदयाला येत होता. परंतु आदिवासी साहित्याच्या संदर्भात पाटी कोरीच होती. हे प्रवाह परिवर्तनाच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे असा विचार कॉम्रेड शरद पाटलांनी पुढे आणला.  यातून पहिले दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. पहिलं साक्रीला, दोन संमेलन वाळव्याला आणि शेवटचं सटाण्याला झालं. आनंद यादव, बाबूराव बागूल अशा अनेक जणांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले होते. त्याकाळात दलित, ग्रामीण, आदिवासी साहित्य चळवळी बर्याच जोर धरत होत्या. या चळवळी जातीअंताच्या दिशेने पुढे जायला हव्या होत्या असे पाटलांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यांनी अब्राह्मणी सौदर्यशास्त्रांची निर्मिती केली. मात्र यातील काहीजण व्यवस्थेला शरण गेल्याने ते एकत्र आले नाहीत. त्यावेळी साहित्य कशाला म्हणतात याचेही मला भान नव्हते. त्यानंतर मला पाटलांनी काही नामवंत साहित्यिकांच्या कादंबर्या वाचायला दिल्या. सुरुवातीला काही जाणवत नव्हतं, परंतु नंतर नंतर बरेच काही वाचल्यानंतर साहित्य क्ळलं. समाजव्यवस्थेच, त्यांच्या परिसराचं किंवा गाव पातळीवरच साहित्य मी वाचलं. ते बरेच जाणिवेच्या पलिकडं गेल्याचं मला दिसत नाही.
त्यातच आपण काय लिहावं असा प्रश्न माझ्यासमोर पडला आणि त्यातून मी ग्रामीण आणि दलित जीवनाच्या व्यथा, वेदनापेक्षा आदिवासीचे जास्त शोषण पिडण होत असल्याने त्यांच्यावर लिहिलं पाहिजे असं ठरवलं. मला जसं सुचत गेलं, तसं मी लिहून काढलं. सुरुवातीला आघोरचे चार भाग लिहले. पण ते कोणीही छापायला तयार नव्हते. आपण म्हणतो आपल्या भाषेत साहित्य लिहीलं पाहिजे, आदिवासी जिथं जिथं विखुरला आहे तिथं तिथं त्यांची संस्कृती आणि भाषा यात थोडासा फरक आहे, या माध्यमातून माझ्या कादंबरीत समान आदिवासीची भाषा ठेवली होती. परंतु ती कादंबरी अक्षर लागत नाही, भाषा कळत म्हणून पुण्या-मुंबईच्या लोकांनी परत पाठवली. त्यावेळी मी खूप नाराज झाले होते. आता काय करावे असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला, मी आदिवासी भाषेत लिहिलेली कादंबरी मराठीत परत लिहून काढली. त्यावेळी मला ही कादंबरी छापायला कर्ज घ्यावं लागलं होतं. त्यामुळेच ती पुढे आली. नाहीतर ती लोकांपुढे गेली नसती. पुढे माझी तृष्णा ही आत्मवृत्त्पर कादंबरी बाहेर पडली. तिला खूप प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळाले तरीही तिला फारसा अजूनही न्याय मिळाला नसल्याचे मला वाटतं. नंतर स्वतंत्र कादंबरी म्हणून भिवा फरारी लिहिली. इंग्रजांच्या विरोधात आदिवासीचे अनेक नायक लढले होते. परंतु त्यांची योग्य दखल घेतली जात नव्हती. आदिवासी समाजाच्या भिवाने इंग्रजांच्या विरोधात संघर्ष केला त्याचे चित्रण त्यात आहे.
मी गुजरातमधील डांगला गेले होते. तेथे शबरीकुंभ मेळा भरतो ते राणीचं राज्य होतं, असं म्हटलं जातं. परंतु तिचं नाव कोणी सांगत नव्हते. मी तिथं गेल्यानंतर पाहणी केली. नंतर माझ्या लक्षात आले की भारतातील मातृसत्ताक राणी म्हणजे ही शबरी आदिवासी आणि तिचं ते स्त्री राज्य असले पाहिजे असे मला वाटते. तिथल्या घनदाट जंगलात सीता सरोवर आदी मी पाहून आले. त्यानंतर खूप विचार करुन मी ही कादंबरी लिहिली. सुरुवातीला मी कथाच लिहित होते. कवितेकडे मी कधी गेले नाही, आदिवासी स्त्रियांवर होणार्या अन्यायाबाबत मी कथा लिहिल्या. बांबूची मोळी, कुतारखांब, जानकी, उमराचं झाड, आदी कथा मी लिहिल्या. त्या खूप गाजल्या. गिरीश कर्नाड, विजय तेंडूलकरांपासून अनेकांनी त्यांचा गौरव केला. माझ्या बाबूची मोळी या कथेवर तेंडूलकर चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते, परंतु नंतर ते आजारी पडल्याने मागे राहिले. दलित, ग्रामीण साहित्य खूप मोठय़ा प्रमाणात लिहिलं गेलं असले तरी आदिवासींच्या बाबत अजूनही फारस लिहिलं गेलं नाही. त्यांच्यातून जे शोधून पुढे आणायला पाहिजे होतं ते पुढे आले नाही. याची मला अजूनही खंत वाटते.
वर्षा फडके-आंधळे

