Pages

Monday, September 12, 2011

कोर्ट मार्शल' झालेल्या अंजलीची आत्महत्या
वृत्तसंस्था
Monday, September 12, 2011 AT 05:37 PM (IST)
भोपाळ - लष्करी न्यायालयाने "कोर्ट मार्शल'ची शिक्षा सुनावलेल्या फ्लाईंग ऑफिसर अंजली गुप्ता (वय 35) हिने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. तिने ज्या खोलीत आत्महत्या केली ती खोली हवाई दलाच्या अधिकाऱ्याची असल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे.
अंजली ही भारतीय हवाई दलातील पहिली महिला फ्लाइंग ऑफिसर. जेव्हा तिची नियुक्ती झाली तेव्हा तिचे देशानेच स्वागत केले होते. हवाई दलात दाखल झाल्यानंतर मात्र ती नेहमीच वादग्रस्त राहिली. तिने तीन अधिकाऱ्यांविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तिच्या या आरोपानंतर हवाई दलात खळबळ माजली होती. हवाई दलाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. लष्करी न्यायालयात हे प्रकरण गेले. अंजलीने केलेले आरोप शेवटी तिच्या अंगलट आले. तिला "कोर्ट मार्शल'ची शिक्षा सुनावण्यात आली.
अंजली अविवाहित होत्या. लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर प्रचंड दबावाखाली होत्या. आत्महत्या करावी वाटते असे तिने आपल्या मित्रांना अनेक वेळा बोलूनही दाखविले होते.
भोपाळ शहरातील शाहपुरी भागातील आकृती ग्लोरी येथील कॅप्टन अमित गुप्ता यांच्या घरात शेवटी तिने आत्महत्या केली. त्यावेळी गुप्ता आणि त्यांचे कुटुंब घरात नव्हते. काही वेळाने शेजारच्या लोकांनी गुप्ता यांच्या घराचे दरवाजे आतून बंद असून कोणी तरी आत असल्याचे सांगितले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता एका खोलीत अंजलीने आत्महत्या केल्याचे दिसले. तिने गुप्ता यांच्या घरात आत्महत्या केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
अंजलीने यापूर्वी वायुदलातील आर.एस.चौधरी, वी.सी. सारिक आणि अनिल चोपडा यांच्याविरोध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या तिघांविरोधात तिने स्थानिक पोलिसांकडे तक्रारही केली होती.
अंजलीच्या विरोधात लष्करी न्यायालयाने तपास सुरु केल्यानंतर तिने आत्महत्या करण्याचीही धमकी दिली होती. तेव्हा तिला तुरुंगांतही ठेवण्यात आले होते. "कोर्ट मार्शल'ची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर तिने शेवटी आत्महत्या केली आणि जीवनयात्रा संपविली. आता तिच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास होणार आहे.

Wednesday, September 7, 2011

महिला दिनाचा इतिहास
8 मार्च 1857 ला न्यूयॉर्क इथे कापड गिरण्यात काम करणाऱ्या महिला कामगार स्वत:वर होत असलेल्या अमानुष शोषणाच्या विरोधात पहिल्या प्रथम लढा करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या. त्यांना स्वत:साठी काही अधिकार देखील हवे होते. त्यांचा लढा सशस्त्र पोलीस, घोडेस्वार वगैरेंच्या मदतीने भांडवलदारांनी मोडून काढण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु लढयाचे हे लोण अमेरिकेतच नव्हे तर युरोपमध्ये देखील पसरले. 1866 मध्ये कामगारांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात स्त्री कामगारांच्या प्रश्नावर ठराव पास करण्यात आला. ह्या ठरावाने स्त्रियांचे काम फक्त घराच्या चार भिंतीत असे ह्या सर्वसाधारण समजुतीचा रहस्यभेद केला. स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दृष्टिने हे एक महत्वाचे पाऊल होते. पुढे 1871 मध्ये फ्रांसची राजधानी पॅरीसमध्ये झालेल्या सुप्रसिद्ध पॅरिस कम्यूनमध्ये स्त्रियांनी हजारोंच्या संख्येने भाग घेऊन कामगार वर्गाने स्थापित केलेल्या सरकारचा बचाव करण्यासाठी भांडवलदारी शक्तीने केलेल्या हल्ल्यांच्या विरोधात प्रत्यक्ष लढाईत भाग घेऊन अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. 1889 मध्ये 19 जुलै ह्या दिवशी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात भाषण देताना क्लारा झेटिकनने स्त्रियांचा कामाचा अधिकार, मुले आणि मातृत्वाची रक्षा व आंतरराष्ट्रीय राजकारण व घडामोडींमध्ये स्त्रियांच्या सहभागाची आवश्यकता ह्यावर जोर दिला. त्यानंतर 1899 मध्ये युद्धाच्या विरोधात स्त्रियांचे पहिले आंतरराष्ट्रीय अधिवेशन झाले व त्यापुढे युद्धविरोधी आंदोलन अधिकच मजबूत होत चालले. 1910 मध्ये समाजवादी महिलांचे कोपनहेगन इथे दुसरे आंतरराष्ट्रीय अधिवेशन झाले. ह्या अधिवेशनात क्लारा झेटिकनद्वारा एक ऐतिहासिक ठराव मांडण्यात आला. ह्या ठरावात म्हटले होते की, 'दरवर्षी एक विशेष दिवस साजरा केला जावा ज्या दिवशी विश्वशांती, स्वातंत्र्य आणि स्त्रियांचे अधिकार ह्या मुद्यांवर संघर्ष करणाऱ्या जगभरच्या स्त्रिया आपली एकजूट दाखवण्यासाठी जागोजागी एकत्र येतील' ह्या अधिवेशनाला आलेल्या जगातील 17 देशांच्या प्रतिनिधी स्त्रियांनी हा ठराव एकमताने पास केला. ह्या ठरावाला एवढया प्रचंड प्रमाणात मान्यता मिळण्याचे कारण हेच होते की, तो देशोदेशीच्या स्त्रियांच्या दैनंदिन अनुभवांवर आधारलेला होता. ह्या ठरावावर ठिकठिकाणी चर्चा झाल्या आणि अत्यंत अनुकूल अशा प्रतिक्रिया आल्या. अखेर शेवटी 8 मार्च 1911 ला जर्मनी, डेन्मार्क, स्वित्झर्लंड आणि ऑस्टि्रया ह्या देशातील महिलांनी पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिवस कामगार स्त्रियांच्या न्यूयॉर्कमध्ये झालेल्या पहिल्या लढयाची आठवण म्हणून साजरा केला.
अक्काराणी ते याहामोगी डाकीण प्रथा विरोधी संवाद यात्रा
नंदुरबार जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व विविध संस्थांच्या
सहभागाने नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 4 वर्षापासून डाकीण प्रथा विरोधी प्रबोधन मोहीम सुरु आहे. या विषयावरील भारतातील हा पहिला संघटीत प्रबोधनाचा प्रयत्न. त्यातीलच एका उपक्रमाचा हा वृत्तांत...
''डाकीण नाहा आमू बायऱ्या, याहा मोगीन् आमू हाय पोयऱ्या''. (आम्ही स्त्रीया डाकीण नसून देवमोगरा मातेच्या मुली आहोत.) अशी घोषणा घेऊन 'अक्काराणी ते याहामोगी' म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडयाच्या कुशीत वसलेल्या धडगाव गावापासून ते गुजरात राज्यातील आदिवासी जमातीची कुलदैवत देवमोगरादेवी पर्यंत 300 किमीचा प्रवास करत संवाद यात्रा संपन्न झाली. सुमारे 7000 व्यक्तिंशी संवाद साधत डाकीणीची अमानुष, अघोरी प्रथा नष्ट करण्यासाठी समाजातील सर्व प्रमुख घटकांना या प्रबोधनाच्या प्रवाहाचा भाग होण्यास संकल्पित केले. शिक्षण, आरोग्य, राजकारण, समाजकारण व आंदोलने अशा विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधींनी यात्रेत सहभागी होऊन प्रबोधनाला अधिक व्यापक बनविले.
दिनांक 21 डिसेंबर 2007 रोजी यात्रेची सुरुवात अक्काराणीच्या किल्ल्यावरून संवाद मशालीचे प्रज्वलन करून झाली. आदिवासी जमातीच्या इतिहासातली एक कर्तबगार अध्याय म्हणजे अक्काराणी. भग्न अवस्थेतला किल्लाही आज त्या इतिहासाची साक्ष देतो. सातपुडयाच्या दऱ्याखोऱ्यांना मागे टाकत मध्येच एका खोल छोटया पठारावर बांधलेला अक्काराणीचा किल्ला. जेवढा भग्न तेवढाच उपेक्षित. तेथून मोहीमेच्या कार्यकर्त्यांनी कार्यवाह अविनाश पाटील व यात्रेचे संयोजक गुजऱ्या हनुमान वळवी यांच्या नेतृत्वात डाकीण प्रथा नष्ट करण्यासाठी संवाद मशालीच्या साक्षीने 'हम होंगे कामयाब' गीताचे गायन केले, आणि या आशावादी गीताने संवाद यात्रेचा प्रवास सुरू झाला, धडगाव तालुक्यातीलच मुंगबारी गावाकडे, यात्रेच्या उद्धाटनासाठी. धडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते संवाद ज्योतीस अभिवादन करुन यात्रेचे उद्धाटन झाले. आपल्या उद्धाटनपर मनोगतात आमदारांनी डाकीण प्रथेचे मूळ कारण आदिवासी भागातील शिक्षण व आरोग्य यांच्या समस्येत असल्याचे सांगितले. जोपर्यंत आदिवासी समाजात गुणवत्तापूर्ण शिक्षण व चांगले आरोग्य मिळत नाही तोपर्यंत आदिवासी मन हे अंधश्रध्दच राहणार आणि त्यातून डाकीणीसारख्या अघोरी प्रथा, जीवंतच राहतील अशी मांडणी त्यांनी केली. मोहीमेचे ब्रीद वाक्य 'संवादातून परिवर्तनाकडे असे आहे, त्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त करत ह्याप्रश्नाच्या निराकरणासाठी संघर्षापेक्षा संवादाची अधिक गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी नंदुरबार जि.प.च्या महिला बालकल्याण विभागाच्या सभापती विजयाताई पावरा होत्या, तर अध्यक्षस्थानी माजी आमदार जनार्दन महाराज पोहऱ्या वळवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहीमेचे कार्याध्यक्ष प्रा. बी. एस. पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. अर्जुन लालचंदाणी, प्राचार्य मधुकर पाटील, कार्यवाह अविनाश पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यू. जी. पाटील, उ.म.वि. चे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. विलास चव्हाण, जिल्हा समन्वयक प्रा. सुनिल कुंवर आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचलन आदिवासी एकता परिषदेचे राजीव बी. पावरा यांनी केले.