Saturday, February 23, 2013

आदिवासींच्या जीवनसंघर्षाचा जिवंत आलेख


नजूबाई गावित यांच्या साहित्यातून आदिवासी जीवनाचे दाहक वास्तव नेहमीच उभे राहते. इंग्रजांशी संघर्ष करत आपल्या लोकांना जगवणा-या ध्येयवादी नायकाची कहाणी सांगणारी ‘भिवा फरारी’ ही त्यांची कादंबरी प्रकाशित झाली आहे. भिवाची कहाणी काल्पनिक असली तरी वास्तवाचा आधार घेऊन लिहिलेली आहे. आदिवासींच्या जीवनपद्धतीचा आणि जीवनसंघर्षाचा जिवंत आलेखच त्यात मांडलेला आहे.
--------
देशातील पहिल्या स्वतंत्र आदिवासी लेखिका म्हणून नजूबाई गावित यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. आदिवासींवर आजवर बरेच लेखन प्रसिद्ध झाले असले तरी आदिवासी साहित्यातील जिवंतपणा आणि वास्तव केवळ नजूबाईंच्या साहित्यातून अनुभवायला मिळतो. धुळे जिल्ह्यातील भूमिहीन आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या नजूबाईंनी जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले असले तरी त्यांची प्रतिभाशक्ती आणि साहित्यातील जीवनवादी दृष्टिकोन प्रज्ञावंतांनाही भुरळ घालतो.
त्यांची प्रत्येक साहित्यकृती मानवी जीवनाचे नवे पैलू नव्याने उलगडून दाखवते.दलित आणि ग्रामीण साहित्य चळवळ मरगळीला येत असल्याच्या काळातच नजूबाईंची पहिली आत्मनिवेदनपर ‘तृष्णा’ नावाची कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने आदिवासींच्या जीवनातील दाहक असे वास्तव समाजासमोर आणले. नामवंत समीक्षकांपासून ते विचारवंतांपर्यंत सगळ्यांना या कादंबरीने आदिवासी जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. त्यानंतर त्यांची ‘भिवा फरारी’ ही कादंबरी ‘मावळाई प्रकाशन’ने प्रसिद्ध केली.
   धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे २ ० जानेवारी २ ० १ ३ ला  सत्यशोधक कष्टकरी महिला  सभेचे अधिवेशन झाले त्यावेळी निघालेल्या मोर्च्याचे नेतृत्व कॉ. नजुबाई गावित यांनी केले होते. त्यावेळीचे हे छायाचित्र  
ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’नंतर इंग्रजांशी संघर्ष करत आपल्या लोकांना जगवणा-या ध्येयवादी नायकाची कहाणी सांगणारी ‘भिवा फरारी’ ही दुसरी कादंबरी म्हणता येईल. ‘फकिरा’तील फकिरा आणि ‘भिवा फरारी’तील भिवा हे या दोन्ही कादंबरीचे दोन नायक, खरे तर दोन स्वतंत्र ‘देशनायक’ म्हणून समोर येताना दिसतात. फकिरापेक्षा भिवाच्या जगण्यातील संघर्ष हा मानवी जीवनाला नवे परिमाण देणारा ठरतो. डोंगरद-यात आणि कडेकपारीत आयुष्य घालवत आपल्यासारखी जगण्याचा संघर्ष करणारी आदिवासी माणसे जगवणारा तसेच भिल्ल जमातीमधील आपल्या गोतावळ्याला जगवणारा भिवा हा आपल्या कर्तृत्वाने माणुसकी कायम राखण्यासाठी सातत्याने समता-संघर्षाची एक अनोखी चळवळ उभारताना दिसतो.
सतत अन्यायाच्या गर्तेत सापडलेल्यांना समतेची वागणूक देत त्यांना माणसांसारखे जगवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि त्यासाठी वाट्टेल ते संकट अंगावर घेण्याची तयारी असणा-या भिवामध्ये एक प्रकारचा क्रांतिकारी बंडखोर आहे. भिवाचा शेवट इंग्रजी सत्तेच्या विरोधात आपल्या प्राणाची आहुती देऊन झाला असला, तरी तो या देशाच्या स्वातंत्र्यासाठीचा होता, हे नक्की. त्याच्या अखेरच्या क्षणी आणि या कादंबरीच्या शेवटी त्याची पत्नी सीता हिने गायिलेले गीत देशात समतेबरोबर स्वातंत्र्यासाठीही आवाहन करणारे आहे.
कधी महू फुले, कधी झाडपाला, कधी शिकारीतून मिळालेले मटण-मांसाचे तुकडे खाऊन जगताना या कादंबरीतील माणसं विषमतेच्या विरोधात संघर्षाची मशाल पेटवताना दिसतात. त्यांचे एक स्वत:चे जग आहे. ते जग समतेचे, समानतेचे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे आहे. भिवा हा या कादंबरीतीत मुख्य नायक असला तरी त्यासोबत काळ्या, उंबऱ्या, मंगळ्या, झुंबडया, जंगल्या, रंग्या ही पुरुष पात्रही तितकीच महत्त्वाची आहेत.
या कादंबरीत भिवाच्या सोबतीचे प्रत्येक स्त्री आणि पुरुष पात्रही विषमतेच्या विरोधात भिवाची साथ देताना, त्याला सतत प्रेरणा देताना दिसतात. भिवाच्या लग्नाच्या मांडवासाठी शिवरा, कान्ह्या व रंग्या भिवासोबत जवळच्या जंगलात जातात. तिथे भिवा पिंपरीची फांदी तोडतो. हिरव्यागार पानांच्या झुबक्याने भरलेली ती फांदी धाडदिशी कोसळते आणि सगळे आरोळी ठोकतात, ‘अरे शाब्बास नवरदेवा, चार-पाच घावांत फांदी तोडलीस. तसे हे गुलामीचे, विषमतेचे, बांडय़ांचे (इंग्रजांचं) राज्य भिवाबरोबर आम्ही तोडू अन् समतेचे राज्य आणू!’