धडगाव येथून दिनांक 21 डिसेंबर रोजी निघालेली संवाद यात्रा सातपुडयाच्या पर्वतरांगेतील गावागावात जाऊन, आश्रमशाळांमध्ये जाऊन संवाद साधत होती. प्रबोधन करत होती. शिकवत होती आणि नवीन शिकत होती. डाकीणीच्या प्रश्नाचे दाहक वास्तव अधिक ठळकपणे समजून घेता आले. आश्रमशाळांच्या 90 टक्के विद्यार्थ्यांचा डाकीण असण्याबाबतचा पक्का समज असल्याचे विदारक चित्रही बघायला मिळाले. सेंन्सेक्सची विक्रमी भरारी आणि महाशक्तीच्या गप्पात रंगणाऱ्या भारतातीलच एका प्रगतीशील आणि पुरोगामी राज्यातील आश्रमशाळांतील कोवळया मनाला आजही डाकीणीसारख्या कल्पना वास्तव वाटतात, आपली शिक्षणव्यवस्था येथे अपयशीच ठरली, हेच म्हणावे लागेल. डाकीण, भूत अशी पात्रे आज वेताळाच्या काल्पनिक कथांमध्येच वाचायला मिळतात, असाच सर्वांचा समज, पण आजही प्रत्यक्षात महिलांना डाकीण ठरविले जाते, तिचा शारीरिक मानसिक छळ केला जातो. तिला गावात जाहीर फिरण्यास मज्जाव केला जातो, कधी गावातून हाकलून लावले जाते तर कधी जीवे मारले जाते. हे आजही येथे घडतेय.
संवाद यात्रेच्या निमित्ताने ह्या प्रश्नाची सामाजिक, वैज्ञानिक दृष्टीकोनातून मांडणी करण्यात आली. सर्व आश्रमशाळांत आदिवासी बोलीभाषेतच हा विचार पोहोचविण्यात आला. मुले संपूर्ण कार्यक्रम उत्साहाने बघत होती व सहभागीही होत होती. मुलांबरोबर गावकरीही कार्यक्रमात सहभागी होत होती. त्याचबरोबर यात्रेदरम्यान अनेक पिडीत महिलांशी संवाद साधण्यात आला. चित्रलेखा साप्ताहिकाच्या संध्या नरे पवार यांनी पूर्णकाळ यात्रेत उपस्थित राहून अशा अनेक पिडीत महिलांना बोलतं केलं. मांडवी, सुखाणी, मोजरा, कात्री, भांग्रापाणी, सुरगस, डाब, मोलगी, पेचरीदेव अशा गावातील आश्रमशाळांना संवाद यात्रेचे कार्यक्रम झाले. आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, परिसरातील जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच पोलिस पाटील असे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहत होते.
संवाद यात्रेत मोलगी, देवमोगरानगर, व खापर या प्रमुख गावांना जाहीर मेळावे घेण्यात आले. लक्षणीय उपस्थिती होती. मोलगी येथील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जि.प.चे शिक्षक सभापती सी. के. दादा पाडवी होते, उद्धाटक म्हणून प्रज्ञा कला महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष सायसिंग भाऊसाहेब हे होते. रामसिंग वळवी, धनसिंग पाडवी हे प्रमुख अतिथी होते. शिक्षण सभापती सी. के. दादा पाडवी यांनी डाकीणीच्या अघोरी प्रथेच्या विरोधात आम्ही लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या, विचारधारेच्या अस्मिता बाजूला ठेवून एकत्रितपणे लढू असे आश्वासन दिले. खापर गावातील जाहीर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र पाडवी होते. त्यांनी आपल्या मनोगतात डाकीण प्रथेची भयानकता प्रत्यक्ष घडलेल्या घटनांची माहीती देत स्पष्ट केली. डाकीणीच्या प्रथेमुळे आदिवासी महिलेस भोगाव्या लागणाऱ्या यातनांची माहीती जेव्हा श्रोतृसमुदाय ऐकत होता, तेव्हा या प्रश्नांची विदारकता सर्वांच्याच काळजाचा ठेका चुकवत होती.
खापर येथून यात्रा दिनांक 25 डिसेंबर रोजी गुजराथ राज्यातील देवमोगरादेवी येथे पोहोचली. तेथे देवमोगरा मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष केसरसिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात केसरसिंग यांनी आदिवासी जमातीतील अंधश्रध्दांवर कडक टीका केली, कोणत्याही समाजाला प्रगतीची पाऊले टाकायची असतील तर ती अंधश्रध्दा मानसिकतेसोबत कधीच पुढे पडणार नाही, म्हणून ही मानसिकता टाकूनच विकासाच्या दिशेने जाता येते, असे त्यांनी मांडले. कार्यक्रमात मोहीमेच्या कार्यकर्त्या हेमलता पाटील यांनी अंगात येऊन जळता कापूर खाऊन दाखविला. तेव्हा मंदिरात अंगात येऊन घुमत असणाऱ्या अन्य स्त्रियांनी हेमलता पाटील यांचा चमत्कार बघून अचानकपणे आपले स्वतःचे घुमणे बंद केले. ही बाब कार्यकर्त्यांच्या नजरेतून सुटू शकली नाही.
शेवटी मोहीमेचे कार्यवाह अविनाश पाटील यांच्या नेतृत्वात सर्वांनी संकल्प घेतला - ''आदिवासी जमातीतील आमच्या आया-बहिणींना आज डाकीण ठरवून छळले जात आहे. या अघोरी प्रथेविरोधात प्रबोधनाची व संघर्षाची धार अधिक तीव्र करणार आणि या मोहीमेचे नेतृत्व भविष्यात तरुण आदिवासी कार्यकर्त्यांनी करण्यासाठी कटिबध्द राहणार..'' असा संकल्प घेऊन संवाद यात्रेची सांगता झाली. समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहादुरसिंग पाडवी यांनी केले व सुत्रसंचालन विनायक सावळे यांनी केले. डाकीणीच्या प्रश्नाची भयानकता अधिक प्रखरतेने या संवादयात्रेतून पुन्हा समोर आली. या यात्रेच्या निमित्ताने सातपुडयाच्या दऱ्याखोऱ्यात महिलांना डाकीण ठरवून त्यांचा दबलेला हुंकार ओठावर आला. पिडीत महिला आपल्या कुटूंबियांसह पुढे येऊन आपली कैफियत मांडू लागल्या. पोलीस ठाण्यात जाऊन कार्यकर्त्यांनी डाकीणीबाबतच्या गुन्ह्यांची माहीती घेतली. पिडीत महिलेस सुरक्षा व न्याय देण्याबाबत दबाव निर्माण करण्यात आला. आदिवासी समाजातील पारंपारीक न्याय व्यवस्था असलेल्या जातपंचायतीत महिलांना प्रतिनिधीत्व असावे ही मागणी समाजासमोर मांडण्यात आली. लोकप्रतिनिधींनी आपापल्या पक्षाच्या अस्मिता आणि विचारधारा बाजूला ठेवत डाकीण प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याची स्पष्ट भूमिका घेतली, हे या संवाद यात्रेचं फलित.
या यात्रेत कार्यवाह अविनाश पाटील, समन्वयक विनायक सावळे, प्रा. केशव पावरा, आर.सी. वसावे, गुजऱ्या हनुमान वळवी, वीरसिंग वळवी, मोतीराम खात्र्या पाडवी, बहादुरसिंग पाडवी, विजय चितोड, सुरेश बोरसे, माणिकलालभाई पाटील, प्रदीप केदारे, भिवसाणे, हेमलता पाटील,. स्मिता शिरसाळे इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले. यात्रेच्या यशस्वीतेसाठी संयोजन संपर्क गुजऱ्या हनुमान वळवी यांनी केले. शेवटी एवढेच सांगू इच्छीतो, की, तथाकथित विकासाच्या स्वप्नांवर झुलणाऱ्या नागरी समाजास आपल्या वास्तव विकासाचे वस्तुनिष्ठ भान येण्यास ही संवाद यात्रा निमित्त ठरेल, अशी आशा वाटते.