त्यावर आपले बलदंड बाहू उंचावत भिवा म्हणतो, ‘अरे, या फुगलेल्या दंडात जे रक्त आहे, ते विषमतेविरोधी लढून समता आणण्यासाठीच वापरणार आहे,’ या वाक्यातून भिवाचा संघर्ष हा पूर्णपणे विषमतेविरोधात होता, हे दिसून येत असले तरी तो स्वकियांशी आणि तितकाच परकीय इंग्रजांशीही होता. देश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला पाहिजे, ही त्याची तळमळ बरेच काही सांगून जाते.
प्रत्येक प्रसंगी भिवाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे उंब-या, मंगळ्या, झुंबडया, जंगल्या, रंग्या हे त्याचे सोबती या कादंबरीत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, पण तुळसा, काळघी, शिवरी, झुनकी, बाजरी, झाकरा आणि भिवाची सखी सीता ही स्त्री पात्रेही तितकीच महत्त्वाची आहेत. ती भिवाच्या संघर्षातही सहभागी होताना दिसतात.
‘भाऊ, तू मानसं पोसणारा आहे. तुझ्या आजाची टोळीबी आपली मानसं पोसत होती. पन शिवबाची बातमी ऐकून ते गेले, तर एकही परत आला नाही. त्या बायकोमा-या रामानंबी आपले पूर्वज गिळून घेतले. बळी काय अन् शंबू काय, ताटका रानी काय अन् रावण काय, ही सगळी आपली मानसं होती. चांगली होती, जातपातविरोधी होती, म्हनून त्यांना जातपातवाल्यांनी मारलं. आपल्यात अजूनबी पोराचं नाव रावण ठेवतात. गोरा इंग्रज त्याच चालीने वागतो आहे,’ अशी म्हणणारी तुळसा एकीकडे भिवाची समजूत काढते, तर दुसरीकडे ‘भिवा, लहू झाला नसता तर मी तुझ्यासोबच राहिले असते. स्त्री राज्यात सैन्य स्त्री-पुरुष दोघांचं असलं तरी, ते स्त्री राज्याचं म्हणूनच ओळखलं जायचं,’ अशी आपल्या हजारो वर्षापासूनच्या स्त्री राज्याची जाणीव करून देणारी सीता तितकीच महत्त्वाची ठरते.
बांडया बाणाच्या कांडयाला विषारी दवा लावताना आपला जीव धोक्यात घालणारी भिवाची आजी तुळसा, ही या कादंबरीची वेगळी नायिका म्हणून समोर येत असली तरी सीता, झाकरा, झुनकी, बाजरी आणि काळघीही स्वतंत्र नायिका ठरतात. खरे तर ही सर्व स्त्री पात्रे नजूबाईंनी काळजीपूर्वक व आस्थेने निर्मिलेली आहेत. कारण त्यांची प्रत्येकीची भूमिका, प्रत्येक प्रसंगी वेगळे भान राखणारी आहे. या प्रत्येक पात्रांच्या स्वतंत्र कथांची सरमिसळ लेखिकेने मोठया कौशल्याने केली आहे.
झाकराचा करुण अंत आणि त्यानंतर तिच्या आठवणीने वेडापिसा झालेला काळ्या यांची कथा वाचकांचे हृदय हेलावून टाकते. पुढे ती झाकरादेवी म्हणून समोर येते. काळ्या अनेक वर्षे झाकराच्या आठवणीत डोंगरद-यातून आयुष्य घालवतो. नंतर आपल्या वस्तीत येऊन राहिल्यानंतर झाकराच्या आठवणीत मुक्या गायीवर आपला जीव लावतो. त्यासाठी लेखिकेने काळ्याच्या तोंडी टाकलेली कविता पशुप्रेमाविषयी नव्या जाणिवा निर्माण करते. या कादंबरीत पाच कविता प्रसंग साधून आल्या असल्या तरी त्या मानवी जीवनाचे अनेक पदर उलगडून दाखवतात. इमला देवी आणि शेंडय़ा देव, जिबला देवी यांच्या कहाण्याही वाचकांना चकित करून सोडतात.
वर्षानुवर्षे आदिवासी समाजात रूढ असलेल्या अंधश्रद्धांचा स्त्रियांच्या जीवनावर कसा परिणाम होतो, त्याचे दर्शन ‘भिवा फरारी’त होते. रोगराई आली की, त्यासाठी बायामाणसांचा जीव घेत असल्याचे दाखले देत असतानाच त्यांना डाकीण कसे ठरवले जाते आणि त्यामागे काय वास्तव असते, ते नजूबाईंनी तुळसाच्या तोंडून वदवले आहे. भिवाला ती अनेक जुन्या गोष्टीतून स्त्रियांचे हे वास्तव आणि त्यांची परंपरा तुळसा सांगत असते. गंगठा राज्यातली कुळदेवी मोगीआया यांच्यासोबतच शूर्पणखा, ताटिकांचा संघर्ष वेळोवेळी सांगते.
भिवाची कहाणी काल्पनिक असली तरी वास्तवाचा आधार घेऊन लिहिलेली आहे. पण कल्पनाविलास व वास्तव यांचे भान बाजूला ठेवले तरी या कादंबरीत मांडलेला दस्तावेज हा एका काळाचा नव्हे तर अवघ्या एका जीवनपद्धतीचा आणि जीवनसंघर्षाचा जिवंत आलेख आहे, असे म्हणावे लागेल. नजूबाई गावित यांच्या सामाजिक कार्याप्रमाणेच त्यांचे लेखनही खूप मोठय़ा सामाजिक परिवर्तनासाठी दिशादर्शक ठरावे. नव्या पिढीला, विशेषत: तरुणाईला समाजाचे हे दुर्लक्षित टोकही निश्चितपणे दिसले पाहिजे, त्यावर विचारमंथन झाले पाहिजे.
भिवा फरारी : नजूबाई गावित
प्रकाशक : मावळाई प्रकाशन
पानं : २४६
किंमत : २७० रुपये