महिला सक्षमीकरणाची गती संथ
भारताला चाळीस वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांच्या रूपाने पहिला महिला पंतप्रधान लाभली आणि स्वातंत्र्याच्या साठाव्या वर्षी राष्ट्रपतिपदी प्रतिभा पाटील यांच्या रूपाने पहिली महिला विराजमान झाली. भारतीय महिलांच्या कर्तृत्वाचे हे प्रतीक असले तरी सामान्य भारतीय महिलेची परिस्थिती अशी आहे, असे नाही.
गेल्या साठ वर्षांत भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यांना फळेही आली. पण सक्षमीकरणाचा वृक्ष फळांनी डवरून गेल्याचे चित्र मात्र नाही. शहरात काही प्रमाणात तसे चित्र दिसू लागले आहे. ग्रामीण भागात मात्र महिलांची स्थिती अद्यापही फारशी सुधारलेली नाही.
भारतातील २४५ दशलक्ष महिलांना आजही वाचता येत नाही. म्हणजे जगातील सर्वाधिक निरक्षर महिला आपल्या देशात आहेत. भारतातील महिलंची संख्या पुरूषांच्या तुलनेत एक हजाराला ९३३ एवढीच आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण सर्वांत कमी आहे. संघटित क्षेत्रात महिलांची संख्या फक्त चार टक्के आहे.
भारतीय घटनेत महिलांसाठी अनेक तरतूदी आहेत. त्यांना संधींच्या बाबतीत समान हक्कांचे वचन घटनेत दिले आहे. लिंगभेद करण्यासही बंदी घातली आहे. ७३ व्या घटनादुरूस्तीद्वारे पंचायत राज्यात तर महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन राजकारणापलकडे राहिलेल्या महिलांना विकासाच्या प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. पण निरक्षरता हा मुद्दा येथेही त्यांच्या विकासाच्या आड येतो आहे.
देशा स्वातंत्र्य झाल्यानंतर लगेचच म्हणजे १९५१ मध्ये महिलांचा साक्षरता दर फक्त सात टक्के होता. त्यावेळी पुरूषांचा दर २५ टक्के होता. आता देशातील ५४ टक्के म हिला साक्षर झाल्या आहेत. पण पुरूषांचे प्रमाण ७५ टक्के आहे.
पण महिला कमी प्रमाणात शिकत असल्या तरी ज्या शिकल्या त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडत आहे. उदाहरणे द्यायची झाली तर सानिया मिर्झा टेनिसमध्ये देशाचे नाव रोशन करत आहे. किरण मुझुमदार व्यावसायात,अरूंधती रॉय लेखनात देशाचे नाव उजळवत आहेत.
असे असले तरी देशाचे निर्णय घेणार्‍या प्रक्रियेत महिलांचा सहभाग नगण्य आहे. संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांचे प्रमाण आजही दहा टक्क्यांपेक्षा जास्त नाही. आणि त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठीचे विधेयक आजही प्रलंबित आहे.
एकीकडे अशी परिस्थिती असताना पुरूषप्रधान व्यवस्थेत महिलांचे पिचणेही संपलेले नाही. हुंडाबळी आणि बलात्कार यांची संख्या रोज वाढते आहे. लग्नानंतर छळामुळे होणाऱे महिलांचे मृत्यूच्या प्रमाणाबाबतीत जागतिक पातळीवर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. ही निश्चितच अभिमानाची बाब नाही.
महिलांवरील अत्याचारात वाढ
देशातील दहा दशलक्ष मुलींना केवळ त्या मुली आहेत, म्हणून जन्म दिला जात नाही. त्यामुळेच गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. महिलांवरचे अत्याचारही वाढतेच आहेत. विशेष म्हणजे घरातूनच होणारे अत्याचारही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. एका अहवालानुसार तर दरवर्षी देशात महिलांसंदर्भात दीड लाख अत्याचार नोंदले जातात. त्यातील पन्नास हजार अत्याचार घरातूनच झालेले असतात.
राजकारणात महिला आजही उपेक्षित
Source: सुलक्षणा पाटील Last Updated 23:04(05/09/11)
आर्टिकल विचार (1) Share
एकाच वेळी अनेक गोष्टींचे भान ठेवून सर्व बाबी पूर्ण करण्याची तिच्यात जन्मजात क्षमता आहे. अनेक टप्प्यांतून जाताना प्रत्येक वेळी ती नवे काही शिकत आहे. स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन तिने स्वत:साठी व्यापक केला. रोजच तारेवरची कसरत करताना ती ‘सुपरवुमन’ होण्याचा अट्टहास करत असते; परंतु राजकारणात ती मागे का आहे?
कोणत्याही पुरुषाला संधी मिळाली तर तो पुढे जाऊ शकतो. महिलांचेही तसेच आहे. त्यांना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व गाजवू शकतात हे भारतातील असंख्य महिलांनी जगाला दाखवून दिले आहे. हीच गोष्ट राजकीय पक्षात नेमकी उलट आहे. भारतात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने राजकीय क्षेत्र हे पुरुषांचे आहे, असे मानले जाते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून राजकीय क्षेत्रात महिलांचे प्रमाण तीन ते चार टक्के होते. आज ते १० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. राजकारणातील महिलांचा सहभाग यशस्वी होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांचे नेतृत्व. काही महिलांनी आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करून त्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता ही यासंदर्भातील काही उदाहरणे आहेत. सुषमा स्वराज, माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे या महिला नेत्यांनीही राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अन्यही ब-याच महिलांचे नेतृत्व आघाडीवर आहे. महाराष्ट्रात संभाव्य मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही महिलेस वाव मिळालेला नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व आतापर्यंत पुरुषप्रधान आहे. अद्यापही महिलांकडे सत्ता सोपवली गेलेली नाही. त्यामुळे खुर्चीवरील पुरुषांची परंपरा खंडित होते की नाही हे येणारा काळच ठरवेल.
आधुनिक काळात महिलांनी स्वत:चे असे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या ६४ वर्षांत पहिल्यांदा महिला राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्या आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना पाठिंबा मिळाल्यावरच त्यांना पुढचे पाऊल टाकावे लागते. नाही तर पाय खेचणारे अनेक राज्यकर्ते असतातच. वास्तविक पाहता अनेक क्षेत्रांत उतुंग भरारी मारत असतानाही महिलांबाबतच्या काही समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. विशेषत: निमशहरी तसेच ग्रामीण भागात राहणा-या महिलांना आजही अनेक असुविधांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद आदी ठिकाणी आरक्षण पद्धतीमुळे महिलांना प्रतिनिधित्व मिळू लागले आहे. सरपंचपदापासून ते सभापती पदापर्यंत महिला विराजमान आहेत, तरीही महिलांचे प्रश्न सोडवताना त्यांनाही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आतापर्यंत राजकीय पक्षांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याबाबत उदासीनता दिसून येत होती. ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत तिकिटांचे वाटप करताना महिलांना दुय्यम स्थान दिले जात होते. त्यामुळे अनेक महिला अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. अलीकडील काळात ही परिस्थिती बदलली असली तरी अजूनही महिलांना आवश्यक त्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत नसल्याचे दिसून येते. या मानसिकतेतूनच त्यांना आरक्षणापासून दूर ठेवले जात आहे. मात्र, प्रामाणिकपणा आणि मेहनत करण्याची तयारी या उपजत गुणांवर महिलांनी अनेक क्षेत्रांत स्वत:चे वर्चस्व सिद्ध केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर राजकारणात येणा-या महिलांची संख्या वाढत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष आता महिला उमेदवार शोधण्यावर भर देत आहेत. नेतृत्व करणा-या महिला उमेदवारांना यामुळे संधी मिळणार आहे. लोकसंख्येच्या तुलनेत राजकारणात येणा-या महिलांची संख्या कमीच आहे. पुरुषांच्या मानसिकतेमुळे महिलांचा राजकारणातील सहभाग हा कमीच आहे. त्यामुळे ‘महिला आरक्षण विधेयक’ मंजूर होण्यास विलंब होत आहे. राजकारणात जितक्या जास्त महिला येतील तितका प्रशासनाचा कारभार पारदर्शक होईल. शासनव्यवस्थेला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. जिच्या हातात पाळण्याची दोरी आहे, तिच्या हाती सत्तेची दोरी आली तर नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल.
अनेक बाबतीत प्रगत समजल्या जाणा-या महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात यांसारख्या राज्यांत कोणत्याच पक्षांकडे अशी महिला उमेदवार नाही की, जी मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचू शकेल. महाराष्ट्रात प्रत्येक पक्ष आम्ही महिलांना प्राधान्य देतो असे सांगतो. मात्र, वस्तुस्थिती त्याच्या अगदी उलट आहे. महिलांना पुरेशा प्रमाणात उमेदवारी तसेच प्रतिनिधित्व दिले जात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात डॉ. विमल मुंदडा, मार्गारेट अल्वा, नीलम गोºहे, मृणाल गोरे, प्रभा राव अशी काही नावे सांगता येतील. सध्या महाराष्ट्रात ४ खासदार आणि ११ आमदार महिला आहेत. निवडून आलेल्या या महिलांना राजकीय घराण्याची परंपरा आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी नसणा-या महिला मात्र मागेच आहे. सतत पुरुषांच्या दबावाखाली राहून महिला राजकारणात यशस्वी कशा होतील? यासाठी पुरुष व स्त्री दोघांनाही समान अधिकार असावेत. प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपल्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करून देत आहे. आता महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्केआरक्षण मिळाले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष महिला उमेदवार शोधण्यावर भर देत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्यावरच राजकीय पक्षांना हे शहाणपण सुचले आहे.

Monday, May 23, 2011

कुठे आहेत महिला न्यायाधीश?

कुठे आहेत महिला न्यायाधीश?
- न्या. सुरेश नाईक (नि.)
Wednesday, March 17, 2010 AT 11:40 PM (IST)
महिला आरक्षण विधेयकानंतर विविध क्षेत्रांमधील महिलांच्या प्रमाणावर बरीच चर्चा होत आहे. त्यातल्या त्यात न्याय यंत्रणेतील महिलांच्या सहभागापुढे मात्र प्रश्नचिन्ह आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधिशपदी अत्यल्प महिला पहायला मिळत असतानाच उच्च न्यायालयांमधील महिला न्यायाधिशांचे प्रमाणही अवघे दहा टक्केही नाही. या क्षेत्रात महिलांचे प्रमाण कसे वाढू शकेल?
प्रचंड गाजावाजा होऊन राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले. हा ऐतिहासिक निर्णय ठरला. या निर्णयामुळे महिलांना आता राजकारणात व्यापक प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणे शक्य होईल. तसेही शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यानंतर स्त्रियांनी जवळपास सर्वच क्षेत्रात प्रवेश मिळवला. एवढेच नव्हे तर तेथे त्यांनी नावलौकिकही मिळवला. त्यामुळे महिलांना अधिकारपदावर काम करण्याची संधी मिळू लागली. एकीकडे महिला आरक्षण विधेयक मंजूर होत असताना भारतीय न्याययंत्रणेत मात्र महिलांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आले. लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ मानल्या गेलेल्या न्यायव्यवस्थेत गेल्या सहा दशकांमध्ये अत्यल्प महिलांना न्यायाधिशपद भूषवण्याची संधी प्राप्त झाली आहे. वरकरणी अनपेक्षित वाटणारी ही माहिती आकडेवारी तपासून पाहिल्यानंतर सत्य असल्याचे दिसून येते.
या संदर्भात समोर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार देशातील 21 उच्च न्यायालयात 630 न्यायाधीश काम करत आहेत. त्यात महिलांची संख्या केवळ 52 आहे. टक्केवारीत हे प्रमाण 8.25 टक्के इतके ठरते. ही परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्याच्या योग्यतेच्या महिला वकील उच्च न्यायालयात नाहीत का, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. अर्थात न्यायाधिशांची नियुक्ती करताना कोणते निकष गरजेचे ठरतात, याचाही विचार करायला हवा. येथे गुणवत्ता हा निकष महत्त्वाचा ठरतो. एखादा वकील हुशार असेल तर तो हुशार न्यायाधीश बनेलच असे सांगता येत नाही. त्यासाठी त्याची गुणवत्ता सिद्ध व्हावी लागते. तरच त्याला आपली जबाबदारी अधिक कौशल्याने पार पाडता येते. या पार्श्वभूमीवर योग्य गुणवत्ता असून डावलले जात असेल तर मात्र तो अन्याय ठरतो. असे असले तरीया पदांवर महिलांचे नगण्य प्रमाण ही खटकणारी बाब ठरते. इतर अनेक क्षेत्रात महिलांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसत असताना न्यायव्यवस्थेत त्यांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे.
महिला न्यायाधीश नगण्य
ही स्थिती केवळ एखाद्याच राज्यात आहे असे नाही. देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये थोड्या-फार प्रमाणात हेच चित्र पहायला मिळते. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायाधिशांची संख्या 42 असून त्यापैकी महिलांची संख्या केवळ आठ आहे. मुंबई आणि मद्रास उच्च न्यायालयात अनुक्रमे 62 आणि 53 न्यायाधीश असून त्यातील महिलांची संख्या केवळ सात आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे सर्वात मोठे उच्च न्यायालय आहे. तेथे 78 न्यायाधीश असून त्यातील महिलांची संख्या केवळ चार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगढ या राज्यांमधील उच्च न्यायालयांमध्ये एकही महिला न्यायाधीश नाही. यावरून न्यायव्यवस्थेत महिलांना पुरेसा वाव दिला जातो की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. लवकरच संसदेत महिलांसाठी 33 टक्के जागा आरक्षित ठेवल्या जातील. पण देशात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या न्यायव्यवस्थेतील महिलांचा सहभाग कधी वाढेल, हा प्रश्न कायम राहणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने काय पावले टाकता येतील, यावर आतापासूनच विचार केला जायला हवा आहे.
आपल्याकडे उच्च वा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची संख्या कायद्याने निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या 31 तर सर्व राज्यातील उच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांची संख्या 725 इतकी निश्चित करण्यात आली आहे. शिवाय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कायदेपंडीत वा उच्च न्यायालयात सलग पाच वर्षे न्यायमूर्ती किंवा उच्च न्यायालयात किमान दहा वर्षे वकिली करणाऱ्यास सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीपद दिले जाते. असे असेल तर ही पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलांची संख्या अगदीच नगण्य आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच आता या प्रश्नासंदर्भात विचार करण्याची वेळ आली आहे. एक तर या व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवावा लागेल शिवाय आता विविध न्यायालयांमध्ये वकील किंवा न्यायाधीश असणाऱ्या महिलांना आणखी वरचा दर्जा कसा दिला जाईल, हे पहावे लागणार आहे. त्यासाठी प्रचलित कायद्यात काही सुधारणा गरजेच्या आहेत का, याचाही विचार करावा लागणार आहे.
विशेष प्रशिक्षण
हे करत असताना इतर दृष्टीकोनांकडेही लक्ष द्यायला हवे. न्यायाधिशांमध्ये गुणवत्तेबरोबरच संयमीपणा, इतरांचे ऐकून घेण्याची तयारी हे गुण गरजेचे ठरतात. तरच ते न्यायालयीन चौकशीच्या वेळी आरोपीचे आणि फिर्यादीचे म्हणणे नीट ऐकून घेऊ शकतात. "शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधी व्यक्तीला शिक्षा होता कामा नये'असे न्यायसंस्थेचे तत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक खटल्यासंदर्भात बारकाईने विचार करावा लागतो. तसेच दोन्ही बाजूंचे म्हणणे लक्षात घ्यावे लागते. मुख्य म्हणजे कोणत्याही खटल्याच्या निकालापूर्वी न्यायाधिशाला बराच अभ्यास करावा लागतो. कायद्यातील विविध तरतुदी लक्षात घ्याव्या लागतात. शिवाय त्या गुन्ह्याचे सामाजिक परिणामही तपासून पहावे लागतात. असे झाले तरच न्याय मागणाऱ्याला तो योग्य पद्धतीने दिला जाऊ शकतो. म्हणूनच न्यायाधिशांच्या निवडीच्या प्रक्रियेला अतिशय महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर महिलांचा विचार गुणवत्तेच्या आधारावरच होऊ शकतो असे म्हणायला वाव आहे.
गेल्या काही वर्षांपासून देशातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असणाऱ्या खटल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. शिवाय त्यात नियमितपणे भर पडत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. न्यायालयांची संख्या वाढवणे किंवा रात्रीची विशेष न्यायालये सुरू करणे यासारख्या उपायांचा त्यात समावेश आहे. असे झाल्यास न्यायाधिशांची संख्या वाढवावी लागणार आहे. त्यांची निवड करताना महिलांना अधिक प्रतिनिधित्व दिले जावे अशी अपेक्षा करणे चुकीचे नाही. तसे व्हावे म्हणून इच्छुक किंवा पात्र ठरू शकणाऱ्या महिलांना विशेष प्रशिक्षण द्यावे लागेल का, याचाही विचार व्हायला हवा. अन्य क्षेत्रात महिलांना व्यापक संधी प्राप्त होत असताना या क्षेत्रात तसे चित्र दिसायला हवे आहे. त्यादृष्टीने पावले टाकणे ही काळाची गरज आहे.
काळाची गरज
राजकारणात महिलांची संख्या गेल्या तीस वर्षात वाढायला लागली. पंचायत राज व्यवस्थेत पन्नास टक्के जागा आणि पदे महिलांसाठी आरक्षित झाली. ग्राम-पंचायतीपासून ते जिल्हा परिषदांपर्यंत महिलांनी आपल्या नियोजन आणि व्यवस्थापनाचा ठसा उमटवला आहे. कायद्याच्या क्षेत्रातही महिला वकिलांची संख्या हळूहळू वाढते आहे. फक्त न्यायालयीन प्रक्रियेचे क्षेत्र त्याला अपवाद राहिले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी न्याय प्रक्रियेतही महिलांना समान न्याय आणि समान संधी मिळायलाच हवी. राज्यघटनेनेच महिलांना समान अधिकार दिले आहेत आणि कायद्याच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायव्यवस्थेवर आहे. पण, या महत्वाच्या क्षेत्रात मात्र महिलांच्याकडे दुर्लक्ष झाले. स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतर महिला न्यायधिशांची संख्या नगण्य असावी, ही बाब जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीलाही शोभादायक नाही. सरकार आणि बार कौन्सिलने या बाबीचा गंभीर विचार करून, न्यायप्रक्रियेत महिलांना अधिक संधी मिळेल, त्यांचा हक्क त्यांना दिला जाईल, यासाठी पुढाकार घेणे ही काळाजी गरज आहे.
- न्या. सुरेश नाईक (नि.)

Thursday, May 19, 2011

पुरोगामी महाराष्ट्रात महिला धोरणाच्या....