Wednesday, October 31, 2012

नजूबाई गावीत

आदिवासी स्त्रियांवर होणाऱ्या 
अन्यायाबाबत मी कथा लिहिल्या - नजूबाई गावीत

एकाधिकारशाही विरोधात नवापूर आणि साक्री भागातून एक आणि तळोजा, शहादा भागातून दोन मोर्चे आले. धुळे जेल रोडवर या माच्र्याची सभा झाली. छायाबाई सुरतवंती यांच्या भाषणानंतर मी बोलले. श्रोत्यांचा मूड बिघडला होता. मलाही हुटआऊट करण्याच्या पावित्र्यात होते. मी माझ्या भाषणाची सुरूवातच अशी केली की, ‘आदिवासी भगिनीमध्ये शहरी भगिनी पांढऱ्या साडय़ा नेसून बसलेल्या आणि बहुसंख्य आदिवासी भगिनी गडद रंगाच्या पेहरावात असल्यामुळे येथे जशा चांदण्या आकाशातून खाली उतरूल्या आहेत की, काय असे भासते’ इतक्यात जमलेल्या श्रोत्यांकडून टाळ्याचा कडकडाट झाला. मी अनेक गोष्टी अशा तऱ्हेने सांगत गेल्याने सभेचा मूड बदलला. लोक माझे बोलणे एकचित्ताने ऐकत होते. ही सभा सार्वत्रिक निवडणुकी अगोदरची होती. एकाधिकारशाही विरोधातली ती एक महासभा होती. धुळे जेल रोडचा परिसर आदिवासी आणि शहरी भगिनींच्या उपस्थितीने फुलून गेला होता. तो प्रसंग माझ्या जीवनात खूप महत्वाचा होता.
मी ‘मावची’ जमातीची. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या गोंडरी पाडय़ात माझा जन्म झाला. आमच्या पिढय़ान्पिढय़ा झोपडीतच राहत होत्या. आमच्या मालकीचे आम्हाला तसे घर ना जमीन. आई लाकुडफाटा गोळा करून ते ओझे कित्येक मैल डोक्यावरून वाहून आणीत असे. ते अल्पस्वल्प किंमतीत विकायचे. आमच्या घरात डझनभर लहान मुले होती. त्यातील मोठी मुले पै-पाव आण्याचे काम करीत असत. आणि वडील गुरे राखीत. आम्हाला जन्मापासूनच कधीच पोटाला पोटभर अन्न मिळाले नाही. अंगाला पुरेसा कपडा मिळाला नाही. त्यातच तीन मामा अन् त्यांच्या बायका व मुलेही आमच्यातच राहत असत. यामुळे कधी कोणाला काही मिळत नव्हते.
आमच्या झोपडीत सर्वत्र दारिद्रय वास्तव्य करून होते. घरकाम आणि शेतातील काम एवढयाच गोष्टी आम्हाला माहित होत्या. त्या दरम्यान आमच्या पाडय़ावर (वस्तीवर) शाळा निघाली. तोर्पयत माझे शाळेचे नेमके वय झाले होते. वस्तीवर शाळा सुरू  झाली आणि वडिलांनी माझे नाव शाळेत टाकले. घरी संपूर्ण दारिद्रय नांदत असल्याने त्यावेळी दोन आण्याची पुस्तके घेण्याइतकीसुध्दा आमची परिस्थिती नव्हती. शाळा म्हणजे इमारत वगैरे असे काही नव्हते. ती कोणाच्या तरी घराच्या पडवीमध्ये भरत होती. सुरूवातील शाळेत एकुण ‘मावची’ आणि ‘भिल्ल’ जातीची मिळून साठ मुले-मुली होत्या. शाळेत सगळचे गुण्या-गोविंदाने राहत असू. माणूस शिक्षणामुळे माणूस सुधारतो हे आम्हाला माहित नव्हते. तशी सुधारण्याची आशाही नव्हती. शिक्षकांनी आमची नावं लिहून घेतली आणि आम्हाल नियमित हजर राहण्यास बजावलं. आम्ही पळून जायचो. झाडाझुडपात लपायचो. परंतु मला मामाने सक्तीनं शाळेत जायला लावलं. ‘मुलीन शाळेत जाण्यात काय हंशील आहे? असा प्रश्न माझ्यासकट सर्वाना पडत असे. चूल आणि मूल यापलिकडे मुलींचं विश्व असू शकते यावर त्यावेळी कोणाचाच विश्वास नव्हता. मी शाळेत जायला लागले. त्यावेळी सगळेच एकाच मडक्यातील पाणी पित असू, ही बाब आमच्या काही लोकांना रूचली नाही.
मावची जमातीच्या बायकांनी भिल्ल जमातीची मुले-मुली त्यांची पडवी, पणी, मुले बाटवितात असा कांगावा करून आम्हाला हाकलून दिले. यामुळे शाळा अडचणीत आली. परंतु गुरुजींनी आणि मामांनी गावाबाहेर झोपडी उभारून पुन्हा शाळा सुरू केली. काही दिवसांनी त्या पहिल्या मास्तरची बदली झाली. नंतर एक हरिजन(मागासवर्गीय) शिक्षक आमच्या शाळेवर आले. आमच्या मावची व भिल्ल लोकांना त्यांना खूप छळले. तरीही ते आम्हाला खूप चांगले शिकवत होते. नंतर त्यांना खूपच छळून अगदी पळवून लावले. मावची आणि भिल्लांच्या या वागणुकीमुळे इथे मास्तर यायला घाबरत होती. तरीही एका मास्तराने धाडस केले आणि तो मास्तर माझे शिक्षण संपेपयर्ंत टिकले. आम्हा सगळयांन त्यांचा खूप आदर वाटत होता.
-----
आम्ही सुरूवातीला सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक महिला सभेची स्थापना केली होती. परंतु ती फारसी प्रभावी ठरली नाही. आदिवासी महिलांची परिस्थिती खूप गंभीर होती. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय झाला की, त्यांना त्यासाठी न्याय मिळणे कठीण होते. कारण ज्या जमातीच्या जातपंचायती होत्या त्यांचे सर्व नेतृत्व पुरूषमंडळीच करीत. आदिवासी महिलांना तेथे येऊ दिले जात नसत. यामुळे स्त्रियांच्या विरोधातच जमातपंचायतीचे निकाल लागत. यामुळे एखाद्या आदिवासी स्त्रीला न्याय मिळत नव्हता. ती समाजाकडून आणि न्यायव्यवस्थेकडूनही पिडली जात होती. गावात कधी दुष्काळ पडला, कोणते साथीचे आजार आले की, तिला डाकिण समजून ठार मारले जाते.
सरकारकडून अनेक आजारावर औषधे उपलब्ध केली असली तरी त्यालाही किती अडचणी आहेत? एक तर आदिवासी दऱ्याखोऱ्यात असल्याने त्यांच्या पाडय़ांकडे रस्ते, शाळा, दिवा पोहोचत नाहीत, यामुळे ते कधी भूकबळीने तर कधी साथीच्या आजाराने मरत आहेत. गावात एखादा आजार कोणाला आला की, भगताकडे नेलं जातं. त्यात स्त्रियांचे काहीही चालत नाही. गावानं एखाद्या स्त्रिला डाकिण समजलं की, तिला त्यातून तिचा नवराही वाचवू शकत नाही. तिला कोणाचेच संरक्षण मिळत नाही. इतकी भीषण अवस्था आदिवासी स्त्रियांची आहे. ती अजूनही संपलेली नाही. यात कधीही डाकिण म्हणून पुरूषांला मारले जात नाही. त्याने कितीही बहुपत्नीत्व केले तरी त्याला समाज विचारत नाही, मात्र स्त्रियांना तसे अधिकार नाहीत. काही लोक आदिवासी स्त्रियांना स्वातंत्र्य असल्याचे बोलतात ते बरोबर नाही.
आदिवासी समाजात स्त्रियांची लग्ने ही घरच्या मंडळींच्या निर्णयाप्रमाणेच होतात. पुरूषांना दुसरी पत्नी करण्याचा अधिकार आहे, मात्र तेच स्त्री करत असेत तर तिला पहिल्या नवरा मंडळीकडे ‘देज’चा व्यवहार आहे तो दुपटीने परत करावा लागतो. तसे पुरूषांबाबत नाही. साक्री तालुक्यातील मोखड गावात उख्या नावाचा आदिवासी होता. शेतीबाडी होती. दोन बायकांच्या त्याला सात मुली होत्या. या सर्वाचीच पहिले लग्न झाल्यानंतर त्या परत आल्या. त्यामुळे उख्याला सगळी शेतीबाडी विकून देज दुपटीने द्यावा लागला होता. शेवटी जावयांना देजची भरती करण्यासाठी त्याला भूमिहीन व्हावे लागल्याचे माझ्यासमोरचे उदाहरण आहे. त्याच्या मुलांनी नंतर काही जमिन कष्टाने परत घेतली तरीही आदिवासींमध्ये असलेल्या जाचक रिवाजांचे प्रश्न कायम आहेत.
यामुळे आम्ही सत्यशोधक महिला सभेच्या माध्यमातून काम सुरू केलं. मात्र ते करत असताना आदिवासी महिलांना कायद्याचं कोणतंही संरक्षण मिळत नसल्याचे आम्हाला दिसून आलं. आदिवासी हे हिंदू नसल्याचे सांगून त्यांच्या महिलांसाठी हिंदू कोड बिलाचे कायदे लागू नव्हते. जे काही कायदेकानून होते त्याचा कोणताही फायदा आणि संरक्षण जसे हिंदू स्त्रियांना मिळत होते तसे आदिवासी स्त्रियांना नाही. यामुळे त्यांच्यावर कितीही अन्याय झाला तर त्यांना कोणी वाली नव्हता. तरीही आदिवासी स्त्रिया नव्याने दमाने आदिवासी चळवळीत पुढे येत होत्या.
त्या काळात आम्ही आदिवासी स्त्रियांच्या हक्कांसाठी जो लढा देत होतो, त्याबाबत मात्र काही ब्राह्मणी स्त्री संघटना आदिवासींच्या प्रश्नांबाबत शेपूट खाली घालून होत्या. आम्ही आदिवासी स्त्रियांच्या अनेक प्रश्नांसाठी न्यायालयात गेलो, परंतु तिथे आम्हाला न्याय मिळेल, अधिकार मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु आदिवासी स्त्रिया हिंदू नसल्यामुळे त्यांना हिंदू कोडबील आणि कोणत्याही प्रकारचे कायदे लागू होत नसल्याचा धक्कादायक निकाल त्यावेळच्या न्यायाधिशांनी दिला. पुरूष आदिवासी असो की, हिंदू त्याला कोणत्याही प्रकारचे बंधन नाहीत, एखाद्या स्त्रीने आपला पती सोडायचा विचार केला तर तिच्यावर जमातपंचायतीचे कायदेकानून सुरू होतात. तसे पुरूषांच्या बाबतीत घडत नाही, ते कधी बहुपत्नीत्वाचा व्यवहार करू शकतात. ही खरे तर आदिवासी स्त्रियांच्याबाबत ही कायद्याची कमजोरी आहे. मोठे धाडस करून एखादी आदिवासी महिला कोर्ट कचेरीत गेली तर तिला न्याय मिळेल असे दिसत नसल्याने आदिवासी स्त्रियांच्या हक्कांसंबंधीचा मुद्दा पुढे कमजोर होत गेला. आता तर या प्रश्नांवर सगळं सपाट झाल्यासारखं दिसतं.
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या माध्यमातून आम्ही आदिवासी भूमिहिनांना जमीनी मिळाव्यात यासाठी लढा सुरू केला होता. तो काळ  ते  सालच्या दरम्यानचा होता. या लढय़ात निम्म्यापेक्षा अधिक आदिवासी महिला होत्या. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भूमिहिन आदिवासींना जमिनी मिळाव्यात यासाठी सुप्रीम कोर्टात गेलो होतो. या लढय़ाचे नेतृत्वच माझ्याकडे होते. माझ्यासोबत कॉ. साजूबाई गावितसह अनेक स्वत:ला झोकून देणारे कार्यकर्त्यां महिला आणि पुरूषही होते. आदिवासी स्त्री पुरू षांनी पाडय़ापाडय़ात जाऊन याबाबत जागृतीचे काम केले होते. प्रत्येक आदिवासींची व्यक्तिगत माहिती गोळा करणे, त्यासाठी गावसभा घेणे, केससाठी लागणारे कागदपत्रे जमा करण्याचे काम आम्ही करत होतो.  सुप्रीम कोर्टात आमची केस लढल्यानंतर इतर राज्यातील आदिवासींनीही आपले दावे कोर्टात दाखल केले.   हे सर्व साक्री, नवापूर भागातील जंगलछेडूच्या भूमिहिन आंदोलन चळवळीच्या रेटयाने शक्य झाले. आम्ही जी देशात भूमिहिन आदिवासींसाठी लढाई सुरू केली त्यासाठी आता गेल्या दोन वर्षामध्ये प्रश्न तीव्र केला जात आहे. यासाठी आंदोलने आणि मोर्च काढले जात आहेत. मात्र आमच्या लढयामुळे हा प्रश्न राजकीय, व कायद्याच्या पटलावर प्रथम आणला गेला.
----