पुरोगामी महाराष्ट्रात महिला धोरणाच्या अंमलबजावणीचे तीनतेरा
नागपूर वृत्तान्त
नागपूर, १९ ऑगस्ट 2010
‘पुरोगामी’ असे बिरुद आवर्जून मिरवणाऱ्या महाराष्ट्रात महिलांच्या उत्थानासाठी व सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात असल्याचा प्रचार नेहमीच केला जातो. तथापि, राज्याचे महिला धोरण तयार करण्यात आल्यापासून, म्हणजे गेली ९ वर्षे त्याच्या अंमलबजावणीबाबत आनंदीआनंदच असल्याचे दिसून येते.महाराष्ट्राचे महिला धोरण २००१ साली तयार करण्यात आले. त्यातील वैशिष्टय़ांवर नजर टाकली तर हे अतिशय आदर्श धोरण असल्याचे मानता येईल. त्यातील तरतुदीनुसार २००२-०३ पासून प्रत्येक विभागाच्या कार्यक्रम अंदाजपत्रकात ‘महिलांचे सक्षमीकरण’ असे प्रकरण असेल. त्यात संबंधित विभाग महिलांना सक्षम करण्यासाठी कोणती धोरणे व कार्यक्रम राबवणार आहे, त्यासाठी किती निधी देण्यात येणार आहे, त्याचा महिलांवर काय परिणाम होणार आहे, याचा उल्लेख असेल. यापुढे सामाजिक-आर्थिक दर्जाचे विश्लेषण करताना पुरुष-स्त्री अशी स्वतंत्र विभागणी दर्शवण्यात येईल. अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना महिला संघटनांशी विचारविनिमय करण्यात येईल. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीत महिलांच्या घरकामाच्या मूल्याचा समावेश केला जावा, अशी शिफारस राज्य शासन केंद्र शासनाला करेल. सर्व ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था वार्षिक आणि पंचवार्षिक महिला सक्षमीकरण योजना तयार करतील. विविध स्तरावरील महिला बालविकास समित्यांकडून या योजनांचा आढावा घेण्यात येईल.
आदिवासी उपयोजना आणि विशेष घटक योजनेच्या धर्तीवर महिला घटक योजना तयार करण्यात येईल. पोलीस पाटलांपासून सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व एक तृतीयांशपर्यंत वाढवण्यासाठी धोरण आखले जाईल. महिलांना संसदेत व राज्य विधिमंडळात ३० टक्के आरक्षण मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. विविध क्षेत्रात महिलांच्या स्वयंसहायता गटांची स्थापना तसेच, त्यांची कार्यक्षमता वाढवण्याच्या कार्यक्रमाला प्रश्नधान्य दिले जाईल. शेती संलग्न व्यवसायांशी संबंधित सहकारी संस्था सुरू करण्यासाठी महिलांना उत्तेजन दिले जाईल. बालविवाह रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेतला जाईल. महिलांना मालमत्तेचा हक्क प्रस्थापित करणारे विधेयक मांडण्यात येईल. शाळांमधून मुलींची पटसंख्या वाढवण्यासाठी व गळती थांबवण्यासाठी र्सवकष कार्यक्रम घेतला जाईल, अशी आश्वासनेदेखील या धोरणात देण्यात आली होती.
महिलांच्या वेगळ्या समस्या ध्यानात घेऊन या धोरणात काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्था व इतर संस्थांना येत्या तीन वर्षात महिलांसाठीप्रसाधनगृहे बांधणे कायद्याने बंधनकारक केले जाईल. सार्वजनिक ठिकाणे, बाजार व औद्योगिक क्षेत्रात पाळणाघरांची सुविधा तीन वर्षात उपलब्ध करून देणे बंधनकारक केले जाईल. महिलांच्या लैंगिक शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्रे, महिला आयोगाचे बळकटीकरण, महिला कैद्यांच्या समस्यावर कार्यवाही यासारख्या उपाययोजना करण्यात येतील. विद्यार्थिनी, नोकरदार महिला व इतर गरजू महिलांसाठी वसतिगृह आणि स्वतंत्र शासकीय अतिथीगृहांची व्यवस्था करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला सक्षमीकरण समिती स्थापन करण्यात येईल. या समितीची बैठक दर तीन महिन्यांनी होईल तसेच, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य पातळीवर कृतीगट स्थापन करण्यात येईल, असेही या धोरणात नमूद करण्यात आले होते.
महिला धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचा उल्लेख मोठय़ा अभिमानाने करण्यात येतो. मात्र, विधिमंडळाच्या २००७ च्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नांची उत्तरे पाहिली तर, राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांना या धोरणाची कल्पना नसावी, असे दिसते. राज्यातील महिलांच्या सर्वागीण विकासासाठी शासनामार्फत २००३-०४ पासून महिला घटक योजना राबवण्यात येत आहे काय, या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे मिळाले होते. २००३-०४ नंतर शासनाने महिला घटक योजनेवरील पुस्तिका प्रकाशित केली नाही, हेही मंत्र्यांनी मान्य केले होते. महिला विशेष घटक योजना तयार करायची असल्यास त्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या धर्तीवर वेगळ्याने नियतव्यय विभागाला उपलब्ध करून देणे आवश्यक राहील व त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. इतर विभागांनी महिलांसाठी तरतूद दर्शवणारी माहिती देण्यात आली आहे. यासाठी २००३-०४ नंतर अशी पुस्तिका प्रकाशित केली नाही, असे मंत्र्यांनी म्हटले होते. तरतुदीपेक्षा कमी खर्च झाल्यास त्याची कारणे विचारली असता, हा प्रश्नच उद्भवत नसल्याचे उत्तर मिळाले होते. या उत्तरासोबत मंत्र्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या तरतुदींचा व खर्चाचा तपशील जोडला होता. याशिवाय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग (योजनांचा उल्लेख करता केवळ तरतूद व खर्च) आणि ग्रामविकास विभाग (इंदिरा आवास योजनेवरील व स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेवरील खर्च) या दोन विभागांनी महिलांसाठी (?)राबवण्यात येणाऱ्या योजनांवरील खर्चाची माहिती तेवढी जोडली होती.

घरगुती छळः महिला सुरक्षा कायदा
उपलब्ध माहितीनुसार भारतात ७० टक्के महिलांना घरगुती छळाला सामोरे जावे लागते. दर एक मिनिटाला महिलेविरुद्ध गुन्हा झालेला असतो. दर सहा मिनिटांनी एक महिला आत्महत्या करत असते, दर २९ मिनिटांनी एक हुंडाबळीची घटना घडत असते. ही एक सगळ्यांसाठी लाजीरवाणी अशी गोष्ट आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीत महिलांना कोणत्या प्रकारचे छळ सोसावे लागले याचे निरीक्षण करण्यात आले असून, त्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे -
४० टक्के - पोलिस ठाण्यात नोंदला गेलेला छळ, ३७ टक्के - विविध कारणांमुळे पुरुषांनी घराच्या बाहेर, ३४ टक्के - पत्नीने सासू-सासऱ्याची सेवा न केल्यामुळे, ३३ टक्के - लहान-मोठे कारणे, २५ टक्के- चांगले अन्न बनविता येत नसल्यामुळे, ०७ टक्के = पैशाच्या कारणामुळे.
या सर्व गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतःहून महिलांनी न घाबरता, घरगुती छळ-महिला सुरक्षा कायद्याचा योग्य असा उपयोग करावा;

महिलांच्या आरोग्याबाबत सरकार उदासीन
राज्यातील महिला हॉस्पिटल्स फक्त विदर्भ आणि मराठवाड्यांमध्ये केंदीत झालेली आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गेल्या साठ वर्षात एकही महिला हॉस्पिटल सुरू करण्यात आलेले नाही. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असतानाही सरकारने महिलांच्या आरोग्याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात आठ महिला हॉस्पिटल्स आहेत, ही सर्व हॉस्पिटल्स विदर्भातील नागपूर, गोंदिया, अमरावती, अकोला आणि मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड व लातूर या जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील महिलांच्या आरोग्याबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचे मत आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यर्कत्यांनी पुण्यात व्यक्त केले.
पुण्यातील ससून या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये राज्यभरातून सामान्य पेशंट उपचारांसाठी येेतात. त्यात महिलांची संख्या मोठी असते. पश्चिम महाराष्ट्रातील महिलांसाठी स्वतंत्र महिला हॉस्पिटल सुरू केल्यास ससूनवर येणारा पेशंटचा ताण कमी करता येईल. त्यामुळे इतर पेशंटला दर्जेदार वैद्यकीय उपचार करता येतील, असेही त्यांनी सांगितले.
ससून वगळता पश्चिम महाराष्ट्रात मोठे सरकारी हॉस्पिटल नाही. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी पेशंटला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते. अशी अद्यायवात सेवा महिला हॉस्पिटलमध्ये सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