मी वेगवेगळया माध्यमातून सत्यशोधक कम्युनिष्ट पक्षाचे करत असताना दलित, आदिवासींच्या प्रश्नांवर भूमिका मांडत राहिले. तब्बल चाळीस वर्षापासून हे सुरूच आहे. भूमिहिनांचा प्रश्न, आदिवासी महिला आणि एकुणच स्त्रीमुक्ती चळवळ आणि स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न हे अजूनही मिटलेले नाहीत. राज्यात भटक्या-विमुक्त, आदिवासी आणि दलितांनी ज्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत त्या त्यांच्या नावावर केल्या जात नाहीत. सरकार वेगवेगळी कारणे सांगून त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवतं. आदिवासींची तर अत्यंत गंभीर अवस्था आहे. त्यांना तर घर ना दार, ना शेती सरकार द्यायला तयार नाही. थोडंसं मागे वळून पाहिलं तर त्यांना घटनाही पूर्ण न्याय देऊ शकली नाही. कायदे कानून आणि देशातील लोकशाही, स्वातंत्र्य, बंधुभावही त्यांच्यासाठी अपुरा पडतो. त्यांना अजूनही स्वातंत्र्यच नाही. अजूनही पोट भरण्यासाठी झगडावं लागतं. त्यांच्या हक्कांचं त्यांना मिळत नाही त्यामुळे आपल्या देशात खरी लोकशाही नांदतेय असे म्हणता येणार नाही. जे काही चालले आहेत ते चुकीच्या वाटेने जात आहेत. म्हणूनच शेतकरी, आदिवासी, दलित, कष्टकरी लोकं उद्ध्वस्त होत असून देशाला भांडवलदारी व्यवस्थेने जखडून टाकलं आहे. यामुळेच भ्रष्टाचार वाढला आहे.

माझ्या आयुष्यात नामांतराचा लढा खूप महत्वाचा ठरला. त्यासाठी मोर्चे काढले, सत्याग्रह केला. नाशिक येथे झालेल्या पहिल्या सत्याग्रहात आमच्या हजारएक लोकांना अटक करण्यात आली, मला परतवलं. आमचे शेकडो कार्यकर्ते दुसऱ्यांदा सत्याग्रहासाठी पुढे आले तेव्हाही चौदाशे लोकांना पकडून डांबण्यात आले. एक शंभर लोकांची तुकडी सुरतमार्गे मुंबईला पाठवण्यात आली होती त्यांनाही अटक करण्यात आली.
----

साठीच्या दशकात दलित, ग्रामीण साहित्य प्रवाह उदयाला येत होते, परंतु आदिवासी साहित्याच्या संदर्भात पाटी कोरीच होती. हे प्रवाह परिवर्तनाच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे असा विचार कॉम्रेड शरद पाटलांनी पुढे आणला. त्यांच्यात असलेली दरी कमी केली पाहिजे यातून पहिले दलित,आदिवासी, ग्रामीण, साहित्य संमेलनाची सुरूवात झाली. पहिलं साक्रीला, दोन संमेलन वाळव्याला आणि शेवटचं सटाण्याला झालं. आनंद यादव, बाबुराव बागुल अनेक जणांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्याकाळात दलित, ग्रामीण, आदिवासी साहित्य चळवळी बऱ्याच जोर धरत होत्या. या चळवळीजातीअंताच्या दिशेने पुढे जायला हव्या होत्या असे पाटलांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यांनी अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राची निर्मिती केली. मात्र यातील काहीजण व्यवस्थेला शरण गेल्याने ते एकत्र आले नाहीत. त्यामुळे या साहित्य चळवळी थंड झाल्यासारखे दिसत आहे. त्यावेळी साहित्य कशाला म्हणतात याचेही मला भान नव्हते. त्यानंतर मला पाटलांनी काही नामवंत साहित्यिकांच्या कादंबऱ्या मला वाचायला दिल्या. सुरूवातीला काही जाणवत नव्हतं, परंतु नंतर नंतर बरेच काही वाचल्यानंतर साहित्य कळलं. ते समाजव्यवस्थेचं त्यांच्या परिसराचं किंवा गाव पातळीवरचं साहित्य मी वाचलं. ते बरेच जाणिवेच्या पलिकडं गेल्याचं मला दिसलं नाही.

आमचा तसा साहित्याचा संबंध नव्हता. तसं साहित्य म्हणजे काय हे माहित नव्हतं. सत्यशोधक ग्रामीण साहित्य सभेच्या माध्यमातून ते आम्हाला पहायला मिळाले. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने पुढे ग्रामीण,दलित, आदिवासी साहित्याचा एक प्रवाह एकत्र करण्याची महत्वाची भूमिका बजावली. अनेक ठिकाणी याविषयींचे साहित्य संमेलन झाली. साक्री येथे पाचवे , दलित,आदिवासी,ग्रामीण साहित्य संमलेन होईर्पयत सर्व काही व्यवस्थीत सुरू होते. मात्र काही लोकांनी ग्रामीण, दलित, आदिवासींसाठी सुरू झालेली साहित्याची चळवळ खोडा घालून ती खंडीत करण्याचा प्रयत्न केला. आता जे काही सुरू आहे ते आदिवासींच्या नावाने ब्राह्मणी व्यवस्थेला आहारी आहेत. ग्रामीण, दलित,आदिवासींच्या चळवळीतून एकजुटीचे साहित्य निर्माण झाले. पुढे ती विभागली गेली. तरीही दलित, आदिवासी, ग्रामीण अशा विविध नावाने का असेना ती सुरू होती. आता मात्र काही वेगळया चुली मांडल्या त्याचीही अनेक शकले पडल्याचे दिसून येत आहे.
 त्यातच आपण काय लिहावं असा प्रश्न माझ्यासमोर पडला आणि त्यातून मी ग्रामीण आणि दलित जीवनाच्या व्यथा वेदनांपेक्षा आदिवासींचे जास्त शोषण पिडन होत असल्याने त्यांच्यावर लिहिलं पाहिजे असे ठाम केलं. मला जसं तसं वेगळं वाटलं तसं मी त्यातून लिहून काढलं. सुरूवातीला ‘आधोर’चे चार भाग लिहले. पण ते कोणीही छापायला तयार नव्हते. आपण म्हणतो आपल्या भाषेत साहित्य लिहीलं पाहिजे, आदिवासी जिथं जिथं विखुरला आहे, तिथं तिथं त्याची संस्कृती आणि भाषा यात थोडासा वेगळा फरक आहे, या माध्यमातून माझ्या कांदबरीत समान आदिवासींची भाषा ठेवली होती, परंतु ती कादंबरी अक्षर लागत नाही, भाषा कळत म्हणून पुण्या-मुंबईच्या लोकांनी परत पाठवली.
त्यावेळी मी खूप नाराज झाले होते.  आता काय करावे,असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला, परत मी आदिवासी भाषेत लिहिलेली कादंबरी मी मराठीत लिहून काढली. त्यावेळीही मला ही कादंबरी छापायला कर्ज घ्यावं होतं. त्यामुळेच ती पुढे आली. नाही तर ती लोकांपुढे गेली नसती.
पुढे माझी ‘तृष्णा’ ही आत्मवृत्तपर कादंबरी बाहेर पडली. तिला खूप प्रसिध्दी आणि पुरस्कार मिळाले तरीही तिला फारसा अजूनही न्याय मिळाला नसल्याचे मला वाटते. नंतर मी स्वतंत्र कादंबरी म्हणून ‘भिवा फरारी’ लिहिली. इंग्रजांच्या विरोधात आदिवासींचे अनेक नायक लढले होते. परंतु त्यांची काही ठिकाणी योग्य दखल घेतली जात नव्हती. आदिवासी समाजाच्या भिवाने इंग्रजांच्या विरोधात संघर्ष केला त्याचे चित्रण त्यात आहे.