राज्याचे महिला धोरण (तिसरे) आणि आपली भूमिका

महाराष्ट्र राज्याचे तिसरे महिला धोरण तयार होत आहे हे आपणास माहित आहे काय? महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने सन १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमिवर पहिले महिला धोरण जाहीर केले होते. त्यानंतर सन २००१ मध्ये महाराष्ट्र राज्याने आपले दूसरे महिला धोरण जाहीर केले. महिला धोरण बनवित असताना प्रत्येक तीन वर्षांनी महिला धोरणाचा पाठपुरावा घेण्याची व प्रत्येक तीन वर्षांनी नवीन महिला धोरण जाहीर करण्याची बाब देखील नमूद करण्यात आली होती. परंतु ही बाब फक्त कागदावरच राहिली. कारण जर प्रत्येक तीन वर्षांनी महिला धोरणांचे मुल्यांकन करुन नवीन धोरण तयार करण्याची प्रक्रिया अंमलात आणली असती तर वर्तमान धोरण हे ‘सहावे’ धोरण असते. अभियान ट्रस्ट च्या क्रांतिज्योती या प्रकल्पामध्ये एक महिनाभर मी अभ्यासकार्य करीत असतांना मला असे दिसून आले की, समाजातच नव्हे तर शासन प्रशासनात देखील या महिला धोरणाबाबत उदासिनता आहे. बहुजन समाजातील बहुतांश महिलांना राज्याचे धोरण म्हणजे काय हेच माहित नाही तर महिला धोरण ही बाब दूरची आहे, या बाबीला मी देखील अपवाद नव्हते.
बहुजन समाजातील महिलांना लिंग, वर्ण व जात या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जातीव्यवस्थेच्या क्रमिक असमानतेमुळे बहुजन समाजातील प्रत्येक जाती-जमातीच्या महिलांच्या समस्यांचे स्वरुप जरी वर वर सारखे दिसत असले तरी त्याची कारणे वेगवेगळी आहेत.
महाराष्ट्रात एससी, एसटी, एनटी, डीएनटी, ओबीसी, एसबीसी या प्रवर्गातील महिलांचे प्रमाण पाहता महिला धोरण ठरविताना या महिलांच्या समस्येचा प्रामुख्याने विचार केला जातो की नाही हे तपासून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने तयार केलेल्या धोरणाचे मूल्यमापन होणे गरजेचे आह. जर धोरणाच्या तरतूदींचे मुल्यांकन, फलनिष्पत्ती तपासली असती तर हे लक्षात आले असते की बहुजन समाजातील महिला आजही विकासापासून का वंचित आहेत ? महिला या महत्वपूर्ण समाजघटकाच्या विकासासाठी, संवैधानिक हक्क-अधिकारांसाठी अशा प्रकारचे धोरण तयार करतांना मागासवर्गातील जाणकारांचा धोरण तयार करतांना विचार लक्षात घेणे आवश्यक आहे. धोरणाच्या मूल्यमापनावर भर देणे ही अत्यंत महत्वाची बाब मानली गेली पाहिजे. एवढेच नाही तर धोरण तयार करतांना, त्याचा मसुदा तयार करतांना सर्व नागरिकांकडून सूचना मागविण्यासाठी तो खुला करणे, प्रकाशित करणे आवश्यक आहे.
बहुजन समाजातील महिलांचा, जाणकार व तज्ञ व्यक्तींचा, संस्था संघटनांचा अशा प्रकारचे धोरण तयार करतांना सहभाग असणे गरजेचे आहे. कारण, बहुजन समाजातील व्यक्तीला स्वत:च्या समस्येची जेवढी तीव्र जाणिव असेल तेवढी बहुजनेत्तर व्यक्तीला असेलच असे नाही. परंतु परिस्थिती अशी आहे की या समस्यांना सोडविण्यासाठी मार्गदर्शक स्वरुपात तयार केल्या जाणार्‍या धोरणाबाबत बहुजन समाजातील बहुतांश लोकांना माहिती नाही. म्हणून बहुजन समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत धोरणाबाबत माहिती पोहचणे गरजेचे आहे. जर बहुजन समाजातील सुशिक्षित तज्ञ व्यक्तींनी या धोरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रितीने सहभाग घेतला नाही तर बहुजन समाजातील महिलांचे फार मोठे नुकसान होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये प्रथमत: १९९४ साली महिला धोरणाची सुरुवात झाली. १९९४ साली तयार करण्यात आलेले धोरण हे महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी करण्यात आले. त्यानंतर २००१ साली दूसरे धोरण तयार करण्यात आले. धोरण तयार करतांना असे नमूद करण्यात आले कह दर तीन वर्षांनी सुधारित धोरण तयार करावे. असे असले तरी बर्‍याच कालावधीनंतर आता तसेच तिसरे महिला धोरण तयार करण्यात येत आहे. या तिसर्‍या धोरणाचा मसूदा सन २०१० साली माविम (महिला आर्थिक विकास महामंडळ) या शासनाच्या संस्थेने तयार केला आहे.
शासन प्रशासनास भारतीय राज्य घटनेने घालून दिलेल्या नियमांचे व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागते. घटनेमध्ये प्रत्येक बाब विस्ताराने स्पष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे काही नियम व मार्गदर्शक बाबी दिलेल्या आहेत. त्यांना लक्षात घेऊन राज्याने आपल्या नागरिकांच्या विकासासाठी हक्क अधिकारांसाठी निरनिराळया योजना तयार करुन त्या राबवाव्या लागतात. या योजनांवर अंमल करण्याचे काम प्रशासनाचे असते. बहुतांश वेळा कायदेमंडळातील लहरी राजकीय नेत्यांमुळे, मंत्र्यांच्या वारंवार हस्तक्षेपामुळे कित्येक योजना बदलल्या जातात तर कित्येक योजना बंद केल्या जातात. इतकेच नाही तर अनेकदा शासन प्रशासनाच्या उदासिनतेमुळे योजना कागदावरच राहतात, किंवा त्या योजना का व कशा राबवाव्यात याबद्दल स्पष्टता, एकवाक्यता नसते अशा वेळी एक मार्गदर्शक दस्तावेज म्हणून धोरणाची आवश्यकता निर्माण होते. या अर्थाने धोरण म्हणजे स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती पावले त्वरित उचलू शकेल, याची निश्चिती करणारा दस्तावेज आहे. हे धोरण या बदलांशी सुसंगत राहण्याच्या दृष्टीने दर तीन वर्षांनी या धोरणांतर्गत घेतलेल्या निर्णयांची फेरतपासणी करून त्यात आवश्यकतेनुसार बदल घडवून आणण्याचा शासनाचा मनोदय आहे.
घटनेच्या चौथ्या भागात मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख आहे. देशामध्ये कोणत्याही विचारप्रणालीचे अथवा पक्षाचे शासन अधिकारावर आले तरी त्याने ही मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत मानून त्यानुसार आपले धोरण आखणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमधील काही महत्वपूर्ण कलमे पुढीलप्रमाणे आहेत.
मार्गदर्शक तत्त्वे
आर्थिक स्वरुपाची मार्गदर्शक तत्त्वे
कलम ३९ : सरकारने आपले धोरण अशा प्रकारे आखावे की ज्यायोगे सर्व नागरिकांना स्त्री-पुरुषांना समान दर्जाच्या कामासाठी समान वेतन मिळेल.
कलम ४१ : राज्याच्या आर्थिक क्षमतेनुसार सर्वांना शिक्षण व रोजगार देण्याचा प्रयत्न करील आणि बेकारी, वृद्धत्व, आजारपण यापासून संरक्षण देण्यासाठी सरकारी मदत देईल.
कलम ४२ : स्त्रियांना बाळंतपणाच्या काळात सहाय्य व्हावे यासाठी राज्य प्रयत्नशील राहिल.
कलम ४३ : काम करणार्‍या श्रमिकांना निश्चित रोजगार, योग्य वेतन, विश्रांती, राहणीचा उत्तम दर्जा, सामाजिक आणि सांस्कृतिक कामांची संधी लाभावी तसेच ग्रामीण भागात  वैयक्तिक आणि सहकारी पायावर कुटिरोद्योग स्थापन करण्याचा प्रयत्न करील.
कलम ४८ : पर्यावरणात सुधारणा घडवून आणणे, जंगले व जंगली श्वापदे यांचे संरक्षण व संवर्धन करणे.
सामाजिक स्वरुपाची मार्गदर्शक तत्त्वे
कलम ४५ : चौदा वर्षाखालील सर्व मुला-मुलींना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणे.
कलम ४६ : समाजातील दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि जमातींना अन्याय आणि शोषणापासून संरक्षण देणे.
कलम ४७ : पौष्टिक अन्नाचा पुरवठा करून लोकांचे जीवनमान उंचावणे.
कलम ४९ : ऐतिहासिक आणि कलात्मक दृष्टिने राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांचे आणि वस्तूंचे संरक्षण करणे.
प्रशासनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे
कलम ४० : ग्रामपंचायती स्थापन करून त्यांना स्थानिक स्वराज्य शासनाचे कार्यक्षम घटक बनविण्यासाठी योग्य ते अधिकार आणि सत्ता देण्यात येईल.
कलम ५० : सर्व सरकारी सेवांमधून कार्यकारी आणि न्यायालयीन अधिकारांची फारकत करण्यात येईल.
संविधानातील मार्गदर्शन तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेता येत नाही. अशावेळी लोकमत आणि लोकमताची शक्ती ही तत्त्वे अंमलात आणण्यास शासनास भाग पडेल.
उद्दिष्टय़े :
१) मागासवर्गीय, अनुसूचित महिला यांचा राजकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिक विकास होण्यासाठी समानतेची संधी निर्माण करून त्यांची अंमलबजावणी करावी.
२) खुल्या वर्गातील महिलांच्या बरोबरीने एससी, एसटी, एनटी डीएनटी, ओबीसी, अल्पसंख्यक या वर्गातील महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण करण्यासाठी महिला आरक्षणामध्ये विशेष मागासवर्गीय महिला आरक्षण दिले जावे.
३) या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी महिला व पुरुषांच्या समानतेसाठी झटणार्‍या जातीय, वर्गीय, लिंग आधारित धार्मिक भेदभाव दूर करण्यासाठी झटणार्‍या संस्था/संघटना व व्यक्तींना बरोबर घेऊन त्यांच्या सहकार्याने महिला विकास विषयक कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी शासन घेईल.
माझ्या मते धोरणांमध्ये पुढील बाबींवर देखील विचार करण्यात यावा.
स्त्रियांचा छळ - स्त्रियांवर होणारा छळ या संकल्पानेतच शारिरीक, मानसिक, सामाजिक, लैगिंक, शाब्दिक छळ यांचा समावेश होतो. स्त्रियां अनेक वर्षांपासून त्यांच्यावर होणारा अन्याय सहन करीत आहेत. परंतु आजची परिस्थिती बदलेली आहे. महिलांचा कौटुंबिक आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनातील सहभाग वाढत आहे. त्या अधिक बोलक्या, निर्णय प्रक्रियेत सहभाग घेणार्‍या सकारात्मक विकास मुल्यांसाठी आग्रही झाल्या आहेत. परंतु सर्वच महिलांचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. मागासवर्गीय महिलांना त्यांच्या हक्कांची व अधिकारांची माहिती नाही. समाजातील जुन्या रुढी, परंपरा, जातीभेद, खच्चीकरण, लिंगभेद या समस्यांना महिला तोंड देत आहेत.
सर्व महिलांना शारीरिक, मानसिक, लैंगिक, सामाजिक व भावनिक स्थितीमध्ये बदल घडवून विकास साध्य करण्यासाठी प्रथम विशेष गरजू महिलांसाठी धोरणामध्ये विशेष तरतुदी केलेल्या असाव्यात. जेणेकरून समानतेच्या मुल्याआधारे त्या आपले विकासातील योगदान देऊ शकतील.
निवारा - समाजातील प्रत्येक महिलेला सुरक्षित निवारा मिळण्याचा हक्क संविधानाने दिला आहे. त्यामुळे ज्या महिला समाजात असुरक्षित आहेत त्यांना शासनाने सुरक्षित निवारा मिळवून देणे, ज्या महिला अनुसूचित जाती-जमातीमधील आहेत. त्यांना विशेष निवारा उपलब्ध करून देणे, तसेच भटक्या समाजातील महिला, परित्यक्ता, विधवा, कुमारी माता व देवदासी यासारख्या महिलांना सुरक्षित निवारागृहाची सोय करणे.
आरोग्य - जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची केलेली संकल्पना शारीरिक, मानसिक, प्रजनन, लैंगिक, सामाजिक, आरोग्य यांच्यात समतोल राखणे. त्या संकल्पनेप्रमाणे समाजातील सर्व स्तरातील महिलांना आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. परंतु अजूनही ग्रामीण भागात वेशीबाहेरील वस्तीमध्ये दुर्गम भागात आरोग्याच्या मुलभूत सेवा उपलब्ध नाहीत.
शिक्षण - महिला वर्ग अनेक वर्षापासून शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे. आजची स्थिती पाहता उच्च वर्गातील महिला मोठय़ा प्रमाणात शिक्षण घेतात. परंतु मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जातीमधील महिलांचा शिक्षण या क्षेत्रात विकास होण्यासाठी त्यांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा देऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी या महिलांना जागृत करणे व त्यांच्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणे.
वसतिगृहे - गरजू महिलांसाठी वसतिगृहे निर्माण करावी. तसेच ज्या महिला शिक्षणापासून वंचित आहे,मागासवर्गातील अनुसूचित जाती-जमातीमधील महिलांना विशेषत: वसतिगृहाची मोफत सोय असावी. तसेच वसतिगृहात प्रसाधनाची सोय व योग्य व्यवस्था करावी व वसतिगृहे ही स्वच्छ व प्रसन्न असली पाहिजेत, सर्वांत महत्त्वाचे वसतिगृह हे रहदारी असणार्‍या विभागात असावे.
कृषी काम करणार्‍या महिला - देशातील सर्वात मोठय़ा प्रमाणात महिलांसाठी शेतीमध्ये काम करतात. या महिला काबाडकष्ट करूनदेखील त्यांचा विकास झालेला नाही. कृषी या क्षेत्रात बहुजन समाजातील महिलांचा मुख्य सहभाग असलेला आढळतो. त्यामुळे या महिलांचा विकास साध्य करण्यासाठी धोरणामध्ये काही बदल करून त्यास कृषी काम करणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन शेतीकाम करणार्‍या महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी संधी व कर्ज पुरवठा करणे या महिलांच्या वेतनात वाढ केली जावी.
कायद्यात बदल - महिलांवर होणारे अत्याचार व अन्याय वाढत आहेत. तसेच शासनाने केलेल्या कायद्यांना अनेक पळवाटा देखील आहेत. त्यामुळे महिलांवर होणार्‍या गंभीर स्वरुपाच्या अत्याचारासाठी कायदे मंडळाने कायद्यात बदल करून त्या कायद्याची प्रशासनामार्फत अंमलबजावणी करावी. उदा. अनुसूचित जाती - अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ व नियम १९९५
नियंत्रण व मूल्यमापन - महिला धोरणात आजपर्यंत झालेल्या धोरणांचे मूल्यमापन केले जावे. कारण महिला धोरण १९९४ व महिला धोरण २००१ चे धोरण पाहता आपल्या निदर्शनास येईल की, ज्याप्रमाणे धोरण करण्यात आले आहे त्याचा पुर्णपणे परिणाम महिलांवर झाला आहे का? किंवा ज्यांच्यासाठी धोरण तयार केले जाते त्यांना धोरण म्हणजे काय हे माहित आहे का? असा प्रश्न माझ्या मनास नेहमी भेडसावतो. त्यामुळे नियंत्रण व मूल्यमापन या दोन गोष्टी धोरणात असणे फार आवश्यक आहे. नियंत्रण व मूल्यमापनामुळे आपण केलेले धोरण किती प्रमाणात यशस्वी झाले तसेच त्या धोरणातील त्रुटी समजतील.

- रेश्मा कांबळे

विद्यार्थिनी, समाजकार्य,
भारती विद्यापीठ, पुणे