-------
मी गुजरातधील डांगला गेले होते. तेथे शबरी कुंभमेळा भरतो. ते राणीचं राज्य होतं असं म्हटलं जातं. परंतु तिचं नाव कोणी सांगत नव्हते. मी तिथं गेल्यानंतर पाहणी केली आणि नंतर माझ्या लक्षात आले की, भारतातील मातृसत्ताक राणी म्हणजे ही शबरी आदिवासी आणि तिचं ते स्त्री राज्य असले पाहिजे असे वाटले. तिथल्या घनदाट जंगलात असलेले सीतासरोवर आदी मी पाहून आले. त्यानंतर खूप विचार करून मी ही कादंबरी लिहिले. सुरूवातीला मी कथाच लिहित होते. कवितेकडे मी कधी गेले नाही. आदिवासी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाबाबत मी कथा लिहिल्या. बांबूची मोळी, कुतारखांब, जानकी, उमराचं झाड, आदी कथा मी लिहिल्या. त्या खूप गाजल्या. गिरीश कर्नाड, विजय तेंडूलकरांपासून अनेकांनी त्यांचा गौरव केला. माझ्या बांबूच्या मोळी या कथेवर तेंडुलकर चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते, परंतु नंतर ते आजारी पडल्याने मागे राहिले. दलित, ग्रामीण साहित्य खूप मोठया प्रमाणात लिहिलं गेले असले तरी आदिवासींच्या बाबत अजूनही फारसं लिहिलं गेलं नाही. त्यांच्यातून जे शोधून पुढे आणायला पाहिजे होतं ते पुढे आले नाही. याची मला अजूनही खंत वाटते.

Sunday, October 21, 2012

 जटिल प्रश्न विधवांचे 

 भारतामध्ये येत्या काही वर्षांमध्ये वृद्ध महिलांचे प्रमाण वाढणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच एका सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे. या महिलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी व त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी केंद्र सरकारने आतापासून तरतुदी करायला हव्यात, अशी सूचनाही या सर्वेक्षणामध्ये करण्यात आली आहे. त्याच वेळी तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त म्हणजे 8.8 टक्के विधवा आणि घटस्फोटित महिलांचे प्रमाण आढळून आले. महाराष्ट्रातही विधवांचे, एकाकी आयुष्य जगणा-या महिलांचे प्रमाण मोठे असून पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

Tuesday, October 16, 2012

बदलत्या जीवनशैलीचा एक परिणाम : घटस्फोट
दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चालल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. दिल्ली असो वा लखनौ, केरळ किंवा पंजाब, कोलकत्ता किंवा चेन्नई देशातील कुठलेही शहर यापासून बचावले नाही. घटस्फोटाचे प्रमाण जसे उच्च वर्गीय कुटुंबियांत पाहायला मिळत आहे तसेच प्रमाण मध्यम वर्गीयांमध्ये आहे. मेट्रो किंवा सेमी अर्बन भागांमध्येच घटस्फोट होत असल्याचा आरोप होत असला तरी ही वस्तुस्थिती नाही. गेल्या काही वर्षातील या संदर्भात देशाच्या प्रमुख शहरांची आकडेवारी पाहिली तर ही परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणिव होईल.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या दिल्लीत 1960 साली दर वर्षाला 1किंवा 2 प्रकरणात घटस्फोट होत होते. 1980 मध्ये हे प्रमाण वाढत वर्षाला 100-200घटस्फोटांर्पयत पोहचले तर नव्वदच्या दशकात वर्षाला हजार घटस्फोट झाल्याचे आकडेवारी दर्शवते. पण गेल्या 10-12 वर्षात हे प्रमाण एकाएकी वाढत वर्षाला 9000 र्पयत पोहचले आहेत.

Wednesday, October 10, 2012

मोलकरीण भगिनी होणार स्वावलंबी

 

नागपूर। दि. ९ (प्रतिनिधी)
आधुनिक समाजात सामाजिक सुधारणांचे मोठमोठे दावे केले जातात. त्यावर वातानुकूलित चेंबरमध्ये चर्चासत्रे होतात. पांढरपेशे लोक त्यावर सकारात्मक बदलांकरिता जोर टाकतात. मात्र प्रत्यक्षात दिव्याखालीच अनेकदा अंधार दिसून येतो. याच लोकांच्या घरचे चित्र पाहिले तर यांच्याकडे घरकाम करणार्‍या महिलांना (सामान्यांच्या भाषेत मोलकरीण) अक्षरश: गुलामाप्रमाणे वागविले जाते, असे चित्र दिसून येते. मग कुठून घडणार सामाजिक क्रांती आणि कधी मिळणार वंचितांना त्यांचे हक्क.. सुशिक्षितांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा प्रश्न कोण्या विचारवंताने नव्हे तर घरकाम करणार्‍या भगिनींनी विचारला आहे.